टेस्टी फॉन्ड्यू अँड सीझलर

वैशाली खाडिलकर, मुंबई 
सोमवार, 16 मार्च 2020

फूड पॉइंट
फॉन्ड्यू आणि सीझलर हे तसे परदेशी पदार्थ आहेत. मात्र हे पदार्थदेखील अस्सल 'देसी टच' देऊन आणखी छान पद्धतीने करता येऊ शकतात. हा प्रकार तरुणांना जास्त आवडतो. अशाच काही सोप्या रेसिपीज...

स्वदेशी फॉन्ड्यू 
साहित्य : चार टेबलस्पून मैदा, पाव कप किसलेले चीज, २ टेबलस्पून बटर, १ कप दूध, २ टेबलस्पून टोमॅटो प्युरी, प्रत्येकी अर्धा टीस्पून, पावभाजी मसाला, तंदुरी मसाला, मालवणी मसाला, मीठ, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून कस्तुरी मेथी, २ लसूण पाकळ्या, पाव टीस्पून मिरपूड, आवडीच्या स्टरफ्राय भाज्या, तळलेले ब्रेडचे तुकडे. 
कृती : गॅसवर पॅनमधे बटर घालावे. ठेचलेल्या लसूण पाकळ्या परताव्या. मग मैदा घालावा व सारखे ढवळत गुलाबीसर रंगावर शिजवावे. थोडे थोडे दूध घालावे व मऊसर मिश्रण करावे. त्यात गुठळ्या नसाव्यात. टोमॅटो प्युरी व पाणी जरुरीप्रमाणे घालावे. सर्व पावडर मसाले, तिखट, कस्तुरी मेथी घालावी आणि ढवळावे. सारखे ढवळत २ मिनिटे शिजवावे. नंतर चीज घालावे, वितळेपर्यंत ढवळावे व गॅस बंद करावा. हा फॉन्ड्यू तयार झाला. लाकडी ट्रेवर फॉन्ड्यू पॉटमध्ये ओतावे व पॉट स्टॅंडवर ठेवून मंद आच ठेवावी. त्याबरोबर बोलमध्ये स्टरफ्राय भाज्या, तळलेले ब्रेडचे तुकडे ठेवावे व लगेच सर्व्ह करावे. 
स्टरफ्राय भाज्यांसाठी : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालावे. बटर वितळले की त्यात तंदुरी मसाला, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेल्या २ लसूण पाकळ्या पसराव्या. मग स्वच्छ धुतलेले ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर तुरे, ३ रंगांच्या सिमला मिरच्यांचे तुकडे, मका दाणे परतावेत. अंदाजानुसार मीठ घालावे. भाज्या खरपूस झाल्या की गॅस बंद करावा. याला पर्याय म्हणून तयार बटाटा भाजी, मटर पालक भाजी किंवा आवडीची उरलेली सुकी भाजी घेऊ शकतो. 

वडापाव फॉन्ड्यू 
येथे बटाटावडा न तळता पावात घालून खावयाचा. वड्यांचे बेसनाचे बॅटर, फॉन्ड्यू (एक प्रकारचे डीप) याबरोबर देतात. 
साहित्य : वड्यासाठी चार बटाटे, प्रत्येकी १ टीस्पून आले, लसूण पेस्ट व हिरवी मिरची पेस्ट; हळद, मीठ, पाव टीस्पून मिरपूड, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे. 
तडक्यासाठी : एक टीस्पून राई तेल, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता 
फॉन्ड्यू सॉससाठी : दोन टेबलस्पून बटर, २ टेबलस्पून बेसन, १ कप दूध, १ क्युब प्रोसेस्ड चीज, १ हिरव्या मिरचीचे तुकडे, २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ, अर्धा टीस्पून आले पेस्ट, चिमटी हळद, १ टीस्पून तेल, अर्धा कप फ्रेश क्रीम. 
चटणीसाठी : तिखट बुंदी, तिखट, आले-लसूण ठेचलेले, मीठ, लिंबूरस हे जिन्नस घेऊन चटणी करावी. (जरुरीप्रमाणे पाव घ्यावे.) 
कृती : गॅसवर नॉनस्टिक कढईत तेल घालून खमंग फोडणी करावी. त्यात आले-लसूण पेस्ट, मिरची पेस्ट घालून परतावी. नंतर उकडलेल्या बटाट्याचा लगदा घालावा. अंदाजाप्रमाणे मीठ, मिरपूड घालून एकजीव करावे व चांगले परतावे. शेवटी कोथिंबीर घालावी. गॅस बंद करावा. हे वड्याचे मिश्रण प्लेटमध्ये काढावे. त्याचे समान आकाराचे गोळे करून त्याचे चपटे वडे तयार करावेत. 
गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर व तेल तापवावे. नंतर त्यात बेसन घालावे व मंद आचेवर सारखे ढवळत खमंग परतावे. दूध घालून उकळावे. मग चीज, मीठ, हळद, आले पेस्ट, मिरचीचे तुकडे घालावेत. फ्रेश क्रीम घालून ढवळावे. गुठळ्या राहू नयेत. गॅस बंद करावा. मिश्रण गाळून फॉन्ड्यू पॉटमध्ये काढावे व कोथिंबीर घालावी. वडापावचे पाव गोलाकार कुकीज कटरने कापून २ भाग करावेत. एका भागावर चटणी लावावी. त्यावर बटाटा वडा ठेवावा. त्यावर दुसरा पाव ठेवावा. हा वडापाव झाला. असे बाकीचे करावेत. सर्व्हींग प्लेटमध्ये फॉन्ड्यू पॉट ठेवावा. त्याभोवती हे वडापाव ठेवावे. चटणीचा बोल ठेवावा व लगेच सर्व्ह करावे. 

