चटण्या, कोशिंबिरी, रायते

सुप्रिया खासनीस
सोमवार, 1 मार्च 2021

जेवणाचे ताट भाजीबरोबरच चटण्या, कोशिंबिरीने भरलेले दिसले की मन तृप्त होते. सणासुदीला तर चटणी, कोशिंबिरीने ताटाची डावी बाजू भरलेली हवीच. पण रोजच्या आहारातही चटण्या, कोशिंबिरी हव्यात.

मिरच्यांची चटणी
साहित्य : सात-आठ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य, पाव लिंबू.
कृती : मिरच्या, कोथिंबीर, जिरे यांची बारीक चटणी वाटावी. चवीनुसार मीठ व साखर घालावे. त्यावर लिंबाचा रस घालावा. नंतर हिंग मोहरीची फोडणी घालावी.

भोपळ्याच्या सालीची चटणी
साहित्य : लाल किंवा दुधी भोपळ्याच्या साली, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर, दाण्याचे कूट, फोडणीचे साहित्य.
कृती : भोपळ्याच्या साली काढाव्यात. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मिरच्यांचे बारीक तुकडे व भोपळ्याच्या साली घालून चांगले परतावे, म्हणजे साली मऊ होतात. नंतर दाण्याचे कूट घालून चटणी वाटावी.

दाण्याची चटणी
साहित्य : अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, १ चमचा खोबऱ्याचा कीस, ३-४ हिरव्या मिरच्या, सुपारीएवढा चिंचेचा कोळ, थोडा पुदीना, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, सुपारी एवढा गूळ.
कृती : शेंगदाणे, खोबऱ्याचा कीस, मिरच्या, पुदीना, जिरे सर्व एकत्र करून वाटावे. वाटताना त्यात चिंचेचा कोळ आणि गूळही घालावा. चवीनुसार मीठ घालावे. ही चटणी चवीला वेगळी पण छान लागते.

दोडक्याच्या शिरांची चटणी
साहित्य : दोडक्याच्या शिरा, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबू, थोडे खोवलेले ओले खोबरे, दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : तेलावर दोडक्याच्या शिरा व मिरच्या चांगल्या परतून घ्याव्यात. नंतर खोबरे, दाण्याचे कूट, कोथिंबीर घालावी. चवीनुसार मीठ व साखर घालावी. सर्व साहित्य एकत्र करून बारीक चटणी वाटावी व वरून हिंगाची फोडणी घालावी.

भोपळी मिरचीचे भरीत
साहित्य : चार-पाच मोठ्या भोपळी मिरच्या, दीड वाटी गोड दही, अर्धी वाटी दाण्याचे कूट, ओले खोबरे, अर्धा चमचा जिरे पूड, तिखट, मीठ, चवीला साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : मिरच्या धुऊन पुसून घ्याव्यात. तेलाचा हात लावून वांगी भाजतो तशा मंद आचेवर भाजाव्यात. गार झाल्यावर त्या देठ काढून बारीक कुस्कराव्यात. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी. दाण्याचे कूट व जिरे पूड घालावी. चवीनुसार लाल तिखट घालावे. नंतर तेलाची हळद न घालता फोडणी गार करून त्यात घालावी.

बुंदी रायता
साहित्य : शंभर ग्रॅम खारी बुंदी, २ वाट्या गोड घट्ट दही, चवीनुसार साखर, मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे आले, थोडी चिंचेची चटणी.
कृती : भांड्यात गार पाणी घेऊन त्यात बुंदी घालावी. दहा मिनिटांनी घट्ट पिळून घ्यावी. गोड दही घुसळून घ्यावे. दह्यात मीठ, साखर, दोन हिरव्या मिरच्या व थोडे आले वाटून घालावे व दही तयार करावे. नंतर पिळून काढलेली बुंदी घ्यावी, त्यावर तयार केलेले दही घालावे. धने जिरे पूड, लाल तिखट, कोथिंबीर व चिंचेची चटणी घालून सजवावे.

