चविष्ट चटण्या, कोशिंबिरी

 सुप्रिया खासनीस
मंगळवार, 28 जुलै 2020

श्रावण महिना सुरू झाला की पुढील काळात सणांची रेलचेल सुरू होते. प्रत्येक सणाला नैवेद्यासाठी पानाच्या डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर हवीच. अशाच काही चटण्या आणि कोशिंबिरींच्या पाककृती...

मिरच्यांची चटणी
साहित्य : सात-आठ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, फोडणीचे साहित्य, पाव लिंबू, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे यांची बारीक चटणी वाटावी. त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर घालावी. त्यावर लिंबाचा रस घालावा. नंतर वरून हिंग व मोहरीची फोडणी घालावी.

भोपळ्याच्या सालीची चटणी
साहित्य : भोपळ्याच्या साली, हिरव्या मिरच्या, दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : भोपळ्याच्या साली काढाव्यात. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मिरच्यांचे बारीक तुकडे व भोपळ्याच्या साली घालून चांगले परतावे. म्हणजे साली मऊ होतात. नंतर दाण्याचे कूट घालून चटणी वाटावी.

दाण्याची चटणी
साहित्य : अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, १ चमचा खोबऱ्याचा कीस, ३-४ हिरव्या मिरच्या, सुपारीएवढा चिंचेचा कोळ, थोडा पुदीना, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, सुपारी एवढा गूळ.
कृती : शेंगदाणे, खोबऱ्याचा कीस, हिरव्या मिरच्या, चिंचेचा कोळ, पुदीना हे सर्व एकत्र करून वाटावे. वाटतानाच त्यामध्ये जिरे, मीठ आणि गूळ घालावा. ही चटणी चवीला वेगळी, पण छान लागते.

खोबऱ्याची चटणी
साहित्य : एक वाटी खोवलेले खोबरे, ५-६ ओल्या मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर, लिंबू.
कृती : खोबरे, मिरच्या, कोथिंबीर एकत्र करून वाटावे. वाटतानाच त्यामध्ये मीठ व साखर घालावी. वाटलेल्या चटणीवर लिंबू पिळून एकसारखे कालवावे.

दोडक्याच्या शिरांची चटणी
साहित्य : दोडक्याच्या शिरा, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबू, थोडे खोवलेले ओले खोबरे, दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : तेलावर दोडक्याच्या शिरा व मिरच्या चांगल्या परतून घ्याव्यात. नंतर त्यात वरील बाकीचे सर्व साहित्य घालून बारीक चटणी वाटावी. नंतर त्यावर हिंगाची फोडणी घालावी.

गवारीची चटणी
साहित्य : एक वाटी अगदी कोवळ्या गवारीच्या शेंगांचे तुकडे, २ लहान हिरवे टोमॅटो, ३ सुक्या मिरच्या, ३ चमचे खोबऱ्याचा कीस, २ चमचे तीळ, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर, ३ चमचे तेल.
कृती : टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. शेंगांचे तुकडे व टोमॅटोच्या फोडी तेलावर परतून घ्याव्यात. सर्व पदार्थ एकत्र करून त्याची भरडसर चटणी वाटावी. गरजेनुसार मीठ, साखर व लिंबाचा रस घालावा.

काकडीची कोशिंबीर
साहित्य : एक वाटी कोचलेली काकडी, १ वाटी दही, कोथिंबीर, १ हिरवी मिरची, पाव वाटी दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : कोचलेली काकडी चांगली पिळून त्यातील पाणी काढून टाकावे व काकडीला तुपाचा हात लावावा. नंतर त्यात दही, साखर, दाण्याचा कूट, वाटलेली मिरची, चवीनुसार मीठ व साखर घालून दाण्याचा कूट घालावा व चांगले एकसारखे करावे. मग वरून कोथिंबीर घालावी.

पेरूची कोशिंबीर
साहित्य : एक वाटी पेरूच्या फोडी, १ वाटी गोड दही, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : पेरूच्या फोडी व दही वरील एकत्र कालवावे. त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर घालावी. शक्य असल्यास पेरूमधील बिया प्रथम काढून टाकाव्यात.

गाजराची कोशिंबीर
साहित्य : एक वाटी गाजराचा कीस, १ वाटी दही, कोथिंबीर, पाव वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट, २ हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करावे. नंतर मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. ती गार झाल्यावर कोशिंबिरीत घालावी. कोथिंबीर घालून कोशिंबीर एकसारखी करावी.

