सहज-सोप्या जांभूळ रेसिपीज

उषा लोकरे
सोमवार, 17 जून 2019

फूड पॉइंट
गडद जांभळ्या रंगाची चकचकीत, तजेलदार जांभळे सर्वांनाच आकर्षित करतात. जांभळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, क्षारासारखे घटक आणि क व ब गटातील जीवनसत्त्वेदेखील असतात. तसेच त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि तंतुमय घटकही मिळतात. या फळाला त्यातील औषधी गुणधर्मामुळे खूपच महत्त्व आहे. विशेषतः डायबेटीससारख्या आजारासाठी हे फळ अत्यंत गुणकारी आहे, असे मानले जाते. अशा जांभळापासून केलेल्या काही सहज-सोप्या रेसिपीज...  

रायता
साहित्य : अर्धा कप जांभूळ (धुऊन, बिया काढून टाकणे), १ कप गोड घट्ट दही, चिमूटभर मीठ, १ चमचा पिठीसाखर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, सजावटीसाठी अक्रोडचे भाजलेले तुकडे (ऐच्छिक)
कृती : बाऊलमध्ये दही, मीठ, पिठीसाखर व थोडी कोथिंबीर एकत्र करून मिश्रण ढवळून एकजीव करावे. त्यात जांभळाचे तुकडे मिसळावे व मिश्रण नीट कालवून घ्यावे. वरून उरलेली कोथिंबीर व अक्रोडचे तुकडे घालून सजवावे.


सरबत 
साहित्य : दोन कप जांभळे, २ कप पाणी, ४ टेबलस्पून साखर, २ चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा सैंधव, १ कप सोडा
कृती : जांभळातील बिया काढून टाकून, गर कुस्करून घ्यावा. गरात पाणी व साखर घालून गर मऊसर शिजेपर्यंत उकळावा. मिश्रण थंड करून मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. पातळ मलमलीच्या कापडातून गाळून घ्यावे व चोथा व साल बाजूला काढावी. गाळलेल्या स्वच्छ रसात सैंधव, मिरपूड, सोडा, लिंबाचा रस मिसळावा व सरबत सर्व्ह करावा. (फ्रॉस्टींगसाठी ग्लासच्या कडेने मीठ चोळून फ्रीजरमध्ये ठेवावा. अशा ग्लासमध्ये सरबत सर्व्ह केल्याने नावीन्यपूर्ण चव मिळते.)


मूस 
साहित्य : अडीचशे ग्रॅम जांभळे, ५०० ग्रॅम दही, २ टेबलस्पून कन्डेन्स्ड मिल्क, २ टेबलस्पून कॅस्टर शुगर, १ कप पिठी साखर, १ चमचा जिलेटिन, पाव कप ताजी क्रीम
कृती : दही मलमलच्या कापडात घालून त्यातील पाणी निथळून घ्यावे व चक्का करावा. जांभळे स्वच्छ धुऊन कोरडी करावीत व त्यावर साखर भुरभुरून ३-४ तास ठेवावे. जांभळामध्ये साखर मुरल्यावर, जांभळातील बिया काढून टाकाव्यात व गर कुस्करून घ्यावा. कन्डेन्सड्‌ मिल्क, जांभळाचा गर व चक्का एकत्र करून मिश्रण मिक्‍सरमधून एकजीव करून घ्यावे. त्यात पाव कप ताजी क्रीम मिसळावी. कोमट पाण्यात २ टेबलस्पून जिलेटिन मिसळून हे मिश्रण उकळून जिलेटिन विरघळून घ्यावे. गार करून वरील मिश्रणात मिसळावे. नंतर घट्ट झाकणाच्या भांड्यात मिश्रण ओतून फ्रीजरमध्ये चार-पाच तास ठेवून मूस सेट करावा. थोड्या जांभळाच्या कापांनी सजवावे.


मॉकटेल 
साहित्य : दोन कप दही, ४ टेबलस्पून साखर, पाऊण कप जांभळाचा पल्प, ४ टेबलस्पून बर्फाचा चुरा
कृती : जांभळे स्वच्छ धुऊन, कोरडी करून त्यातल्या बिया काढून टाकाव्यात व कुस्करून घ्यावीत. बर्फाचा चुरा सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण मिक्‍सरमधून मुलायम व फेसाळ (frothy) करून घ्यावे. ग्लासमध्ये मिश्रण घालून त्यात बर्फाचा चुरा टाकावा व सर्व्ह करावे.


