मटार पुरी, पॅटीस, सूप...

ऊर्मिला पिंगळे, पुणे
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

खजूर - काजू रोल
साहित्य ः बिया काढून स्वच्छ केलेला खजूर १०० ग्रॅम, मिल्क पावडर १०० ग्रॅम, काजू १०० ग्रॅम, अर्धी वाटी साखर, साजूक तूप
कृती ः कढईत थोडे तूप टाकून खजुराचा गोळा परतून घ्यावा. प्लॅस्टिक कागदाला तुपाचा हात लावून त्यावर खजुराचा गोळा ठेवावा. दुसऱ्या प्लॅस्टिक कागदाला तुपाचा हात लावून खजुराच्या गोळ्यावर ठेवून लाटण्याने खजुराची पोळी लाटावी. काजूची पावडर करावी. साखर भिजेल इतपत पाणी घालून साखरेचा पाक करावा. त्या पाकात मिल्क पावडर, काजू पावडर घालून त्याचाही गोळा करावा. प्लॅस्टिक कागदावर काजूचा गोळा ठेवून, खजुराच्या पोळीएवढी पोळी लाटावी. खजुराच्या पोळीवर काजूची पोळी ठेवून दाबून बसवावी व वरील कागद अलगद काढून घ्यावा. दोन्ही पोळीचा एकत्र रोल करून गुंडाळी १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी. रोल सेट झाल्यावर बाहेर काढून गुंडाळीचे स्लाईस कापावे. असा पौष्टिक रोल सर्वांनाच खूप आवडेल.

वांग्याचे लोणचे
साहित्य : एक मोठे वांगे, २-३ लाल मिरच्या, १ चमचा तेल हिंग धने, अर्धा चमचा मेथ्या बडीशेप, एक चमचा लिंबूरस किंवा कैरीचा कीस, मीठ १ चमचा गूळ किंवा साखर (आवडीनुसार)
कृती : धने, लाल मिरच्या, मेथ्या, बडीशेप थोड्या तेलावर भाजून घ्यावी. वांगे धुऊन त्याचे गोल किंवा उभे काप करावेत. भाजलेला मसाला मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावा. तो तेलावर लालसर परतावा, त्यात मीठ, कैरीचा कीस किंवा लिंबूरस घालून वांग्याच्या कापावर घालून चांगले मिक्‍स करावे. थोडा हिंग घालावा. आवडत असल्यास थोडा गूळ घालावा. चटकदार लोणचे तोंडा रुची आणते. भाजणी, थालीपीठ, पोहे, उपम्याबरोबर खाण्यास झकास तोंडी लावणे तयार. 

छोले गाजर पुलाव
साहित्य : एक वाटी भिजवून वाफवलेले काबुली चणे, एक वाटी भिजवून ठेवलेले तांदूळ, तूप-काजू-मिरे ४-५, तमालपत्र १, लवंग ३-४, दालचिनी २-३ तुकडे, लाल मिरची १-२, १ वाटी गाजराचे तुकडे, मीठ, कोथिंबीर, फ्लॉवरचे तुरे अर्धी वाटी, साखर, वेलदोडे 
कृती : कढईत तुपावर लवंग, दालचिनी, मिरे, काजू, तमालपत्र, १-२ वेलदोडे, लाल मिरच्या घालून परतावे. गाजराचे तुकडे, फ्लॉवरचे तुरे व तांदूळ घालून चांगले परतावे. त्यात चणे, मीठ व थोडी साखर पुन्हा घालून परतावे. २ वाट्या गरम पाणी घालून वाफ आणावी. पुलाव चांगला शिजल्यावर थोडे तूप सोडावे. कोथिंबीर घालून, आवडत असल्यास थोडी पुदिन्याची पाने घालून डिशमध्ये खाण्यास द्यावा. अत्यंत चविष्ट असा प्रोटीनयुक्त पुलाव स्वादिष्ट लागतो.

