ठेपला, खाकरा आणि पालक पुरी!

सुप्रिया खासनीस 
सोमवार, 27 जानेवारी 2020

फूड पॉइंट
प्रवासाला निघताना सर्वांत आधी प्रश्न पडतो की खायचे काय आणि कुठे? कारण घरच्यासारखे स्वच्छ आणि पौष्टिक जेवण हॉटेलमध्ये मिळेलच असे नाही; शिवाय प्रवास लांबचा असेल तर बाहेरचे पदार्थ बाधूही शकतात. अशावेळी घरचे पदार्थ आपल्याबरोबर घेतल्याने प्रवासाचा वेळही वाचतो आणि कसलाही त्रास होत नाही. त्यासाठी काही खास रेसिपीज...

मेथीचा ठेपला  
साहित्य : एक जुडी मेथीची कोवळी भाजी, ३ वाट्या कणीक, १ वाटी चणाडाळीचे पीठ, ६-७ हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, हळद, चवीला साखर. 
कृती : मेथीची भाजी धुऊन, चिरून घ्यावी. त्यात कणीक, डाळीचे पीठ, हिरव्या मिरच्या व लसूण वाटून, चवीनुसार हळद, मीठ, साखर व तेल घालावे. पोळ्यांच्या कणकेप्रमाणे पीठ भिजवावे. नंतर साधारण मध्यम आकाराचा उंडा करून त्याची पातळ पोळी लाटावी. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी भाजावी. ठेपला फुगत नाही. चांगले टिकतात. खावयास खमंग लागतात.

बाजरीची पुरी  
साहित्य : तीन वाट्या बाजरीचे पीठ, ४ चमचे तीळ, १ लहान चमचा हिंग, चवीनुसार तिखट, मीठ, भिजवण्यासाठी ताक किंवा दही, तेल. 
कृती : बाजरीच्या पिठात हिंग, मीठ, तीळ, तिखट घालावे. मिश्रण दह्यात भिजवावे. पाणी घालू नये. चांगले मळून छोट्या जाड पुऱ्या लाटून खमंग तळाव्यात. मस्त लागतात.

खारी पुरी  
साहित्य : अडीच वाट्या मैदा, १ चमचा काळ्या मिरीची भरडसर पूड, २ चमचे जिरेपूड, चवीनुसार मीठ, थोडी हळद, तेल किंवा डालडा. 
कृती : मैदा, मिरीची भरडपूड, जिरेपूड, अर्धी वाटी तेल, चवीप्रमाणे मीठ व हळद एकत्र करून पाण्याने भिजवून ठेवावे. नंतर एक तासाने मळून घेऊन पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या पातळ लाटाव्यात व त्यावर सुरीने टोचे पाडून त्या अर्ध्या ते पाऊण तास सुकत ठेवाव्या. नंतर पुऱ्या तेलात किंवा डालडा तुपामध्ये तळाव्यात. तांबूस रंगावर तळून काढाव्यात. पुऱ्या खुसखुशीत होतात. डालड्यामध्ये तळल्यास बरेच दिवस चांगल्या राहतात.

साधा खाकरा  
साहित्य : अर्धी वाटी कणीक, दीड चमचा डाळीचे पीठ, ३ चमचे तेल, चवीनुसार मीठ. 
कृती : प्रथम तेल व मीठ घालून कणीक घट्ट मळून घ्यावी. १५ ते २० मिनिटांनी खाकरे करण्यास घ्यावे. मध्यम आकाराची लाटी घेऊन त्याला तेल, तूप काहीही न लावता पिठावर गोल व अगदी पापडाप्रमाणे पातळ लाटावी. तव्यावर टाकून मंद आचेवर कापडाने दाबत दाबत गोल फिरवत खाकरा दोन्ही बाजूंनी खमंग भाजावा. भाजताना फुगू देऊ नये. नाहीतर तो मऊ पडतो. हे खाकरे बरेच दिवस टिकतात.

