चविष्ट हलवा, गरमागरम खीर!

सुनीता थोरात
गुरुवार, 10 जानेवारी 2019

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.
सु

मुगाच्या डाळीचा हलवा

साहित्य : मूग डाळ एक कप, तूप अर्धा कप, खवा २०० ग्रॅम, दूध एक कप, साखर दोन कप, पाणी एक कप, बदामाचे काप आवडीनुसार, बेदाणे आवडीनुसार, पाच-सहा वेलचीची पूड
कृती : मूग डाळ स्वच्छ निवडून भिजत घालावी. चार-पाच तास डाळ भिजल्यावर पाणी काढून डाळ कपड्यावर पसरावी. डाळ सुकली, की मिक्‍सरमध्ये बारीक वाटावी. जाड बुडाच्या कढईत तूर गरम करून डाळ घालून मंद आचेवर सतत परतत राहावे. डाळ भाजत आली, की तूप सुटू लागते. डाळीला गुलाबी रंग आल्यानंतर दूध घालावे व मंद आचेवर वाफ येऊ द्यावी. खवा घालून परतावे. नंतर साखर घालून परतावे. साखर घातल्यावर खमंग परतावे. परतताना तूप सुटू लागेल. वेलची पूड, बदामाचे काप व बेदाणे घालून गॅस बंद करावा.
टीप : मूग डाळीचा हलवा जाड बुडाच्या कढईतच करावा. मंद गॅसवर परतावा. मूग डाळ चांगली भाजावी म्हणजे कच्चा वास लागणार नाही.

दुधी हलवा
साहित्य : दुधी भोपळा किस, दोन कप, तूप पाव कप, साखर एक कप, दुधावरची साय पाव कप, दुधावरची साय पाव कप, वेलची पूड पाव टीस्पून, काजू-बेदाणे आवडीनुसार, खायचा सोडा चिमूटभर
कृती : प्रथम दुधी भोपळ्याची साल काढावी. किसणीवर किसून घ्यावा. दुधीचा तुकडा तोंडात चावून पहावा. कडू दुधी असेल, तर तो दुधी स्वयंपाकात वापरू नये. किसलेला दुधी भोपळ्यावर चिमूटभर सोडा टाकून किस दोन हातात पिळून पाणी काढून टाकावे. कढीत तूप घालून किस परतावा, नंतर साखर घालून परतावे. साखर विरघळेल व साय घालावी. मिश्रण ओलसर असतानाच वेलची पूड, बेदाणे घालावी. दुधी हलवा थंड झाला की घट्ट होतो.
टीप : दुधीच्या किसाला चिमूटभर सोडा लावल्याने दुधीचा नैसर्गिक रंग टिकतो. सायीच्या ऐवजी खवा घालू शकतो.

गव्हाची खीर
पारंपरिक अशी खीर आहे. खिरीसाठी वेगळे गहू मिळतात. या गव्हाला खपली गहू किंवा जोड गहू म्हणतात.
साहित्य : गहू - अर्धा कप, तांदूळ २ टेबल स्पून, गूळ किसलेला अर्धा कप, ओलं खोबरं किसून पाव कप, काजू - बेदाणे आवडीनुसार, सुंठ पावडर पाव टीस्पून
कृती : प्रथम गव्हाची सालं काढावीत किंवा रेडिमेड पॉलिश केलेले गहू वापरावेत. रात्री गहू कोमट पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घालावेत. सकाळी कुकरमध्ये गहू व तांदूळ शिजवून घ्यावा. गहू फुटला, की समजावे शिजला. गूळ घालून मिक्‍स करावा. गूळ वितळून एकजीव झाला, की सुंठ पावडर घालावी. शेवटी काजू बेदाणे घालावे. नंतर ओले खोबरे किसून खिरीत मिक्‍स करावे.

तांदळाची खीर
साहित्य : तांदूळ दोन टेबल स्पून, दूध अर्धा लिटर, साखर पाव कप, केशर पाच-सहा काड्या, वेलची पूड - एक टीस्पून, तूप दोन टीस्पून, ड्रायफ्रूटस आवडीनुसार
कृती : प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून व सुकवून घ्यावेत. केशरमध्ये दोन-तीन टेबलस्पून दूध ओतून ठेवावे. दूध उकळत ठेवावे. ड्रायफूड्‌स तुपावर परतून दुधात घालावे. तांदूळ मिक्‍सरला बारीक करून दुधात घालावे. खीर सतत ढवळत राहावी. साखर घालावी व ढवळावे. खीर घट्ट व्हायला लागेल. केशराचे दूध व वेलची पूड घालून मिक्‍स करावे. वरून ड्रायफूडस्‌ घालून खीर सर्व्ह करावी.

