कबाब, स्वीट-रोल, थालिपीठे

तनुजा सानप, पुणे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

कडधान्याचे थालिपीठ
साहित्य : एक वाटी मटकी, अर्धी वाटी मूग, एक टेबलस्पून हिरवे वाटाणे, दोन टीस्पून आलं - लसूण मिरची पेस्ट, एक टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून धनेपूड, तीन टेबल स्पून किसलेले गाजर, दोन टेबलस्पून किसलेला कोबी (किंवा आवडीनुसार पालेभाज्या), अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून साखर, भाजण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ
कृती : सर्व कडधान्याला मोड असावेत. कुकरमध्ये चार-पाच शिट्ट्या करून त्यातील पाणी काढून स्मॅश करून घ्यावे. त्यात आलं - लसूण - मिरची पेस्ट, जिरे पूड, धने पूड, किसलेला गाजर आणि कोबी (किंवा आवडीनुसार पालेभाज्या), मीठ, गरम मसाला, मिसळून  चांगले मळून घ्यावे. त्याचे थालीपीठ थापून दोन्ही बाजूने गरम तव्यावर थोडे तेल टाकून खरपूस भाजून घ्यावे.

पनीर स्वीट रोल
साहित्य : शंभर ग्रॅम पनीर, शंभर ग्रॅम पेठा, अर्धी वाटी किसलेले खोबरे, गुलकंद, काजू-बदामाचे तुकडे
कृती : पनीर व पेठा सम प्रमाणात घेऊन ते किसावे. चांगल्या प्रकारे मिक्‍स करून मळावे. थोडासा गोळा घेऊन त्याच्यामध्ये थोडे गुलकंद घेऊन बंद करून त्याला लांबट आकार द्यावा. सुक्‍या खोबऱ्याच्या किसात घोळवावे. सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रूट घालून द्यावे. स्वीट डिश म्हणून झटपट व छान पदार्थ आहे.

गोटा भजी
साहित्य : अर्धा कप रवाळ बेसन, अर्धा कप मूग डाळ पीठ, पाव कप कसुरी मेथी, एक टेबल स्पून लसूण पेस्ट, अर्धा कप दही, दोन लवंगा, दोन चिमटी दालचिनी पावडर, एक टीस्पून अख्खे धने, दोन टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, दोन टीस्पून साखर, अर्धा टीस्पून सोडा
कृती : सर्व खडामसाल्याची जाडसर भरड करून घ्यावी. जाडसर चिकट असे पीठ भिजवावे. तळण्याच्या थोडे आधी सोडा मिसळावा. हातावर तेल लावून चमचाभर मिश्रण हातावर गोळा बनवून मंद आचेवर तळून घ्यावे. हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावे.

सिकमपुरी कबाब
साहित्य : भिजवून वाफवलेली चना डाळ एक वाटी, भिजवून कोरडे केलेले सोया ग्रॅन्युअल्स एक वाटी, अर्धी वाटी चिरलेला कांदा, एक चमचा चिरलेला पुदिना, एक चमचा चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट, दोन टीस्पून काजू पावडर, एक टीस्पून चारोळी, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर, एक-दोन विलायची, अर्धा टीस्पून गरम मसाला, जावीत्री पावडर दोन चिमूट, धने - जिरे पावडर एक  टीस्पून, एक टीस्पून टांगलेले दही (२ तास कापडात बांधून टांगावे), ब्रेड क्रम्स, कॉर्न फ्लोअरचा घोळ (कॉर्नफ्लोअर, मीठ पाण्यात घालून पेस्ट करावी) चवीनुसार मीठ, मिरची चिरलेली दोन-तीन.
कृती : चणा डाळ, सोया ग्रॅन्युअल्स, मीठ, सर्व मसाले, आलं-लसूण पेस्ट, चारोळी, काजू पावडर, मिरची सर्व एकत्र करून मिसळून घ्यावे. एका भांड्यात पुदिना, कोथिंबीर, कांदा एकत्र करावे. त्यात टांगलेले दही मिसळावे. वरील मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवून त्यात दही - कोथिंबीर - पुदिना - कांद्याचे मिश्रण घालून त्याचा रोल करून घ्यावा. तो कॉर्नफ्लोअरच्या घोळात बुडवून, नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळून व तळून घ्यावेत.

हैदराबादी बगारे बैंगन 
साहित्य : छोटी वांगी पाव किलो, उभा चिरलेला कांदा, एक वाटी आले - लसूण - मिरची पेस्ट दोन टीस्पून, चिंचेचा कोळ तीन टीस्पून, एक टेबल स्पून धने, दोन टेबल स्पून तीळ, एक टेबल स्पून शेंगदाणे, जिरे एक टीस्पून, खसखस दोन टीस्पून, दोन लवंगा, दोन विलायची, शहाजिरे अर्धा टीस्पून, दालचिनी एक इंच, दोन टेबल स्पून तेल, मोहरी अर्धा टीस्पून, हिंग पाव टीस्पून, अर्धा टीस्पून मेथी दाणे चवीनुसार मीठ, हळद अर्धा टीस्पून.
कृती : वांगी भरल्या भाजीसाठी चिरून मीठ घातलेल्या पाण्यात अर्धा तास ठेवावी. कांदा तेलावर परतून घ्यावा. धने, जिरे, तीळ, शेंगदाणे, खसखस, शहाजिरे, दालचिनी, लवंगा, विलायची, सर्व वेगवेगळे कोरडे भाजून पूड करावी. वांगी निथळून घ्यावी. कांदा वाटून घ्यावा. कढईत जरा जास्त तेल घालून वांगी चांगली परतून घ्यावीत. चांगली वाफली, की सर्व मसाला घालावा. परतून थोडे पाणी घालून भाजी शिजवावी. चिंचेचा कोळ शेवटी घालून, मीठ घालून गॅस करावा. आंबट, तिखट, तेलकट चविष्ट अशी पारंपरिक भाजी खूप छान लागते.

