कैरी स्पेशल

तनुजा सानप
सोमवार, 24 जून 2019

फूड पॉइंट
आंबट-गोड चवीची कैरी सर्वांनाच आवडते. रोजच्या जेवणात मेन्यू कोणताही असो, पण तोंडी लावायला कैरीपासून केलेली चटणी, लोणचे, छुंदा असेल तर जेवणाची चव आणखी वाढते. तर अशाच काही कैरी स्पेशल रेसिपीज इथे देत आहोत.

कैरी-फणस लोणचे
साहित्य : पाचशे ग्रॅम कोवळ्या फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे, २५० ग्रॅम किसलेली आंबट कैरी, २ टेबलस्पून हळद, १०० ग्रॅम मोहरी डाळ, १ टीस्पून हिंग, सुक्‍या लाल मिरचीची भरड, मीठ, १ टेबलस्पून बडीशेप, १ टीस्पून मेथी दाणे आणि मोहरीचे तेल.
कृती : बडीशेप, मेथी दाणे भरडून घ्यावे. तेल कोमट करून त्यात मेथी दाणे, हळद, हिंग, घालावे. सर्व मसाले एकत्र करून त्यावर ही फोडणी ओतावी. गार झाल्यावर फणसाचे तुकडे आणि कैरीचा कीस मिक्‍स करून बरणीत भरावे. वरून तेल ओतून अधूनमधून हलवावे.

साखरांबा
साहित्य : एक किलो मोठ्या आकाराच्या गरयुक्त कैऱ्या, १ किलो साखर, सुंठ, वेलची पूड आणि केशर काड्या.
कृती : कैऱ्या सोलून गराचे लहान तुकडे करावेत. जाड बुडाच्या पातेल्यात साखर घालून त्यात एक वाटीभर पाणी घालावे व ते गॅसवर ठेवावे. साखर पूर्णपणे विरघळल्यावर त्यात कैरीचे काप टाकून सतत ढवळावे. तीन तारी पाक तयार होऊन पाकाला मधासारखा दाटपणा आला, की गॅस बंद करावा. त्यात सुंठ, वेलची पूड, केशर काड्या टाकून साखरांबा चांगला ढवळून एकजीव करावा. पूर्णपणे गार झाल्यावर बरणीत भरावा.

छुंदा
साहित्य : एक किलो गरयुक्त कैरी, १ किलो साखर, २ टेबलस्पून तिखट, १ टेबल स्पून मीठ, २ टेबलस्पून जिरेपूड.
कृती : कैऱ्या सोलून किसून घ्याव्यात. कैरीच्या किसात साखर घालून ती चांगली एकत्र करावी. हे मिश्रण स्टीलच्या पातेल्यात घालून पातळ कापडाने बांधून ८ ते १० दिवस कडक उन्हात ठेवावे, ज्यामुळे साखरेचा पाक होतो. पाक झाल्यावर त्यात तिखट, मीठ, जिरेपूड घालून २ दिवस पातेले परत उन्हात ठेवून छुंदा बाटलीत भरून ठेवावा.

गोड लोणचे
साहित्य : एक किलो आंबट कैरी, १०० ग्रॅम मोहरी डाळ, ५० ग्रॅम धणे, २५ ग्रॅम मेथी दाणे, ५०० ग्रॅम गूळ, तिखट चवीनुसार, २ टेबलस्पून लवंग, दालचिनी, जायफळ पूड, हिंग, तिळाचे तेल.
कृती : कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात. धणे, मेथी दाण्याची भरड पूड करून घ्यावी. गूळ किसावा. मोहरी डाळ, धणे पूड, मेथी पूड, कोरडी भाजून घ्यावी. एका परातीत सर्व मसाले एकत्र करून हिंग, तिखट घालून त्यावर कोमट तेल ओतावे. किसलेला गूळ, मीठ टाकून एकत्र करावा. कैरीच्या फोडी घालून कालवावे. नंतर बरणीत भरून ठेवावे. थोडा वेळ हलवत राहावे. गूळ मिक्‍स केल्यावर काही तासात गुळाचा पाक तयार होतो. त्यामुळे तेल कमी वापरावे.

कैरी-चणाडाळ चटणी
साहित्य : एक वाटी चणाडाळ (४ तास पाण्यात भिजवलेली), १ मोठी कैरी, तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, तेल, लसूण.
कृती : कैरीचे काप, चणाडाळ, तिखट, कोथिंबीर, मीठ, लसूण जाडसर वाटून घ्यावे. गरम तेलात हिंग, मोहरी, कढीपत्ता, जिरे घालून फोडणी द्यावी. नंतर थंड करून मिश्रणात घालावी व चटणी सर्व्ह करावी. 