कॉर्न-कोकोनट फॉन्ड्यू 
साहित्य : अर्धा कप वाफवून घेतलेल्या मक्‍याच्या दाण्यांची भरड, अर्धा कप नारळाचे दूध, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर पेस्ट, १ टीस्पून बटर, ५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ बारीक चिरलेला कांदा, पाव कप टोमॅटो, १ कप किसलेले प्रोसेस्ड चीज, मीठ, २ टेबलस्पून फ्रेशक्रीम, पाव टीस्पून मिरीपूड, १ टीस्पून चिलीफ्लेक्‍स. 
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालावे. त्यामध्ये ठेचलेला लसूण घालून परतावे. बारीक चिरलेला कांदा, ३ रंगाच्या सिमला मिरच्यांचे तुकडे मंद आचेवर २ मिनिटे परतावे. टोमॅटो प्युरी व वाफवलेली मक्‍याची भरड, चीज घालून हालवावे. मंद आचेवर मिनिटभर परतावे. आता नारळाचे दूध व कॉर्नफ्लोअर पेस्ट घालून एकजीव करावे. मंद आचेवर सारखे ढवळत २ मिनिटे शिजवावे. शेवटी मीठ, फ्रेश क्रीम, मिरीपूड, चिलीफ्लेक्‍स घालावे. मंद आचेवर मिनिटभर शिजवावे. चाखून बघावे. गॅस बंद करावा. लाकडी ट्रेमध्ये (तयार मिश्रण) ओतावे व स्टॅंडवर ठेवून मंद आचेवर ठेवावे. बाजूला बोलमध्ये बटाटा, केळी वेफर्स, भाजलेले ब्राऊन ब्रेड ठेवावेत. पुऱ्या, पराठ्याचे त्रिकोणी तुकडे, कडक भाकरीचे गोलाकार तुकडेही ठेवता येतील. 

पालक-मटर फॉन्ड्यू 
साहित्य : दोन कप ब्लांच पालक पाने, १ टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ कांदा व १ टोमॅटो बारीक चिरलेला, जिरे, अर्धा कप ताजे मटार, २ टीस्पून कढई मसाला, २ टीस्पून बटर, १ टेबलस्पून मिरची पावडर, अर्धा कप किसलेले चीज, पाव कप फेटलेले दही, मीठ. 
कृती : काचेच्या बोलमध्ये पाव कप पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर घालून पेस्ट करावी. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये बटर घालावे. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून अर्धा मिनिट परतावे. कांदा, टोमॅटो घालून कॉर्नफ्लोअर पेस्टनंतर पालक प्युरी, ताजे मटर वाफवावे. पाण्याचा हबका मारावा व २ मिनिटे परतावे. नंतर कढई मसाला, काश्मिरी मिरची पावडर, चीज, मीठ, फेटलेले दही घालून ढवळावे. मध्यम आचेवर मिनिटभर शिजवावे. थंड होऊ द्यावे. नंतर मिक्सरमध्ये जाडसर प्युरी करावी. तयार भाजी फॉन्ड्यू पॉटमध्ये भरावी व स्टॅंडवर मंद आचेवर ठेवावी. नंतर सर्व्ह करावी. त्याबरोबर हर्ब ब्रेड द्यावा किंवा फुलके, पुऱ्याही देऊ शकतो. एखादे सॅलड किंवा कोशिंबीर, बटाटा-केळी वेफर्सही देतात. पूर्णान्न प्लेट तयार होईल.

