गरमागरम खिचडी

उमाशशी भालेराव
सोमवार, 25 जानेवारी 2021

फूड पॉइंट

लग्न समारंभ वा सणासुदीला दुपारी भरपेट जेवण झाल्यावर संध्याकाळी काही तरी हलका आहार घ्यावा असे वाटते. त्यावेळी डाळ-तांदुळाच्या खिचडीची आठवण येते. ‘वन डिश मील’ असणारी ही परिपूर्ण खिचडी सर्वांनाच आवडते.

साधी डाळ खिचडी
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग डाळ, १ तमालपत्र, छोटा तुकडा दालचिनी, २ चमचे साजूक तूप, जिरे, हिंग, हळद, मीठ, चिमूटभर साखर. 
कृती : तांदूळ व डाळ स्वच्छ धुऊन निथळून ठेवावी. दुसरीकडे साजूक तुपात जिरे, हिंग, हळद, दालचिनी, तमालपत्र घालून फोडणी करावी. फोडणीमध्ये डाळ-तांदूळ परतून घ्यावेत. चवीनुसार, मीठ, थोडी साखर व तीन वाट्या पाणी घालून कुकरमध्ये खिचडी शिजवावी. ही बिनतिखट, बिनमसाल्याची खिचडी खास आजारी व्यक्तींसाठी व लहान बाळांसाठी आहे.

सिंधी खिचडी
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ, १ बारीक चिरलेला टोमॅटो, ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ चमचे तूप, जिरे, मोहरी, हिंग, हळद, १ चमचा लाल तिखट, मीठ.
कृती : तांदूळ व डाळी स्वच्छ धुऊन अर्धा तास निथळत ठेवाव्यात. तुपात, जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेली मिरची, टोमॅटो, तिखट घालून परतावे. नंतर त्यात डाळ-तांदूळ, मीठ व तिप्पट पाणी घालावे व कुकरमध्ये तीन शिट्या काढून शिजवावे. सर्व्ह करताना पुन्हा वर तूप व कोथिंबीर घालावी.

बाजरीची खिचडी
साहित्य : एक वाटी बाजरी, १ वाटी मूग डाळ, तूप, जिरे, हिंग, हळद, तिखट, मीठ.
कृती : बाजरी रात्रभर भिजत घालावी. सकाळी धुऊन निथळून घ्यावी. मूग डाळही धुऊन निथळून घ्यावी. दोन्ही एकत्र करून दुप्पट पाणी व मीठ घालून कुकरमध्ये तीन-चार शिट्या काढून शिजवावे. कुकर थंड होऊ द्यावा. एका मोठ्या भांड्यात दोन चमचे साजूक तुपात जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. शिजवलेली बाजरी व डाळ घालून सर्व छान एकत्र करावे. आवडीप्रमाणे थोडे तिखट घालून मध्यम आचेवर दोन-तीन मिनिटे शिजवावे. गरमागरम खिचडी साजूक तूप व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावी.

पालक खिचडी
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी मूग डाळ, २ वाट्या पालकाची प्युरी, २-३ हिरव्या मिरच्या, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, ३ लवंगा, २-३ वेलदोडे, मीठ, थोडी साखर.
कृती : पालकाची पाने स्वच्छ धुऊन एक मिनिट गरम पाण्यात घालून काढावीत. ही पाने व हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावे. तांदूळ-मूग डाळ धुऊन, निथळून ठेवावे. दोन चमचे तेलात लवंगा, वेलदोडे परतावे. नंतर कांदा परतावा. आले-लसूण पेस्ट घालावी. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून नरम होईपर्यंत शिजवावे. पालक पेस्ट घालावी. थोडे परतून त्यात गरम मसाला, मीठ व चवीपुरती थोडी साखर घालावी. डाळ-तांदूळ घालून सर्व एकत्र थोडे परतून दुप्पट पाणी घालावे व कुकरमध्ये शिजवावे. हिरवीगार खिचडी गरमागरम सर्व्ह करावी.

कडधान्यांची खिचडी
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मिश्र कडधान्ये (मूग, मसूर, राजमा, चवळी), १ बारीक चिरलेला कांदा, २ तमालपत्र, इंचभर दालचिनी, ३-४ लवंगा, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १ चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, मीठ, १ चमचा लिंबाचा रस.
कृती : सर्व कडधान्ये एकत्र करून धुऊन रात्रभर भिजत घालावीत व सकाळी निथळून ठेवावी. तांदूळ धुऊन घ्यावेत. मोठ्या भांड्यात दोन चमचे तेल तापवून त्यात दालचिनी, तमालपत्र व लवंगा घालून परतावे. नंतर कांदा परतावा. आले-लसूण पेस्ट घालून परतावे. त्यात कडधान्ये व तांदूळ घालून पुन्हा परतावे. मीठ, तिखट, गरम मसाला, लिंबाचा रस घालावा. चार वाट्या गरम पाणी घालून कुकरमध्ये दोन शिट्या काढून खिचडी शिजवावी. खोबरे, कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावी.

लसणाची खिचडी
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी मूग डाळ, २ जुड्या पातीचा लसूण, १०-१२ लसूण पाकळ्या, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, ५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, साजूक तूप, मीठ, कोथिंबीर, अर्धा चमचे जिरे.
कृती  : लसूण पात बारीक चिरून घ्यावी. लसूण पाकळ्या बारीक चिरून वा ठेचून घ्याव्यात. थोड्या तेलावर लसूण पात, लसूण व हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात. त्यात जिरे घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर भांड्यात दोन चमचे साजूक तूप वा तेल गरम करून त्यात कांदा परतावा. या वाटणात धुऊन ठेवलेले डाळ-तांदूळ घालून परतावे. पाच-सहा वाट्या पाणी घालून व अंदाजे मीठ घालून खिचडी शिजवावी. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावी.

संबंधित बातम्या