मेथी बाटी
साहित्य : मेथीची एक जुडी निवडून स्वच्छ धुऊन चिरावी. कणीक, २ वाट्या, तिखट मीठ चवीप्रमाणे, ओवा, पांढरे तीळ, २ चमचे ठेचलेला लसूण, हळद, हिंग, तुरीच्या डाळीचे वरण अर्धी वाटी, १ चमचा चिंचेचा कोळ, गूळ, फोडणीसाठी तेल, मोहरी २ लाल मिरच्या, काळा मसाला.
कृती : कणकेत आवडीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, तीळ, हळद, थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवावी. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, हिंग ठेचलेला लसूण, लाल मिरच्या घालून मेथीची भाजी टाकावी. वाफ आल्यावर थोडी साखर किंवा गूळ, हळद, चिंचेचा कोळ टाकावा. तुरीचे वरण चांगले घोटून टाकावे. मीठ टाकावे. पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून वाफ आणावी. भिजवलेल्या कणकेच्या हाताला तेल लावून छोट्या-छोट्या बाट्या कराव्यात व त्या भाजीत घालाव्यात. पातळ हवे असल्यास अजून थोडे पाणी घालावे. काळा मसाला चवीप्रमाणे घालावा. बाट्या चांगल्या शिजू द्याव्यात. खायला देताना वरून साजूक तूप, खोबरे घालावे. रुचकर अशी वनमिल डिश तयार आवडीप्रमाणे लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे तोंडी लावण्यास द्यावे. एखादा पापड भाजून द्यावा.

मटार पुरी 
साहित्य : एक वाटी मटार, तेल, हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीप्रमाणे, मीठ, साखर, हिंग, १ चमचा लिंबूरस, आले कीस १ चमचा आवडत असल्यास लसूण ठेचून २ चमचे खोबरे कीस किंवा कोकोनट पावडर ४ चमचा, बडीशेप १ चमचा, ड्रायफ्रूट - काजूपाकळ्या बेदाणे.
पारी : एक वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा, २ चमचे चण्याचे पीठ, मीठ, साखर, तेल
कृती : कणकेत मैदा, डाळीचे पीठ, मीठ, साखर, तेलाचे मोहन घालून पुरीसाठी पीठ मळावे. मटार उकडून घेऊन मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात बारीक केलेले मटार परतावे. त्यात आवडीप्रमाणे मिरची ठेचा (लसूण) आले कीस घालावा. खोबरे कीस, बडीशेप, ड्रायफ्रूट घालावेत. गार झाल्यावर लिंबाचा रस घालावा, चवीला थोडी साखर घालावी. कणकेची पारी लाटून त्यात मटारचे सारण भरून पुरी कचोरीप्रमाणे बंद करावी. हलक्‍या हाताने लाटून तेलात तळावी. गरम पुरी खाण्यास छानच लागते. तिच्याबरोबर टोमॅटो सॉस द्यावी. मटार पुरीऐवजी मटार करंजीही तयार होते. मटाराऐवजी कॉर्नही वापरू शकतो.

लाल भोपळ्याचे पॅटीस
साहित्य : सारण १ पाव लाल भोपळा, साजूक तूप , हिरव्या मिरचीचे ४-५ तुकडे, अर्धा चमचा तिखट, किसलेले पनीर अर्धी वाटी, काजू तुकडे, थोडे आले किसून, बेदाणे, शेंगदाणा कूट २ चमचे, १ चमचा साखर, १ चमचा लिंबूरस, कव्हरसाठी, ५-६ बटाटे मॅश केलेले, २ चमचे आरारूट किंवा साबुदाणा पीठ, किंचित मीठ, तेल किंवा तूप, राजगिरा पीठ
कृती : लाल भोपळा साल काढून किसून घ्यावा. तुपावर जिरे, मिरच्यांचे तुकडे घालून भोपळ्याचा कीस परतून घ्यावा. वाफ आल्यावर त्यात काजू तुकडे बेदाणे, पनीर कीस, साखर, आल्याचा कीस, तिखट, शेंगदाणा कूट घालून चांगली वाफ आणावी. थंड झाल्यावर १ चमचा लिंबूरस घालावा. मॅश केलेल्या बटाट्यात आरारूट किंचित मीठ, साबुदाणा पीठ घालून चांगले मळून घ्यावे. पिठाची पारी करून त्यात भोपळ्याचे सारण भरून गोळ्याला चपटा आकार द्यावा. राजगिरा पिठात पॅटीस घोळवून तेलात किंवा तुपात शॅलोफ्राय करावे किंवा लालसर तळून घ्यावे. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे. (चटणी दह्यात कालवून) उपवासाच्या वेळी किंवा एरवीही खाण्यास चटकदार असा पदार्थ तयार होतो.

