घरगुती 'स्पा-फूड'च्या रेसिपीज 

वैशाली खाडिलकर, मुंबई
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

फूड पॉइंट
सध्या तरुणांमध्ये स्पा-फूडचे प्रस्थ आहे. स्पा म्हटल्यावर स्टीम, मसाज, स्विमिंग, जिम आणि आराम... त्यासाठी बडेबडे रिसॉर्ट, हॉटेल्स, फार्म हाउस येथे मनसोक्त मजा करून तेथील महागडे स्पा-फूडही आनंदाने खाल्ले जाते... यातून नवीन ऊर्जा तर मिळते, पण भरपूर पैसेही खर्च होतात... त्यामुळे आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्यांसाठी घरीही करता येतील अशा काही खास रेसिपीज...  

स्टील-कट ओट्स पॉरिज 
साहित्य :  एक वाटी स्टील-कट ओट्‌स, १ वाटी आंबट ताक, २ वाटी पाणी, मीठ स्वादानुसार, चिमटी हळद. 
टॉपिंगसाठी : पाव वाटी वाफवलेले ताजे मटार व मका दाणे प्रत्येकी, १ वाटी बारीक चिरलेली मेथी व पालक पाने, १ टीस्पून हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून मिरपूड, अर्धा टीस्पून मिक्‍स हर्ब्स, १ टीस्पून चिली फ्लेक्‍स, पाव टीस्पून जिरे, पुदिना पावडर, मीठ, १ वाटी टोमॅटो प्युरी, १ टीस्पून तूप, सजावटीसाठी कोथिंबीर पाने. 
कृती : स्टील प्रेशर कुकरमधे ओट्‌स, हळद, पाणी, पीठ, ताक घालून ३-४ शिट्ट्या घेऊन गरगट शिजवावे. गॅसवर पॅनमध्ये तूप घालावे. जिरे घालावे. पेस्ट परतावी. मग मटार, मका दाणे व मेथी-पालक पाने मिनिटभर परतावे. टोमॅटो प्युरी, मिरपूड, पुदिना पावडर, मिक्‍स हर्ब्स पावडर इत्यादी घालावे. चवीनुसार मीठ घालावे, ढवळावे व गॅस बंद करावा. सर्व्हिंग प्लेटमध्ये ओट्‌स काढावेत. त्यावर हे भाज्यांचे मिश्रण घालावे व कोथिंबिरीने सजवावे.

सनशाईन सूप  
साहित्य : पाव वाटी सोनामसुरी तांदूळ, पाव वाटी मसूरडाळ, १ टीस्पून लोणी, जिरे, कांदा, ४ लसूण पाकळ्या, १ लवंग, तमालपत्र, दालचिनी तुकडा, गाजराचे तुकडे, अर्धी वाटी ब्रोकोली, २ लाल टोमॅटो, २ सेलरी दांडे, कोथिंबीर दांडे, १ वाटी ताक, २ वाटी व्हेजीटेबल स्टॉक, पाव टीस्पून मिरपूड, हळद, पेपरिका, धनाजिरा पावडर प्रत्येकी सूर्यफूल व भोपळ्याच्या भाजलेल्या बिया, चिली फ्लेक्‍स, फ्रेश क्रीम, स्वादानुसार मीठ. 
कृती : तांदूळ व मसूरडाळ स्वच्छ धुवावी व स्टीलच्या टोपात अर्धा तास भिजवावी. चाळणीत निथळत ठेवावी. स्टीलच्या प्रेशर कुकरमध्ये लोणी घालावे. जिरे व बारीक चिरलेला कांदा टाकून तांबूस रंगावर परतावा. लसूण पाकळ्या, लवंग, तमालपत्र, दालचिनी तुकडा परतावा. २ मिनिटे डाळ व तांदूळ परतावे. मग गाजराचे तुकडे, ब्रोकोली, बारीक चिरलेले टोमॅटो, सेलरी दांडे, कोथिंबीर दांडे घालावे व ढवळावे. नंतर व्हेजीटेबल स्टॉक घालावा. मिरपूड, हळद, पेपरिका, धना-जिरा पावडर, मीठ हे सर्व घालावे व ३ शिट्ट्या घेऊन शिजवावे. झाकण उघडावे व त्यात आंबट ताक घालावे. भाजलेल्या सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया व चिली फ्लेक्‍स घालावे. ईमरशन ब्लेंडरने सर्व एकजीव करावे. मऊसर व्हायला हवे. पुन्हा मिनिटभर उकळावे. तयार सूप सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे. कोथिंबीर पानाने सजवावे. वरून फ्रेश क्रीम घालावे.