मिश्र कोशिंबीर
साहित्य : एक छोटे बीट, १ गाजर, १ काकडी, १ टोमॅटो, ४-५ ओल्या मिरच्या, १ वाटी गोड दही, पाव चमचा किसलेले आले, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : बीट व गाजर किसून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत व काकडी बारीक कोचून घ्यावी. हे सर्व एकत्र करावे. दही, मीठ, साखर घालून एकसारखे करावे. नंतर गार फोडणी घालावी व कोथिंबीर घालावी.

केळ्यांची कोशिंबीर
साहित्य : एक वाटी केळीच्या फोडी, १ वाटी गोड दही, थोडे खोवलेले खोबरे, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : केळीच्या फोडी व दही एकत्र करावे. नंतर चवीनुसार मीठ व साखर व खोबरे घालून कालवावे.

भेंडीचे भरीत
साहित्य : दोन वाट्या भेंडीचे पातळ काप, १ वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचा कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य, तेल.
कृती : चार चमचे तेलाची हिंग घालून फोडणी करावी. त्यात भेंडीचे काप तांबूस होईपर्यंत परतून घ्यावेत. नंतर खाली उतरवून गार झाल्यावर त्यात दाण्याचा कूट, ओल्या मिरच्या वाटून घालाव्यात. चवीनुसार मीठ व साखर घालून कालवावे. आयत्या वेळी दही घालून भरीत सारखे करावे.

घोसाळ्याचे भरीत
साहित्य : घोसाळी, दही, ओल्या मिरच्या, थोडेसे मेतकूट, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : घोसाळ्याच्या साली काढून त्याच्या फोडी कराव्यात. फोडी वाफवाव्यात. नंतर त्या कुस्कराव्यात. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालून मिरच्या घालून तयार केलेली फोडणी घालावी. आयत्या वेळी दही व कोथिंबीर घालून सारखे करावे.

पंचामृत
साहित्य : एक वाटी गूळ, पाऊण वाटी चिंच, २ चमचे गोडा मसाला, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, पाव वाटी ओल्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती:- तीळ भाजून कुटून घ्यावेत. चिंच कोळून त्याचे पाणी करून घ्यावे. हिंग घालून खमंग फोडणी करावी व त्यात कुटलेले तिळ, चिंचेचे पाणी (कोळ) व साहित्यातील इतर सर्व जिन्नस घालून चांगल्या २-३ उकळ्या आणाव्यात.

पेरूचा कायरस
साहित्य : एक वाटी पेरूच्या बारीक फोडी, सुपारीएवढी चिंच, अर्धी वाटी गूळ, लाल तिखट, मीठ, मेथ्या, १ चमचा गोडा मसाला व फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम मेथ्या घालून फोडणी तयार करून घ्यावी. त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट, मसाला घालून चांगली उकळी आणावी. नंतर त्यात पेरूच्या फोडी घालून शिजवावे.

भोपळी मिरचीचे भरीत
साहित्य : चार-पाच मोठ्या भोपळी मिरच्या, दीड वाटी गोड दही, अर्धी वाटी दाण्याचा कूट, ओले खोबरे, अर्धा चमचा जिरे पूड, तिखट, मीठ, चवीला साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : मिरच्या धुऊन पुसून घ्याव्यात. तेलाचा हात लावून वांगी भाजतो तशा मंद आचेवर भाजाव्यात. गार झाल्यावर देठ काढून बारीक कुस्कराव्यात. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी. दाण्याचा कूट व जिरे पूड घालावी. चवीनुसार तिखट घालावे. नंतर तेलाची हळद न घालता फोडणी करावी व गार करून भरतावर घालावी.

बुंदी रायता
साहित्य : शंभर ग्रॅम खारी बुंदी, दोन वाट्या गोड घट्ट दही, चवीनुसार साखर व मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा धने जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे आले, थोडी चिंचेची चटणी.
कृती : भांड्यात गार पाणी घेऊन त्यात बुंदी घालावी. दहा मिनिटांनी हातांनी घट्ट पिळून घ्यावी. गोड दही घुसळून घ्यावे. दह्यात मीठ, साखर, २ हिरव्या मिरच्या व थोडे आले वाटून घालावे व दही तयार करावे. नंतर पिळून काढलेली बुंदी घ्यावी. त्यावर तयार केलेले दही घालावे. धने जिरे पूड, तिखट, कोथिंबीर व चिंचेची चटणी घालून सजवावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या