रुचकर भेंडी

उमाशशी भालेराव
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

काहींना आवडणाऱ्या, पण अनेकांना न आवडणाऱ्या भेंडीत खरे तर अनेक गुण आहेत. शिवाय भेंडीचे कितीतरी पौष्टिक आणि खुमासदार पदार्थ करता येतात. अशाच काही रुचकर पदार्थांच्या रेसिपीज...

टीप - भेंडी नेहमी स्वच्छ धुऊन फडक्यावर पसरून ठेवावी. प्रत्येक भेंडी नीट पुसून पूर्णपणे कोरडी करून मग चिरावी. चिरण्यापूर्वी टोकाचा थोडा भाग व देठाकडील थोडा भाग कापावा. भेंडीची भाजी शिजवताना झाकण ठेवू नये म्हणजे भेंडी चिकट होणार नाही.

क्रिस्पी कुरकुरीत भेंडी
साहित्य - पाव किलो भेंडी, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, थोडी हळद, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा धने पूड, २ चमचे बेसन, २ चमचे कॉर्नफ्लोअर अथवा तांदळाची पिठी, तळण्यासाठी तेल. 
कृती - भेंड्या धुऊन, कोरड्या करून, प्रत्येक भेंडीचे उभे चार लांबलचक तुकडे करावेत. बिया काढून टाकाव्यात. नंतर त्यांना तिखट, मीठ, हळद, धने पूड, चाट मसाला लावून १० मिनिटे ठेवावे. मिठामुळे थोडा ओलसरपणा येईल. नंतर त्यावर बेसन व कॉर्नफ्लोअर अथवा तांदळाची पिठी भुरभुरून लावावी. हलक्या हाताने सर्व तुकड्यांना लागेल असे पाहावे. कढईत तेल तापवून सर्व भेंड्यांचे तुकडे छान कुरकुरीत तळून घ्यावेत. क्रिस्पी भेंडी तयार!

चिंचगुळाची भेंडी
साहित्य - पाव किलो भेंडी, २ चमचे चिंचेचा कोळ, गूळ (साधारण चिंचेपेक्षा दुप्पट), अर्धा चमचा तिखट, मीठ, चमचाभर काळा गोडा मसाला, तेल, फोडणीचे साहित्य, थोडे ओले खोबरे, कोथिंबीर. 
कृती - भेंड्या धुऊन, कोरड्या करून लहान तुकडे करावेत. २ चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात भेंडीचे तुकडे घालून परतावे. नंतर चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला व थोडे पाणी घालून शिजवावे. शिजताना झाकण ठेवू नये, म्हणजे भाजी चिकट होणार नाही. भाजी शिजून तयार झाल्यावर त्यावर थोडे खवलेले ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. 

भरली भेंडी
साहित्य - अर्धा किलो भेंडी, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, ४ चमचे बेसन, २ चमचे काळा मसाला, २ चमचे धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, चमचाभर साखर, चमचाभर लिंबू रस, तेल, फोडणीचे साहित्य. 
कृती - भेंड्या धुऊन, पुसून त्यांचे ३-४ इंचांचे लांबट तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्याला मधोमध चीर पाडावी. ओले खोबरे, बेसन, मसाला, धने-जिरे पूड, तिखट, मीठ, साखर सर्व एकत्र कालवावे. त्यात लिंबू रस घालावा. सर्व कालवून हे सारण प्रत्येक भेंडीच्या तुकड्यात ठासून भरावे. थोडे जास्त म्हणजे ४-५ चमचे तेल घेऊन मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी व त्यात भरलेली भेंडी घालून (पाणी न घालता) फक्त परतून शिजवावे. सारण थोडे उरले असेल, तर ते पण परतताना वरून घालावे. भेंडी शिजल्यावर सर्व्ह करताना पुन्हा थोडे खोबरे, कोथिंबिरीने सजवावे. (काहीजण बेसनाऐवजी दाण्याचा कूट घालतात.)

झटपट आलू भेंडी
साहित्य - पाव किलो भेंडी, २ मोठे बटाटे, १ मोठा कांदा, तिखट, मीठ, चमचाभर धने पूड, अर्धा चमचा चाट मसाला, तेल व फोडणीचे साहित्य. 
कृती - भेंडीचे उभे काप चिरावेत. बटाटा आणि कांद्याचेही उभे काप करावेत. २ चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. प्रथम कांदा थोडा परतून घ्यावा, मग बटाट्याचे व भेंडीचे काप घालून सर्व शिजेपर्यंत परतावे. शेवटी स्वादानुसार तिखट, मीठ, धने पूड व थोडा चाट मसाला भुरभुरावा. हलक्या हाताने पुन्हा परतावे. सर्व्ह करताना वर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. (आवडत असल्यास या भाजीत कांद्यासह एक टोमॅटो घालावा.)

भरीत
साहित्य - पाव किलो भेंडी, १ वाटी ताक, १ वाटी दही, पाव वाटी दाण्याचा कूट, पाव वाटी खवलेले ओले खोबरे, थोडी कोथिंबीर, २-३ ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, तूप किंवा तेल, फोडणीचे  
साहित्य. 
कृती - भेंडीचे पातळ काप करून घ्यावेत. २ चमचे तेल किंवा तुपात जिरे, हिंग घालून फोडणी करावी व त्यात भेंडीचे काप परतून घ्यावेत. काप तांबूस रंगाचे झाले, की गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्यात ताक, दाण्याचा कूट, खोबरे, कोथिंबीर, ठेचलेल्या मिरच्या, मीठ, थोडी साखर घालून कालवावे. वाढण्यापूर्वी गरजेप्रमाणे दही कालवून भरीत सारखे करून वाढावे.

