खास नैवेद्यासाठी

सुप्रिया खासनीस
सोमवार, 23 मार्च 2020

फूड पॉइंट
गुढीपाडवा! मराठी नववर्षातला पहिला सण! गुढीला नैवेद्य दाखविण्यासाठी घरी श्रीखंड, बासुंदी, शिरा असे गोडाचे पदार्थ केले जातात... नैवेद्यालाही होतील आणि घरातही सर्वांना आवडतील अशा काही खास रेसिपीज...

मूग डाळीचा शिरा/हलवा  
साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, १ वाटी साखर, अर्धा ते पाऊण वाटी तूप, ५-६ वेलदोड्याची पूड, काजू, बेदाणे, केशर किंवा केशरी रंग, दीड ते दोन वाट्या दूध. 
कृती : हलवा करण्यापूर्वी प्रथम मुगाची डाळ चार-पाच तास पाण्यात भिजत घालावी. नंतर पाण्यातून स्वच्छ धुऊन काढून मिक्‍सरवर बारीक वाटावी. कढईमध्ये तूप गरम करायला ठेवावे. तूप गरम झाल्यावर त्यात वाटलेली डाळ घालून ती बदामी रंगावर भाजावी. तूप सुटू लागल्यावर त्यातील तूप काढून घ्यावे. नंतर त्यात दूध व केशर घालून डाळ चांगली शिजवावी. दुधाऐवजी पाणी घातले तरी चालते. डाळ चांगली मऊ झाल्यावर त्यात साखर घालावी. चांगली वाफ आल्यावर वेलदोड्याची पूड, काजूचे काप व बेदाणे घालावेत. नंतर बाजूला काढून ठेवलेले तूप कडेने सोडावे.

बदाम रबडी 
साहित्य : दोन लीटर दूध, पुरेशी साखर, केशर किंवा केशरी रंग, वेलदोडा पूड, दीड-दोन वाट्या बदामाचे पातळ काप. 
कृती : शक्‍यतो पसरट भांड्यात किंवा कढईमध्ये दूध आटण्यासाठी ठेवावे. दूध आटवत असताना सारखे हलवत राहावे. चांगली रबडी होण्यास दोन लिटरचे दूध एक लिटरपर्यंत आटवावे. नंतर त्यात पुरेशी साखर घालून एक उकळी आणावी. आता त्यात केशर, वेलदोडा पूड घालावी व खाली उतरवावी. प्रथम बदाम १० मिनिटे कोमट पाण्यात भिजवावे. नंतर त्याची साले काढून त्याचे पातळ काप करून ते रबडीत घालावेत. चांगले हलवून एकसारखे करावे. रबडी थंड खाण्यास चांगली लागते. त्यामुळे खायला देताना ती थंड द्यावी.

सीताफळ रबडी  
साहित्य : दोन लिटर दूध, बदाम काप, पिस्ते काप, चारोळ्या, गरजेनुसार साखर, अर्धा किलो सीताफळाचा गर (पल्प). 
कृती : प्रथम एका पसरट भांड्यात दूध घेऊन तापायला ठेवावे. ते साधारण सव्वा लिटरपर्यंत आटवावे. नंतर तयार सीताफळाचा गर किंवा सीताफळे असतील तर त्यातील बिया काढून अर्धा किलो गर घ्यावा. दूध थंड झाल्यावर त्यात पुरेशी गोडीनुसार साखर व सीताफळाचा गर घालून एकसारखे करावे. सीताफळ रबडी पूर्ण गार झाल्यावर त्यात बदामाचे किंवा पिस्त्याचे काप घालावेत. ही रबडी जेवढी थंड तेवढी चांगली लागते. तसेच सीताफळाचा त्याला सुंदर वासही येतो.

