पोटभरीचे पदार्थ

सुवर्णा इनामदार
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

फूड पॉइंट
पोटभर खाल्ले, की दिवसाची सुरुवात चांगली होते. पण प्रत्येक वेळी पोटभरीचा पदार्थ म्हणून भाजी भाकरीचा बेत शक्य नसतो आणि नाश्त्याच्या वेळी तर नकोच वाटतो...अशा वेळी चविष्ट आणि पोटभरीचे पदार्थ करण्याकडे आपला कल असतो. अशाच पदार्थांच्या काही रेसिपीज इथे देत आहोत...

रवा-ओट्‌स ढोकळा 
साहित्य : एक वाटी कच्चा रवा, १ वाटी मिक्‍सरला फिरवून घेतलेली ओट्‌सची पावडर, अर्धी वाटी दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, आल्याचा कीस, मीठ, आवश्‍यकतेनुसार पाणी, १ छोटे पाकीट इनो. 
कृती : रवा व ओट्‌समध्ये दही व आवश्‍यकतेनुसार पाणी घालून सरसरीत करून अर्धा तास झाकून ठेवावे. आयत्यावेळी त्यात मिरचीचा ठेचा, मीठ, किसलेले आले घालून मिक्‍स करावे. ढोकळा पात्र गॅसवर ठेवून त्यात पाणी गरम करायला ठेवावे. ढोकळा स्टॅण्डला (ताटलीला) तेल लावून घ्यावे. अगदी आयत्यावेळी इनो मिक्‍स करून ताटली गॅसवरील भांड्यात ठेवावी. १० मिनिटे मोठ्या आचेवर गॅसवर ठेवावे. नंतर गॅस बंद करावा. गार झाले, की बाहेर काढून घ्यावे. त्यावर वरून तेलाची मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्त्याची घालून फोडणी करून घालावी. 

पॉपकॉर्न थालीपीठ 
साहित्य : दोन वाट्या पॉपकॉर्नचा भरडा, १ वाटी कणीक, अर्धी वाटी तांदूळ, १ मोठा कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, १ चमचा जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, तेल, पाणी. 
कृती : सर्व साहित्य मिक्‍स करून घ्यावे. तव्याला थोडे जास्त तेल लावावे. पातळ थालीपीठ लावून नेहमीप्रमाणे दोन्हीकडून भाजावे. गरम गरम लोणी काढून खायला द्यावे.

पॉपकॉर्न भजी 
साहित्य : तयार पॉपकॉर्न, अर्धी वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी तांदूळ पिठी, पाव वाटी कणीक, चिमूटभर सोडा, १ चमचा जिरे, १ चमचा तीळ, तिखट, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे कॉर्नफ्लोअर, पाव चमचा हळद, पाणी आवश्‍यकतेनुसार. 
कृती : पॉपकॉर्न मिक्‍सरमधून फिरवून घ्यावेत. जाडसर भरडा काढून घ्यावा. त्यात सर्व साहित्य घालून मिक्‍स करावे. पाणी जास्त घालू नये. छोटे छोटे गोळे करून तेलात तळावेत. भजींना तांबूस रंग आल्यावर काढून सॉस बरोबर सर्व्ह करावीत.

कोहळ्याचे पराठे 
साहित्य : कोहळा, कणीक, २ चमचे डाळीचे पीठ, कच्च्या जिऱ्याची पूड, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, १ चमचा हिंग, साखर, किसलेले आले, १ वाटी कोथिंबीर आणि तेल. 
कृती : कोहळ्याची साल काढून कापून बिया काढाव्यात. बिया कोवळ्या असतील, तर घेतल्या तरी चालतील. त्याचा २ वाट्या कीस घ्यावा. तो कीस कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला, की त्यात जिरेपूड, ठेचा, मीठ, साखर, हिंग, आल्याचा कीस व कोथिंबीर घालून मिक्‍स करावे. १० ते १५ मिनिटांत त्याला पाणी सुटते. त्याच पाण्यात बसेल एवढी कणीक घालावी. डाळीचे पीठ घालावे. तेल लावून कणीक मळावी व एक तास भिजत ठेवावी. पोळ्या करतो त्याचप्रमाणे घडीची पोळी करून लाटून साजूक तुपावर भाजावी. लोणच्याबरोबर सर्व्ह करावी.