कैरी-शेंगदाणा चटणी
साहित्य : एक वाटी शेंगदाणे, १ चिरलेली कैरी, १ इंच आले, मीठ चवीनुसार, तिखट आवडीनुसार, ४-५ पाकळ्या लसूण, कोथिंबीर, फोडणीसाठी २ चमचे तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, १ चमचा गूळ.
कृती : शेंगदाणे, कैरी, आले, लसूण, मीठ, तिखट, 
कोथिंबीर, गूळ सर्व मिक्‍सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. नंतर गरम तेलात फोडणीसाठी हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून फोडणी थंड करून वरील मिश्रणात घालावी व चटणी सर्व्ह करावी.

भरीत 
साहित्य : दोन कैऱ्या, १ कांदा, १ मोठी काकडी, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, साखर, हिरव्या मिरच्या आवडीनुसार, मीठ चवीनुसार. 
कृती : कैऱ्या वाफवून त्याचा गर काढावा. कांदा व काकडी सोलून बारीक किसावी. पुदिना, कोथिंबीर, मिरची बारीक चिरावी. लागेल तेव्हा गरात कांदा, काकडी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, मीठ आणि साखर मिसळावे. जर बराच वेळ मिसळून ठेवल्यास कांद्याला पाणी सुटून मऊ होते व चव लागत नाही.

कैरी-कांदा चटणी
साहित्य : एक मोठी कैरी, १ कांदा, हिरव्या मिरच्या, काळे मीठ, साधे मीठ चवीनुसार, १ चमचा गूळ, अर्धा चमचा जिरे, फोडणीसाठी मेथी दाणे, हिंग, हळद, तेल.
कृती : कैरीची साले काढून घ्यावीत. कैरी किसून घ्यावी. कांदा सोलून किसून घ्यावा. हिरव्या मिरच्या आणि जिरे जाडसर भरडून घ्यावेत. कांदा कैरीचा किस, जिरे, मिरची, मीठ, गूळ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. तेलात हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करून गार करावी. मग मिश्रणात घालावी आणि भाकरी किंवा भाताबरोबर खावी.

कैरी-गुळाची चटणी
साहित्य : एक वाटी किसलेली कैरी, १ वाटी गूळ, चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता.
कृती : प्रथम कैरी आणि गूळ मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे. त्यात मीठ घालावे. गरम तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी करावी व वरील मिश्रणात घालावी. नंतर सर्व्ह करावी. ही चटणी फ्रीजमध्ये २-३ दिवस चांगली राहते.

कढी
साहित्य : दोन-तीन कैऱ्या, १ वाटी खोवलेले खोबरे, १ इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिरवी मिरची आवडीनुसार, २ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), हळद, मेथी दाणे, मोहरी, सुक्‍या लाल मिरच्या, हिंग, तेल, मीठ, कोथिंबीर, साखर, तिखट बुंदी.
कृती : कैऱ्या वाफवून त्याचा गर काढून घ्यावा. खोवलेल्या नारळात थोडे पाणी घालून मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यातच जिरे, आले, हिरवी मिरची टाकून वाटावे. नारळाच्या वाटलेल्या मिश्रणात डाळीचे पीठ, साखर, मीठ, कैरीचा गर, वाटण व हळद घालून एकजीव करावे. गॅसवर मंद आचेवर मिश्रण ठेवून कढी दाट होईपर्यंत शिजवावे. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मेथी दाणे, मोहरी, हिंग, लाल मिरच्या घालून फोडणी करावी व कढीवर घालावी. सर्व्ह करताना आवडत असल्यास त्यात तिखट बुंदी घालावी.

कैरी-खोबऱ्याची चटणी
साहित्य : एक वाटी कैरीच्या चिरलेल्या फोडी, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, २ चमचे चिरलेली कोथिंबीर, १ चमचा गूळ, काळे मीठ, साधे मीठ, हिरवी मिरची आवडीनुसार, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता.
कृती : कैरी, खोबरे, कोथिंबीर, मिरची एकत्र करून मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे. गरम तेलात हिंग, मोहरी, कढीपत्ता, जिरे, मोहरी घालून फोडणी वरील मिश्रणात घालावी. वाटतानाच त्यामध्ये मीठ घालावे. ही चटणी फ्रीजमध्ये २-३ दिवस चांगली राहते.  

संबंधित बातम्या