झटपट पदार्थ

वैशाली खाडीलकर
सोमवार, 29 मार्च 2021

फूडपॉइंट

घाईच्या वेळी हाताशी तयार असलेले पदार्थ पटकन स्वयंपाकात वापरता येतात. साठवून ठेवता येतील आणि वेळप्रसंगी स्वयंपाकात वापरता येतील असे काही पदार्थ... 

पौष्टिक सातू पीठ 

साहित्य ः चार वाट्या गहू, २ वाट्या पंढरपुरी डाळ, २ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून वेलची-जायफळ पूड. 
कृती : गॅसवर कढईत मंद आचेवर चार वाट्या गहू खमंग भाजावेत. नंतर दोन वाट्या पंढरपुरी डाळ जराशी भाजावी. दोन्ही एकत्र करून त्यात दोन टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून वेलची-जायफळ पूड घालावी. हे मिश्रण घरघंटीवर दळावे किंवा गिरणीतून दळून आणावे. तयार पौष्टिक सातू पीठ हवाबंद डब्यात भरून ठेवावे, बरेच दिवस टिकते. या पिठात तिखट-मीठ, हळद, मेथी दाणे, रवा व जरुरीप्रमाणे पाणी घालून पातळसर पीठ भिजवून त्याची धिरडी करावीत. या पिठाची थालीपिठे, पराठे, वडे व पुऱ्याही करता येतात.  लाडू करण्यासाठी अर्धी वाटी तूप फेटून घ्यावे व त्यात हे पीठ, ड्रायफ्रूट पावडर व पिठी साखर घालून लाडू वळावेत.

सन-ड्राईड टोमॅटो
साहित्य ः सहा लाल टोमॅटो, ६ टीस्पून ऑलिव्ह ऑईल, मीठ. 
कृती ः सहा लाल टोमॅटोंच्या लहान फोडी करून बाऊलमध्ये घ्याव्यात. त्यावर सहा टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि अंदाजानुसार मीठ घालून एकजीव करावे. टोमॅटो एका ताटात ठेवून कडक उन्हात चार दिवस वाळवावेत. पूर्ण वाळल्यानंतर हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावेत. पिझ्झावर टॉपिंगसाठी, सॅंडविच आणि डोसा स्टफिंगसाठी किंवा आमटी-भाजीत हे सन-ड्राईड टोमॅटो वापरता येतात.

झटपट सुकी चटणी 

साहित्य : दोन वाट्या शेंगदाणे, पाव वाटी तीळ, १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, २ लाल सुक्या मिरच्या, १५-२० कढीपत्ता पाने, ५-६ लसूण पाकळ्या, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ व साखर. 
कृती : गॅसवर कॉपर बॉटम स्टील कढईत प्रथम दोन वाट्या शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजावेत व ताटलीमध्ये काढावेत. त्याचप्रमाणे पाव वाटी तीळ व एक वाटी सुके खोबरे कीस भाजून ताटलीत काढावा. दोन सुक्या लाल मिरच्या व पंधरा-वीस कढीपत्ता पाने भाजावीत. हे सर्व पदार्थ मिक्सर जारमध्ये घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, पाच-सहा लसूण पाकळ्या आणि आमचूर पावडर घालावी व सुकी चटणी करावी. ही चटणी हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास महिनाभर टिकते. घावन, पराठे व पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी उपयोगी पडेल. 

बहुरूपी पुऱ्या

साहित्य  ः एक कप ज्वारी पीठ, पाव कप बारीक रवा, १ टीस्पून साखर, १ टीस्पून चिली फ्लेक्स, १ टीस्पून पिझ्झा सिझनिंग, २ टेबलस्पून वाफवलेल्या मका दाण्यांची भरड, २ टेबलस्पून किसलेले पनीर, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, १ टीस्पून चाट मसाला, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, आवश्‍यकतेनुसार पाणी. 
कृती : एका काचेच्या बाऊलमध्ये ज्वारी पीठ, बारीक रवा, साखर, चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग, वाफवलेल्या मका दाण्यांची भरड, किसलेले पनीर, मिरी पूड, चाट मसाला, हळद, मीठ घालून पुऱ्यांसाठी पीठ मळावे व पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. पिठाचे छोटे गोळे घेऊन नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटाव्यात व त्यावर टोचे मारावेत. गॅसवर स्टील कढईत तेल तापवून मंद आचेवर पुऱ्या तळाव्यात आणि प्लेटमध्ये पेपर नॅपकिनवर काढाव्यात. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात, आठवडाभर टिकतात. 
टीप : बाजरी, नाचणी अशी वेगवेगळी पिठे व वेगवेगळे मसाले (पावभाजी, गरम, कांदा लसूण, किचन किंग, सब्जी मसाला) वापरूनही नावीन्यपूर्ण पुऱ्या करता येतील. 