चविष्ट रोल्स 
साहित्य : एक वाटी नाचणी पीठ, १ वाटी ज्वारी लाह्या पीठ, २ टेबलस्पून च्यवनप्राश व गुलकंद प्रत्येकी, पाव वाटी खारीक, अक्रोड, बदाम, काजू या ड्रायफ्रुट्‌सची पावडर, २ टीस्पून सुंठ पावडर, १ टीस्पून शतावरी पावडर, ६ टीस्पून गूळ पावडर (ऑरगॅनिक), १ टीस्पून खसखस (भाजलेली), पाव वाटी भाजलेले तीळ, १ टीस्पून भाजलेली बडीशेप पावडर, १ वाटी खजूर (बिया काढलेला), अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, पाव वाटी भाजलेले ओट्स, पाव वाटी साजूक तूप. 
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालावे. दोन्ही िपठे मंद आचेवर भाजून परातीत काढावीत. गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्यात च्यवनप्राश, गुलकंद, ड्रायफ्रुट्सची पावडर, सुंठ, शतावरी, बडीशेप, वेलची, जायफळ पावडर घालून कालवावे. मिक्‍सरवर खजुराची पेस्ट करावी. ती त्यात घालावी. गरजेप्रमाणे कमीजास्त गूळ पावडर घालावी. चाखून बघावे. या मिश्रणाचे समान आकाराचे लंबगोलाकार रोल करावेत. स्टीलच्या थाळीत भाजलेल्या ओट्स‌चा चुरा ठेवावा. त्यात भाजलेली खसखस, तीळ घालावे. तयार रोल यात घोळवावे व प्लेटमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ठेवावेत. २-३ तासांनी खुटखुटीत झाले, की हवाबंद डब्यात भरावेत. दुधाबरोबर रोज एक खावे. पौष्टिक नाश्‍ता होईल.

थरमॉस रेडी स्मूदी 
साहित्य : एक कप हापूस आंब्याच्या फोडी, अर्धा कप बरक्‍या फणसाचे गरे, अर्धा कप अननसाच्या फोडी, १ कप गाईचे दूध, अर्धा कप साय, १ चमचा मध, १ चमचा भाजलेले अक्रोडाचे तुकडे व सूर्यफूल बिया प्रत्येकी, १ चमचा मिल्क पावडर, व्हॅनिला बिन बारीक तुकडा. 
कृती : आंबा, फणस व अननसाचे तुकडे व दूध एकत्र करून मिक्सरमध्ये प्युरी करावी. क्रिमी मिश्रण तयार करावे. साय घालावी व पुन्हा मिक्‍सरमध्ये फिरवावे. हे मिश्रण बाऊलमध्ये काढावे व त्यात उरलेले जिन्नस घालावेत व हॅंड ब्लेंडरने ढवळावे. तयार स्मूदी, फ्रिजमध्ये ठेवावी. नंतर थरमासमध्ये काढावी. लागेल त्याप्रमाणे ग्लासमध्ये काढावी व परत थरमॉस फ्रीजमध्ये ठेवावा. 