जाम 
साहित्य : अडीचशे ग्रॅम जांभळे (जांभळ्या रंगाचे कडक), ७५० ग्रॅम साखर व मीठ.
कृती : जांभळे स्वच्छ धुवावेत व एक कप पाण्यात एक चमचा मीठ घालून त्यात जांभळे १५-२० मिनिटे ठेवावीत. नंतर एका भांड्यात जांभळे घेऊन त्यात पाव कप पाणी घालून उकळावे. गॅस मंद करून जांभळे शिजवावीत व चमच्याने दाबून त्यातील बिया काढून टाकाव्यात. चमच्याने दाबून पल्प करावा. उकळत असताना त्यात साखर मिसळावी व साखर विरघळून घट्ट चिकट जाम मंद आचेवर करावा.


बर्फी 
साहित्य : चार कप जांभळाचा पल्प, १ कप खोवलेले खोबरे, अडीच कप साखर, २ टेबलस्पून पिठीसाखर, अर्धा चमचा वेलदोडे पूड, सुकामेवा.
कृती : कढईत जांभळाचा पल्प, साखर, खोवलले खोबरे एकत्र करून एकसारखे ढवळत उकळावे व एक गोळा करावा. मिश्रण कढईच्या बाजूला सुटू लागले पाहिजे. नंतर त्यात पिठीसाखर मिसळून मिश्रण चांगले ढवळून काढावे. त्यात वेलदोडे पूड, काजू तुकडे मिसळावे. तूप लावलेल्या थाळीत मिश्रण थापून वड्या कापाव्यात.


मोल्ड  
साहित्य : पंधरा-वीस जांभळे, अडीच कप दूध, ४ चमचे कस्टर्ड पावडर, अर्धा कप पाणी, एक कप साखर
कृती : जांभळे अर्धा कप उकळत्या पाण्यात मऊसर शिजवून घ्यावीत. त्यातील बिया काढून टाकून पल्प एकजीव करावा, (मिक्‍सरमधून काढावा). २ कप दूध गरम करून घ्यावे. अर्धा कप गार दुधात कॉर्नफ्लोअर मिसळून पेस्ट करून त्यात मिसळावी व मंद गॅसवर हे मिश्रण २ मिनिटे शिजवावे. मिश्रण शिजत असताना त्यात साखर मिसळून घ्यावी. मिश्रण थंड करावे व त्यात जांभळाचा पल्प घालून मिश्रण मिक्‍सरमधून काढावे. घट्ट झाकणाच्या भांड्यात मिश्रण ओतून फ्रीजमध्ये सेट करावे. अर्धवट सेट झाल्यावर मिश्रण पुन्हा एकदा मिक्‍सरमधून चर्न करून काढावे व भांड्यात ओतून फ्रीजमध्ये सेट करावे(२-३ वेळा मिक्‍सरमधून काढल्याने लुसलुशीतपणा वाढतो). २-३ जांभळांच्या कापांनी सजवून आइस्क्रीम सर्व्ह करावे.


आइस्क्रीम 
साहित्य : एक कप जांभळाची प्युरी, अर्धा कप दूध पावडर, अर्धा कप साखर, १ कप क्रीम, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, २ कप दूध
कृती : जांभळे धुऊन त्यातील बिया काढाव्यात. नंतर मिक्‍सरमधून बारीक करून पल्प करावा. त्यात साखर, दूध पावडर, क्रीम मिसळावे. कॉर्नफ्लोअर थोड्या दुधात मिसळून नंतर उकळत्या दुधात मिसळावे व कस्टर्ड करावे. घट्ट झाकणाच्या भांड्यात हे मिश्रण घालावे. मिश्रण फ्रीजरमध्ये सेट करावे. १-२ वेळा मिश्रण बाहेर काढून मिक्‍सरमधून काढावे व परत सेट करायला ठेवावे. ज्यामुळे आइस्क्रीम लुसलुशीत होते.


स्क्वॅश 
साहित्य : अर्धा किलो जांभळाचा रस, एक किलो साखर
कृती : जांभळाचा रस उकळावा, उकळी आल्यावर त्यात साखर मिसळावी व घट्ट सीरप करावे. स्टेराईल बाटलीत स्क्वॅश भरून ठेवावा.   

संबंधित बातम्या