झटपट खाऊ

सुनीता मिरासदार
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

फूड पॉइंट
खवय्यांसाठी सगळे ऋतू सारखेच असतात, तर खाण्यासाठी ठराविक वेळादेखील नसतात. यात तळलेल्या पदार्थांचा सर्वांत वरचा नंबर असतो. अशा खवय्यासाठी झटपट आणि गोड-तिखट चविच्या काही रेसिपीज इथे देत आहोत...

नारळ-गुलकंद शंकरपाळी
साहित्य : एक वाटी नारळचव, अर्धी वाटी गुलकंद, १ वाटी तांदुळपिठी, १ वाटी हरभरा डाळीचे पीठ, २ चमचे कणिक, १ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी वनस्पती तूप, वेलची पूड.
कृती : अर्धा चमचा तुपावर नारळचव चांगला परतावा. आवडीनुसार पिठीसाखर घालावी. गुलकंद, वेलची पूड, नारळचव, पिठीसाखर एकत्र करावे. कणीक, तांदुळपिठी, डाळीचे पीठ, गरम तूप घालून मिसळावे. नारळचव, गुलकंदाचे मिश्रण पिठात घालून पाणी किंवा दुधाने पीठ घट्ट भिजवून ठेवावे. मीठ मळून जाडसर पोळी लाटावी. लहान लहान शंकरपाळी कापून वनस्पती तुपात तांबूस रंगावर तळावीत. शंकरपाळी खाताना गुलकंदाचा वास चांगला वाटतो. ही शंकरपाळी आठ दिवस चांगली राहतात.

पुडाच्या पुऱ्या
साहित्य : दोन वाट्या मैदा, ४ चमचे तेल, चिमुटभर मीठ.
सारण : एक वाटी नारळचव, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ आल्याचा तुकडा, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबूरस, साखर, मीठ.
कृती : आले, मिरच्या, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून नारळचवमधे मिसळावी. मीठ, लिंबूरस, साखर घालून नारळाचे चविष्ट सारण तयार करावे. सारण ओलसर झाल्यास कढईत घालून परतून थोडे कोरडे करावे. गरम तेलाचे मोहन चिमुटभर मीठ घालून मैदा घट्ट भिजवून ठेवावा. पिठाच्या पातळ पुऱ्या लाटून त्यावर १ चमचा नारळाचे सारण घालून आडव्या आकाराची पुरी करावी. गरम तेलात मंद आचेवर पुरी खमंग तळावी. गरम पुरी टोमॅटो सॉस, पुदिना चटणीबरोबर चवदार लागते.

ताकातली कडबोळी
साहित्य : एक वाटी आंबट ताक, २ वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी तांदुळपिठी, २ चमचे हरभरा डाळीचे पीठ, १ चमचा जिरे, १ चमचा ओवा, १ चमचा तीळ, ८-१० लसूण पाकळ्या, ४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, हळद, मीठ, तेल.
कृती : ज्वारी पीठ, तांदुळपिठी, हरभरा डाळीचे पीठ एकत्र करावे. लसूण, आले, मिरच्या, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून पिठात घालावे. नंतर ओवा, जिरे, हळद, मीठ, ३ चमचे गरम तेलाचे मोहन घालून ताकात पीठ भिजवावे. लागल्यास पाणी वापरावे. तेलाचा हात लावून पीठ मळून कडबोळ्या वळाव्यात. ताटलीत तीळ पसरून कडबोळ्या तिळात घोळवाव्यात. तेल तापवून मंद आचेवर कडबोळी खमंग तळावीत. गरम ताजी कडबोळी छान लागतात. दुसऱ्या दिवशी गोडसर दह्याबरोबर चविष्ट लागतात. आठ दिवस चांगली राहतात. 

चॉकलेट चुरमुरे
साहित्य : चार वाट्या चुरमुरे, १ वाटी गूळ, १ चमचा साजूक तूप, अर्धा चमचा वेलची पूड, १ चमचा चॉकलेट पावडर किंवा चॉकलेट बार वितळून.
कृती : कढईमध्ये तूप, गूळ घालून गोळीबंद पाक करावा. पाकात वेलदोडे पूड, चॉकलेट पावडर किंवा वितळवलेला चॉकलेट बार घालावा. पाकात थोडे भाजलेले शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे घालून मिसळावे. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण थापावे. मिश्रण कोमट असतानाच चौकोनी वड्या कापाव्यात. चॉकलेट चुरमुरे मुलांना डब्यात देता येतात. मुलांचा आवडता खाऊ आहे. आठ दिवस चांगले राहतात.

