घुगनी, झालमुडी आणि गुलगुले

सुरेखा भिडे, पनवेल
सोमवार, 5 जुलै 2021

फूड पॉइंट

महाराष्ट्रीय पदार्थ तर आपण नेहमीच करतो. म्हणूनच झारखंड, बिहारमध्ये खासियत असण्याऱ्या काही पदार्थांच्या या रेसिपीज...

बटाट्याची रस्सा भाजी
साहित्य ः साले काढून फोडी केलेले ३-४ बटाटे, १ कांदा, १ टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, २-३ हिरव्या मिरच्या, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड, तेल, मीठ, कोथिंबीर.
कृती ः ही रस्सा भाजी कुकरमध्ये करावी. कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात कांदा बारीक चिरून परतावा. त्यावर आले-लसूण पेस्ट परतावी. नंतर टोमॅटो घालून परतावा. मग हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड सर्व घालून मिक्स करावे. मीठ घालावे. नंतर बटाटे घालावेत. मिश्रणात थोडे पाणी घालावे व झाकण लावावे. २-३ शिट्ट्या झाल्या की भाजी तयार. भाजी गार झाली की कोथिंबीर घालावी.
टीप ः धुसका व बटाट्याची रस्सा भाजी झारखंडमध्ये खूप लोकप्रिय आहे.

धुसका
साहित्य ः एक कप तांदूळ, अर्धा कपापेक्षा कमी चणा डाळ, पाव कप उडीद डाळ, ३-४ हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, हळद, १ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून धने पूड, चवीनुसार मीठ व तेल.
कृती ः तांदूळ व सर्व डाळी स्वच्छ धुऊन ५-६ तास भिजत घालाव्यात. नंतर मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. वाटताना त्यात ३-४ हिरव्या मिरच्या व आल्याचा तुकडा घालावा. त्याची स्मूथ पेस्ट करावी. पेस्ट बाऊलमध्ये काढावी. त्यात हळद, चवीनुसार मीठ, १ टीस्पून जिरे व अर्धा टीस्पून धने पूड घालून मिक्स करावे. त्याच्या पुऱ्या लाटून नंतर कढईमध्ये तेल घालून धुसके तळून घ्यावेत. मस्त फुगतात. हे बटाटा भाजीबरोबर खातात. ही झारखंडची रेसिपी आहे.

गुलगुले
साहित्य ः एक वाटी कणीक, अर्धा चमचा बडीशेप, ५-६ चमचे पिठीसाखर (जास्त गोड आवडत असेल तर जादा घालू शकता), तेल तळणीसाठी. 
कृती ः कणीक, बडीशेप आणि साखर सर्व मिक्स करून घ्यावे. त्यात पाणी घालून पीठ तयार करावे. छोटे छोटे गोळे तेलात सोडावेत व तळावेत. हे गुलगुले छान लागतात. लहान मुलांना नक्की आवडतील. गुलगुले गूळ घालून पण करता येतात.

सत्तू की कचौरी
साहित्य ः दोन वाट्या चणा डाळ, २ वाट्या मैदा, १ बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून सौंफ (बडिशेप), अर्धा टीस्पून कलौंजी, मीठ, तेल, हळद.
कृती ः थोडे तूप घालून मैदा भिजवून घ्यावा. डाळ मिक्सरमध्ये वाटून तिची पूड करावी. त्यामध्ये कांदा, मीठ, आले, लसूण पेस्ट, हळद, सौफ, कलौंजी, कोथिंबीर घालून एकत्र करावे. त्यात थोडे तेल व पाणी घालून भिजवावे. हे सारण जरा कोरडे हवे. मैद्यामध्ये हे सारण भरून पुरीच्या आकाराचे कचौरी लाटावी व तळून घ्यावी. ही कचौरी झारखंड, बिहारमध्ये प्रसिद्ध आहे.

चावल की खीर

साहित्य ः दीड लिटर दूध, अर्धी वाटी तांदूळ, चवीनुसार साखर, वेलची पूड, काजू, बदाम, पिस्ते सजावटीसाठी.
कृती ः दूध गरम करून घ्यावे. तांदूळ स्वच्छ धुऊन मग दुधात घालावेत. तांदूळ दुधातच शिजवावे. तांदूळ शिजले व दूध थोडे आटले की चवीप्रमाणे साखर, वेलची पूड, काजू, बदाम, पिस्ते याचे तुकडे घालावेत. साखर विरघळी की खीर तयार. ही खीर थंड खूपच छान लागते. बिहारमध्ये छट पूजेच्या वेळी ही खीर करतात.

