ब्रेडचे नावीन्यपूर्ण पदार्थ

उमाशशी भालेराव
मंगळवार, 27 एप्रिल 2021

फूड पॉइंट

परदेशातून आलेला ब्रेड आता आपल्याकडेही सरसकट खाल्ला जातो. त्याचे प्रकारही अनेक आहेत. अशा या ब्रेडपासून केलेल्या काही वेगळ्या रेसिपीज...

ब्रेड रोल
साहित्य : पाच-सहा ब्रेड स्लाइस, १ उकडलेला बटाटा, २ चीज स्लाइस, मीठ, मीरपूड, तळण्यासाठी तेल.
कृती : ब्रेड स्लाइसच्या कडा कापून टाकाव्यात. हे स्लाइस लाटण्याने लाटून पातळ करावेत. उकडलेला बटाटा कुस्करून त्यात मीठ, मीरपूड घालावी. हे मिश्रण प्रत्येक स्लाइसला पसरून लावावे. त्यावर चीज स्लाइसचा तुकडा ठेवून रोल करून घ्यावे. रोल सुटतो आहे असे वाटल्यास त्याला टुथपिक लावावी. हे रोल तेलात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. टुथपिक काढून टाकावी. टोमॅटो सॉसबरोबर अथवा आवडीच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे. या रोलमध्ये चीज छान वितळलेले असते. 

सँडविच ब्रेड पकोडे
साहित्य : सहा ब्रेड स्लाइस, २ उकडलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा धने-जिरे पूड, २ हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, तेल.
कृती : दोन-तीन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. थोडी बारीक चिरलेली कढीलिंबाची पाने आणि दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. बारीक चिरलेला कांदा परतून नंतर त्यात उकडून कुस्करलेला बटाटा घालावा. मीठ, जिरे-धने पूड घालून छान भाजी करून घ्यावी. दोन ब्रेड स्लाइसमध्ये हे सारण पसरून भरावे व दाबून घट्ट करावे. त्रिकोणी कापावे व भज्याच्या पिठात बुडवून तळावे. भज्याच्या पिठासाठी बेसनात आवडीप्रमाणे तिखट, मीठ, जिरेपूड व अंदाजे पाणी घालून कालवून घ्यावे.

उपमा
साहित्य : सात-आठ ब्रेड स्लाइस, तेल, फोडणीचे साहित्य, अर्धा चमचा उडदाची डाळ, २-३ लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ.
कृती : ब्रेडचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे अथवा हातानेच बारीक तुकडे करावेत. दोन-तीन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. उडदाची डाळ, सुक्या मिरच्या परताव्यात. कढीलिंबाची पाने घालावीत. बारीक तुकडे केलेला ब्रेड घालून परतावे. मीठ, चवीपुरती चिमूटभर साखर घालावी. फार कोरडे वाटल्यास थोडे पाणी शिंपडावे. आवडल्यास थोडा लिंबू रस घालावा. छान वाफ आल्यावर खोबरे, कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे. आवडल्यास फोडणीमध्ये एक कांदा बारीक चिरून परतावा.

ब्रेड सफरचंद पुडिंग
साहित्य : दोन सफरचंदे, १ ब्रेड, दूध, लोणी, साखर (गरजेप्रमाणे).
कृती : ब्रेड स्लाइसना लोणी व साखर लावून ठेवावे. सफरचंदांची साले व बिया काढून लहान फोडी कराव्यात व शिजवून घ्याव्यात. ब्रेडचे तुकडे भिजतील इतके अंदाजे दूध घेऊन त्यात लोणी साखर लावून ठेवलेले ब्रेडचे तुकडे भिजवावेत व जरा कुस्करून घ्यावेत. नंतर ओव्हनमध्ये ठेवण्याच्या बाऊलला लोण्याचा हात लावून त्यात कुस्करलेल्या ब्रेडचा एक थर, त्यावर शिजवलेल्या सफरचंदाचा एक थर, पुन्हा ब्रेडचा थर असे थर देऊन ओव्हनमध्ये १८० अंशाला १५-२० मिनिटे भाजून घ्यावे.

शिरा
साहित्य : एक मोठा ब्रेड, १ लिटर दूध, अर्धा किलो साखर, तळण्यासाठी तूप, वेलची पूड, काजू, बदाम, बेदाणे. 
कृती : ब्रेडचे लहान तुकडे करून ते तुपात तांबूस रंगावर तळून घ्यावेत. दूध तापवून उकळी आल्यावर त्यात हे तळलेले तुकडे घालून घोटून घ्यावे. पावाचा घोटून गोळा झाल्यावर त्यात साखर घालावी. आपल्या आवडीप्रमाणे साखर कमी-जास्त घालावी. नंतर रव्याच्या शिऱ्याप्रमाणे वाफ आणून हा शिरा करावा. वेलची पूड व काजू, बदामाचे काप आणि बेदाणे घालावेत.

शाही ब्रेड तुकडा
साहित्य : आठ ब्रेड स्लाइस, २ वाट्या साखर, तळणीसाठी तूप, रबडी (दूध आटवून साखल घालून रबडी तयार करावी), काजू, बदाम, पिस्ते काप.
कृती : ब्रेड स्लाइसचे त्रिकोणी तुकडे कापून तुपात तांबूस रंग येईपर्यंत तळावे. साखरेचा पातळ पाक करावा व त्या पाकात हे तळलेले तुकडे घालावेत. तुकड्यांना सर्व बाजूंनी पाक लागल्यावर तुकडे एका बशीत काढावेत व त्यावर रबडी पसरावी. काजू, बदाम, पिस्ते यांच्या कापांनी सजवून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या