रुचकर सुरणाचे काप व क्रंची भेंडी
फूड पॉइंट
रोजच्या जेवणात भाजी काय करायची हा प्रश्नच असतो. बऱ्याचदा भाजी करायचा कंटाळाही येतो. अशा वेळी एखादे रुचकर तोंडीलावणे मदतीला येते. एकदा करून ठेवले, की हे पदार्थ पुढचे काही दिवस सहज टिकतात. अशाच काही पदार्थांच्या चविष्ट रेसिपीज...
बटाट्याचे काप
साहित्य : एक मोठा बटाटा, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी रवा.
कृती : बटाट्याचे गोल मध्यम जाडसर काप करून घ्यावेत. त्यावर तुमच्या चवीप्रमाणे तिखटाचे प्रमाण ठरवून तिखट (एका मोठ्या बटाट्याचे साधारण ६-७ काप होतात, त्यासाठी एक चमचा तिखट पुरेसे असते.) हळद व चवीप्रमाणे मीठ घालून चांगले एकत्र करावे. एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ व रवा एकत्र करून घ्यावा. बटाट्याचे काप या पिठात घोळवून घ्यावे. नंतर गॅसवर तवा ठेवावा. तवा गरम झाल्यावर त्यात तेल घालावे. त्यात बटाट्याचे काप घालावे व मंद आचेवर दोन्ही बाजूने शिजवून घ्यावे. बटाट्याचे काप पूर्ण शिजले आहेत का पाहण्यासाठी काटेरी चमच्याने यांच्या मधोमध टोचून पहावे. गरमागरम काप वरण-भातबरोबर छान लागतात.
तिळकूट
साहित्य : एक वाटी काळे तीळ, १ चमचा तिखट, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, १० - १२ लसूण पाकळ्या.
कृती : काळे तीळ चांगले भाजून घ्यावे. किसलेले खोबरेही खरपूस भाजून घ्यावे. आता भाजलेले तीळ, खोबरे, तिखट, मीठ एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. झाले तिळकूट तयार. जेवताना तोंडी लावायला केव्हाही उत्तम.
गाजराची चटणी
साहित्य : एक-दोन गाजर, ३-४ लसूण पाकळ्या, १ चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, १ चमचा लिंबू रस.
फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग.
कृती : गाजर स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याचे साल काढून जाडसर किसून घ्यावे. गाजराच्या किसात लसूण, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. यामध्ये शक्यतो पाणी घालू नये. गरज असेल तर ४-५ चमचे एवढेच पाणी घालावे. तयार झालेली चटणी बोलमध्ये काढून घ्यावी. त्याला वरून हिंग-मोहरीची चरचरीत फोडणी द्यावी. यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला, तरी चटणीला छान चव येते. मात्र शेंगदाणा कूट ऐच्छिक आहे.
सुरणाचे काप
साहित्य : पाव किलो सुरण, २ चमचे तिखट, १ चमचा हळद, चवीपुरते मीठ, १ वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी रवा, ३-४ कोकम.
कृती : सुरणाचे मध्यम आकाराचे चौकोनी काप करून घ्यावेत. एका पातेल्यात गरम पाणी करून त्यामध्ये हे काप काही वेळ ठेवून द्यावेत. साधारण १० ते १५ मिनिटांनी काप पाण्यातून काढून घ्यावे. नंतर या कापांना कोकम चोळून घ्यावे किंवा कोकमचे पाणी करून ते कापांना लावून घ्यावे. त्यानंतर या कापांना तिखट, हळद, मीठ लावून घ्यावे. तांदूळ-रव्याचे पीठ एकत्र करून घ्यावे. आता तांदूळ-रव्याच्या पिठामध्ये हे काप घोळवून घ्यावेत. गरम तव्यावर थोडे तेल घालून काप मंद आचेवर शिजवून घ्यावेत. हे काप शिजवताना वरून झाकण ठेवले, तर वाफेवर काप लवकर शिजतात. झाले तयार रुचकर सुरणाचे काप!
कोथिंबीर वडी
साहित्य : एक जुडी कोथिंबीर, २ वाट्या बेसन पीठ, १ चमचा तीळ, लसूण-कोथिंबीर पेस्ट (यामध्ये ८-९ लसूण पाकळ्या, आले, १ वाटी कोथिंबीर, १ चमचा जिरे, २ मिरच्या), १ चमचा तिखट, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ.
कृती : कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये तयार कोथिंबीर पेस्ट, तीळ, तिखट (लसूण-कोथिंबीर पेस्टमध्ये मिरची असल्याने तिखटाचे प्रमाण कमी जास्त करावे) हळद आणि चवीपुरते मीठ घालून एकजीव करून घ्यावे. मिश्रणाला असलेल्या ओलसरपणामध्ये मावेल इतके बेसन पीठ घालून चांगले मळून घ्यावे. शक्यतो पाण्याचा वापर करू नये. पिठाचा लगदा तयार झाला, की हाताला थोडे तेल लावून लांबसर गोळे करून घ्यावेत. इडली पात्रात हे गोळे ठेवून १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे काप करून शॅलो फ्राय किंवा तळून घ्यावेत. ही वडी गरम आणि थंडही छान लागते.
