पुऱ्या, ठेपले, वडे

तनुजा सानप  
गुरुवार, 22 मार्च 2018

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

मसालेदार दहीभेंडी
साहित्य ः अडीचशे ग्रॅम ताजी भेंडी, दोनशे ग्रॅम दही, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मोहरी-कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, अर्धा लहान चमचा हळदपूड, १ मोठा चमचा तेल, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल, चवीप्रमाणे मीठ
कृती ः भेंडी धुवून त्याचे अर्धा इंच लांबीचे तुकडे कापावे. दही घुसळून घ्यावे. त्यात वाटलेली हिरवी मिरची मीठ घालावी तसेच जिरे पूड घालावी. तेल गरम करून भेंडी तळून घ्यावी. लक्षात ठेवावे भेंडीचा रंग बदलता कामा नये. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, कढीपत्ता परतावा. हळद टाकावी. त्यात दही मिसळा. सोबत तळलेली भेंडीसुद्धा मिसळावी. जिरा पुलावासोबत सर्व्ह करावे.

हिरव्या मिरचीचे वडे
साहित्य ः अर्धा कप हिरवे हरभरे वाफवून मिक्‍सरमध्ये वाटलेले १ चमचा आलं लसूण मिरची पेस्ट, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, दीड चमचा तीळ, अर्धा कप बाजरी पीठ, पाव कप मका पीठ, पाव कप ज्वारी पीठ, २ चमचे दही, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ
कृती ः वाफवलेले हिरवे चणे मिक्‍सरमधून काढून त्याची पेस्ट करावी. त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट, हळद, हिंग, दही, बाजरी पीठ, ज्वारी पीठ, मका पीठ, तीळ, तिखट, मीठ, हळद गाळावे. गरज असेल तर पाणी घालून घट्ट मळावे. त्याचे गोळे (छोटे) बनवून त्याला थोडे दाबून गरम तेलात तळून घ्यावे. मसाला दह्यासोबत सर्व्ह करावे.

चंद्रपुरी वडे
साहित्य ः अर्धी वाटी मटकी, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडद डाळ, १ वाटी चणा डाळ, तूर डाळ, चवळी एकत्र चवीनुसार मीठ, १ चमचा कढीपत्ता, २ चमचा तीळ, धन्याची भरड, २ चमचे भिजवलेली मूग डाळ, १ चमचे कोथिंबीर, दीड चमचा वाटलेले आलं मिरची जिरं, अर्धा चमचा हळद, २ चमचे मोहन
कृती ः सर्व डाळी ४ तास भिजवून जाडसर वाटून घ्यावे. वाटताना त्यात मीठ, आलं, मिरची, जिरं वाटून घालावे. नंतर त्यात हळद, तिखट, धण्याची बरड, कढीपत्ता, कोथिंबीर, भिजवलेली मूग डाळ, तिखट, मोहन (मोहन जास्त झाल्यावर वडे फुटतात) घालून त्याचे वडे करावेत. गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत.

गाजराच्या पुऱ्या
साहित्य ः अर्धी वाटी गहू पीठ, अर्धी वाटी बेसन, २ स्पून मक्‍याचे पीठ, १ वाटी किसलेला गाजर, अर्धा चमचा मिरी पूड, १ चमचा तिखट, १ चमचा मीठ, २ चमचे कोथिंबीर, २-३ चमचे दही
कृती ः गहू पीठ, बेसन, मक्‍याचे पीठ, मिरी पूड, मीठ, तिखट, कोथिंबीर, दही घालून पाण्याने पीठ मळावे. त्याची पोळी लाटावी. त्यावर गाजर पसरावा. त्यावर तीळ घालावेत. त्यावरून दाबून लाटावे. साच्याने त्याच्या पुऱ्या पाडाव्यात. गरम तेलात तळून घ्यावे.

मेथी ठेपला
साहित्य ः चार वाटी मेथीची पाने, २ वाटी गहू पीठ, १ वाटी बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, पाव वाटी रवा, ३ चमचे तीळ, ४ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा हळद, २ चमचे तिखट, २ चमचे जिरे, चवीनुसार मीठ
कृती ः मेथीची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरावी. त्यात गहू, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हळद, मीठ, तिखट, तीळ, जिरे, तेलाचे मोहन (गरम तेल) घालून घट्ट मळावे. २ तास भिजत ठेवावे. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून लाटावे. दोन्ही बाजूने खरपूस भाजावे व लोणच्यासोबत सर्व्ह करावे.

