विविध रंगांची चविष्ट ग्रेव्ही

उमाशशी भालेराव
सोमवार, 9 मार्च 2020

फूड पॉइंट
 

आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, तेव्हा पाहतो की तेथील मेनूकार्डमध्ये पदार्थांची भली मोठी यादी असते. त्यांपैकी कोणी व्हेज करीची ऑर्डर देतो, तर कोणी अंडाकरी, कोफ्ताकरी, चिकन वा मटणकरीची ऑर्डर देतो. हे सर्व पदार्थ १५-२० मिनिटांत टेबलावर पोचतात. इतक्‍या जलद इतके वेगवेगळे पदार्थ कसे करतात याचे आपल्याला नक्कीच आश्‍चर्य वाटते. हीच तर खासियत आहे. तिथे वेगवेगळ्या स्वादांचे वाटण म्हणजे ग्रेव्ही फ्रिजमध्ये तयार करून ठेवलेली असते. मागणीप्रमाणे हवे ते वाटण घेऊन त्यात हवा त्याप्रमाणे पदार्थ घालून झटकन सर्व्ह केला जातो. तसेच आपल्याला घरीही करता येईल. वेळ असेल, सवड असेल तेव्हा वेगवेगळ्या स्वादांच्या ग्रेव्हीचे वाटण तयार करून फ्रिझरमध्ये ठेवून टाकावे. म्हणजे कोणी पाहुणे जेवायला आले की चटकन काही खास पदार्थ करता येतील. फ्रिझरमध्ये ठेवलेले वाटण अनेक दिवस उत्तम टिकते. ग्रेव्ही तयार असेल, तर ऐनवेळी त्यात हव्या त्या भाज्या, पनीर, अंडी, तळलेले छोटे बटाटे, मटण, चिकन घालून मस्त पदार्थ करता येतात. अशाच विविध स्वादाच्या व विविध रंगाच्या ग्रेव्ही...

पांढरी ग्रेव्ही (प्रकार-१) 
साहित्य : चार मोठे कांदे, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, ४-५ हिरव्या मिरच्या, १ वाटी काजू, २ चमचे तेल, पाव कप मावा, मीठ, पांढरी मिरपूड, दही आणि क्रीम.
कृती : प्रथम कांद्याच्या फोडी करून पाण्यात शिजवून घ्याव्या. नंतर त्यात लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या चिरून घालून मिक्‍सरमधून पेस्ट करून घ्यावी. काजू गरम पाण्यात अर्धा तास भिजवून त्याचीही पेस्ट करून घ्यावी. कढईत दोन चमचे तेल घालून कांदा, आले, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट हलके परतून घ्यावी. रंग बदलू देऊ नये. रंग पांढराच राहायला हवा. नंतर त्यात काजू पेस्ट घालावी. पुन्हा थोडे परतावे. नंतर मावा कुसकरून घालावा व थोडे परतून गॅस बंद करावा. मीठ आणि पांढरी मिरपूड घालावी. शाही पांढरी ग्रेव्ही तयार! पदार्थ करताना या वाटणात अर्धी वाटी दही फेटून घालावे व पदार्थ सर्व्ह करताना वरून थोडे क्रीम घालावे.  

पांढरी ग्रेव्ही (प्रकार-२)  
साहित्य : चार मोठे कांदे, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, ५-६ हिरव्या मिरच्या, १ वाटी खोवलेला ओला नारळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, तेल, मीठ, मिरपूड. 
कृती : प्रथम कांद्याच्या फोडी करून पाण्यात शिजवून घ्याव्यात. हे शिजवलेले कांदे, लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या, खोवलेला नारळ हे सर्व एकत्र करून मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे. खसखस व तीळ थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. २ चमचे तेलात कांद्याचे वाटण हलकेच परतून घ्यावे. नंतर त्यात खसखस, तिळाची पेस्ट घालून परतावे. सर्वांचा रंग पांढराच दिसायला हवा. गॅस बंद करून स्वादानुसार मीठ व पांढरी मिरपूड घालावी. ही दुसऱ्या प्रकारची पांढरी ग्रेव्ही तयार! 

तांबडी ग्रेव्ही  
साहित्य : पाच-सहा मोठे टोमॅटो, ३ कांदे, १०-१२ काजू, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, २ चमचे तेल, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, अर्धा चमचा तिखटपूड, थोडी हळद.
कृती : सगळे टोमॅटो चिरून मिक्‍सरमधून त्याची प्युरी करून घ्यावी. सर्व काजू गरम पाण्यात अर्धा तास भिजवून त्याचीपण पेस्ट करून घ्यावी. कांदे बारीक चिरून घ्यावेत. चिरलेला कांदा, चिरलेल्या लसूण पाकळ्या, चिरलेले आले हे सर्व गरम तेलात लाल रंग होईपर्यंत  परतावे. नंतर त्यात गरम मसाला, धने-जिरेपूड, आवडीप्रमाणे अर्धा चमचा (अथवा अधिक) तिखटपूड व थोडी हळद घालून सर्व मंद आचेवर परतावे. नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतावे. शेवटी त्यात काजू पेस्ट घालावी. गॅस बंद करून स्वादानुसार मीठ घालावे. तांबडी ग्रेव्ही तयार.