रसमलई  
साहित्य : एक लिटर दूध, अर्धी वाटी साखर, १ चमचा कॉर्न फ्लोअर, बदाम, पिस्ते, तयार रसगुल्ले. 
रसगुल्ले साहित्य व कृती : तयार पनीर, थोडा मैदा, डाळी एवढा सोडा, पाकासाठी साखर. तयार पनीर घेऊन चांगले मळावे. नंतर त्यात मैदा व सोडा घालून खूप मळावे. साखरेचा कच्चा पाक तयार करावा. मळून घेतलेल्या पनीरच्या हलक्‍या हाताने सुपारी एवढ्या लहान गोळ्या कराव्यात व त्या पाक उकळत असताना त्यात टाकाव्यात. मधूनमधून वर पाण्याचा हबका मारावा. म्हणजे पाक घट्ट होणार नाही. रसगुल्ला भांड्यात पाणी घेऊन त्यात टाकून बघावा. एकदम तळाला गेला तर तयार झाले असे समजावे. नाहीतर रसगुल्ला पाकात अधिक उकळू द्यावा. 
रसमलई कृती : दूध आटवून पाऊण लिटर करावे. दाटपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लोअर दुधाला लावावे. नंतर त्यात साखर, बदाम, पिस्त्याचे काप सोडावेत आणि तयार केलेले रसगुल्ले सोडावेत. एक उकळी आल्यावर खाली उतरवावे. आवडत असल्यास गार झाल्यावर थोडे गुलाबपाणी शिंपडून खायला द्यावे. रसमलई जितकी थंड तितकी खायला चांगली लागते. शक्‍यतो फ्रीजमध्ये ठेवावी.

बासुंदी  
साहित्य : दोन लिटर दूध, साखर, केशर अगर केशरी रंग, वेलदोडे, बदाम, चारोळ्या. 
कृती : शक्‍यतो पसरट भांड्यात दूध आटण्यासाठी ठेवावे. दूध आटत असताना सारखे हालवत राहावे. चांगली दाट बासुंदी होण्यास दोन लिटर दुधाचे अंदाजे चार ते साडेचार वाट्या दूध आटवून झाले पाहिजे. दूध आटल्यानंतर त्यात १ वाटी साखर घालून एक उकळी आणावी. नंतर केशर किंवा केशरी रंग, वेलदोड्याची पूड, बेदाणे किंवा बदाम-पिस्त्याचे काप घालावेत. चारोळीही थोडीशी भाजून घालावी व बासुंदी थंड करण्यास ठेवावी. २ लिटर दुधाची बासुंदी साधारण दोन माणसांना पुरते.

रसमंजिरी  
साहित्य : दोन लिटर दूध, गुलाबजामसाठी अर्धी वाटी खवा, १ वाटी बारीक साखर, पाव वाटी शेवया, आरारुट, तूप, बदामाचे काप किंवा केशरी रंग, वेलदोडा पूड. 
कृती : नेहमीच्या गुलाबजामच्या कृतीप्रमाणे खव्यामध्ये आरारुट घालून सुपारी एवढ्या आकाराचे गुलाबजाम करावेत. १ वाटी साखरेच्या पाकात ते मुरण्यास ठेवावेत. शेवया बदामी रंगावर येईपर्यंत तुपावर परतून त्यावर लगेच पाणी घालून त्या निथळत ठेवाव्यात. दूध आटवून निम्मे करावे व थोडे थंड झाल्यावर पाकासकट गुलाबजाम, शेवया, केशर, बदामाचे काप, वेलदोडा पूड घालून हलक्‍या हाताने ढवळावे व एक उकळी आणावी.

खीर मोहन  
साहित्य : पाव किलो तयार पनीर, पाव किलो खवा, ५० ग्रॅम मैदा, किंचित सोडा, बेदाणे, वेलदोडा पूड, तूप. 
कृती : पनीरमध्ये खवा, मैदा व किंचित सोडा घालून खूप मळावे. या मळलेल्या गोळ्याचे लांबट गोल आकाराचे लहान लहान गोळे करून घ्यावेत. गोळ्यांमध्ये बेदाणे घालावे. हे गोळे मंद विस्तवावर तुपात लाल रंगावर तळावेत. साखरेचा कच्चा पाक तयार करून त्यात तळलेले गोळे (खीर मोहन) घालावे व ५-१० मिनिटे पाकात ठेवल्यावर बाहेर काढावेत. नंतर पाक पुन्हा गॅसवर ठेवून जरा पक्का पाक करावा व त्यात हे खीर मोहन घालावेत.

