चटकदार चमचमीत...

वैशाली खाडिलकर, मुंबई
गुरुवार, 15 मार्च 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

रगडा चिले 
साहित्य ः रगड्यासाठी - भिजवलेले सुके हिरवे हरभरे (कडधान्य) अथवा सोललेले हिरवे ओले हरभरे १ वाटी, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कांदा टोमॅटो बारीक चिरलेला, चना मसाला, मीठ, हळद, तेल, जिरे किंचित गूळ अथवा साखर, कोथिंबीर, शेव व कच्चा कांदा बारीक चिरलेला
चिल्यांकरिता : होल व्हीट आटा १ वाटी, ज्वारी आटा १ वाटी, रवा पाव वाटी, मीठ, टोमॅटो प्युरी २ चमचे, तिखट आवडीनुसार
कृती : रगडा : पॅनमध्ये तेल घालावे. जिरे घालावे. हळद पावडर घालावी. आले - लसूण पेस्ट घालावी. कांदा टोमॅटो कांदा घालावा व परतावे. मग त्यात चना मसाला, मीठ, साखर घालावी. हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. नंतर ते बत्त्याने ठेचावे. म्हणजे चावण्यास सोपे पडते व पचनालाही योग्य होते. पाण्यासकट हे हरभरे पॅनमधील ग्रेव्हीमध्ये घालावे. हा रगडा तयार झाला.
चिले : वरील सर्व साहित्य मोठ्या बाऊलमध्ये घेऊन पाणी घालून अर्धा तास भिजवावे. तवा गरम करावा व छोटे चिले धिरड्यांसारखे घालावे व बाजूने तेल सोडावे. दोन्ही बाजूनी खमंग होऊ द्यावे.
सर्व्ह करताना पसरट बाऊलमध्ये प्रथम रगडा घालावा. त्यावर शेव, कांदा व कोथिंबीर घालावी व छोटे चिले आत सोडावे. ते रगड्यात मुरल्यावर छान चव येते.
टीप : इथे हरभरे वापरावे कारण त्यात आंब हा घटक आहे तो पोटाच्या तक्रारी दूर करतो. पित्तशामक आहे. पोटभरू व शक्तिदायक आहे त्यामुळे कष्टकरी लोकांनी याचा अवश्‍य वापर करावा.

क्रिमी छोले पोहे
साहित्य ः पोहे २ वाट्या, नारळ चव १ वाटी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले कीस, मीठ, साखर, बारीक चिरलेला कांदा, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, बडीशेप, हिंग, हळद, कढीपत्ता.
कृती : पॅनमध्ये पातळ पोहे घ्यावेत. त्यात नारळ चव व आले कीस घालून दडपून ठेवावेत. नेहमीप्रमाणे फोडणी करावी व वरील पोह्यांवर १ तासाने घालावी. वाढलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, कांदा व कोथिंबीर घालावी.
छोले साहित्य ः काबुली चणे १ वाटी, जिरे, मिरे, दालचिनी मसाला वेलची, लसूण, आले, सुक्‍या लाल मिरच्या, खायचा सोडा, अनारदाणे, तूप, तमालपत्र, मीठ
कृती : रात्री पाण्यात सोडा घालून काबुली चणे भिजत घालावे. सकाळी प्रेशर कुकरमध्ये पाण्यासकट हे चणे मीठ व तमालपत्र घालून ४ शिट्या आणून शिजवावेत. नंतर जिरे, मिरे दालचिनी वेलची किंचित शेकावे व पूड करावी. आले, लसूण, लाल मिरच्या व ही पूड यांचा पाणी घालून गोळा तयार करावा. पॅनमध्ये तूप घालावे व हा गोळा तुपात बाजूने सुटेपर्यंत खमंग परतणे. त्यात शिजलेले चणे व अनारदाणे घालावेत. आवश्‍यकतेनुसार मीठ घालावे व वाफ आणावी. अंगाबरोबर रस ठेवावे. एकदम सुके ठेवू नयेत.
    सर्व्हिग बाऊलमध्ये प्रथम पोहे घालावेत व त्यावर छोले घालावेत सायीसकट फेटलेले दही घालावे व हलके ढवळावे. शेवटी चमच्याने तयार दह्याचे गोलाकार डिझाईन करावे.
हा पदार्थ शोभिवंत दिसतो व पौष्टिकतेच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे. चविष्ट लागतो, मार्केटमध्ये उपलब्ध असलेले लाल पोहे वापरल्यास लज्जत वाढेल.

