मँगो मॅजिक

उषा लोकरे
सोमवार, 10 मे 2021

फूड पॉइंट

आंब्याचे स्वर्गीय अमृतफळ असे वर्णन केले तरी वावगे ठरणार नाही. या अमृतफळापासून केलेले पदार्थही खासच होतात.

सांदण
साहित्य ः दोन वाट्या हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी खवलेले खोबरे, पाव वाटी तूप, दीड वाटी तांदळाचा रवा, वेलदोडा पूड, चिमूटभर सोडा.
कृत्री ः साजूक तुपावर रवा चांगला भाजून घ्यावा व गार करावा. हापूस आंब्याच्या रसात साखर, खोबरे, मीठ घालून मिश्रण मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. त्यात गार झालेला रवा भिजवावा व खायचा सोडा घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे. इडली पात्राला तुपाचा हात लावावा. त्यात एकेक चमचा वरील मिश्रण घालावे किंवा तूप लावलेल्या थाळीत घालावे. कुकरमध्ये वाफवावे व गार करून साजूक तुपाबरोबर सर्व्ह करावे.

केक
साहित्य ः एक वाटी हापूस आंब्याचा रस, १ वाटी बारीक रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साखर, अर्धा चमचा वेलदोडा पूड, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, सजावटीसाठी काजू तुकडे व बेदाणे.
कृत्री ः आंब्याचा रस, दही, साखर, रवा नीट एकत्र करून मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. एक-दोन तास झाकून ठेवावे. नंतर त्यात वेलदोडा पूड, मीठ घालून मिक्स करावे. सोडा घालून मिश्रण एकाच दिशेने चांगले फेटून घ्यावे. बेकिंग डिशला तुपाला हात फिरवून मिश्रण ओतावे. ओव्हनमध्ये ठेवून केक बेक करावा किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये ओतून मंद गॅसवर भाजावा.

मलई बर्फी
साहित्य ः एक लिटर घट्ट दूध, अर्धी वाटी साखर, थोडी पिठीसाखर, पाऊण वाटी हापूस आंब्याचा रस, १ चमचा कॉर्नफ्लोअर, दोन चमचे पाणी, अर्धा चमचा तुरटी, १ चमचा वेलदोडा पूड, किंचित केशरी रंग, बदाम काप.
कृती : दूध प्रथम उकळून घ्यावे व त्यातील साय काढून घ्यावी. दूध परत उकळून तुरटी घालून छाना करावा. छाना स्वच्छ धुऊन घ्यावा व पाणी निथळून काढावे. आंब्याचा रस व साखर एकत्र करून उकळावा. त्याचा घट्टसर गोळा करून त्यात छाना मिसळावा. मिश्रण ढवळत चांगले गरम करावे. गोळा होत आल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर मिसळावे. त्यात पिठीसाखर मिसळून मिश्रण घोटून घ्यावे व घट्टसर गोळा करावा, त्यात वेलदोडा पूड घालावी. थाळीत बटर पेपर घालून त्यावर वरील मिश्रण थापावे. वरून बदाम काप पेरावेत व वड्या कापाव्यात.

साटोरी
साहित्य ः एक वाटी आंब्याचा मावा, २ वाट्या खवा, २ वाट्या साखर, वेलदोडा पूड, साजूक तूप.
पारीसाठी ः दोन वाट्या बारीक चिरोटी रवा, १ वाटी मैदा, ४ चमचे तुपाचे मोहन, मीठ.
कृती : खवा प्रथम कोरड्या कढईत परतून घ्यावा. त्यात साखर व आंबा मावा मिसळून मिश्रण घट्ट कोरडे करावे. त्यात वेलदोडा पूड मिसळून मिश्रण गार करावे व चांगले मळून मऊसर गोळा करावा. रवा व मैदा चाळून एकत्र करावा. त्यात मीठ, कडकडीत मोहन मिसळून पाण्याने घट्ट पीठ भिजवावे. मळलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. साटोरी करण्याआधी आंबा मिश्रणाचा गोळा व पिठाचा गोळा चांगला मळून घ्यावा. पिठाच्या गोळीत दुप्पट आकारात आंब्याचे सारण घालावे व तांदळाच्या पिठावर जाडसर साटोरी लाटावी. निर्लेप तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप सोडून साटोरी खमंग भाजावी.

बर्फी
साहित्य ः दोन वाट्या आंब्याचा मावा (आटवलेला आमरस), २ वाट्या साखर, १ वाटी खवा, वेलदोडा पूड, पिठीसाखर, चारोळ्या.
कृती : आंब्याचा मावा मिक्सरमधून चांगला एकजीव करून घ्यावा. दोन वाट्या साखरेत अर्धी वाटी पाणी घालून गोळीबंद पाक करावा. त्यात आंबा माव्याचे मिश्रण घालून मिश्रण चांगले घोटावे. शेवटी पिठीसाखर घालून परत मिश्रण घोटून घ्यावे. त्यात वेलदोडा पूड मिसळावी. थाळ्याला तुपाचा हात फिरवून त्यात बर्फी थापावी. वरून चारोळ्यांनी सजवावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात.

खरवस
साहित्य ः एक वाटी खरवसाचा चीक, अर्धी वाटी आंब्याचा रस, १ कप दूध, पाऊण वाटी साखर, केशराच्या काड्या, वेलदोडा पूड.
कृत्री ः आंब्याचा रस मिक्सरमधून एकजीव करून काढावा. त्यात दूध, खरवसाचा चीक, साखर नीट मिसळावी. वेलदोडा पूड मिसळावी. कुकरमध्ये  शिट्टी न लावता मिश्रण २०-३० मिनिटे वाफवावे. खरवस नीट सेट झाल्यावर त्यावर केशराच्या काड्या पसराव्या. मिश्रण कोमट असताना वड्या कापाव्यात.

दहीवडा

साहित्य ः पाव किलो आंब्याचा रस, पाव किलो बेसन, २ लवंगा - २ वेलदोडे - २ मिरी याची कुटून मसाला पूड, कोथिंबीर, दही, साखर, मीठ, चिमूटभर सोडा, तेल.
कृत्री ः आंबा रस, बेसन एकत्र कालवून त्यात थोडी मसाला पूड घालावी. त्यातच थोडी कोथिंबीर व सोडा घालून घट्ट सरसरीत मिश्रण करावे. गरम तेलात वरील मिश्रणाचे छोटे छोटे वडे घालून खमंग तळावेत. तळलेले वडे पाण्यात घालून पिळावेत. दही घुसळून त्यात साखर, मीठ घालून उरलेला मसाला मिसळावा. त्यात वडे घालून मुरू द्यावेत. वरून कोथिंबीर पेरावी.

कुल्फी
साहित्य ः दोन लिटर म्हशीचे दूध, १ वाटी आंब्याचा मावा, ४ टेबलस्पून साखर, ४ टेबलस्पून क्रीम, २ टेबलस्पून खवा, केशरी रंग.
कृत्री ः दूध चांगले आटवून एक तृतीयांश (६०० मिली) करावे. आटत असतानाच साखर घालावी (खमंग कॅरॅमल फ्लेव्हरसाठी). हे मिश्रण गार करावे. आंब्याचा मावा, खवा, क्रीम एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव करावे. हे मिश्रण आटवलेल्या दुधाच्या मिश्रणात मिसळावे. त्यात केशरी रंग घालून अल्युमिनियम किंवा प्लॅस्टिक मोडमध्ये मिश्रण घालून रेफ्रिजरेट करावे. सेट झालेली कुल्फी मोल्डमधून काढून सर्व्ह करावी.

संबंधित बातम्या