चिली-चटका पुडिंग 
साहित्य : एक कप व्होल व्हीट आटा, १ कप भाजलेली पावडर, १ कप ब्राउन शुगर, २ पिकलेल्या केळ्याचा लगदा, पाव कप कोको पावडर, पाव कप वितळलेले डार्क चॉकलेट, २ टीस्पून बटर, १ लाल सिमला मिरचीचे बारीक तुकडे, १ टीस्पून काश्‍मिरी लाल मिरची पावडर, चिमटी बेकिंग पावडर, पिठी साखर व चिली फ्लेक्‍स सजावटीसाठी. 
कृती : काचेच्या बाऊलमध्ये आटा व कोको पावडर चाळून घ्यावी. त्यात साखर, बटर, केळीचा लगदा, मिरचीचे तुकडे व मिरची पावडर, डार्क चॉकलेट घालून हॅंड ब्लेंडरने एकजीव करावे. मिश्रणात शेवटी चिमटी बेकिंग पावडर घालावी व मिश्रण चांगले फेटावे. बेकिंग डिशला बटर लावावे. त्यात हे मिश्रण ओतावे. १८० अंश सेल्सिअसवर २० मिनिटे ठेवावे. नंतर थंड होऊ द्यावे. प्लेटमध्ये तयार पुडींग काढावे. कटरने समान आकाराच्या वड्या कापाव्यात. पिठीसाखर व चिली फ्लेक्‍स पेरावेत. लगेच सर्व्ह करावे.

बदाम-क्रॅनबेरी पोहे 
साहित्य : पाव किलो पोहे, ५० ग्रॅम बदामाचे तुकडे, ५० ग्रॅम कॅनब्रेरी (रातांबे).  
फोडणीसाठी ः दोन टेबलस्पून तेल, १ टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता पाने, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ वाटी कांदा (बारीक चिरलेला), कोथिंबीर बारीक चिरलेली, ओला नारळ चव. 
कृती : जाडे पोहे चाळणीत चाळून घ्यावे व वाहत्या पाण्यात धुवावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. अर्धे २५ ग्रॅम बदाम पाण्यात भिजवावे. नंतर त्याचे लांबडे काप करावेत. २५ ग्रॅम बदाम नुसते भाजावेत. गॅसवर नॉनस्टिक कढईत तेल तापवावे. राई, जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे यांची खमंग फोडणी करावी. कांदा गुलाबीसर परतावा. आता पोहे व बदाम घालून ढवळावे. मंद आचेवर वाफवावे. त्यात मीठ घालावे. नंतर क्रॅनबेरीज घालाव्यात. मिनिटभर हालवावे. चाखून बघावे. नंतर गॅस बंद करावा. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे. कोथिंबीर पानांनी सजवावे व ओला नारळ चव घालावा. लगेच खायला द्यावे. 

पौष्टिक टोमॅटो ऑम्लेट 
साहित्य : अर्धा कप नाचणीचे पीठ, पाव कप भाजलेले ओट्‌स, पाव कप रवा, अर्धा कप टोमॅटो प्युरी, १ कप आंबट ताक, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ टीस्पून रेड चिली पेस्ट, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, चिमटी हळद, तेल, गरजेनुसार पाणी, १ टेबलस्पून हिरवी कांदा पात बारीक चिरलेली. 
कृती : स्टीलच्या वाडग्यात पीठ, ओट्‌स, रवा एकत्र करावा. टोमॅटो प्युरी, आंबट ताक आणि पाणी घालून मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर त्यात इतर जिन्नस घालून जाडसर मिश्रण करावे. नॉनस्टिक तव्यावर ब्रशने तेल लावावे व डावभर मिश्रण ओतावे. दोन्ही बाजूंनी खमंग भाजावे. झाले चविष्ट ऑम्लेट तयार. असे बाकीचे करावेत. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावेत व शेजवान सॉसबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर खायला द्यावेत. 

