चटकदार डाळी 

उमाशशी भालेराव
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

शाकाहारी जेवणात डाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपल्या शरीराला आवश्‍यक प्रथिने डाळीतून मिळतात. म्हणूनच आपल्या जेवणात वरण, आमटी असतेच. वेगवेगळ्या डाळींपासून तयार केलेल्या आमटीचे काही हटके नमुने...

दाल साग
साहित्य : एक वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३-४ हिरव्या मिरच्या, २ चमचे गरम मसाला, एक वाटी भाज्या - वागी, गाजर, बीन्स, बटाटा, भोपळा, थोडी पालेभाजी (पालक/मेथी/शेपू इ.), फोडणीचे साहित्य, तेल, ८-१० लसूण पाकळ्या. 
कृती : हरभरा डाळ, मूग डाळ, कांदा, टोमॅटो, मिरच्या सर्व भाज्या व पालेभाज्या एकत्र कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात व नंतर एकत्र घोटून घ्याव्यात. गरजेप्रमाणे मीठ घालावे. शेवटी दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद व लसूण घालून फोडणी करावी व घोटलेल्या डाळीवर घालून गरमागरम डाळ सर्व्ह करावी.

दाल बुखारा
साहित्य : एक वाटी सालीची उडदाची डाळ, १ चमचा आले-लसूण पेस्ट, ४ चमचे बटर, १ चमचा तिखट, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, २ चमचे कसुरी मेथी, २ चमचे क्रीम, चवीनुसार मीठ, फोडणीचे साहित्य, ७-८ लसूण पाकळ्या.
कृती : एक वाटी सालीची उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी कुकरमध्ये शिजवावी. दुसरीकडे दोन चमचे बटरमध्ये आले-लसूण पेस्ट परतावी. गॅस मंद करून त्यात तिखट, टोमॅटो प्युरी घालावी. हा तडका शिजवलेल्या डाळीवर घालावा. मीठ, कसुरी मेथी व उरलेले दोन चमचे बटर, क्रीम घालावे. नंतर पुन्हा दोन चमचे तेलात जिरे, हिंग, हळद व लसूण घालून फोडणी करावी व घालावी. वर क्रीमने सजवून सर्व्ह करावी.

राजस्थानी मूग चणा डाळ
साहित्य : एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, १ कांदा, साजूक तूप, जिरे, हिंग, तिखट, १ चमचा आमचूर पावडर, मीठ.
कृती : मूग व चणा डाळ स्वच्छ धुऊन एकत्र शिजवावी व शिजल्यावर घोटून घ्यावी. हिंग, जिरे घालून साजूक तुपाची फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. गॅस बंद करून त्यात आवडीप्रमाणे चमचाभर लाल तिखट घालावे. ही फोडणी शिजवलेल्या डाळीवर घालावी. नंतर चवीनुसार मीठ व आमचूर पावडर घालून सर्व्ह करावी.

अमृतसरी उडद दाल

साहित्य : एक वाटी उडदाची डाळ, १ कांदा, १ टोमॅटो, ४ मिरच्या, १ चमचा जिरे, पाव चमचा हिंग, इंचभर आले, 
मीठ.
कृती : उडदाची डाळ थोडी हळद घालून शिजवावी. शिजल्यावर जास्तीचे पाणी असल्यास गाळून काढून टाकावे. दोन चमचे साजूक तुपात जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात आले किसून घालावे. बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि टोमॅटो परतावा. ही फोडणी शिजवलेल्या उडीद डाळीवर घालावी. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावी. 

दाल पक्वान्न
साहित्य :  एक वाटी हरभऱ्याची डाळ, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, फोडणीचे साहित्य, तेल , मीठ. 
कृती :  चण्याची डाळ हळद घालून कुकरमध्ये शिजवावी. दोन चमचे तेलात जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद घालून फोडणी करावी. त्यात चिरलेला कांदा परतावा. नंतर हिरवी मिरची, टोमॅटो घालून पुन्हा परतावे. त्यात तिखट पूड, गरम मसाला आमचूर पावडर घालावी. चवीनुसार मीठ घालून उकळावे. 
पक्वान्नासाठी : एक वाटी मैदा, पाव वाटी रवा, थोडा ओवा, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कालवावे आणि अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटाव्यात. पुऱ्यांना सुरी अथवा काट्याने भोके पाडून पुऱ्या तळाव्यात. या पुऱ्या फुगू नयेत आणि कडक राहाव्यात. दाल पक्वान्न म्हणजे या पुऱ्यांचे तुकडे करून त्यावर डाळ घालून, कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करतात.

दाल माखनी
साहित्य :  एक वाटी सालीची उडदाची डाळ, पाव वाटी राजमा, ३ चमचे बटर, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, १ चमचा जिरे, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, छोटा तुकडा दालचिनी, २-३ लवंगा, २-३ मसाल्याचे वेलदोडे, १ कांदा बारीक चिरून, १ चमचा तिखट, हळद, १ अगदी बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ, अर्धी वाटी क्रीम.
कृती : उडदाची डाळ व राजमा भरपूर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी उपसून दोन-अडीच वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवावे. नंतर उपसून घोटून घ्यावे. दुसरीकडे पॅनमध्ये बटर वितळवून जिऱ्याची फोडणी करावी. नंतर त्यात हिरवी मिरची, दालचिनी, लवंगा, वेलदोडे, बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट परतावी. कांदा ब्राउन झाल्यावर त्यात तिखट, हळद, टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर शिजवलेली डाळ, वाटीभर पाणी व मीठ घालून दहा मिनिटे शिजवावी. नंतर क्रीम घालावे. कोथिंबीर व बटरने सजवून सर्व्ह करावे. 

छिलकेवाली मूग दाल
साहित्य : एक वाटी सालीची मूग डाळ, १ कांदा, १ टोमॅटो, ७-८ लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, २ चमचे साजूक तूप, चवीनुसार मीठ, थोडी साखर (ऐच्छिक).
कृती : सालीची मूग डाळ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिरलेला लसूण, चिरलेल्या मिरच्या हे सर्व एकत्र शिजवावे. शिजल्यावर घोटून घ्यावे. साजूक तुपात जिरे व लसणाची फोडणी करून त्यावर घालावी. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

खट्टी दाल
साहित्य : एक वाटी हरभरा डाळ, १ कांदा, १ मोठा टोमॅटो, ७-८ लसूण पाकळ्या, १ चमचा मिरची पूड, १ चमचा कलौंजी, कढीपत्ता, २ चमचे चिंचेचा कोळ, मीठ, जिरे, २ चमचे तेल. 
कृती : दोन चमचे तेलात जिरे, कलौंजी, लसूण घालून फोडणी करावी. कढीपत्त्याची ८-१० पाने घालावीत. एक कांदा बारीक चिरून परतावा. नंतर टोमॅटोच्या बारीक फोडी करून सर्व एकजीव परतावे. त्यात शिजवलेली डाळ, मीठ व चिंचेचा कोळ घालून छान उकळावे व सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या