अस्सल महाराष्ट्रीयन सीझलर 
सीझलर म्हणजे धुरकट स्वादाचे २-३ पदार्थ एकाच प्लेटमध्ये देतात. येथे नेहमीचा भात, भाजी, वडे व ठेचा यांचे एकत्रीकरण केले आहे. साहजिकच चविष्ट पोटभरू आहे. 
डाळिंबी भातासाठी : एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवावेत. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल तापवावे. राई, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता पाने घालून खमंग फोडणी करावी. त्यात डाळिंब्या अर्धा कप (बिरडे वाल) घालून मिनिटभर परतावे. १ टीस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ टीस्पून गोडा मसाला घालून परतावे. मग तांदूळ घालावे. दुप्पट पाणी घालावे व झाकण ठेवून शिजवावे. मधेमधे ढवळावे. चिंचेचा कोळ २ टीस्पून व गूळ पावडर १ टीस्पून, मीठ स्वादानुसार घालावे व ढवळावे. पाणी संपत आले, भात होत आला, की २ टीस्पून तूप घालावे व १ वाफ आणावी. गॅस बंद करावा. भाताचा दाणा शिजला का ते पाहावे. ओल्या नारळाचा चव व कोथिंबीर घालावी.  
भरलेल्या भाज्यांसाठी :  प्रत्येकी १ हिरवा व लाल टोमॅटो, कांदा, बटाटा, वांगे, हिरवी, पिवळी व लाल मिरची, काटेरी वांगे स्वच्छ धुवावे व पुसावे. टोमॅटोचा गर काढावा. सिमला मिरच्याही आतून पोखरून घ्याव्यात. कांदा, बटाट्याची साले काढावी. उभे आडवे छेद द्यावेत. वांगे देठासकट ठेवावे व त्यालाही छेद द्यावेत. 
सारणासाठी : पाव कप भाजलेल्या दाण्याचे कूट, १ टेबलस्पून भाजलेले तिळकूट, पाव कप भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस, २ टीस्पून गोडा मसाला, १ टीस्पून धने-जिरेपूड, १ टीस्पून तिखट, हळद, हिंग, १ टेबलस्पून लिंबूरस, मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सर्व एकत्र करून सारण तयार करावे व प्रत्येकात भरावे. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये ४ टेबलस्पून तेल घालून खमंग फोडणी करावी. मंद आच ठेवावी. भरलेल्या भाज्या खमंग परतून घ्याव्यात. प्लेटमध्ये काढाव्यात.  
बटाटा-पालक वड्यासाठी : मोठ्या वाडग्यात ४ उकडलेल्या बटाट्याचा लगदा, १ कप बारीक चिरलेली ब्लांच पालक पाने, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग, हळद, मीठ, आमचूर पावडर, चिमटी साखर, १ कप भिजलेले पोहे, १ कप वाटलेली चणाडाळ, चिमटी ओवा, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सर्व एकत्र करून मिश्रण तयार करावे. शेवटी त्यात चिमटी सोडा घालावा. या मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करून वडे तयार करावेत. तेलात तळावेत व प्लेटमध्ये पेपर नॅपकीनवर काढावेत.  
लाल मिरचीचा ठेचा : सहा लाल सुक्‍या मिरच्या पाण्यात भिजवाव्यात. नंतर मिक्‍सरजारमध्ये घेऊन त्यात ४ लसूण पाकळ्या, मीठ, ४ चिंचेची बुटुके व जरुरीप्रमाणे पाणी घालून मऊसर वाटावे. बोलमध्ये ठेचा काढावा. 
एकत्रीकरण : गॅसवर सीझलर प्लेट लालसर गरम करावी व लाकडी ट्रेमध्ये ठेवावी. मधोमध मोठी डाळिंबी भाताची मूद पाडावी. त्यावर कोथिंबीर घालावी. गोलाकार बटाटा-पालक वडे ठेवावेत. प्रत्येकावर ठेचा घालावा. भरलेल्या भाज्या एकेक करून गोलाकार ठेवाव्यात. भाजलेल्या पापडाचे त्रिकोणी तुकडे भातात खोचावेत. सगळीकडे ट्रेमध्ये ठेचा ओतावा. १ टेबलस्पून घरचे लोणी सर्व बाजूंनी सोडावे व लगेच खावयास द्यावे.  

संबंधित बातम्या