बाप्पासाठी प्रसाद

सुप्रिया खासनीस
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

बाप्पांचे आगमन झाले की घरोघरी आरतीसाठी टाळघंटेचे नाद घुमू लागतात. प्रसन्न वातावरणात आरती होत असते. प्रसाद म्हणून विविध प्रकारच्या खिरापती केल्या जातात. अशाच काही प्रसादासाठी पाककृती...

काजूची बर्फी
साहित्य : दोन वाट्या काजू, दीड वाटी साखर, अर्धी वाटी खवा, पाव जायफळ, चांदी वर्ख (ऐच्छिक).
कृती : काजूची मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यावी. खवा थोडा भाजून घ्यावा. साखरेचा एकतारी पाक करावा व त्यात काजूची पूड घालून शिजवावे. साधारण घट्ट गोळा झाला, की खाली उतरवून त्यात भाजलेला खवा घालावा, मिश्रण चांगले घोटावे व त्यात जायफळ पूड घालावी. नंतर पोळपाट किंवा ताटाला तूप लावून त्यावर तो गोळा लाटावा. पाहिजे असल्यास त्यावर चांदीचा वर्ख लावावा.

दुधी भोपळ्याच्या वड्या
साहित्य : दोन वाट्या दुधी भोपळ्याचा कीस, दीड ते दोन वाट्या साखर, पाऊण वाटी मावा, पाव वाटी तूप, वेलदोड्याची पूड, पिस्ते काप (ऐच्छिक).
कृती : दुधी भोपळ्याचा कीस धुऊन घ्यावा. नंतर तो तुपावर चांगला वाफवून घ्यावा. चांगली वाफ आल्यावर साखर घालून मिश्रण शिजत ठेवावे. शिजत आल्यावर त्यात मावा घालावा व पुन्हा शिजवावे. गोळा घट्ट झाल्यावर त्यात वेलदोड्याची पूड घालावी. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा लाटावा. हवे असल्यास त्यावर पिस्त्याचे काप लावावेत व वड्या पाडाव्यात.

बटाट्याची बर्फी
साहित्य : एक वाटी उकडलेल्या बटाट्याचा लगदा, अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी दूध, ५ ते ६ वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळ पूड, २ वाट्या साधी साखर व अर्धी वाटी पिठीसाखर.
कृती : पिठी साखरेखेरीज सर्व साहित्य एकत्र करून गॅसवर ठेवावे. मिश्रण मंदाग्नीवर ठेवावे. मिश्रण घट्ट होत आले की थोड्या पाण्यात वालभर मिश्रण टाकून पाहावे, पाण्यात विरघळले की खाली उतरवून डावाने चांगले घोटावे. पातेले कोमट झाले की त्यात थोडी थोडी पिठीसाखर घालून मिश्रण सारखे करावे. गोळा घट्ट झाला की तूप लावलेल्या ताटावर थापावा व वड्या पाडाव्यात. प्रत्येक वडीवर वेलची दाणे लावले, की बर्फी फार सुंदर दिसते.

खोबऱ्याच्या वड्या (नारळी पाक)
साहित्य : एक मध्यम आकाराचा नारळ, पाव किलो साखर, १ मोठी वाटी दूध, वेलदोडा पूड, पिस्त्याचे काप, चारोळी.
कृती : नारळ खोवून घ्यावा. खोबरे, साखर, दूध एकत्र शिजत ठेवावे. शिजत असताना सारखे हालवावे व गोळा झाल्यावर त्यात वेलची पूड घालावी. ताटाला तूप लावून त्यावर तो गोळा थापावा. त्यावर चारोळी, पिस्त्याचे काप पसरावेत व हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

रव्याच्या वड्या
साहित्य : एक वाटी बारीक रवा, १ वाटी तूप, ३ वाट्या साखर, ३ वाट्या दूध, वेलची पूड, चारोळी.
कृती : रवा, तूप, साखर, दूध यांचे मिश्रण करून शिजत ठेवावे. शिजताना सारखे हालवावे. शिजून त्याचा घट्ट गोळा झाला की त्यात वेलची पूड घालावी. ताटावर तूप लावून गोळा लाटावा. वर चारोळी घालावी. हलके लाटणे फिरवावे व वड्या पाडाव्यात.

गूळपापडीचे लाडू
साहित्य : दोन वाट्या कणीक, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, १ डाव भाजलेले तीळ, वेलदोड्याची पूड व गरजेनुसार तूप.
कृती : तुपावर कणीक चांगली भाजावी. छान वास आला की गॅसवरून खाली उतरवावी. गरम असतानाच कणकेमध्ये किसलेला गूळ घालून उलथण्याने चांगले ढवळावे. तीळ व वेलची पूड घालून लगेचच लाडू वळावेत.