आंध्रातील भेंडेकाय पुलूसू (रस्सा भाजी)
साहित्य - पाव किलो भेंडी छोटे तुकडे करून, १ मोठा कांदा, १ टोमॅटो, २ मिरच्या, ६-७ लसूण पाकळ्या, २ चमचे तेल, मोहरी, पाव छोटा चमचा मेथीदाणा, कढीपत्ता, ३-४ चमचे चिंचेचा कोळ, हळद, मीठ.
कृती - दोन चमचे तेलात थोडी मोहरी, मेथीदाणा, कढीपत्ता, अख्ख्या लसूण पाकळ्या घालाव्यात व परतावे. नंतर बारीक चिरलेला कांदा परतावा. मग टोमॅटो आणि मिरचीचे तुकडे परतावेत. भेंडीचे तुकडे, हळद घालून पुन्हा परतावे. चिंचेचा कोळ व १ पाणी, मीठ घालून मंद आचेवर शिजवावे. रस्सा भाजी तयार.

पंजाबी भिंडी दो प्याजा
साहित्य - पाव किलो भेंडी (१ इंचाचे तुकडे करून घेणे), १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १ मोठा मोठे तुकडे केलेला कांदा, २ टोमॅटोंची प्युरी, तेल, अर्धा चमचा ओवा, २ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, मीठ, दही. 
कृती - दोन चमचे तेलात भेंडीचे तुकडे परतून बाजूला काढून ठेवावेत. एका कांद्याच्या फोडींचे पदर सोडवून मोकळे कराव्यात व या कांद्याच्या फोडी उरलेल्या तेलात परतून भेंडीबरोबर बाजूला ठेवाव्यात. पुन्हा २ चमचे तेलात ओवा, लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे व बारीक चिरलेला कांदा परतावा. १ चमचा आले-लसूण पेस्ट व टोमॅटो प्युरी घालून परतावे. नंतर २ चमचे दही, गरजेप्रमाणे मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर घालावी. शेवटी भेंडीचे तुकडे व कांद्याचे मोठे पातळ तुकडे मिसळावेत. मंद आचेवर शिजवावे. कोथिंबिरीने सजवून मग वाढावे.

राजस्थानी दही भिंडी
साहित्य - पाव किलो भेंडी, १ वाटी दही, मोठे २-३ चमचे बेसन, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा तिखट, कढीपत्ता, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती - भेंडीचे १ इंच लांबीचे तुकडे करावेत. २ चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात भेंडीचे तुकडे घालून, परतून शिजवावे. दुसरीकडे दही, बेसन, तिखट, मीठ, धनेपूड व वाटीभर पाणी घालून सर्व एकत्र थान फेटून घ्यावे. भेंडी शिजली, की त्यात हे दही बेसनाचे मिश्रण घालून पुन्हा थोडे शिजवावे. भाजी किती घट्ट वा पातळ पाहिजे, त्याप्रमाणे पाणी मिसळावे. सर्व्ह करताना वरून कोथिंबिरीने सजवावे. 

सिंधी कढी
साहित्य - शंभर ग्रॅम भेंडी, १०० ग्रॅम गवार, १ मोठा बटाटा, १ टोमॅटो, १ इंच आले, तिखट, मीठ, ४ चमचे बेसन, २ चमचे चिंचेचा कोळ, तेल, फोडणीचे साहित्य, ५-६ पाने कढीपत्ता.
कृती - दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात चार चमचे बेसन घालून परतावे. नंतर ३ कप पाणी घालून बेसनाच्या गाठी होऊ न देता सतत ढवळत उकळी आणावी. त्यात तिखट, मीठ, हळद, किसलेले आले घालावे. 
दुसरीकडे २ चमचे तेलात अख्खी भेंडी, अख्ख्या गवारीच्या शेंगा व बटाट्याच्या लांबट फोडी परतून शिजवून घ्याव्यात व या भाज्या उकळत्या बेसन कढीत घालाव्यात. शेवटी २ चमचे चिंचेचा कोळ घालून छान उकळून घ्यावे. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घालावी. 

भेंडी-मेथी भुर्जी
साहित्य - पाव किलो भेंडी (१ इंचाचे तुकडे करून घेणे), २ वाट्या मेथीची पाने (अर्धी जुडी), २ टोमॅटो, १ कांदा, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, १ चमचा गरम मसाला, तेल. 
कृती - दोन-तीन चमचे तेलात बारीक चिरलेला कांदा परतावा. त्यात आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा सर्व ब्राऊन होईपर्यंत परतावे. भेंडीचे तुकडे घालून पुन्हा परतावे. तिखट, मीठ, गरम मसाला घालावा. भेंडी शिजत आली, की बारीक चिरलेली मेथी व बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा परतावे. सर्व शिजल्यावर भुर्जी तयार. गरमागरम सर्व्ह करावी.

संबंधित बातम्या