नावीन्यपूर्ण वन डिश मील

सुनीता गंभीर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

थंडीच्या दिवसात रात्रीच्या जेवणासाठी, गरम गरम आणि झटपट होणारा तसेच परिपूर्ण आहार होईल असा  पदार्थ पाहिजे असतो. वन डिश मीलमुळे अनेक पदार्थ करायचे कष्टही वाचतात. असेच काही नावीन्यपूर्ण पदार्थ खास तुमच्यासाठी.

भाताचे मुटके
साहित्य : दोन वाट्या मऊसर शिजलेला भात (सकाळीच करून ठेवावा), अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, १ छोटा चमचा गव्हाचे पीठ, ४-५ पाकळ्या लसूण, ३-४ अमसुले, १ चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, मूठभर भाजलेले शेंगदाणे, १ वाटी गवार (कोणतीही भाजी चालेल), तिखट, मीठ, हळद, फोडणीचे साहित्य.
कृती : भातामध्ये दोन्ही पिठे, हळद, तिखट, मीठ चवीनुसार घालून नीट मळून त्याचे छोटे गोळे करावेत. पातेल्यात तेलाची फोडणी करून कढीलिंब, लसणाची पेस्ट घालून थोडे परतावे. मग त्यात शेंगदाणे व गवारीचे तुकडे घालून झाकून थोडे वाफवावे. मुटके बुडतील इतके गरम पाणी घालावे. रस्सा जास्त हवा असल्यास पाणी वाढवावे. चवीप्रमाणे तिखट, मीठ, अमसूल, धणे-जिरे पूड घालून झाकण ठेवावे व १०-१२ मिनिटे शिजू द्यावे. नंतर वर कोथिंबीर पेरावी.

व्हेज डाळ फळ
साहित्य : चार वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी चिरलेली मेथी (कोथिंबीर/पालक काहीही आवडीप्रमाणे), अर्धी वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ, १-२ कांदे, ७-८ लसूण पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा, ४-५ अमसुले, २ चमचे सुक्या खोबऱ्याचा कूट, १ चमचा धणे-जिरे पूड, १ चमचा गरम मसाला, तिखट, मीठ, हळद, गूळ चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य.
कृती : तिन्ही डाळी कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कणकेमध्ये चिरलेली मेथी, चवीप्रमाणे लाल तिखट (किंवा मिरच्या), निम्मी लसणाची पेस्ट व धणे-जिरे पूड, थोडे तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून ठेवावे. नेहमीच्या पोळीपेक्षा थोड्या जाडसर पोळ्या लाटून पसरून ठेवाव्यात. आता मोठ्या पातेल्यात तेलाची फोडणी करून उरलेली आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतावे. शिजलेली डाळ हाटून घालावी. अंदाजाने गरम पाणी घालून तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, धणे-जिरे पूड, अमसूल, गूळ घालून नेहमीपेक्षा पातळ आमटी करावी. उकळी आल्यावर लाटलेल्या एकेक पोळ्यांच्या कापण्या करून भराभर आमटीत सोडाव्यात. १०-१५ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. नंतर कोथिंबीर पेरावी.
टीप : सकाळीच डाळी कुकरमध्ये शिजवून आणि कणीक भिजवून फ्रिजमध्ये ठेवता येईल.

खुसखुशीत थालीपीठ
साहित्य : दोन वाट्या थालीपीठ भाजणी, पाव वाटी कढवलेल्या तुपाची बेरी, पाव वाटी ओल्या नारळाचा चव, १ कांदा बारीक चिरून (किंवा कोणतीही भाजी), तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे, अर्धा चमचा जिरे पूड, तेल, कोथिंबीर.
कृती : भाजणीमध्ये चिरलेला कांदा, तिखट, मीठ, हळद, जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेरी, नारळाचा चव घालून मळून घ्यावे. नेहमीपेक्षा थोडी जाडसर थालीपीठ थापून तेलावर खमंग भाजवे.

मिक्स व्हेज बास्केट
साहित्य : एक वाटी बारीक रवा, २ वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी  फ्लॉवरचे तुकडे, १ वाटी हिरवा वाटाणा, अर्धी वाटी गाजराचे तुकडे, १ वाटी बटाट्याच्या फोडी, २ कांदे बारीक चिरून, २ टोमॅटोच्या फोडी (किंवा घरात असणाऱ्या कोणत्याही भाज्या), १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा चमचा धणे-जिरे पूड, १ चमचा पावभाजी मसाला, फोडणीचे साहित्य.
कृती : रवा व कणीक एकत्र करून चवीपुरते मीठ घालावे. हाताने मुटके करता येतील इतके लोणी (थोडे गरम करून) पिठात घालावे व पीठ पोळीसाठी भिजवतो त्याप्रमाणे भिजवावे. कढईत तेल घालून फोडणी करावी. त्यात आले-लसूण पेस्ट तसेच कांदा आणि उरलेल्या सर्व भाज्या घालून चवीप्रमाणे तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, मसाला घालावा व वाफेवर शिजवावे. भाजी मोकळी झाली पाहिजे. आता  
पिठाचे हवे असलेल्या आकाराचे एकसारखे गोळे करावेत. प्रत्येक गोळा लांबट आकाराचा आणि पुरीपेक्षा जाडसर लाटावा. मध्यभागी मावेल इतकी भाजी घालून बास्केटचा आकार देत चारही बाजू नीट दाबाव्यात. ओव्हन आधी गरम करून घ्यावा. १६० डिग्रीवर १०-१५ मिनिटे भाजावे किंवा पॅनमध्ये थोड्या तेलात परतावे. चटणी अथवा सॉसबरोबर सर्व्ह करावे.