ओनियन टी
साहित्य ः दोन कप पाणी, १ बारीक चिरलेला कांदा, १ तमालपत्र, ३ लवंगा, १ तुकडा दालचिनी, चिमूटभर सुंठ पूड, मध किंवा गूळ पावडर. 
कृती  ः गॅसवर नॉन-स्टिक कढईत दोन कप पाणी उकळत ठेवावे. त्यात बारीक चिरलेला एक कांदा, एक तमालपत्र, तीन लवंगा, एक दालचिनी तुकडा व चिमूटभर सुंठ पूड घालावी. पाण्याला तपकिरी रंग आला की गॅस बंद करावा. चहा गाळून कपात घ्यावा व आवडीप्रमाणे त्यात मध किंवा गूळ पावडर घालून प्यायला द्यावा.

नारळाचे पीठ 

साहित्य ः एका ओल्या नारळाचा चव. 
कृती ः एका ओल्या नारळाचा चव (फक्त पांढरा), गॅसवर नॉन-स्टिक पॅनमध्ये किंवा ओव्हनमध्ये भाजून 
कोरडा करावा. त्यात पाण्याचा अंश राहता कामा नये. नंतर याचे घरघंटीवर, मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमध्ये चांगले दळून पीठ करावे. याचा उपयोग लाडवामध्ये, खिरीमध्ये किंवा शिऱ्यामध्ये करू शकतो.

पीनट बटर
साहित्य  ः दोन कप भाजलेले शेंगदाणे, ४ टेबलस्पून खोबरेल तेल. 
कृती  ः दोन कप भाजलेले शेंगदाणे मिक्सर जारमध्ये घ्यावे. मधे मधे चार टेबलस्पून खोबरेल तेल घालत त्याची मऊसर पेस्ट करावी. तयार पीनट बटर हवाबंद काचेच्या बरणीत भरावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. पंधरा दिवस तरी चांगले टिकते. सॅंडविचसाठी किंवा पराठ्यावर याचा उपयोग करावा. बाहेरच्या बटरपेक्षा हा घरगुती पर्याय चांगला आहे.

वाळवलेल्या भाज्या 

  •  गवारी, डिंगरी, फरसबी व चवळीच्या शेंगा चाळणीत घालून नळाखाली वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात. 
  • गॅसवर कढईत पाणी व मीठ घालून उकळावे. त्यात या शेंगा फक्त दोन मिनिटे ठेवाव्यात. नंतर चाळणीत निथळत ठेवाव्यात. थाळीत कापडावर ठेवून चार दिवस कडक उन्हात वाळवाव्यात. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात व जरुरीप्रमाणे वापराव्यात. या शेंगा तळून घेऊन नेहमीप्रमाणे चमचमीत भाजी करावी. 
  • वांगी, भेंडी, तोंडली स्वच्छ धुऊन त्यांच्या फोडी कराव्यात व टोपात घ्याव्यात. अंदाजे हळद व मीठ घालून वरीलप्रमाणे वाळवाव्यात. पूर्ण सुकल्यावर नेहमीप्रमाणे कुरकुरीत काचऱ्यांची भाजी करावी. 
  • शेवग्याचा पाला, हरभऱ्याचा पाला, कुठल्याही पालेभाजीची पाने, कढीलिंब व पुदिना पाने स्वच्छ धुऊन, कोरडी करून वरीलप्रमाणे उन्हात वाळवावीत. कोथिंबीर, कढीलिंब वाळवून त्यांची पूड करून ठेवावी. मेथीचा पाला सुकवून कसुरी मेथी करावी. आयत्या वेळी केव्हाही या पालेभाज्यांच्या पानांची परतून कुरकुरीत भाजी करावी.

संबंधित बातम्या