भाताचे नानाविध प्रकार

उमाशशी भालेराव
सोमवार, 15 मार्च 2021

भात मऊ असो की मोकळा, आदल्या दिवशीचा उरलेला असो की ताजा; भाताचे अनेकविध पदार्थ तयार करता येतात. असेच काही हटके पदार्थ...

चित्रान्ना 
साहित्य : एक वाटी तांदूळ, २ चमचे चण्याची डाळ, १ चमचा उडीद डाळ, १ वाटी नारळाचा कीस, थोडी कोथिंबीर, २-३ लाल सुक्या मिरच्या, आंबटपणासाठी अर्धी वाटी कैरीचा कीस, कैरी नसल्यास एका लिंबाचा रस, ३-४ चमचे तेल, फोडणीचे साहित्य व थोडे काजू (ऐच्छिक). 
कृती : चण्याची व उडदाची डाळ अर्धा तास पाण्यात भिजवून निथळून ठेवावी. तांदळाचा छान मोकळा भात करून घ्यावा व परातीत पसरून गार करून घ्यावा. तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. नंतर त्या तेलात चण्याची उडदाची डाळ परतून घ्यावी. सुक्या मिरच्या परताव्यात. गार झालेल्या भातात खोबरे, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे व नंतर फोडणी द्यावी. कैरीचा कीस अथवा लिंबू रस घालून कालवावे. काजू, कोथिंबिरीने सजवून गारच सर्व्ह करावा.

कॉर्न मेथी पुलाव
साहित्य : दोन तमालपत्राची पाने, दालचिनीचा तुकडा, ४-५ लवंगा, ३-४ वेलदोडे, ८-१० मिऱ्याचे दाणे, १ चमचा चण्याची डाळ, १ चमचा उडदाची डाळ, तेल, फोडणीचे साहित्य, १ बारीक चिरलेला कांदा, १ वाटी कॉर्नचे दाणे, २-३ हिरव्या मिरच्या, १ जुडी बारीक चिरलेली मेथी, मीठ, थोडी साखर, १ लिंबाचा रस, २ वाट्या बासमती तांदळाचा तयार भात
कृती : तीन-चार चमचे तेलात मोहरी, हिंगाची फोडणी करून त्यात चण्याची डाळ, उडदाची डाळ परतून घ्यावी. खडा मसाला व बारीक चिरलेला कांदा परतावा. शिजवलेले कॉर्नचे दाणे घालावेत. बारीक चिरलेली मेथी परतून शिजवावी. मीठ घालून झाकण ठेवावे. सर्व शिजल्यावर त्यात तयार भात घालून परतावे. त्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडी साखर घालावी. (आले-लसूण पेस्ट ऐच्छिक आहे)

नागपुरी वडा भात
साहित्य : एक वाटी तांदूळ, २ चमचे तेल, फोडणीचे साहित्य, वड्यासाठी - वाटीभर बेसन, अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने पूड, पाव चमचा जिरे पूड, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट (वड्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र मळून छोटे गोळे करून घ्यावेत).
कृती : तेलात मोहरी, हिंगाची फोडणी करावी. त्यात तांदूळ परतावेत व दुप्पट पाणी घालून भात शिजवायला ठेवावा. भात अर्धवट शिजला की त्यात तयार गोळे मिसळावेत व गरजेप्रमाणे थोडे मीठ घालून, झाकण ठेवून भात शिजवावा. सर्व्ह करताना डिशमध्ये भात वाढल्यावर पुन्हा त्यावर मोहरी, हिंग, सुकी मिरची व लसूण घालून केलेली फोडणी घालावी. (वड्याचे गोळे भातात न शिजवता आधीच तळून घेऊन नंतरही मिसळतात.)

वऱ्हाडी आलू भात
साहित्य : एक वाटी तांदूळ, २ चमचे धने, १ इंच दालचिनी, थोडा आल्याचा तुकडा, ४-५ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, २ मोठे बटाटे, वाटीभर दही, ४ चमचे तेल, जिरे, हिंग, पाव वाटी किसलेला नारळ, काजू. 
कृती : धने, दालचिनी, आले, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर थोडे पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. चार चमचे तेलात बटाट्याच्या फोडी परतून, शिजवून बाजूला ठेवाव्यात. त्याच तेलात जिरे, हिंगाची फोडणी करून त्यात वाटलेला मसाला परतावा. त्यावर बटाट्याच्या फोडी व दही घालावे. नंतर वाटीभर तांदूळ घालून परतावे. चवीनुसार मीठ व दुप्पट पाणी घालून भात शिजवावा. तळलेल्या काजूने व कोशिंबिरीने सजवावे. 

पंजाबी तवा पुलाव
साहित्य : एक मोठा कांदा (लांब लांब चिरून चिरून कुरकुरीत होईपर्यंत तळलेला), त्याशिवाय आणखी १ बारीक चिरलेला कांदा, १ चिरलेला टोमॅटो, १ वाटी बासमती तांदूळ, २ चमचे पावभाजी मसाला, १ चमचा आले-लसूण पेस्ट, मटार, गाजर, बीन्स, फ्लॉवर, बटाटा या भाज्यांचे शिजवलेले तुकडे, १०-१२ काजू, मीठ, कोथिंबीर, तेल. 
कृती : बासमती तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा. तीन-चार चमचे तेलात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो परतावा. आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परतावे. त्यात शिजवलेल्या भाज्या, पावभाजी मसाला व मीठ घालावे. शेवटी शिजवलेला भात मिसळावा. सर्व्ह करताना वरती तळलेला कांदा, तळलेले काजू व कोथिंबीर घालून सजवावे.

केरळी कोकोनट राइस
साहित्य :  एक वाटी तांदूळ, ३-४ चमचे साजूक तूप, ४ लवंगा, दालचिनीचा तुकडा, ३-४ वेलदोडे, ३-४ हिरव्या मिरच्या, १०-१२ काजू, अर्धी-पाऊण वाटी नारळाचा चव, एका लिंबाचा रस, मीठ, थोडी कोथिंबीर.
कृती : एक वाटी तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा. दुसरीकडे तुपात लवंगा, वेलदोडे, दालचिनी, हिरव्या मिरचीचे तुकडे परतावेत. नंतर काजू परतावेत. त्यात तयार भात, नारळाचा चव, मीठ व लिंबू रस मिसळावा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या