मसालेदार झालमुडी
साहित्य ः दोन वाटी चुरमुरे, १ बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, जिरे पूड, थोडा चाट मसाला, सरसो तेल, अर्धी वाटीपेक्षा कमी भिजवलेले चणे, बारीक चिरलेली थोडी कैरी, १ बारीक चिरलेला उकडलेला बटाटा.
कृती ः बाऊलमध्ये चुरमुरे, कांदा, मिरची, मीठ, चाट मसाला, कैरी तुकडे, चणे, बटाटा, सरसो तेल, जिरे पूड व कोथिंबीर सर्व घालून मिक्स करावे. मसालेदार झालमुडी तयार. ही खूपच छान लागते.

मिरची का सालन

साहित्य ः चार छोटे चमचे शेंगदाणे, २ छोटे चमचे तीळ, १ छोटा चमचा धने, १ छोटा चमचा जिरे, ३-४ लाल सुक्या मिरच्या, ६-७ लांब व जाड हिरव्या मिरच्या, चिंचेचा कोळ, १ बारीक चिरलेला कांदा, ४-५ कढीपत्त्याची पाने, आले-लसूण पेस्ट, १ चमचा काश्‍मिरी मिरचीचे तिखट, १ चमचा हळद, थोडा गूळ, चवीनुसार मीठ.
कृती ः शेंगदाणे, तीळ, धने, जिरे व सुकी लाल मिरची सर्व भाजून घ्यावे व गार झाले की मिक्सरमधून थोडे पाणी घालून स्मूथ पेस्ट करावी. बाजारात थोडी लांब व जाड हिरवी मिरची मिळते. अशा ६-७ मिरच्यांना मधून चिर पाडावी व बिया काढून टाकाव्यात. मिरचीमध्ये थोडा चिंचेचा कोळ लावावा. मग तव्यावर १ छोटा चमचा तेल घालून मिरच्या जरा परतून घ्याव्या. एक ते दोन मिनिटे परतून बाजूला ठेवावे. 
कढईत २-३ चमचे तेल घ्यावे. मग तेल गरम झाले की त्यात कांदा परतावा. मग कढीपत्त्याची पाने घालावीत. नंतर आले लसूण पेस्ट घालून पुन्हा परतावे. त्यावर १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, १ चमचा हळद घालावे. सर्व परतून झाल्यावर स्मूथ केलेली पेस्ट त्यात मिक्स करावी. चवीनुसार मीठ घालून परत मिक्स करावे. नंतर चिंचेचा कोळ, गूळ घालावा. एक ग्लास पाणी घालून उकळी आणावी. मग त्यात परतलेल्या मिरच्या घालून परत उकळी आणावी. हे आंबट, गोड, तिखट मिरचीचे सालन खूपच सुंदर लागते. पोळी, पराठा व भाताबरोबर खावे.

घुगनी
साहित्य ः सरसो तेल, तमालपत्र, जिरे, मोहरी, हिंग, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेले टोमॅटो, लसूण पेस्ट, धने-जिरे पूड, गरम मसाला, मिरची पूड, छोटे चणे.
कृती ः कुकरमध्ये सरसों तेल घालून त्यात तमालपत्र, जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. नंतर त्यात कांदा परतावा. कांद्याचा रंग बदलला की आले लसूण पेस्ट, २ बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतावे. नंतर त्यात धने-जिरे पूड घालावी. थोडा गरम मसाला घालून परतावे. छोटे चणे ५-६ तास भिजवून घ्यावेत. हे चणे मसाल्यामध्ये घालावेत. मग त्यात मीठ, काश्मिरी मिरची पूड घालावी. काश्‍मिरी मिरची पूडमुळे रंग छान येतो. हे मिश्रण परतून घ्यावे. मिश्रणात एक ग्लास पाणी घालून झाकण लावावे व कुकरच्या ३-४ शिट्ट्या कराव्यात. गार झाले की कोथिंबीर घालून घुगनी सर्व्ह करावे. (बिहार, बंगाल, झारखंडमध्ये सरसो तेलात करतात. आपण कुठलेही तेल घालून करू शकतो.)

खट्टा मिठा चटपटा आमझोर

साहित्य ः दोन-तीन उकडलेल्या कैऱ्यांचा गर, साखर, काळे मीठ, पुदिना, थोडी जिरे पूड व चवीला चाट मसाला.
कृती ः कैरीचा गर व थोडी साखर मिक्सरमधून एकजीव करून घ्यावी. त्यात थोडे पाणी घालावे. एक वाटी पुदिन्याच्या पानांची पाणी घालून पेस्ट करावी. ही पेस्ट आणखी थोडे पाणी घालून गाळून घ्यावी. पेस्टमध्ये कैरी गर, जिरे पूड, काळे मीठ, थोडा चाट मसाला घालून सर्व्ह करावे. हे आंबट गोड आमझोर बिहार, झारखंडमध्ये सर्व जण आवडीने पितात. खूपच चविष्ट लागते.

संबंधित बातम्या