कणकेच्या कापण्या
साहित्य : दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी तांदुळपिठी, दीड वाटी चिरलेला गूळ, ४ चमचे तुपाचे मोहन, १ चमचा खसखस, १ चमचा तीळ, दुध.
कृती : अर्धी वाटी दूध कोमट करावे. त्यात वनस्पती तूप घालावे. गूळ घालावा. चिमुटभर मीठ घालावे. गुळाचे खडे मऊ करावेत किंवा दूध, गूळ मिक्‍सरमधून एकजीव करावे. कणीक, तांदूळपिठी, खसखस, तीळ एकत्र करून गूळ, दुधाच्या मिश्रणात पीठ घट्ट भिजवून ठेवावे. १० मिनीटांनी पीठ चांगले मळून पिठाची थोडी जाडसर पोळी लाटावी. कातणीने शंकरपाळ्याप्रमाणे काप करावेत. रिफाइंड तेलात कापण्या खरपूस तळाव्यात. खुसखुशीत कापण्या चहा, कॉफीबरोबर छान लागतात. गुळामुळे कापण्या खमंग लागतात. ३-४ दिवस चांगल्या राहतात.

भोपळा घारगे
साहित्य : अर्धा किलो तांबडा भोपळा, दीड वाटी गूळ, १ चमचा वेलचीपूड, ३ चमचे वनस्पती तूप, २ वाट्या तांदुळपिठी, अर्धी वाटी मैदा.
कृती : भोपळ्यातील बिया काढून भोपळा किसून घ्यावा. तुपावर कीस घालून वाफवून घ्यावा. कीस मऊ झाला, की त्यात गूळ घालून मंद गॅसवर परतावा. गूळ विरघळला की किसात वेलची पूड घालून कीस थंड होण्यास ठेवावा. तांदूळपिठी, मैदा, गरम तूप एकत्र मिसळावे. गूळ किसाच्या मिश्रणात तांदूळपिठी, मैदा घालून मळावे. लागल्यास दूध वापरावे. पीठ मळून जाडसर पुऱ्या लाटाव्यात. गरम रिफाइंड तेलात मंद आचेवर पुऱ्या तांबूस रंगावत तळाव्यात. गरम भोपळा घारगे, साजूक तूप, लिंबू लोणच्याबरोबर वाढावे. खुसखुशीत छान होतात. दुसऱ्या दिवशी जास्त चवदार लागतात.

जिरे मिरपुडीची शंकरपाळी
साहित्य : दोन वाट्या रवा, १ वाटी मैदा, २ चमचे दही, १ चमचा जिरेपूड, १ चमचा मिरपूड, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ, तेल.
कृती : रवा, मैदा, ३ चमचे गरम तुपाचे मोहन, चिमुटभर मीठ, जिरे-मिरेपूड, सोडा, दही घालून पीठ घट्ट भिजवून ठेवावे. अर्ध्या तासाने पीठ मळून पिठाची जाडसर पोळी लाटावी. पोळीवर थोडे जिरे, थोडी खसखस दाबावी. लाटणे फिरवावे. शंकरपाळी कातून मंद आचेवर लालसर तळावीत. कैरीचा छुंदा, लोणी बरोबर खुसखुशीत शंकरपाळी खायला सर्वांना आवडतात. ४-५ दिवस चांगली राहतात. प्रवासात नेता येतात.

भाजणी वडा
साहित्य : दोन वाट्या ज्वारी, २ वाट्या बाजरी, २ वाट्या हरभरा डाळ, अर्धी वाटी तांदूळ, उडीद दाळ, प्रत्येकी २ चमचे धने, १ चमचा जिरे, तिखट, मीठ, हिंग, तेल.
कृती : सर्व धान्ये कोरडी भाजावीत. धने, जिरे भाजून धान्यात मिसळून थोडे जाडसर दळून आणावे. २ वाट्या भाजणीत तिखट, मीठ, हिंग, हळद, बारीक चिरून कोथिंबीर, ३ चमचे गरम तेलाचे मोहन घालून कोमट पाण्यात भिजवून ठेवावी. अर्ध्या तासाने तेलाचा हात लावून मळून भाजणी पिठाचा वडा थापावा. वरून थोडे तीळ दाबावेत. गरम तेलात मंद आचेवर खरपूस तळावा. गरम भाजणी, वडा, दाण्याची दह्यात कालवलेली चटणी, लोणीबरोबर खमंग लागतो. शिल्लक भाजणी केव्हाही वापरावी. चांगली राहते. कांदा घालून भाजणीचे चवदार थालीपीठ करावे.

कुरकुरीत कुरकुरे
साहित्य : दीड वाटी कणिक, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ, अर्धी वाटी तांदूळपिठी, अर्धी वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, २ चमचे खसखस, १ चमचा तिखट, १ चमचा ओवा.
कृती : खोबऱ्याचा कीस थोडा भाजून मिक्‍सरमधून बारीक करावा. खसखस भाजून त्यात मिसळावी. सर्व पीठे एकत्र करून त्यात खोबरे, खसखस, तिखट, मीठ, ओवा, १ चमचा जिरेपूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ चमचे गरम तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवून ठेवावे. तेलाचा हात लावून पीठ चांगले मळावे. पिठाची पातळ पोळी लाटावी. पोळीच्या लांबट पट्ट्या कापाव्यात. गरम तेलात खरपूस तळाव्यात. चहाबरोबर अगर चटणीबरोबर कुरकुरे मस्त लागतात. बिस्किटाऐवजी बदल चांगला वाटतो. छोट्या पुऱ्या तळल्या तरी चालतात.

संबंधित बातम्या