टेस्टी, क्रिस्पी  सँडविच!

कोमल मोरे
सोमवार, 27 एप्रिल 2020

फूड पॉइंट
सँडविच हा शब्द उच्चरला,  की  चॉकलेट, पनीर, चीज, चिकन, मशरूम यांची डार्क, स्पायसी चव  आणि ब्रेडचा  तो  कुरकुरीतपणा  चटकन  आठवतो आणि जिभेला पाणी सुटते. सँडविच  हा  प्रकार आहेच असा, जो  खाणाऱ्यांना तर  आवडतोच, शिवाय झटपट होतो म्हणून करणाऱ्यांनाही  आवडतो.  सकाळच्या  ब्रेकफास्टसाठी  करता येतील अशा  व्हेज-नॉनव्हेज  सँडविचच्या  खास  रेसिपीज...

व्हेजिटेबल सँडविच
साहित्य : दोन ब्रेड स्लाइस, ६-७ काकडीच्या पातळ चकत्या, ५-६ टोमॅटोच्या पातळ चकत्या, २-३ शिजलेल्या बटाट्याच्या पातळ गोल चकत्या, १-२ कांद्याच्या पातळ चकत्या, बटर, मिरपूड, कोथिंबीर, मिरची, जिरेपूड,‌ थोडी साखर, चवीनुसार मीठ आणि सॉस.
कृती : प्रथम कोथिंबीर, मिरच्या, जिरेपूड, चवीनुसार मीठ, साखर आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी करून घ्यावी. त्यानंतर ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्याव्यात. ज्यांना आवडत असतील त्यांनी ठेवल्या तरी चालतील. दोन्ही ब्रेड स्लाइसच्या एका बाजूला आधी बटर आणि नंतर चटणी लावून घ्यावी. एका स्लाइसवर आधी काकडीच्या चकत्या पसरून ठेवाव्यात. त्यावर टोमॅटोच्या चकत्या ठेवाव्यात. नंतर त्यावर बटाट्याच्या चकत्या लावाव्यात, किंचीत मीठ आणि मिरपूड टाकावी आणि त्यावर कांद्याची चकती ठेवावी. बटर आणि चटणी लावलेला ब्रेड स्लाइस यावर ठेवावा, झाले व्हेजिटेबल सँडविच तयार. 
सुरीने तुकडे करावेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

कॉर्न मेयो सँडविच
साहित्य : अर्धा कप  कॉर्न, २ चमचे मेयोनीज, ब्रेड स्लाइस, मीठ, ‌मिरपूड, हळद, चीज, बटर, टोमॅटो सॉस. 
कृती : प्रथम एका भांड्यात कॉर्न उकडून घ्यावेत. कॉर्न  उकडताना त्यात थोडी हळद आणि मीठ टाकावे. नंतर एका बोलमध्ये  कॉर्न घेऊन त्यात  मेयोनीज, मिरपूड, चवीनुसार मीठ टाकावे. हे मिश्रण एकजीव करावे. ब्रेडच्या  २ स्लाइस घेऊन त्यावर  बटर लावावे. त्यातील एका ब्रेड स्लाइसवर  हे मिश्रण ठेवावे. त्यावर चीज किसून घालावे.  नंतर  टोमॅटो सॉस घालावा. आता ब्रेडची  दुसरी स्लाइस त्या मिश्रण घातलेल्या स्लाइसवर ठेवून ते  त्रिकोणी कट करावे व  ग्रील करून घ्यावे. 

स्पायसी क्रॉसवर्ड 
साहित्य : एक  लहान उकडलेला बटाटा, अर्धा चमचा  तिखट, अर्धा चमचा  गरम मसाला, हळद, मीठ, ब्रेड स्लाइस, २ चमचे मेयोनीज, बटर, टोमॅटो सॉस इत्यादी 
कृती : एका बोलमध्ये  बटाटा बारीक स्मॅश ‌‌‌‌ करून घ्यावा.  त्यात गरम मसाला, तिखट, चिमुटभर हळद, मेयोनीज, चवीनुसार मीठ  घालून चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर  ब्रेडच्या  २ स्लाइस  घेऊन त्याला थोडे बटर लावावे.  एका स्लाइसवर  हे मिश्रण ‌‌व्यवस्थित ठेवावे.  त्यावर थोडा टोमॅटो सॉस घालावा.  दुसरी स्लाइस  या  मिश्रण ठेवलेल्या स्लाइसवर  ठेवून त्रिकोणी कट करावे. नंतर ग्रीलरमध्ये ग्रील करावे. आता एका प्लेटमध्ये  घेऊन टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे. 