मिश्र डाळींचे आप्पे
साहित्य : अर्धी किंवा १ वाटी तांदूळ, तूर, मूग, चना, मसूर अशा सर्व डाळी प्रत्येक मूठभर, मीठ, साखर, हिरव्या मिरचीचा लसूण आले घातलेला ठेचा, १ चमचा हळद, अर्धी वाटी कोबीचा किस, अर्धी वाटी गाजर कीस, पालक ५-६ पाने, तेल, कढीलिंब ४-५ पाने
कृती : तांदूळ व सर्व डाळी एकत्र भिजवून त्यात पालकची पाने घालून मिक्‍सरमधून काढावे. त्यात गाजर, कोबी कीस, हिरव्या मिरचीचा ठेचा, आले, लसूण, मीठ, साखर, हळद, कढीलिंब चिरून घालून चांगले कालवावे. आप्पेपात्राला तेल लावून त्यात मीठ घालून आप्पे उकडून घ्यावेत.
चटणी : चिंचगुळाचे घट्टसर पाणी करून त्यात पांढरे तिळकूट तिखट, मीठ, जिरेपूड घालावी. आप्पा खायला देताना या चटणीबरोबर देणे. अशा चविष्ट आप्प्यामुळे आपल्याला प्रथिने कॅल्शिअम मिळते.

मिक्‍स भाजीचा ढोकळा
साहित्य : पालक, मेथी, चवळईची भाजी निवडून चिरून प्रत्येकी १-१ वाटी, दुधी भोपळ्याचा कीस अर्धी वाटी, मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा १ चमचा, आले - लसूण पेस्ट २ चमचे, बडीशेप १ चमचा, धने - जिरेपूड १ चमचा, साखर, पां. तीळ, दही २ चमचा, सोडा चिमूटभर, तेल, तांदळाचे व चण्याचे पीठ आवश्‍यकतेप्रमाणे
कृती : बाऊलमध्ये सर्व भाज्या एकत्र करून त्यात हिरवी मिरचीचा ठेचा, आले - लसूण पेस्ट, मीठ, साखर, तीळ, थोडे तेल घालून कालवावे. चिमूटभर सोडा घालावा, त्यात सामावेल एवढे तांदळाचे, चण्याचे पीठ घालून गोळा मळून घ्यावा. थाळीला तेल लावून त्यावर गोळा थापावा व २० मिनिटे उकडून घ्यावा. गार झाल्यावर चौकोनी वड्या पाडाव्यात. तेलाची फोडणी करून त्यात लाल मिरची, पां. तीळ घालून ती फोडणी त्यावर घालावी. खोबरे कोथिंबीर घालून खाण्यास द्यावे.

खजूर सूप
साहित्य : एक वाटी बिया काढलेला खजूर, १ वाटी ओले खोबरे, तूप, जिरे, हिंग, चिंचेचा गोळ, २ चमचे गूळ, २ चमचे बीट, २ चमचे मीठ, बीटाचा लहान तुकडा, १ गाजर, कोथिंबीर, १ लाल मिरची
कृती : खजूर, ओले खोबरे, बीट, गाजर (तुकडे करून) थोडे पाणी घालून मिक्‍सरमधून काढावे व गाळून घ्यावे, साजूक तुपात जिरे, लाल मिरची, हिंग घालून फोडणी करावी. त्यावर घालून घेतलेले खजुराचे मिश्रण घालावे. चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घालून उकळी आणावी. कोथिंबीर घालून गरम पिण्यास द्यावे. पावसाळ्यात गरम सूप पिण्यास मजा येते.
टीप : सूप गाळल्यावर जो चोथा उरतो त्यात ज्वारी - चण्याचे पीठ घालून वडे किंवा थालीपीठ करता येते. चोथ्यामुळे फायबरही मिळते.

स्वीट कॉर्न लस्सी
साहित्य : एक वाटी स्वीट कॉर्न, १ वाटी किंवा थोडे जास्त दूध, साखर, बर्फाचा चुरा, १ चमचा दही
कृती : स्वीट कॉर्न व दूध एकत्र मिक्‍सरमधून काढावे व गाळून घ्यावे, गाळलेला चोथा बाजूला ठेवावा. गाळलेले दूध चांगले गरम करावे. गार करून त्याला दही लावून ठेवावे. चांगले दही लागल्यावर घुसळून ताक करावे. घट्टसर चाकात साखर, बर्फाचा चुरा घालून स्वीट लस्सी तयार. खारी लस्सी हवी असेल त्यात साखरेऐवजी किंचित मीठ घालावे. एक पौष्टिक लस्सी वेगळ्या चवीमुळे छान लागते.
टीप ः दूध गाळून वर राहिलेल्या चोथ्यात उकडलेला बटाटा, तिखट मीठ, कॉर्नफ्लॉवर घालून कटलेट बनवावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या