पनीरचे चविष्ट पदार्थ

सुनीता थोरात, सोलापूर
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

पनीर चीज रोल
साहित्य : पनीर पाऊण कप, चीजचे क्‍यूब पाव कप, सिमला मिरची बारीक चिरलेली २ टेबल स्पून, कांदा बारीक चिरलेला २ टेबल स्पून, लसूण १ टीस्पून, गरम मसाला १ टेबल स्पून, कॉर्न फ्लॉवर २ टेबलस्पून, मैदा २ टेबल स्पून, हिरवी मिरची आवडीनुसार, कोथिंबीर २ टेबल स्पून, मीठ आवश्‍यकतेनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती : पॅनमध्ये तेल घेऊन त्यावर कांदा परतावा. कांदा भाजला, की लसूण परतून घ्यावा. सिमला मिरची, हिरवी मिरची घालून थोडी भाजली, की मीठ व गरम मसाला घालून एक वाफ आणावी. कुस्करलेले किंवा पनीरचा कीस घालावा. कोथिंबीर घालून सर्व मिश्र करावे. हे मिश्रण थंड झाले, की एकजीव होण्यासाठी ब्रेडक्रम्स घालून एकत्र करावे. गोल किंवा लांबट गोळे करताना चीजचा एक क्‍यूब घालावा व गोळा बनवावा. हा गोळा ब्रेडक्रम्समध्ये घोळून नंतर कॉर्नफ्लॉवर व मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून परत ब्रेडक्रम्समध्ये घोळून डीप फ्राय करावा.

उपासाचे पनीर रोल
साहित्य : पनीर अर्धा कप, उकडलेले बटाटे २, चिलिफ्लेक्‍स/हिरवी मिरची पेस्ट १ टेबल स्पून, भिजवलेला साबुदाणा ४ टेबल स्पून, मीठ गरजेनुसार, तेल शॅलो फ्रायसाठी.
कृती : प्रथम पनीर व बटाट्याचा चुरा करून घ्यावा. यात साबुदाणा एकत्र करावा. हिरवी मिरची पेस्ट व मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. लांबट आकाराचे रोल करून राजगिऱ्याच्या पिठात घोळून शॅलो फ्राय करावे. दह्यासोबत सर्व्ह करावे.

पनीर चीज पराठा
साहित्य : पनीर अर्धा कप, चीज पाव कप, धने पूड अर्धा टेबल स्पून, जिरे पूड अर्धा टेबल स्पून, हिरवी मिरची ३ ते ४, कोथिंबीर १ टेबल स्पून, मीठ चवीनुसार, गव्हाचे पीठ २ कप.
कृती : गव्हाच्या पिठात १ टेबल स्पून तेल घालून घट्ट कणीक मळून ठेवावी. पनीर व चीजचा खिस घेऊन त्यात धने, जिरेपूड, मिरची, कोथिंबीर, मीठ घालून एकत्र करावे. सारण तयार झालं. कणकेचा गोळा करून त्यात पनीर चीजच सारण भरून पराठा लाटावा. वरून तूप लावावे.

पनीर पुरी
साहित्य : पनीरचा कीस अर्धा कप, गव्हाचे पीठ १ कप, जिरे १ टेबल स्पून, हिरवी मिरची ३, गरम मसाला १ टीस्पून, चाट मसाला अर्धा टीस्पून, ओवा अर्धा टीस्पून.
कृती : कणकेत ओवा व मीठ घालून घट्ट भिजवावे. पनीरचा कीस घेऊन त्यात जिरे, गरम मसाला, हिरवी मिरची, चिमूटभर मीठ घालून एकत्र करावे. हे पनीरचे सारण तयार झाले, की कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या लाटून त्यात हे सारण भरून पुऱ्या तळून घ्याव्यात.

पनीरची खीर
साहित्य : पनीर २५० ग्रॅम, दूध २ लिटर, कॉर्न फ्लॉवर १ टेबल स्पून, साखर १ सपाट कप, वेलची, जायफळ पूड १ टीस्पून, केशर ६-७ काड्या.
कृती : दोन लिटर दूध आटवायला ठेवावे. कॉर्नफ्लोअर घालून घट्ट होईपर्यंत निम्मे आटवावे. साखर घालून विरघळली, की खाली उतरवून गार करावे. वेलची, जायफळ पूड व केशर घालावे. जाड किसणीवर किसून पनीर घालावे. फ्रीजमध्ये गार करून सर्व्ह करावे.

पनीर पकोडे
साहित्य : पनीरचे चौकोनी तुकडे १ कप, हरभरा डाळीचे पीठ अर्धा कप, तांदळाचे पीठ २ टेबलस्पून, हळद पाव टीस्पून, ओवा अर्धा टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, सोडा चिमूटभर, मीठ गरजेनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती : हरभरा डाळीचे पीठ व तांदळाच पीठ घेऊन त्यात ओवा, तिखट, हळद, मीठ व शेवटी सोडा घालून पातळ मिश्रण करावे. पनीरची एक चौकोनी स्लाईस बुडवून तळून घ्यावी. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

पनीर स्टफ मशरूम
साहित्य : मशरूम १ कप, पनीरचा कीस अर्धा कप, कांदा पात पाव कप, हिरवी मिरची ४ ते ५, चीज पाव कप कीस, लसूण बारीक केलेला २ टेबल स्पून, कोथिंबीर २ टेबल स्पून.
कृती : मशरूम स्वच्छ धुवून आतील सर्व काढून गोल करून घ्यावे. पनीरचा कीस, कांदा पात, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ घालून एकत्र करावे व हे मिश्रण मशरुममध्ये भरावे. वरून चीज किसून घालावे. पॅनवर तेल किंवा बटर घालून मशरूम ठेवावे. झाकण ठेवावे. पाच मिनिटांनंतर वाफ येते. पनीर स्टफ मशरूम तयार.

पनीर सीख कबाब
साहित्य : दोनशे ग्रॅम पनीर कीस, कांदा १ चिरून, ब्रेडक्रम्स पाव कप, कॉर्नफ्लॉवर ३ टेबल स्पून, धने पूड अर्ध टीस्पून, जिरे पूड अर्धा टीस्पून, गरम मसाला १ टीस्पून, चाट मसाला अर्धा टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, हिरवी मिरची ३, मीठ गरजेनुसार.
कृती : एका भांड्यात पनीरचा कीस घेऊन त्यात कांदा, कोथिंबीर, कॉर्न फ्लॉवर, धने, जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची, ब्रेडक्रम्स घालून एकत्र करावे. स्टॉटे स्टीक घेऊन त्याला मिश्रण लावावे व शॅलो फ्राय करावे. बटरवर फ्राय करावे.

पनीर कटलेट
साहित्य : पनीरचा कीस १ कप, स्मॅश बटाटा पाव कप, हिरवी मिरची २, कांदा २ टेबल स्पून, आलं पेस्ट अर्धा टीस्पून, सिमला मिरची १ टेबल स्पून, कोथिंबीर १ टेबल स्पून, जिरे १ टेबल स्पून, ब्रेडक्रम्स ३ टेबलस्पून.
कृती : एका भांड्यात पनीरचा कीस, मॅश बटाटा, हिरवी मिरचीचे तुकडे, कांदा, आलं पेस्ट, सिमला मिरची, कोथिंबीर, जिरे घालून एकत्र करावे. कटलेटचा आकार देऊन ब्रेडक्रम्समध्ये घोळावे व पॅनवर शॅलो फ्राय करावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या