पांढरा चिवडा  
साहित्य : पाव किलो पातळ पोहे, १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, १ चमचा तीळ, थोडा कढीलिंब, मीठ, तेल फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे. 
कृती : मुगाची डाळ ३-४ तास भिजवावी. भिजत घालताना त्यात वालाएवढी तुरटी घालावी. नंतर डाळ उपसून कोरडी करावी व डाळ तळून बाजूला ठेवावी. पातळ पोहे परतून घ्यावे. कुरकुरीत झाले की कागदावर पसरावे. नंतर खोबऱ्याचा कीस जरा परतून घ्यावा. डालडा तुपाची हिंग, जिरे घालून फोडणी करावी. त्यात लाल मिरच्यांचे तुकडे, कढीलिंब, तीळ व शेंगदाणे घालून जरा परतून घ्यावे. नंतर खाली उतरवून घ्यावे. त्यात भाजलेले पोहे, मीठ, सुक्‍या खोबऱ्याचा कीस घालून मिश्रण चांगले ढवळावे. जरा वेळ परतावे. नंतर त्यात तळलेली डाळ घालून खाली उतरावे. झाला चिवडा तयार. 

खमंग खाकरा  
साहित्य : दोन वाट्या कणीक, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ चमचे डाळीचे पीठ, ३-४ चमचे तेल, चवीपुरते मीठ, तिखट, आवडत असल्यास ३-४ पाकळ्या लसूण. 
कृती : प्रथम तेल, मीठ, चिरलेली कोथिंबीर, तिखट घालून कणीक जरा घट्ट भिजवावी. ज्यांना लसूण घालावयाचा असेल त्यांनी लसणाची पेस्ट करून कणीक भिजवताना घालावी. १५-२० मिनिटांनी खाकरे करण्यास घ्यावे. मध्यम आकाराची लाटी घेऊन त्याला तेल, तूप काही न लावता पिठावर गोल अगदी पापडाप्रमाणे पातळ लाटावी. तव्यावर टाकून मंद आचेवर कापडाने दाबत दाबत गोल फिरवत खाकरा दोन्ही बाजूंनी खमंग भाजावा. भाजताना फुगू देऊ नये, म्हणजे कडक होतो.

तिखट पुरी  
साहित्य : दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ, आवडीनुसार तिखट, मीठ, ओवा, हळद, तळणीसाठी तेल. 
कृती : कणीक व बेसन एकत्र करून त्यात मीठ मिसळावे. नंतर त्यात तिखट, हाताने चुरलेला ओवा आणि किंचित हळद घालावी. डावभर तेल गरम करून त्यावर घालावे. कणीक चांगली घट्ट भिजवावी. नंतर त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्या जरा पातळ लाटून कडक तळाव्यात. या पुऱ्या आठ-दहा दिवस उत्तम टिकतात. मात्र, पूर्ण थंड झाल्यावरच घट्ट झाकणाच्या डब्यात भराव्यात. पाहिजे असेल तर २-४ दिवसानंतर या पुऱ्यांचा कुस्करा, चटणी व दही अशी न्याहारी होऊ शकते.

गूळ पोळी  
साहित्य : पाचशे ग्रॅम गूळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तिळाची पूड, वेलचीपूड, १ चमचा खोबऱ्याचा सुका कीस, अडीच चमचे डाळीचे पीठ, २ वाट्या कणीक, १ वाटी मैदा, तूप. 
कृती : कणीक, मैदा व डाळीचे पीठ एकत्र करून त्यात जरा जास्त मोहन घालून पीठ घट्टसर भिजवून ठेवावे. गूळ चांगला किसून घ्यावा. तीळ, खसखस, खोबरे भाजून घ्यावे. नंतर कुटावे. डाळीचे पीठ थोड्या तुपावर चांगले भाजून घ्यावे. वेलचीपूड घालून सर्व सारण एकत्र करून ठेवावे. नंतर कणकेच्या दोन लाट्या लाटून घ्याव्यात. एका लाटलेल्या पारीवर मोठी गुळाची गोळी घालावी. नंतर दुसरी पारी त्यावर ठेवून कडा दाबाव्यात व हलक्‍या हाताने पोळी लाटावी. तव्यावर खमंग भाजावी.