पंचखाद्य मफिन्स 
साहित्य : अर्धी वाटी कॉर्न, ज्वारी लाह्या, साळीच्या लाह्या, पोहे प्रत्येकी, १ वाटी सायीसगटचे दही, कांदा बारीक कापलेला, पाव टीस्पून मिरपूड, १ टीस्पून चिली फ्लेक्‍स, ४ हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, १ वाटी किसलेले चीज, अर्धा टीस्पून लेमन इनो सॉल्ट, १ टेबलस्पून काजू, बदाम पेस्ट, १ टीस्पून पेरी पेरी मसाला, तेल गरजेनुसार, टोमॅटो केचप आवडीप्रमाणे. 
कृती : एका काचेच्या बाऊलमध्ये सर्व लाह्या, कॉर्न एकत्र कालवावे. फूड प्रोसेसरमध्ये वाटावे व बाऊलमध्ये काढावे. नंतर त्यात इतर जिन्नस घालावेत. मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे. शेवटी इनो सॉल्ट घालावे. गॅसवर इडली कुकरमध्ये रिंग ठेवावी. त्यावर चाळणी ठेवावी. रिंग बुडेल एवढे पाणी घालावे. मंद आच ठेवावी. ४ सिलिकॉन मोल्डला आतून ब्रशने तेल लावावे. यात वरील मिश्रण (साधारण पाऊण भागापर्यंत) ओतावे. तयार मोल्ड चाळणीवर ठेवावे. झाकण बंद करावे. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. १० मिनिटांनी चाळणी बाहेर काढावी. मोल्डमधून मफीन्स बाहेर काढावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावेत. प्रत्येकावर टोमॅटो केचप घालावे. सोबत आवडीचा सॉस, सालसा, चटणी द्यावी. जास्त छान रुची येईल

मेक्‍सिकन मुठिया 
साहित्य : दोन वाटी एका काचेच्या बाऊलमध्ये गहू आटा, १ वाटी ताजी पाव मेथीची पाने स्वच्छ धुतलेली, २ टेबलस्पून बेसन, पाव वाटी ओट्स, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून हळद, हिंग, ओवा, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ टेबलस्पून लिंबूरस, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तीळ, (अर्धी वाटी शिजवून मॅश केलेला भात मिश्रण मिळून येण्यासाठी), १ टीस्पून पेरी पेरी मसाला, १ टीस्पून टॅको सिझनींग, पाव वाटी वाफवलेले मका दाणे, १ टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ. 
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करावे. गरजेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा करावा. १० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर याचे लिंबाएवढे लंबगोलाकार मुठिया तयार करावे. स्टीलच्या प्रेशर कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यात मुठिया ठेवावे व वाफवून घ्यावे. (साधारण 15 मिनिटे. नंतर प्लेटमध्ये काढावेत. तडका पॅनमध्ये तेल तापवावे. राई, जिरे, हिंग, तीळ व कढीपत्ता पाने घालून खमंग फोडणी करावी व मुठियांवर घालावी. मिक्‍सर जारमध्ये ४ लाल टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर (दांड्यासगट चिरलेली), मीठ स्वादानुसार, पेरी पेरी मसाला व ड्राय हर्ब्स पावडर प्रत्येकी अर्धा टीस्पून, ४ लसूण कळ्या, ४ मिरे यांचे वाटण करावे. नंतर गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल तापवावे व त्यात वाटण घालावे. चांगले उकळावे. मंद आचेवर १० मिनिटे सारखे ढवळावे व शिजवावे. मिश्रण घट्टसर व्हायला हवे. झाला चविष्ट सालसा तयार. आता सर्व्हिंग बोलमध्ये (लंबवर्तुळाकार, ओव्हल शेपचा) सालसा ओतावा. त्यावर तयार मुठिया मांडावेत. किसलेले चीझ वर घालावे व लगेच सर्व्ह करावे. अशा रीतीने पालक पाने, दुधी किंवा कोबी कीस घालूनही मुठिया करता येतील.

संबंधित बातम्या