नवधान्याचा ढोकळा
साहित्य : एक वाटी उडीद डाळ, दोन वाटी तांदूळ, एक वाटी ज्वारी, अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तूरडाळ, अर्धी वाटी पांढरे वाटाणे, अर्धी वाटी चवळी, दोन वाटी आंबट दही, हिंग पाव चमचा, अर्धा चमचा लिंबू सत्तव, एक टीस्पून खायचा सोडा, आलं - लसूण - हिरव्या मिरचीचे वाटण, दोन टीस्पून चवीनुसार साखर आणि मीठ
कृती : सर्व धान्ये सहा - सात तास पाण्यात भिजत घालावी (वेगवेगळी), नंतर पाण्यातून उपसून वेगवेगळीच मिक्‍सरमधून वाटून घ्यावी. नंतर सर्व धान्यांची पीठे एकत्र कालवून ठेवावी. आठ-दहा तासानंतर त्यात दही, मीठ, हिंग, लिंबू, सत्त्व, आलं-लसूण-मिरची पेस्ट, खायचा सोडा आणि साखर घालून मिश्रण हलक्‍या हाताने कालवावे. ढोकळा पात्रात किंवा शिट्टी काढलेल्या कुकरमध्ये तेल लावलेल्या भांड्यात ठेवून हे मिश्रण १५-२० मिनिटे वाफवावे. वरून मोहरीची फोडणी करून त्यावर टाकावी. शेवटी त्यावर खोवलेले नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर पसरावी.

नागपुरी वडा-भात
साहित्य : चार वाट्या तांदूळ, वाटी उडीद डाळ, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी मूग डाळ, दाणे, एक चमचा धने-जिरे पावडर, कढीपत्ता, चवीनुसार तिखट, तेल, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ
कृती : सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्यात. भिजल्यानंतर चाळणीत ठेवून निथळून घ्यावे. त्यात मेथी दाणे घालून सर्व डाळी जाडसर वाटून घ्याव्यात. वाटलेल्या डाळीत थोडा कढीपत्ता, तिखट, धने-जिरे पूड, अर्धे छोटी वाटी कडकडीत तेल, चवीनुसार मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून मिश्रण सैलसर भिजवावे. त्या मिश्रणाचे चपट्या आकाराचे वडे करून मंद आचेवर तेलात तळून घ्यावे. चार वाटी तांदळाचा मोकळा फडफडीत भात करून घ्यावा. हा भात परातीत घेऊन एकसारखा परतावा. त्यावर वडे तुकडे करून घालावे. वरून गरम तेलात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता यांची खमंग फोडणी घालावी. आपला नागपुरी वडाभात खाण्यासाठी तयार आहे.

कॉर्न बिर्याणी
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, एक इंच दालचिनी, तीन लवंगा, दोन विलायची, तेल चवीनुसार, मीठ, दोन वाट्या वाफवलेले मक्‍याचे दाणे, दोन बारीक चिरलेले कांदे, दोन बारीक चिरलेले टोमॅटो, दोन चमचे आलं - लसूण पेस्ट, हिरवी मिरची आवडीनुसार, एक चमचा गरम मसाला, एक चमचा जिरे पूड, एक चमचा लिंबाचा रस, दोन चमचे कोथिंबीर व मीठ चवीनुसार
कृती : कढईत तेल तापवून घ्यावे त्यानंतर दालचिनी, लवंग, विलायची, मीठ घालून परतून घ्यावे. त्या चार वाट्या पाणी घालून भिजवलेला दोन वाट्या तांदूळ घालून मोकळा भात शिजवून घ्यावे. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्यावे नंतर आलं - लसूण पेस्ट, मिरच्या, गरम मसाला, जिरे पूड घालून परतून घ्यावे. छान सुगंध आला, की त्यात वाफवलेले मक्‍याचे दाणे, टोमॅटो, लिंबाचा रस व मीठ चवीनुसार घालून शिजवून घ्यावे. शिजलेल्या सारणात वरील शिजलेला मोकळा भात घालून एकत्रित वाफवून घेतला, की कॉर्न बिर्याणी खाण्यासाठी तयार!

अमेरिकेचे स्पायसी लसानिया
साहित्य : एक टेबलस्पून लोणी, २५० ग्रॅम पनीर, एक मोठा कांदा, एक टीस्पून बेसन, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, १ टोमॅटो, तीन-चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट, मिरपूड, मेथीदाणे, प्रत्येकी अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार
कृती : थम पनीरचे चौकोनी तुकडे करावे. बेसन पिठात थोडे पाणी घालून ते पातळसर करावे. त्यात प्रत्येक पनीरचा तुकडा बुडवून तो एका पसरट थाळीत ठेवावा. सर्व पनीरचे तुकडे बेसन पिठात बुडवून थाळीत ठेवून थाळी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी. कांदा टोमॅटो चिरून घ्यावा. पॅनमध्ये लोणी गरम करून त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट, मिरपूड, मेथीदाणे व चवीनुसार मीठ टाकावे. आता पनीरचे तुकडे फ्रीजमधून बाहेर काढावे व ते हाताने थोडे कुस्करून घ्यावे. हे कुस्करलेले पनीर पॅनमधील मसाल्यात टाकावे. मंद आचेवर परतताना कडेने लोणी सुटलेले दिसले, की आपले अमेरिकन स्पायसी लसायनिया तयार झाले. वरून कोथिंबीर पेरून ब्रेड व चपातीबरोबर सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या