टेस्टी पकोडे, कुरकुरीत पुरी!

स्मिता घाटगे
सोमवार, 18 मे 2020

फूडपॉइंट
घरातल्या खवय्यांकडून वेगवेगळ्या पदार्थांची फर्माईश  नेहमीच होत असते. अशात जर सुटी असेल तर  घरात  काही ना काही चटपटीत, कुरकुरीत, आंबट-गोड अशा  स्वादिष्ट पदार्थांची मेजवानीच असते… या पदार्थांमुळे  जेवणाला  आणखी रंगत येते... अशाच काही लज्जतदार रेसिपीज... 

सीताफळ रबडी
साहित्य : तीन तयार पिकलेली सीताफळे, २ लिटर म्हशीचे दूध, पाव टीस्पून हिरवी वेलची आणि जायफळपूड, किंचित केशर, १ ते सव्वा कप साखर आणि सजावटीसाठी पिस्ता व बदामाचे काप. 
कृती : प्रथम मध्यम आचेवर दूध उकळून आटवून घावे. एका बाजूला गॅसवर मोठा तवा ठेवून चांगला तापवावा आणि त्यावर थोडे थोडे दूध ओतून लच्छे तयार करून एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. एका खोलगट चाळणीत सीताफळाचा गर बियांसकट काढून डावाने घासून बिया वेगळ्या कराव्यात आणि साताफळाचा गर तयार करून घ्यावा. दूध आटून साधारण १ ते दीड लिटरपर्यंत झाल्यावर दूध चांगले घट्टदेखील होईल. आता या दुधात तयार केलेले दुधाचे लच्छे, साखर, वेलची आणि जायफळपूड, तयार सीताफळाचा गर आणि केशर घालून चांगले एकजीव करावे. एकजीव करून झाल्यावर पुन्हा १० मिनिटे मध्यम आचेवर संपूर्ण रबडी परतत उकळून घ्यावी. १० मिनिटांनी गॅस बंद करावा आणि सीताफळ रबडी थंड करून घ्यावी. रबडी थंड झाल्यावर बोलमध्ये काढून वर सीताफळ गर आणि पिस्ता-बदामाचे काप घालून थंड सर्व्ह करावी. झाली स्वादिष्ट लच्छेवाली सीताफळ रबडी तय्यार!

खारी शंकरपाळी
साहित्य : साडेतीन कप मैदा, १ टीस्पून काळी मिरपूड, अडीच टेबलस्पून कसूरी  मेथी, ३ टेबलस्पून तेल  मोहनासाठी, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. 
कृती : प्रथम एका परातीत मैदा घेऊन त्यात कुरकुरीत कसूरी  मेथी चुरून घालावी. त्यानंतर काळी मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालावे. आता एका पॅनमध्ये तेलाचे मोहन गरम करून घ्यावे. तेल जास्त कडकडीत गरम करू नये. हे  गरम तेलाचे मोहन मैद्यात घालावे आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. आता साध्या पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यावे. पिठाचे गोळे तयार करून त्याच्या पोळ्या लाटाव्यात आणि शंकरपाळ्या  करून  घ्याव्यात. गरम तेलात मध्यम आचेवर शंकरपाळी सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्यावी.