घोसाळ्याचे भरीत
साहित्य : घोसाळी, दही, ओल्या मिरच्या, थोडेसे मेतकूट, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर.
कृती : घोसाळ्याच्या साली काढून त्याच्या फोडी कराव्यात. फोडी वाफवाव्यात. नंतर त्या कुस्कराव्यात. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी. मिरच्या घालून तयार केलेली फोडणी घालावी. आयत्या वेळी दही व कोथिंबीर घालून सारखे करावे.

पंचामृत
साहित्य : एक वाटी गूळ, पाऊण वाटी चिंच, २ चमचे गोडा मसाला, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, पाव वाटी ओल्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती : तीळ भाजून कुटून घ्यावेत. चिंच कोळून त्याचे पाणी करून घ्यावे. हिंग घालून खमंग फोडणी करून घ्यावी. त्यात कुटलेले तीळ, चिंचेचे पाणी (कोळ) व साहित्यातील इतर सर्व जिन्नस घालून चांगल्या दोन तीन उकळ्या आणाव्यात.

पेरूचा कायरस
साहित्य : एक वाटी पेरूच्या बारीक फोडी, सुपारीएवढी चिंच, अर्धी वाटी गूळ, लाल तिखट, मीठ, १ चमचा मेथ्या, १ चमचा गोडा मसाला व फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम मेथ्या घालून फोडणी तयार करून घ्यावी. त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट, मसाला घालून चांगली उकळी आणावी. नंतर त्यात पेरूच्या फोडी घालून शिजवाव्यात. पेरूचा कायरस तयार!

गवारीची चटणी
साहित्य : एक वाटी अगदी कोवळ्या गवारीच्या शेंगांचे तुकडे, २ लहान हिरवे टोमॅटो, ३ सुक्या मिरच्या, ३ चमचे खोबऱ्याचा कीस, २ चमचे तीळ, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर, ३ चमचे तेल.
कृती : टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. शेंगांचे तुकडे व टोमॅटोच्या फोडी तेलावर परतून घ्याव्यात. सर्व पदार्थ एकत्र करून त्याची भरडसर चटणी वाटावी. गरजेनुसार मीठ साखर व लिंबाचा रस घालावा.

काकडीची कोशिंबीर
साहित्य : एक वाटी कोचलेली काकडी, चवीनुसार मीठ व साखर, १ वाटी दही, कोथिंबीर, १-२ हिरव्या मिरच्या, पाव वाटी दाण्याचे कूट.
कृती : कोचलेली काकडी चांगली पिळून त्यातील पाणी काढून टाकावे व काकडीला तुपाचा हात लावावा. नंतर त्यात दही, साखर दाण्याचे कूट, वाटलेली मिरची, चवीनुसार मीठ व साखर घालावे. दाण्याचे कूट घालावे व चांगले एकसारखे करावे. मग वरून कोथिंबीर घालावी.

भेंडीचे भरीत
साहित्य : दोन वाट्या भेंडीचे पातळ काप, १ वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचे कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य, तेल.
कृती : चार चमचे तेलाची हिंग घालून फोडणी करावी. त्यात भेंड्यांचे काप तांबूस होईपर्यंत परतून घ्यावे. नंतर खाली उतरवून ठेवावे. गार झाल्यावर त्यात दाण्याचे कूट, ओल्या मिरच्या वाटून चवीनुसार मीठ साखर घालून कालवावे. आयत्या वेळी दही घालून भरतासारखे करावे.

मिश्र कोशिंबीर
साहित्य : एक छोटे बीट, १ गाजर, १ काकडी, १ टोमॅटो, ४-५ ओल्या मिरच्या, १ वाटी गोड दही, पाव चमचा किसलेले आले,  चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.
कृती : बीट व गाजर किसून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा व काकडी बारीक कोचून घ्यावी. हे सर्व एकत्र करावे. दही, मीठ, साखर घालून एकसारखे करावे. नंतर फोडणी करून ती गार झाल्यावर वरून घालावी.

केळ्यांची कोशिंबीर
साहित्य : एक वाटी केळीच्या फोडी, १ वाटी गोड दही, चवीनुसार मीठ व साखर, थोडे खोवलेले खोबरे.
कृती : केळीच्या फोडी आणि दही एकत्र करावे. नंतर चवीनुसार मीठ व साखर घालून कालवावे. नंतर खोबरे घालून पुन्हा कालवावे.

संबंधित बातम्या