चॉकलेट सँडविच
साहित्य : चॉकलेट सॉस, ब्रेड स्लाइस, १ लहान वाटी किसलेले चीज, बटर, मिरपूड आणि मीठ
कृती : दोन ब्रेड स्लाइस घेऊन त्यांना बटर लावून घ्यावे. एका स्लाइसवर किसलेले चीज घालावे. नंतर चिमूटभर मिरपूड घालावी. आता त्यावर चॉकलेट सॉस घालावा. दुसरी ब्रेड स्लाइस पहिल्या स्लाइसवर ठेवून ते त्रिकोणी कट करून ग्रील करून घ्यावे. तयार प्लेटमध्ये काढून घ्यावे.

पनीर सँडविच
साहित्य : दोन ब्रेड स्लाइस, २ लहान कांदे, १ शिमला मिरची, चाट मसाला, हिरवी चटणी, बटर.
स्टफिंगसाठी : पनीरचे लहान चौकोनी तुकडे, जिरेपूड, टोमॅटो सॉस, मिरपूड, चवीपुरते मीठ.
कृती : प्रथम कांदा आणि शिमला मिरची उभी पातळ चिरून घ्यावी. एका लहान बोलमध्ये टोमॅटो सॉस, जिरेपूड आणि अगदी चिमुटभर मीठ घेऊन मिक्स करावे. यामध्ये पनीरचे तुकडे साधारण १० मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे. नंतर पनीरचे तुकडे  एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे  परतून घ्यावे. आता हे पनीर बाजूला काढून ठेवावे. ब्रेड स्लाइसेसवर बटर लावून घ्यावे. नंतर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर पनीरचे तुकडे आणि चिरलेला कांदा व शिमला मिरची घालावी. नंतर थोडा चाट मसाला, मिरपूड व मीठ ‌घालावे. आता ब्रेडची दुसरी स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी लावावी आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सॅंडविच तयार करावे. नंतर सॅंडविच ग्रील करून घ्यावे किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घालून दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर टोस्ट करावे. जर नॉनस्टिक पॅन वापरणार असाल, तर आच कमी ठेवावी. सँडविच चांगले भाजून घ्यावे. सॅंडविच हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

मशरूम चीज सँडविच
साहित्य : एक कप कापलेले मशरूम, अर्धा कप सिमला मिरचीचे तुकडे, किसलेले चीज, बटर, २-३ कापलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा लाल मिरचीचे  तुकडे, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धना पावडर, हळद, मीठ, मिरपूड, ब्रेड स्लाइस, टोमॅटो सॉस. 
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवावा. त्यात १ चमचा बटर घालावे. त्यात कापलेला लसूण टाकून हलवावे. नंतर त्यात लाल मिरचीचे तुकडे, चिमूटभर हळद, जिरेपूड, धना पावडर टाकावी आणि मिक्स करावे. आता त्यात कापलेले मशरूम आणि सिमला मिरचीचे तुकडे टाकून फ्राय करावे. नंतर मिरपूड आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करावे. जास्त शिजवू नये. ४-५ मिनिटे फ्राय करावे. आता ब्रेडच्या २ स्लाइस  घ्याव्यात. दोन्ही स्लाइसच्या एका बाजूला बटर लावून घ्यावे. त्यातील एका स्लाइसवर किसलेले चीज घालावे. त्यावर फ्राय केलेले मिश्रण (मशरूम, शिमला मिरचीचे) घालावे. थोडासा टोमॅटो सॉस घालावा आणि वरती पुन्हा थोडेसे किसलेले चीज घालावे. ब्रेडची दुसरी स्लाइस त्यावर ठेवावी आणि सँडविच ग्रील करून त्रिकोणी कट करावे. टोमॅटो सॉसबरोबर  सर्व्ह करावे.