दही-वडा 
साहित्य : अडीचशे ग्रॅम  उडदाची डाळ, १०० ग्रॅम मुगाची डाळ, अर्धा टीस्पून  ओवा, १ टेबलस्पून जिरे, १०० ग्रॅम साखर, २५० ग्रॅम दही, तळण्यासाठी  तेल आणि चवीनुसार मीठ. 
चाटसाठी  ः आवडीनुसार  आलू भुजिया, चाट मसाला, चिंच-खजुराची  चटणी, पुदिन्याची  तिखट चटणी, मिरची पावडर. 
कृती : प्रथम उडदाची डाळ आणि मुगाची डाळ साधारण ६ तास पाण्यात भिजवत ठेवावी. दह्यामध्ये साखर मिसळून घ्यावी. ६ तासानंतर दोन्ही डाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. (गरज असल्यास पाण्याचा वापर करावा.) आता या वाटलेल्या  डाळींमध्ये  मीठ, ओवा आणि जिरे घालून कोणत्याही एकाच दिशेने फेटून घ्यावेत. मिश्रण फुगून  वर आले, की  फेटण्याची प्रक्रिया थांबवावी. आता गरम तेलात मध्यम आचेवर मध्यम आकाराचे वडे सोडावेत. तेलात वडे सोडल्यावर झाऱ्याने  वड्यांवर तेल शिंपडत रहावे, जेणेकरून  वरचा भागही  तळून निघेल आणि वाड्यांना  उलटताना ते  सहज उलटले जातील. वडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. सर्व वडे तळून झाल्यावर त्यांना गुणगुणत्या कोमट पाण्यात किमान ३० मिनिटे बुडवून ठेवावे. ३० मिनिटांनंतर सर्व वडे अर्धे निथळून घ्यावे. आता एका चाटच्या प्लेटमध्ये सोयीनुसार वडे वाढून घ्यावेत. प्रत्येक वड्यावर थोडी थोडी चिंच-खजुराची आणि पुदिन्याची  तिखट चटणी घालावी. वरून मिरची पावडर आणि चाट मसाला शिंपडावा. आता वड्यांवर आलू भुजिया  घालून चटपटीत दही-वड्यांचा  आस्वाद  घ्यावा. 
टीप : १) कोमट पाण्यात दही वडे भिजवल्यावर  वड्यातील  शोषलेले  तेल ७५ टक्के  बाहेर पडून पाण्याबरोबर  निघून जाते व वडे एकदम मऊ  राहतात. 
       २) वड्यात थोडा गोडवा हवा असेल,  तर डाळीच्या पिठात किंवा कोमट पाण्यात १ टेबलस्पून साखर मिसळून घ्यावी.

मेथी पुरी  
साहित्य : पाचशे ग्रॅम मैदा, २ टेबलस्पून कसूरी मेथी, अडीच टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून क्रश केलेली काळी मिरी, पुऱ्या तळण्यासाठी तेल आणि चवीपेक्षा थोडे जास्त मीठ. 
कृती : प्रथम एका भांड्यात तेल कोमट करावे. कोमट करून झाल्यानंतर एका परातीत मैदा घ्यावा (मैदा चाळून घ्यावा). आता मैद्यात कोमट तेल, जिरे, मीठ, क्रश केलेली काळी मिरी घालून मिश्रण चांगले फेसून घ्यावे (पीठ फेसताना आतल्या गुठळ्या मोडून घ्याव्यात). मिश्रण चांगले फेसून झाल्यानंतर त्यात थोडे थोडे साधे पाणी घालून मीठ चांगले मळून घ्यावे. पिठाचा गोळा तयार झाल्यावर त्यात कसूरी मेथी घालून पुन्हा चांगले मळून घ्यावे. आता पिठाच्या गोळ्याला २ तासांसाठी मुरवत ठेवावे. २ तासांनंतर पीठ पुन्हा हलके मळून घ्यावे. आता पिठाचे साधारण गोळे तयार करून मोठ्या पोळ्या लाटून घ्याव्यात आणि साधारण एका छोट्या वाटीने गोल आकारात पुऱ्या कट करून घ्याव्यात. तयार गोल पुरीवर सुरीने किंवा फोर्कने टोचून घ्यावे म्हणजे पुरी फुलणार नाही. आता तयार गोल पुऱ्या गरम तेलात मध्यम आचेवर बदामी आणि सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. खमंग आणि स्वादिष्ट कुरकुरीत मेथीच्या पुऱ्या तय्यार! या पुऱ्या चहाबरोबर छान लागतात. 