कोथिंबीर-कोबी वडी
साहित्य : एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, कोथिंबीर-कोबी पेस्ट (यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी कोबी, ८-९ लसूण पाकळ्या, आले, २ मिरच्या, एक चमचा जिरे), २ चमचे तिखट, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ वाटी बेसन पीठ.
कृती : बारीक चिरलेली कोथिंबीर व कोबी एकत्र करून घ्यावा. त्यामध्ये कोथिंबीर-कोबी पेस्ट घालावी. त्यानंतर तिखट, हळद आणि चवीपुरते मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. मिश्रणात असलेल्या ओलसरपणामध्ये मावेल इतके बेसन पीठ घालून चांगले मळून घ्यावे. शक्यतो पाण्याचा वापर करू नये. पिठाचा लगदा तयार झाला, की हाताला थोडे तेल लावून त्याचे लांबसर गोळे करून घ्यावेत. इडली पात्रात हे गोळे ठेवून १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचे काप करून शॅलो फ्राय करावे किंवा तळून घ्यावे.
अळूवडी
साहित्य : मध्यम आकाराची ३-४ अळूची पाने, ३ चमचे तिखट, १ चमचा हळद, १ वाटी सुके खोबरे, अर्धा चमचा पांढरे तीळ, ६-७ लसूण पाकळ्या, आले, कोथिंबीर आणि कोकम पाणी.
कृती : अळूची पाने स्वच्छ धुऊन त्यांची देठे कापून टाकावीत. अळूच्या पानाला कोकम पाणी लावून ठेवावे. सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे. त्यामध्येच लसूण पाकळ्या, आले, कोथिंबीर, जिरे टाकावे व हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. बेसन पिठामध्ये हे मिश्रण घालून पांढरे तीळ, लाल तिखट, हळद, मीठ घालून हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. तयार केलेले मिश्रण अळूच्या पानाला मागच्या बाजूस व्यवस्थित लावून घ्यावे. पहिल्या पानावर मिश्रण लावून झाले, की त्यावर दुसरे पान ठेवावे. त्यालाही हे मिश्रण लावून घ्यावे. असेच तिसरे पानही लावून घ्यावे. आता एकावर एक ठेवलेल्या या पानांचा व्यवस्थित रोल करावा. रोल करत असतानाही त्याला पीठ लावून घ्यावे. तयार झालेला रोल इडली पात्रात ठेवून वाफेवर शिजवून घ्यावा. १५ मिनिटांत अळूवडी शिजते. वडी थंड झाल्यावर त्याचे बारीक काप करून शॅलो फ्राय करून घ्यावेत. झाली अळूवडी तयार!
क्रंची भेंडी
साहित्य : दहा-पंधरा भेंड्या, २ चमचे तिखट, १ चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, आवश्यकतेनुसार बेसन पीठ, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ.
कृती : भेंडी स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी. भेंडीचे देठ कापून पातळ उभे काप करावेत. एका छोट्या वाटीत बेसन पीठ, तिखट, हळद, जिरेपूड आणि चवीपुरते मीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका प्लेटमध्ये घेऊन त्याला आले-लसूण पेस्ट लावून घ्यावी. त्यात बेसन पिठाचे मिश्रण घालून हाताने मिक्स करावे. मिश्रण एकजीव करण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करू नये. त्याने भेंडीला कुरकुरीतपणा येत नाही. आता कढईत तेल गरम करावे. मिश्रणात एकजीव झालेले भेंडीचे पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मध्यम आचेवर भेंडीचे काप कुरकुरीत होईपर्यंत तळावेत. ही क्रंची भेंडी स्टार्टर म्हणून छान लागते.
नारळाची चटणी
साहित्य : दोन वाट्या ओल्या नारळाचा खोवलेला कीस, ४-५ मिरच्या, ५-७ लसूण पाकळ्या, आले, चवी पुरते मीठ, चिमूटभर साखर (ऐच्छिक), २ चमचे फुटाणे, कोथिंबीर.
फोडणीसाठी : तेल, १ चमचा मोहरी, ५-७ कढीपत्ता पाने, अर्धा चमचा धने.
कृती : खोवलेला कीस, मिरच्या, लसूण पाकळ्या, आले, मीठ, फुटाणे, साखर, कोथिंबीर हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करावे. गरम तेलात मोहरी, कढीपत्ता, धने टाकावे. मोहरी चांगली तडतडली, की त्यामध्ये वाटलेले मिश्रण घालावे. इडली, घावन याबरोबर ही चटणी छान लागते.