पेन्टाग्रेन पराठा
साहित्य ः दोनशे ग्रॅम गहू पीठ, १०० ग्रॅम मूग डाळ पीठ, १०० ग्रॅम बेसन, १०० ग्रॅम पोहे, १०० ग्रॅम नाचणी पीठ, १ चमचा ओवा, १ चमचा मीठ, २ चमचे तिखट, अर्धा कांदा, अर्धा कप मेथीची पाने, अर्धा कप पालक, अर्धा कप कोबी, तेल, आलं-लसूण पेस्ट
कृती ः सर्व पिठं न भाजता मिक्‍स करून घ्यावीत. मळताना त्या ओवा, मीठ घालून पाण्याने मळावे. कढईत तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. त्यात कांदा घालून परतावा. त्यात सर्व भाज्या बारीक चिरून घालाव्यात. त्यात तिखट मीठ घालावे. मसूर डाळ शिजवून मऊ करावी. फोडणीमध्ये मसूर डाळ घालावी. आपले सारण तयार करावे. सारण थंड करून घ्यावे. कणकेचा गोळा घेऊन त्यात सारण भरून पराठा लाटावा. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. लोणच्यासोबत सर्व्ह करावा.

पालकाचे शाही कबाब
साहित्य ः पालक एक जुडी, हरभरा डाळ १ वाटी, २ स्पून हिरवी मिरची-आलं- लसूण पेस्ट, १ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, ब्रेडचा चुरा, २ टेबल स्पून बेदाणे, २ टेबल काजूचे काप, १ टीस्पून साखर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर
कृती ः पालकाची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक चिरून घ्यावी. हरभरा डाळ दोन तास कोमट पाण्यात भिजवावा. डाळ उपसून पाणी न घालता मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावी. ब्रेडचा चुरा आणि तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण तयार करावे. चपटे गोळे बनवून ब्रेड चुऱ्यामध्ये घोळवून डीप किंवा शॅलोफ्राय करावे. (पालकाचे मिश्रण सैल झाल्यावर थोडा ब्रेडचा चुरा मिक्‍स करावा) व सर्व्ह करावेत.

दुधी भोपळ्याची चटणी (केरळ)
साहित्य ः दोन वाटी दुधी भोपळा कीस, १ वाटी किसलेला नारळ, २-३ हिरवी मिरच्या, चवीनुसार मीठ, २ चमचे दही, १०-१२ कढीपत्ता पाने, हिंग, १ चमचे जिरे, २ टीस्पून उडद, चणा डाळ, फोडणीसाठी तेल
कृती ः दुधी भोपळ्याचा कीस सालीसकट तेलात परतावा वा चांगला भाजावा. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये दुधी भोपळा, किसलेला नारळ, दही, मीठ, मिरची, कढीपत्ता बारीक वाटावे. त्यावर फोडणीसाठी तेल गरम करून हिंग उडद, चणा डाळ, जिऱ्याची फोडणी द्यावी व सर्व्ह करावे.

खापरोळी (कोकणी पदार्थ)
साहित्य ः एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, १ चमचा मेथी, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद, तूप
कृती ः तांदूळ, उडीद डाळ, चना डाळ, मेथी दाणे सर्व एकत्र करून ६ तास भिजवावे. त्यात हळद, मीठ घालावे. मिक्‍सरमधून काढावे. ८ तास आंबवावे. पॅनवर तूप टाकून डोश्‍याप्रमाणे पसरवून (जाडसर) दोन्ही बाजूने भाजावे. गरम असतानाच त्यावर मेथी आणि जिरेपूड टाकून सर्व्ह करावे.

टोमॅटो पुलाव
साहित्य ः अर्धा किलो बासमती तांदूळ, पाव किलो शिजवलेल्या टोमॅटोचा रस, अर्धा नारळ, ३ कांदे, काजू - बेदाणे, अर्धा जुडी कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, ४ लवंगा, २ तुकडे दालचिनी, २ मसाला विलायची
कृती ः नारळाचे दूध काढून ते टोमॅटोच्या गार झालेल्या रसात घालून एकत्र करावे. कांदा, मिरची, कोथिंबीर वाटून घ्यावे. थोड्या तुपात दालचिनी, लवंगा, वेलदोडे घालून परतावे. चवीनुसार मीठ, हळद घालावे. टोमॅटोचे मिश्रण व थोडे पाणी गरजेनुसार घालून मोकळा पुलाव बनवावा. वर काजू तुकडे व बेदाणे तळून घालावे व सर्व्ह करावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या