कॉर्नचे चटपटीत पदार्थ

सुरेखा भिडे, पनवेल
सोमवार, 8 जुलै 2019

फूड पॉइंट
चटपटीत पदार्थ सर्वांनाच खायला आवडतात. पावसाळ्यात तर अशा पदार्थांना जास्तच मागणी असते. पण सतत बाहेरचे पदार्थ न खाता घरीच असे चटपटीत पदार्थ करता आले तर उत्तमच! कॉर्नपासून केलेल्या हटके रेसिपीज इथे देत आहोत... 

भेळ 
साहित्य : एक कप उकडलेले कॉर्न, १ बारीक चिरलेला कांदा, १ टोमॅटो, एक हिरवी मिरची (कापलेली), चवीनुसार मीठ, थोडी मिरची पावडर, चाट मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर व सजावटीसाठी बारीक शेव 
कृती : कॉर्न, कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ, मिरची पावडर, चाट मसाला व लिंबाचा रस एका भांड्यात घेऊन मिक्‍स करावे. नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व शेव घालून सर्व्ह करावे.

कॉर्न चीज टिक्की 
साहित्य : दीड कप उकडलेले कॉर्न, २ उकडलेले बटाटे, १ वाटी किसलेले पनीर, गरम मसाला, चाट मसाला, मिरची पावडर, मीठ व कोथिंबीर, तेल, चीज, कॉर्नफ्लोअर. 
कृती : उकडलेले कॉर्न पाणी न घालता ग्राइंड करून घ्यावे. उकडलेला बटाटा मॅश करून घ्यावा. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. ग्राइंड केलेले कॉर्न, बटाटा, चाट मसाला, मिरची पावडर, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करून घ्यावे. त्यात २-३ चमचे कॉर्नफ्लोअर घालावे. त्याची टिक्की करावी. टिक्की करताना आत थोडे चीज घालावे, नंतर टिक्की बंद करावी आणि शॅलो फ्राय करावी. जरा लालसर झाली, की ती प्लेटमध्ये काढावी. त्या टिक्कीवर परत चीज किसून घालावे. शिवाय थोडी कोथिंबीर आणि चाट मसालापण घालावा. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करवी.

मसाला बेबी कॉर्न भाजी 
साहित्य : पंचवीस-तीस उकडलेले बेबी कॉर्न, ४ बेबी कांदे, २ टोमॅटो, १ टीस्पून जिरे, तेल, मीठ चवीनुसार. 
मसाल्यासाठी साहित्य ः  पाच लसूण पाकळ्या, १ कांदा, १-२ मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, १ टीस्पून गरम मसाला, अर्धा चमचा तंदुरी मसाला, १०-१२ काजू. हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची पेस्ट करावी. 
कृती : कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाकावे. नंतर बेबी कांद्याचे तुकडे घालून परतावे. नंतर टोमॅटोची प्युरी घालून परतावे व मीठ घालून तयार मसाला त्यात घालावा. पुन्हा सर्व नीट परतून घ्यावे. मग त्यात बेबी कॉर्न घालावेत. वरून कोथिंबीर टाकून लिंबू पिळावे. ही भाजी गरम-गरम आणि पराठ्याबरोबर छान लागते.

चिला (धिरडे)
साहित्य :  उकडलेले कॉर्न, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट, ओवा व जिरे, मीठ, मिरची पावडर, कोथिंबीर
कृती : कॉर्न उकडून त्याची पेस्ट करून त्यात बेसन व तांदळाचे पीठ घालावे. भजी करतो त्याप्रमाणे पीठ तयार करून घ्यावे. त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट, ओवा, जिरे, मीठ, मिरची पावडर, कोथिंबीर सर्व घालून मिक्‍स करावे. मग तव्यावर गोल गोल डोशाप्रमाणे घालून वरून खालून लालसर भाजून घ्यावे आणि सॉसबरोबर सर्व्ह करावे.