हिरवी ग्रेव्ही  
साहित्य : दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिरलेला पुदिना, १०-१२ पालकची पाने, ५-६ हिरव्या मिरच्या, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, १ चमचा तेल, १ कांदा, दही, बटर.
कृती : कोथिंबीर आणि पुदिना आधण आलेल्या पाण्यात मिनिटभर ठेवून बाहेर काढावे. पालक बारीक चिरून घ्यावा. आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या चिरून कोथिंबीर, पुदिना, पालक आणि मिरच्या हे सर्व मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. नंतर १ चमचा तेलात परतून घ्यावा. त्यात आले, लसूण पेस्ट घालून परतावे. नंतर गरम मसाला व धने-जिरेपूड घालून परतावे. त्यात कोथिंबीर, पुदिना, पालकची हिरवी पेस्ट घालावी. थोडे परतून गॅस बंद करावा. रंग हिरवा राहायला हवा (काळपट होऊ देऊ नये). त्यात स्वादानुसार मीठ घालावे. हिरवी ग्रेव्ही तयार! ऐनवेळी पदार्थ करताना त्यात अर्धी वाटी दही फेटून घालावे व सर्व्ह करताना वरून चमचाभर बटर घालावे. स्वाद छान लागतो.

पिवळी ग्रेव्ही  
साहित्य : चार कांदे, २-३ पिवळ्या शिमला मिरच्या, १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आले, ८-१० काजू, १ टेबलस्पून तेल, १ मोठा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, मीठ. 
कृती : कांदे चिरून घ्यावेत. शिमला मिरचीतील बिया काढून चिरून घ्यावी. हिरव्या मिरच्यादेखील चिरून घ्याव्यात. हे सर्व आणि लसूण, आले, काजू १ टेबलस्पून तेलात परतून घ्यावे. नंतर मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे. २ चमचे तेलात दोन तमालपत्राची पाने घालून वरील वाटण मंद आचेवर परतून घ्यावे. शेवटी त्यात गरम मसाला व हळद घालावी आणि गॅस बंद करून स्वादानुसार मीठ घालावे. हळदीमुळे ग्रेव्हीला पिवळा रंग येतो. पदार्थ करताना १ वाटी दही फेटून घालावे.

ब्राऊन ग्रेव्ही  
साहित्य : दोन कप काश्‍मिरी लाल मिरची, १ कप टोमॅटो प्युरी, १ चमचा तेल, १ बारीक कांदा, १ चमचा आले लसूण पेस्ट, २ चमचे गरम मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, १ चमचा तिखट, थोडी हळद, दही. 
कृती : प्रथम मिरचीतील बिया काढून टाकाव्यात व थोडा वेळ पाण्यात ठेवून नंतर त्याची मिक्‍सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. या मिरच्या तिखट नसतात. १ चमचा तेलात बारीक चिरलेला कांदा व आले-लसूण पेस्ट ब्राऊन रंग येईपर्यंत परतावी. त्यात काश्‍मिरी मिरचीची पेस्ट व टोमॅटो प्युरी घालून परतावे. गरम मसाला, धने-जिरेपूड, तिखटपूड व हळद घालावी. गॅस बंद करून स्वादानुसार थोडे मीठ घालावे. 

नेहमीसाठी ग्रेव्ही  
साहित्य :  दोन वाट्या खोवलेला नारळ, ४ कांद्याच्या फोडी, ४ चिरलेले टोमॅटो, १०-१२ हिरव्या मिरच्या, १-२ इंच आले, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिरलेला पुदिना, दही.
कृती : प्रथम खोवलेला नारळ, कांद्याच्या फोडी तेलात परतून घ्याव्यात. टोमॅटो चिरून घ्यावे. लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या (आपल्याला जितके तिखट हवे त्याप्रमाणे), चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना (ऐच्छिक) हे सर्व साहित्य मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे व हे वाटण फ्रिझरमध्ये ठेवावे. पदार्थ करताना त्यातील हवे तेवढे वाटण घेऊन दोन चमचे तेलात, तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात आपल्याला हव्या त्या स्वादाचा मसाला (गोडा मसाला, गरम मसाला, पंजाबी मसाला, मालवणी मसाला इत्यादी) घालावा. वाटीभर दही फेटून घालावे (ऐच्छिक), गरजेप्रमाणे पाणी घालून, त्यात हवा तो पदार्थ घालून शिजवावा.


टीप : या सर्व ग्रेव्हींचा वापर करण्यापूर्वी ३-४ तास वाटण फ्रिझरमधून बाहेर काढून ठेवावे. पदार्थ करताना अगदी थोड्या तेलात वाटण परतून घ्यावे. त्यात हव्या त्या भाज्या किंवा चिकन-मटण घालून पाणी घालून शिजवावे. ग्रेव्ही हवी तितकी पातळ व दाट ठेवावी. गरजेप्रमाणे पुन्हा थोडे मीठ घालावे. ज्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो नाही, त्यात दही फेटून घालावे.
 

संबंधित बातम्या