शेवयाची खीर
साहित्य : बारीक शेवया पाव कप, दूध दीड लिटर, साखर अर्धा कप, तूप २ टेबल स्पून, चारोळी-पिस्ते-काजू - दोन टेबलस्पून, केशर - पाच - सहा काड्या, वेलची पूड एक टीस्पून
कृती : एका जाड पातेल्यात तूप घालावे. तूप वितळले, की ड्रायफूटसचे काप घालून परतावे. ड्रायफूटस गुलाबी रंग आला, की दूध ओतावे. दुधात साखर घालावी व सतत ढवळत राहावे. ड्रायफूडस्‌ची चव दुधात उतरेल व दूध पण आटेल. दूध एक लिटर झाले म्हणजे शेवया तुपावर फ्राय करून दुधात घालावे. पळीने सतत हलवत राहावे. केशर घालावे. शेवटी वेलची पूड घालून गॅस बंद करावा.

लाल भोपळ्याची खीर
साहित्य : लाल भोपळ्याचा किस पाव कप, दूध अर्धा लिटर, साखर पाऊण कप, तूप दोन टेबलस्पून, वेलची व जायफळ पूड एक टीस्पून, काजू - बदामाचे काप आवडीनुसार
कृती : प्रथम एका पातेल्यात दूध व साखर घालून दूध उकळत ठेवावे. ७५ टक्के दूध आटले, की गॅस बंद करावा. दुसरीकडे एका पॅनमध्ये तूप घालावे. तूप वितळले, की लाल भोपळ्याचा किस घालून परतावे. ड्रायफ्रूटस घालून परतावे. भोपळा पटकन शिजतो. भोपळ्याचा किस दुधात घालावा व उकळी येऊ द्यावी. वेलची जायफळ पूड घालावी. तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करावा.

रताळ्याची खीर
साहित्य : रताळ्याचा किस पाव कप, भिजवलेला साबुदाणा दोन टेबलस्पून, दूध अर्धा लिटर, साखर अर्धा कप, वेलची व जायफळ पूड पाव टीस्पून, तूप दोन टेबलस्पून, ड्रायफ्रूटस आवडीनुसार
कृती : एका पातेल्यात तूप घालावे. तूप वितळले, की रताळ्याचा किस घालून परतावे. किसाचा कलर पिवळा होईल. त्यात दूध घालावे. दुधाला उकळी आली, की भिजवलेला साबुदाणा घालावा. सतत ढवळत राहावे. साखर व ड्रायफूडस घालावे. साबुदाण्यामुळे खिरीला दाटसरपणा येईल. रताळ्याचा किस लगेच शिजतो. साबुदाणा पारदर्शक होईल म्हणजे साबू पण शिजेल. वेलची, जायफळ पूड घालून गॅस बंद करावा. ही खीर उपवासाला पण चालते.

बिटाचा हलवा
साहित्य : बिटाचा किस एक कप, गूळ अर्धा कप, तूप चार टेबल स्पून, खसखस, काजू तुकडे २ टेबलस्पून, खवा २५ ग्रॅम, वेलची पूड एक टीस्पून
कृती : प्रथम जाड कढीत तूप घालावे. तूप वितळले, की बिटाचा किस परतावा. पाणी सुकून कोरडेपणा आला, की गूळ घालावा. गूळ वितळेल. सतत परत राहावे. खसखस भाजून जाडसर वाटावी. ही पूड हलव्यात घालावी. खसखसमुळे वेगळे छान चव येते. खवा घालावा. खवा खाल्ल्यावर हलवा घट्ट होईल. शेवटी काजू व वेलची पूड घालून परतावे व गॅस बंद करावा.

गाजर हलवा
साहित्य : गाजराचा किस एक कप, दूध एक लिटर, तूप दोन टेबल स्पून, ड्रायफ्रूट्‌स आवडीनुसार, वेलची पूड पाव टीस्पून, साखर अर्धा कप
कृती : कढईत तूप घालून ते वितळले, की गाजराचा किस परतावा. त्या किसात साखर घालावी. साखर मेल्ट वितळली, की पूर्ण दूध ओतावे व सतत ढवळत राहावे. दूध आटू लागेल. पूर्ण दूध आटून त्याचा खवा गाजराच्या किसात मिक्‍स होईल. ड्रायफ्रूट्‌स घालावे व वेलची पूड घालावी. गाजर हलवा तयार आहे.
टीप : दूधाऐवजी खवा वापरू शकतो. पण दूध आटून एकजीव होते व हा हलवा त्यामुळे छान लागतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या