बाजरी पुरी 
साहित्य : तीन वाट्या बाजरीचे पीठ, अर्धी वाटी कणीक, १ वाटी चिरलेली मेथीचे पाने, २ चमचे तीळ, १ चमचा जिरे, तिखट, मीठ आवडीनुसार, १ चमचा हळद, पाव वाटी तेलाचे मोहन, पाणी आवश्‍यकतेनुसार, तळणीसाठी तेल. 
कृती : सर्व साहित्य नीट एकत्र करून घ्यावे. त्यात गरम तेलाचे मोहन टाकावे. आवश्‍यकतेनुसार पाणी टाकून पीठ भिजवावे. पीठ भिजवल्यावर फार वेळ ठेवू नये. लगेच पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात आणि सॉसबरोबर सर्व्ह कराव्यात.

तांदळाचे थालीपीठ 
साहित्य : एक वाटी तांदूळ पिठी, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, चिमूटभर हिंग, तेल आणि कोमट पाणी. 
कृती : सर्व साहित्य कोरडेच मिक्‍स करून घ्यावे. नंतर त्यात थोडे कोमट पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यावा. तव्याला खाली तेल लावून नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घ्यावे. भाजताना झाकण ठेवून १० मिनिटे दोन्ही बाजूंना वाफ द्यावी. गरम गरम साजूक तुपाबरोबर सर्व्ह करावे.

तुरीच्या डाळीची भजी 
साहित्य : दोन वाटी तूर डाळ (चार तास भिजवलेली), १ मोठा कांदा, १ वाटी कोथिंबीर, २ चमचे जिरे, हळद, १ चमचा तीळ, मीठ, २ चमचे तिखट, तळण्यासाठी तेल. 
कृती : भिजवलेली डाळ कमी पाणी घालून वाटावी. वाटताना त्यात जिरे, तिखट, मीठ, हळद टाकावी. कांदा उभा चिरून घेऊन त्यात टाकावा. चिरलेली कोथिंबीर व तीळ टाकून सर्व नीट मिक्‍स करावे. गरम तेलात तांबूस रंगावर तळावेत. ही भजी खूप खरपूस व चविष्ट लागतात.

पॉपकॉर्न 
साहित्य : पॉपकॉर्नचे दाणे, तेल, तिखट, मीठ, हळद (ऐच्छिक) 
कृती : कुकरची रिंग काढावी. कुकर गॅसवर ठेवून गरम झाल्यावर त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात पॉपकॉर्नचे दाणे टाकावे. दाणे गरम झाल्यावरच तिखट व हळद टाकावी. अन्यथा हळद व तिखट जळते. नंतर त्यावर झाकण ठेवावे. हवा जाण्यास जागा ठेवावी. कुकरच्या आकाराचा अंदाज घेऊन दाणे टाकावेत. (अर्धी वाटी किंवा १ वाटी दाणे) कारण पॉपकॉर्न फुलण्यासाठी जागा खूप लागते. तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करावा. गार झाल्यावर मीठ टाकावे. हवे असल्यास चाट मसाला टाकून खावे.

तांदूळ-मूगडाळ पुरी 
साहित्य : एक वाटी शिजवलेली मूगडाळ, तांदूळ पिठी, जिरे, तीळ, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि तेल. 
कृती : नेहमीप्रमाणे मूगडाळ कुकरला हळद टाकून शिजवून घ्यावी. त्यात बसेल तेवढे तांदूळ पीठ घालून पीठ भिजवावे. नंतर त्यात जिरे, तीळ, तिखट, मीठ, चिरलेली कोथिंबीर टाकून पीठ मळून घ्यावे. आवश्‍यकतेनुसार पाणी टाकावे. प्लॅस्टिकच्या पिशवीवर पुऱ्या लाटाव्यात. तेलात तळून घ्याव्यात. सॉसबरोबर सर्व्ह करावे. या पुऱ्या चार-पाच दिवस टिकतात. प्रवासाला नेण्यासाठी उपयोगी पडतात.

मिक्‍स डाळीचा ढोकळा 
साहित्य : एक वाटी हरभरा डाळ (वाटी छोटी घ्यावी), १ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूगडाळ, पाव वाटी उदीड डाळ, पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी मसूर डाळ, आले, लसूण, मिरचीचा ठेचा, आंबट ताक, मीठ, २ पाकिटे इनो. 
कृती : सर्व डाळी व तांदूळ रात्री भिजत घालावेत. सकाळी डाळींमधले पाणी काढून घ्यावे आणि इनो सोडून सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून सरसरीत करावे. अगदी आयत्यावेळी इनो घालून लगेच गॅसवर ठेवावे. १० मिनिटे पूर्ण गॅसवर वाफवून घ्यावे. गार झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात. वरून तेलाची, मोहरी, जिरे, तीळ, कढीपत्ता घालून फोडणी घालावी.

संबंधित बातम्या