ब्रेड पकोडे
साहित्य : पाचशे  ग्रॅम उकडलेले  बटाटे, ३ कप  बारीक बेसन, ८-९ ब्रेड स्लाइस, ५-६ मिरच्या बारीक चिरलेल्या, ३ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, ९-१० कढीपत्त्याची पाने, अर्धा टीस्पून  मेथी दाणे, १ टीस्पून  हळद, १ टेबलस्पून क्रश धने, अर्धा टेबलस्पून  जिरे, अर्धा टेबलस्पून  राई, पाव टीस्पून  खायचा सोडा, दीड टेबलस्पून  ठेचलेले आले, दीड टेबलस्पून  ठेचलेले लसूण, पाव टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ आणि ४ टेबलस्पून तेल.
चटणीसाठी : चार-पाच  बटर, अडीच टेबलस्पून  मिरची पावडर, ८-९ लसूण पाकळ्या, दीड कप बेसनचा कुरकुरीत चुरा, अर्धा टेबलस्पून  मीठ. 
कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, चिरलेली मिरची, मेथी दाणे, धने, आले, लसूण, हिंग इत्यादी घालून फोडणी द्यावी.  साधारण ५ मिनिटे परतावे. फोडणी थंड करून उकडलेल्या बटाट्यांवर घालावी. त्याबरोबरच  चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून भाजी चांगली एकजीव करून घ्यावी. नंतर एका पातेल्यात बेसन घेऊन त्यात सोडा आणि अर्धा टीस्पून  किंवा चवीनुसार मीठ घालून प्रथम अर्धा  कप पाणी घालून गुठळ्या मोडून घ्याव्यात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर जास्त पातळ  किंवा जाड न ठेवता घोळून तयार करावे. नंतर ब्रेडच्या  स्लाइस  त्रिकोणी आकारात कापून त्यात भाजी भरून दुसऱ्या बाजूने स्लाइस  बंद करावी. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून त्यात सर्व ब्रेड पकोडे सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यावेत. उरलेल्या बेसनाचा कढईत चुरा घालून त्याला लालसर रंगावर तळून घ्यावे. त्यानंतर खलबत्यात  बटर ठेचून त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून, मिरची पावडर, लसूण पाकळ्या, बेसन चुरा, अर्धा टेबलस्पून  मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. गरमागरम टेस्टी ब्रेड पकोडे  खमंग चटणीबरोबर  सर्व्ह करावे.

पॅन नानकटाई
साहित्य : तीन कप मैदा, दीड कप वनस्पती तूप, दीड कप पिठीसाखर, दीड टेबलस्पून बारीक रवा, चिमूटभर खायचा सोडा, अर्धा टीस्पून वेलची पावडर (पर्यायी), पाऊण टीस्पून केसर रंग (पर्यायी) आणि सजावटीसाठी बदामाचे काप. 
कृती : सर्वात प्रथम एका परातीत तूप व्हीप्ड क्रीमसारखे फेटून घ्यावे. नंतर त्यात साखर, रवा, वेलची पावडर, सोडा आणि केसर रंग घालून चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात मैदा घालून पुन्हा एकजीव करावे आणि एक गोळा मळून घ्यावा. (गोळा मळताना जास्त मळू नये.) तयार गोळ्याचे नानकटाईच्या आकाराचे लहान लहान गोळे करून त्यावर बदामाचे काप लावून सजवून घ्यावे. आता एका पॅनमध्ये जाळी ठेवून पॅन ५ मिनिटे मोठ्या आचेवर प्रीहीट करून घ्यावा. एका प्लेटमध्ये सर्व नानकटाई सुटसुटीत ठेवून २० मिनिटे मध्यम आचेवर बेक करून घ्यावे. तयार नानकटाई थंड करून डब्यात भरून ठेवाव्यात. या नानकटाई २०-२५ दिवस तरी चांगल्या राहतात.

सोलकढी
साहित्य : एक अख्ख्या नारळाचा कीस, १ हिरवी मिरची, १२ काळी मिरी दाणे, २ टेबलस्पून भाजलेले  जिरे, अर्धा इंच  आले, २ लिटर  थंड पाणी, ८-९ लसूण पाकळ्या, १ वाटी कोकम आगळ  किंवा  कोकमचे पाणी, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 
कृती : प्रथम  मिक्सरच्या भांड्यात नारळाचा कीस, मिरची,  मिरी दाणे, जिरे, आले, लसूण आणि थंड पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावे.  संपूर्ण जिन्नसांचे चाळणीच्या साहाय्याने दोन वेळा दूध काढून घ्यावे. तयार केलेले नारळाचे दूध पुन्हा एका बारीक चाळणीने गाळून घ्यावे. गाळलेल्या नारळाच्या दुधात कोकम आगळ, चवीनुसार मीठ आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सोलकढी चांगली घोळून घ्यावी. थंडगार सोलकढी जेवण करताना  वाढावी.

संबंधित बातम्या