पालक पुरी 
साहित्य : दीड वाटी कणीक, अर्धी वाटी रवा किंवा बेसन, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, चवीला मीठ, पालकची १०-१२ मोठी पाने, ३-४ लसूण पाकळ्या, तळण्यासाठी तेल. 
कृती : पालकाची पाने धुऊन घ्यावीत. हाताने बारीक तुकडे करून लसूण घालून मिक्‍सरमधून वाटून घ्यावीत. या पालकमध्येच कणीक, रवा, हळद, ओवा, २ चमचे तेल घालून पीठ घट्ट भिजवावे (आवश्‍यकता वाटली तरच पाणी घालावे). पीठ भिजवल्यावर किमान २० मिनिटांनी त्याच्या पुऱ्या लाटून तळून घ्याव्या. या पुऱ्या ३-४ दिवस टिकत असल्याने प्रवासासाठी उत्तम पर्याय होतात.

खव्याची (मावा) पोळी  
साहित्य : एक वाटी खवा, दीड वाटी दळलेली साखर, पाव वाटी खसखस, वेलचीपूड, प्रत्येकी पाऊण वाटी रवा व मैदा, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी. 
कृती : तूप टाकून खवा चांगला तांबूस भाजून घ्यावा. खसखस भाजून बारीक कुटून घ्यावी. खवा गार झाल्यावर मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावा. नंतर त्यात बारीक केलेली खसखस, वेलचीपूड, पिठीसाखर व १ चमचा मैदा घालून सर्व एकत्र करून सारणाचा गोळा करावा. तेल व मीठ घालून रवा व मैदा चांगला घट्ट भिजवावा. नंतर गोळा कुटून मऊ करून घ्यावा. गुळाच्या पोळीप्रमाणे दोन पाऱ्या लाटून घ्याव्या. रव्या मैद्याच्या एका पारीवर खव्याचा गोळा घालून सर्व कडा बंद कराव्या व पिठीवर पातळ पोळी लाटावी. मंद गॅसवर चांगली भाजावी व थोडा वेळ गार करायला ठेवावी.

खव्याच्या साटोऱ्या 
साहित्य : (सारणासाठी) दीड वाटी खवा, १ वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी तूप, थोडे दूध, पाव वाटी खसखस, अर्धी वाटी किसलेले खोबरे (बाजारातील कीस), दीड चमचा वेलचीपूड, २ वाट्या पिठीसाखर. 
पारीसाठी : दीड वाटी बारीक रवा, पाऊण वाटी मैदा, पाव वाटी गरम तुपाचे मोहन, मीठ, तांदळाची पिठी, तूप. 
कृती : रवा-मैदा एकत्र करून तूप आणि मीठ घालून पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. डाळीचे पीठ तुपावर बेसन लाडूप्रमाणे खमंग भाजावे. उतरवून कोमट होऊ द्यावे. कढईत खसखस व बारीक डेसिकेटेड खोबरे भाजून घेऊन ते डाळीच्या पिठात मिसळावे. त्याच कढईत खवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. डाळीच्या पिठात मिसळावा. त्यात पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून सारण एकजीव करावे. याच्या पेढ्याएवढ्या गोळ्या कराव्या आणि झाकून ठेवाव्या. भिजवलेल्या पिठाच्या सारणाच्या गोळ्याच्या दुप्पट संख्येत सुपारीएवढ्या गोळ्या कराव्यात. या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून एका पुरीवर सारणाची गोळी पसरावी. त्यावर दुसरी पुरी ठेवून पाण्याचा हात लावून कडा चिकटवाव्यात. ही साटोरी तांदळाच्या पिठीवर हलक्‍या हाताने लाटून थोडी वाढवावी. तव्यावर कोरडी शेकून मग तुपात तळावी. या साटोऱ्या १०-१२ दिवस चांगल्या राहतात. 

संबंधित बातम्या