पुलाव 
साहित्य :  गरजेनुसार तांदूळ, १ वाटी उकडलेले कॉर्न, १ चमचा तूप, २ वेलची, २ लवंग, १०-१५ काजू, कोथिंबीर, पुदिना, गरम मसाला पावडर (जिरे, शहाजिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, मिरे, वेलची सर्व भाजून बारीक पूड करा.) हा मसाला पुलावमध्ये घालावा व त्यावर गरम मसाला, मीठ चवीनुसार, तूप, कांदा.
कृती : कुकरला भात शिजवून घ्यावा. भात शिजवताना त्यात १ चमचा तूप, २ वेलची, २ लवंग घालाव्यात. म्हणजे भात शिजला की मस्त वास येतो. कढईत तूप घालावे. नंतर जिरे, लवंग, वेलची, तमाल पत्र आणि कांदा परतावा. नंतर त्यात काजू घालावेत. शिजवलेल्या भातात कॉर्न घालावे. मीठ घालून त्यावर झाकण ठेवावे. मग गरम मसाला घालून परतावा. एक वाफ आली की त्यात कोथिंबीर व पुदिना घालून गरम गरम रायत्याबरोबर सर्व्ह करावा.

चटपटे कॉर्न 
साहित्य : उकडलेले कॉर्न, चाट मसाला, मिरची पावडर, मीठ, बटर. 
कृती : उकडलेले कॉर्न घेऊन त्यात चाट मसाला, मिरची पावडर, मीठ व थोडे बटर घालावे. हे गरम गरम चटपटे कॉर्न खूपच छान लागतात. त्यात थोडा लिंबाचा रस घालावा.

उपमा 
साहित्य : उकडलेले कॉर्न, २-३ मिरच्या, मोहरी, जिरे, हिंग, हळद, तेल. 
कृती : उकडलेल्या कॉर्नमध्ये मिरच्या घालून मिक्‍सरमध्ये फिरवून पेस्ट करावी. पेस्ट अगदी बारीक व्हायला नको. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालावी. त्यात कॅर्नची पेस्ट परतावी. वरून मीठ घालून थोडी सुकत आली की झाला उपमा तयार. प्लेटमध्ये उपमा घेऊन त्यावर लिंबू पिळावे. कोथिंबीर व ओले खोबरे घालून सर्व्ह करावे. छान लागते.

पिझ्झा 
साहित्य : पिझ्झा बेस (बाजारात मिळतो), एक शिमला मिरची, १ बारीक चिरलेला कांदा, दीड वाटी उकडलेले कॉर्न, मीठ, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, ओरिगानो, चीज, बटर, काळी मिरी. 
कृती : पिझ्झा बेसला दोन्ही बाजूने बटर लावून घ्यावे. नंतर वरच्या बाजूला टोमॅटो व पिझ्झा सॉस लावावा. थोड्या तेलावर कांदा, शिमला मिरची परतून कॉर्न घालावे, त्यात मीठ, काळी मिरी घालावी. पिझ्झा बेसला सॉस लावला होता त्यावर ही भाजी घालावी. ओरिगानो आणि चीज किसून घालावे. हा पिझ्झा तव्यावर थोडा गरम करून घ्यावा.

कॉर्न पनीर पालक 
साहित्य : एक वाटी उकडलेले कॉर्न, १ वाटी बारीक चौकोनी तुकडे केलेले पनीर, १ जुडी पालक, मीठ, तेल, बटर, जिरे, ३-४ काळी मिरी, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, तिखट, हळद, लसूण पेस्ट. 
कृती : पालक उकडून पेस्ट करावी. पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरे व काळी मिरी घालावी. कांदा परतून घ्यावा. आले-लसूण पेस्ट घालून परतावे. नंतर चिरलेला टोमॅटो घालावा. सर्व परतून झाले की हळद, तिखट घालावे. उकडलेले कॉर्न, पालक पेस्ट व पनीर घालावे. चवीनुसार मीठ घालावे. चांगले परतून मग वरून थोडे बटर घालावे. पराठ्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

पास्ता 
साहित्य : कॉर्न, पास्ता, कांदा, टोमॅटो, पास्ता सॉस, टोमॅटो सॉस, मीठ, तेल, चीज, ओरिगानो, शिमला मिरची 
कृती : कॉर्न उकडून घ्यावे. पास्तापण बॉईल करावा. कढईत तेल घालून त्यात कांदा, शिमला मिरची, टोमॅटो परतावे. मग उकडलेले कॉर्न घालावेत, पास्ता घालावा, मग सॉस घालावा. थोडे ओरिगानो पण घालावे. चवीनुसार मीठ घालावे वरून चीज घालून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या