एग मेयो सँडविच
साहित्य : दोन अंडी, मिरपूड, मीठ, २ ब्रेड स्लाइस, बटर, टोमॅटो सॉस, तेल व मेयोनीज.
कृती : प्रथम गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवावा. त्यात १ चमचा तेल टाकावे व त्यात दोन्ही अंडी फोडून टाकावीत. आता त्यात चिमूटभर मिरपूड आणि चवीनुसार मीठ टाकावे. हे मिश्रण चांगले फ्राय करावे. अंडाभुर्जीप्रमाणे चांगले फ्राय करावे. आता एका बोलमध्ये २ चमचे मेयोनीज घ्यावे व त्यामध्ये फ्राय केलेले अंड्याचे मिश्रण घालावे आणि ते एकजीव करून घ्यावे. आता २ ब्रेड स्लाइस घेऊन त्यातील एका स्लाइसला बटर लावून घ्यावे. नंतर त्यावर अंड्याचे मिश्रण घालावे. आता ब्रेडची दुसरी स्लाइस घेऊन त्यावरही बटर लावून ही स्लाइस पहिल्या स्लाइसवर ठेवावी. आता हे सँडविच छान ग्रील करून घ्यावे व त्रिकोणी कट करून टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

चिकन मेयो सँडविच
साहित्य : एक कप उकडलेले बोनलेस चिकन, अर्धा कप सिमला मिरचीचे तुकडे, मेयोनीज,‌ मिरपूड, मीठ, २ ब्रेड‌ स्लाइस, बटर, १ लहान चमचा शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस.
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात १ चमचा बटर घालावे. त्यात शिमला मिरचीचे तुकडे टाकावेत. नंतर उकडलेल्या चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून ते पॅनमधे टाकावेत. आता १ चमचा शेजवान चटणी आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण ५-६ मिनिटे फ्राय करावे. नंतर एका बोलमध्ये हे मिश्रण काढून घ्यावे व त्यात २ चमचे मेयोनीज आणि चिमूटभर मिरपूड घालून व्यवस्थित मिक्स करावे. ब्रेडच्या २ स्लाइस घेऊन दोन्ही स्लाइसच्या एका एका बाजूला बटर लावून घ्यावे. त्यातील एका स्लाइसवर हे मिश्रण ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवावी. आता हे सँडविच ग्रील करून घ्यावे व त्रिकोणी कट करून टोमॅटो सॉसबरोबर खावे. (ग्रीलर नसेल तर नॉनस्टिक पॅनवर १ चमचा बटर टाकून सँडविच दोन्ही बाजूंनी भाजून घेतले तरी छान लागते.)

चटणी सँडविच
साहित्य : पुदिन्याची पाने,  कोथिंबीर, खोवलेला ओला नारळ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, १ चमचा लिंबू रस, चवीनुसार मीठ, २ हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार  ब्रेड स्लाइसेस  आणि बटर .
कृती : सर्वप्रथम चटणी वाटून घ्यावी.  एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, जिरेपूड, मीठ, लिंबाचा रस आणि खोवलेले खोबरे घेऊन त्यात  थोडे पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्यावी. चटणी जराशी घट्ट असावी.  पातळ झाल्यास ती  ब्रेड स्लाइसवर व्यवस्थित  लागत नाही. ब्रेड स्लाइसेसच्या कडा कापून घ्याव्यात. एका स्लाइसला बटर लावून घ्यावे.  दुसऱ्या स्लाइसला चटणी लावून घ्यावी. दोन्ही स्लाइसेस  एकावर एक ठेवून सँडविच बंद करून घ्यावे. अशाच प्रकारे लागतील तेवढे सँडविच करून  घ्यावेत.

संबंधित बातम्या