पायनॅपल खंड (अननस श्रीखंड)  
साहित्य : अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, बदाम पिस्ते, साधारण वाटीभर बारीक चिरलेले अननसाचे तुकडे, पुरेसा पायनॅपल इसेन्स. 
कृती : प्रथम चक्का चांगला फेटून घ्यावा. नंतर त्यात साखर घालून चांगले एकसारखे फेटावे. थोड्यावेळाने अननसाच्या फोडी घालाव्यात. थोडा पायनॅपल इसेन्स घालून काजू पिस्त्याचे काप घालावेत. अननसाचा सुरेख स्वाद येऊन पायनॅपल खंडाचा रंगही छान दिसतो. ज्यावेळी अननस उपलब्ध नसेल त्यावेळी पायनॅपल इसेन्सचा पूर्ण वापर केला तरी चालतो.

सफरचंदाचा हलवा  
साहित्य : चार चांगली सफरचंद, १ वाटी साखर, १ वाटी रवा, पाव वाटी बेदाणे, २ चमचे तूप, केवडा इसेन्स, अर्धा मिल्कमेडचा डबा. 
कृती : रवा तुपावर खमंग भाजावा. त्यात १ वाटी गरम पाणी घेऊन त्यात किंचित मीठ घालून झाकण ठेवावे. रवा शिजल्यावर त्यात साखर घालावी. सफरचंदाची साले, बिया काढून त्याचे तुकडे करावेत. थोड्या पाण्यात फोडी शिजवून घ्याव्यात. या शिजलेल्या फोडी शिऱ्यामध्ये घालून मिश्रण हालवावे. नंतर इसेन्स, बेदाणे घालून हालवावे. कडेने मिल्कमेड मिश्रण सोडत परत चांगले हालवावे. गरम, थंड कसाही हा हलवा खाता येतो.

फ्रूट सॅलड शिरा 
साहित्य : एक वाटी रवा, पाव वाटी तूप, २ वाट्या पाणी, अर्धी वाटी साखर, हंगामानुसार मिळणारी फळे. 
कृती : नेहमीप्रमाणे साधा शिरा करून घ्यावा. फळे स्वच्छ धुऊन त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. शिरा गार झाल्यावर त्यात त्या फोडी मिसळाव्यात. हा शिरा जरा सैलसर असावा. म्हणजे त्यात फोडी व्यवस्थित मिसळता येतात. याप्रमाणे मॅंगो शिरा, पायनॅपल शिराही त्या त्या फळांचे रस घालून करता येतो.

दुधी भोपळ्याची खीर  
साहित्य : एक वाटी किसलेला दुधी भोपळा, एक ते दीड वाटी दूध, अर्धी वाटी साखर, ५-६ बदामाचे काप, १ चमचा कॉर्नफ्लोअर, ५-६ वेलदोड्याची पूड, थोडे केशर, तूप. 
कृती : थोड्या तुपावर किसलेला भोपळा परतून घ्यावा. झाकण ठेवून मंदाग्नीवर कीस शिजवून घ्यावा. नंतर त्यात साखर घालून जरा वेळ शिजवावे. दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून ते दूध त्यात ओतावे. नंतर त्यात बदामाचे काप वेलची पूड, केशर, घालून उतरावे. कॉर्नफ्लोअर घातल्याने खीर दाट होते व मिळून येते.

श्रीखंड  
साहित्य : एक किलो मलईचा चक्का, १ किलो साखर, १०-१२ वेलदोड्याची पूड, ५० ग्रॅम चारोळी, १० ग्रॅम काजू, थोडे केशर, थोडा केशरी रंग, थोडे दूध (अंदाजे अर्धी वाटी) 
कृती : पुरण यंत्रातून १ डाव चक्का व १ डाव साखर असे एकत्र करून घेऊन गाळावे. त्याप्रमाणे बाकी सर्व चक्का व साखर घालून फिरवून काढावे. थोड्या दुधात केशर भिजत घालावे व थोड्या दुधात केशरी रंग घालावा. नंतर हे कालवलेले केशर व केशरी रंग तयार केलेल्या चक्‍क्‍यात घालावे व चांगले ढवळावे. नंतर त्यात वेलदोड्याची पूड, चारोळी, काजूचे काप घालून एकसारखे करावे. श्रीखंड शक्‍यतो आदल्या दिवशी करून ठेवावे. म्हणजे मुरल्यावर ते जास्त चविष्ट लागते.

संबंधित बातम्या