पेढा पोळी 
साहित्य ः कंदी पेढे ६, बेसन ३ चमचे, खसखस ३ चमचे, वेलची पूड, रवा व कणीक १ वाटी, तेल, तूप, मीठ, तांदळाचे पीठ
कृती : सारण : पॅनमध्ये तूप घालावे व बेसन आणि खसखस क्रमाक्रमाने खमंग भाजावे. कंदी पेठे कुस्करावे व त्यात घालावे. वेलची पूड घालावी व मिश्रण थंड होऊ द्यावे.
पारीसाठी : परातीत रवा व कणीक घ्यावी. किंचित मीठ घालावे. तेल घालावे व जरुरीप्रमाणे पाणी घालून कणीक मळावी. तेलाचा हात घेऊन तिंबावे. कणकेचा मऊसूत गोळा तयार करावा. अर्धा तास मलमलच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवावा. नंतर या कणकेच्या दोन गोळ्या कराव्यात. मधे काठोकाठ सारण भरावे. पोळपाटावर तांदळाची पिठी घालावी व पोळी लाटावी. नॉनस्टिक तव्यावर तूप घालावे व पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजावी.
टीप : पेठे शक्‍यतो १ ते २ दिवस खावे. फ्रीजमध्ये ठेवू नयेत. उरलेल्या पेढ्यांचा असा उपयोग करावा. ही पेढा पोळी खमंग लागते व जास्त खटपट न करता पटकन होते. सोबत कैरी लोणचे अथवा फोडणीची मिरची द्यावी, जास्तच लज्जत येईल.

कथल सॅलड 
साहित्य ः पिकलेल्या कथल (फणसाचे) गरे, हिरवी सिमला मिरचीचे तुकडे वाफवलेले अंकुरत मूग, हिरवे चणे, मोड आलेली मेथी, उकडलेले स्वीटकॉर्न, ताजे फेटलेले दही अथवा चक्का, मीठ, मिरपूड, लिंबूरस, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, ऑलिव्ह ऑइल, 
सजावटीसाठी : कोथिंबीर, कोबी पाने
कृती : पिकलेल्या फणसासेच गरे पातळ चिरावेत. बाकी सर्व जिन्नस घालून छान मिक्‍स करावे. दही अथवा चक्का घालावा,. चांगले कालवावे. बाकीचे मीठ इ. पदार्थ घालून पुन्हा सर्व एकजीव करावे. एका बाऊलमध्ये कोबीची धुतलेली हिरवीगार पाने व्यवस्थित लावावी व त्यामध्ये वरील मिश्रण घालावे. वरून कोथिंबीर पेरावी.
टीप : हे आगळे-वेगळे सॅलड जीवनसत्वानी युक्त तर आहेच पण फार चवदारही लागते.

शुगरकेन ड्रिंक
साहित्य व कृती ः एका उभट ग्लासमध्ये उसाचा ताजा रस अर्ध्यापर्यंत घालावा. त्यात आळ्याचा रस १ चमचा, गूळ पावडर २ चमचे, खडीसाखर (बारीक तुकडे) २ चमचे, मिरपूड काळे मीठ स्वादाकरता घालावे. ढवळत राहावे. शेवटी काळ्या द्राक्षांनी सजवावे.

फ्रूट ड्रिंक 
साहित्य व कृती ः पेरूच्या बिया काढाव्या व गर मिक्‍सरवर फिरवून घ्याव्यात. डाळिंबाचे दाणे हे त्यातच घालावे व प्युरी तयार करावी. ग्लासमध्ये ही प्युरी ओतावी. त्यात भाजलेल्या जिरे व मिरे याची पूड घालावी. सैंधव मीठ, ज्येष्ठमध पावडर घालावी व ढवळावे. शेवटी काळ्या अथवा हिरव्या ऑलिव्ह फळांनी सजवावे. वरील दोन्ही ड्रिंक करून झाल्यावर लगेच प्यावीत. नाहीतर त्यातल्या जिनसांचे पौष्टिक गुणधर्म नाहीसे होतात. वृद्धांसाठी आजारी व्यक्तींसाठी अवश्‍य द्यावे. शक्तिवर्धक व आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या