बाजरीचा उपमा
साहित्य : दोन वाट्या बाजरीचे पीठ, १ मोठा कांदा, ४-५ लसूण पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा, मूठभर भाजलेले शेंगदाणे, अर्धे लिंबू, तिखट, मीठ, साखर, ओले खोबरे, कोथिंबीर, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती : बाजरीच्या पिठात चवीपुरते मीठ आणि एक चमचा तेल घालून भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे. त्याचे छोटे आणि चपटे गोळे करून सकाळीच भाताबरोबर कुकरमध्ये वाफवून ठेवावेत. कढईत तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, चिरलेला कांदा घालून परतावे. गुलाबी रंग आल्यावर भाजलेले शेंगदाणे घालावे. बाजरीच्या गोळ्यांचा कुस्करा आधीच करून ठेवावा, म्हणजे शेंगदाणे परतले की लगेच घालता येतील. त्यात खोबरे, कोथिंबीर सोडून उरलेले सर्व जिन्नस घालून चांगले परतावे. एक वाफ आणावी. खोबरे, कोथिंबिरीने सजवावे.

पौष्टिक दशमी
साहित्य : एक वाटी वाफवलेल्या लाल भोपळ्याचा कुस्करा, १ वाटी गूळ, गव्हाची कणीक, २ मोठे चमचे बदाम काजू पावडर, पाव चमचा वेलदोडे पूड, तेल, मीठ.
कृती : भोपळ्याच्या कुस्कऱ्यामध्ये गूळ मिसळून ठेवावा. गूळ विरघळल्यावर त्यात चवीपुरते मीठ, बदाम काजू, वेलदोडे पूड आणि दोन चमचे तेलाचे मोहन घालून पोळीसारखी कणीक मळून घ्यावी. पोळीप्रमाणेच घडी घालून दशम्या थोड्या जाडसर लाटून तेलावर भाजाव्यात. शेंगदाण्याची चटणी, लोणचे, तुपाबरोबर सर्व्ह करावे.

तिखट केक
साहित्य : तीन वाट्या तांदूळ (कोणताही), १ वाटी तूर, मूग, मसूर आणि उडीद डाळ एकत्रितपणे, १ वाटी कोणत्याही भाजीचा कीस किंवा पेस्ट (दुधी भोपळा/मेथी/लाल भोपळा/पालक इ.), २ चमचे धणे-जिरे पूड, तिखट, मीठ, साखर चवीप्रमाणे, फोडणीसाठी तेल व तीळ.
कृती : तांदूळ आणि डाळी धुऊन सात-आठ तास भिजवावेत. इडलीच्या पिठाप्रमाणे सात-आठ तास आंबवून घ्यावेत. पिठात सर्व  जिन्नस नीट मिसळावेत. केकपात्र किंवा कोणतेही पसरट भांडे घेऊन त्याला तेल लावून पीठ घालावे. १६० डिग्रीला ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे किंवा पॅनमध्ये ठेवून गॅस मंद ठेवून ३०-३५ मिनिटे बेक करावे. गार झाल्यावर तेलात तिळाची फोडणी करून वर ओतावी. चटणी, सॉसबरोबर सर्व करावे. 

व्हेज रोटी नूडल्स
साहित्य : पाच-सहा पोळ्या, १ मध्यम कांदा, २ ढोबळी मिरच्या, २ टोमॅटो, १ वाटी चिरलेला कोबी, अर्धी वाटी हिरवा वाटाणा किंवा मोड आलेले कोणतेही कडधान्य, २ चमचे शेजवान चटणी किंवा मॅगी मसाला, मीठ, साखर चवीप्रमाणे, तेल, चीज आणि टोमॅटो सॉस (ऐच्छिक).
कृती : सर्व भाज्या लांबट आकारात चिराव्यात. पोळ्या एकावर एक ठेवून त्याची वळकटी करावी व नूडल्ससारखे लांब तुकडे होतील अशा चिराव्यात. कढईत भाज्या नीट परतल्या जातील इतके तेल घालून भाज्या नीट परतून थोडी वाफ आणावी, म्हणजे भाज्या अर्धवट शिजतील. आता पोळीचे तुकडे मीठ, साखर, चटणी/मसाला घालून परतावे व एक वाफ आणावी. वर चीज, टोमॅटो सॉस घालून सर्व्ह करावे.

बाजरीचा मसाले भात
साहित्य : दोन वाट्या बाजरी, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, पाव वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मटार, प्रत्येकी पाव वाटी गाजर, फ्लॉवरचे तुरे, १ चिरलेला कांदा (अजून काही भाज्या ऐच्छिक), २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ चमचे गरम मसाला, हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य, ओले खोबरे, कोथिंबीर.
कृती : बाजरी थोडी ओलसर होईल इतकेच पाणी घ्यावे. त्यात थोडे मीठ विरघळवून ते पाणी हाताने बाजरीला चोळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. मिक्सरमधून हलकेच फिरवून चाळणीने चाळावे. तांदूळ आणि डाळीही धुऊन निथळून घ्याव्यात. आता सर्व जिन्नस एकत्र करून फडक्यावर पसरून वाळवून घ्यावेत. कढईत थोडेसे गरम करून घेतले की हवे तेव्हा वापरता येतात.
भात करण्यासाठी, पातेल्यात किंवा कुकरमध्ये तेलाची फोडणी करावी. त्यात तमालपत्र, कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, सर्व भाज्या घालून हलवावे. आता वरील धान्याचे मिश्रण, तसेच तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि गरम पाणी (अंदाजाने तिप्पट प्रमाण) घालून नीट ढवळावे. मंद आचेवर कुकरच्या चार-पाच शिट्या कराव्यात. वर खोबरे कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या