ओल्या खोबऱ्याचे लाडू
साहित्य : एक मध्यम आकाराचा नारळ, २ ते अडीच वाटी साखर, वेलची पूड, तूप, अर्धा कप दूध किंवा २ ते ३ चमचे साय.
कृती : वेलची पूड सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत शिजायला ठेवावे. सारखे हालवत राहावे. गोळा घट्ट होत आला की त्यात वेलची पूड घालून चांगले ढवळावे. हाताला थोडा तुपाचा हात लावून गरम असतानाच लाडू वळावेत.

गाजराचे लाडू
साहित्य : दोन वाट्या गाजराचा कीस, दीड वाटी खोवलेले खोबरे, १ वाटी चिरलेला गूळ, ४ चमचे तूप, वेलदोड्याचे दाणे.
कृती : गाजरे धुऊन, पुसून बारीक किसणीने किसावीत. कीस, गूळ, खोबरे व तूप एकत्र मिश्रण करून शिजायला ठेवावे. मिश्रण घट्ट गोळा झाले, की वेलदोड्याचे दाणे घालून लाडू वळावेत.

शेंगदाण्याचे लाडू
साहित्य : एक वाटी दाण्याचा बारीक कूट, अर्धी वाटी खारीक पावडर, थोडे तूप, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, चारोळी, वेलची पूड.
कृती : चारोळी सोडून वरील सर्व साहित्य एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. नंतर त्यात चारोळी घालून आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडे तूप घालून लाडू वळावेत.

खवा पुरी
साहित्य : दीड वाटी मैदा, पाऊण वाटी रवा, दीड वाटी खवा, दीड वाटी पिठीसाखर, २ चमचे वेलची पूड, तूप.
कृती : रवा, मैदा एकत्र करून त्यात २ चमचे तुपाचे मोहन घालून घट्ट भिजवून तासभर झाकून ठेवावे. खवा चांगला परतून घ्यावा. त्यात साखर, वेलची पूड घालून एकसारखे सारण तयार करावे. भिजवलेला रवा, मैदा चांगला कुटून घ्यावा. त्याच्या लाट्या करून पातळ पुऱ्या लाटाव्यात. एका वेळी दोन पुऱ्या लाटाव्यात. एका पुरीवर सारण पसरून त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा दाबून घ्याव्यात. सर्व पुऱ्या तयार झाल्यावर तुपात तळून काढाव्यात.

भोपळ्याचे घारगे
साहित्य : दोन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी रवा, थोडी कणीक, २ वाट्या गूळ, तळण्यासाठी तेल.
कृती : भोपळ्याचा कीस गूळ घालून शिजवावा. शिजवून झाल्यावर गरम असतानाच त्यात तांदळाचे पीठ, रवा व २ चमचे तेलाचे मोहन, थोडी कणीक घालून चांगले मळावे. प्लॅस्टिकच्या कागदावर पुरीच्या आकाराचे घारगे थापून तळून काढावेत. कणीक घातल्यामुळे घारगे थापणे सोपे जाते.

शिरा
साहित्य : एक वाटी बारीक रवा, १ वाटी साखर, १ वाटी तूप, ३ वाट्या दूध, वेलची पूड, काजू, बदाम, चारोळी.
कृती : प्रथम रवा तुपामध्ये चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये तीन वाट्या चांगले गरम दूध घालावे व त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. दूध पूर्णपणे त्यात आटले की मग त्यात साखर घालून चांगले ढवळावे. त्यात चारोळी काजू, बदाम घालून पुन्हा वाफ आणावी. कोमट असताना नंतर वेलचीपूड घालावी.

साखरी भात
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, २ वाट्या साखर, अर्धी वाटी तूप, ५-६ लवंगा, बदामाचे काप, वेलची पूड, बेदाणे, अर्धे लिंबू, केशर किंवा केशरी रंग.
कृती : तांदूळ तासभर आधी धुऊन ठेवावेत. थोड्या तुपावर लवंगा परतून नंतर त्यावर तांदूळ चांगले परतावेत. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालावे. चवीला मीठ घालून तो भात मोकळा शिजवावा. शिजल्यावर परातीत पसरून मोकळा करावा. एका पातेल्यात साखरेचा गोळीबंद पाक करून घ्यावा. त्यात लिंबाचा रस घालावा. पाकात मोकळा केलेला भात घालून मंदाग्नीवर चांगली वाफ आणावी व पुन्हा तो मोकळा होऊ द्यावा. बदाम काप, बेदाणे वेलची पूड घालून एकसारखा करावा वर चांगले तूप सोडावे.

संबंधित बातम्या