पंचरत्न पुलाव, बिस्कीट केक

वैशाली खाडिलकर
सोमवार, 7 जून 2021

फूड पॉइंट

इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून करता येतील आणि जेवणातही एक वेगळा हटके पदार्थ करता येईल, अशा काही पदार्थांच्या रेसिपीज... 

उत्साहवर्धक पेय

साहित्य : दोन कप पाणी, १ तुकडा दालचिनी, १ लहान आल्याचा तुकडा, २ लवंग, २ वेलची, ४ सुकलेली तुळशीची पाने, २ पुदिना पाने, गूळ पावडर, बडीशेप पावडर.
कृती : गॅसवर नॉन-स्टिक पॅनमध्ये दोन कप पाणी उकळत ठेवावे. त्यात १ दालचिनी तुकडा, १ लहान आले तुकडा, लवंग-वेलची प्रत्येकी २, ४ सुकलेली तुळस पाने व २ पुदिना पाने घालावीत. मिश्रण दाट होत आले की त्यात आवडीप्रमाणे गूळ पावडर व बडीशेप पावडर घालावी. मिनिटभराने गॅस बंद करावा. हा तयार अर्क गाळून काचेच्या हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा. आयत्या वेळी १ कप मोसंब, संत्र, सफरचंद किंवा आवडीच्या फळाचा रस, २ टेबलस्पून लिंबू रस व वरील अर्क पाव कप हे ग्लासमध्ये घेऊन हँड ग्राइंडरने एकजीव करावे व बर्फाचे खडे घालून सर्व्ह करावे.

बिस्कीट केक

साहित्य : प्रत्येकी १० जिंजर व मारी बिस्किटे, ४ आंब्याच्या वड्या, प्रत्येकी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट व दूध, प्रत्येकी २ टेबलस्पून मिल्क पावडर व टूटीफ्रूटी, १ टीस्पून लेमन इनो सॉल्ट, २ टेबलस्पून बटर, वितळलेले डार्क चॉकलेट व चॉकलेट चिप्स जरुरीप्रमाणे.
कृती : मिक्सरमध्ये बिस्किटांचा रवाळ चुरा करून बाऊलमध्ये घ्यावा. आंब्याच्या वड्यांचा चुरा, डेसिकेटेड कोकोनट इत्यादी जिन्नस घालून हँड ग्राइंडरने एकजीव करावे व दहा मिनिटे झाकून ठेवावे. आयत्या वेळी त्यात इनो सॉल्ट घालून चांगले फेटावे. हे झाले केकचे मिश्रण. इडली स्टँडच्या मोल्डला तूप लावून त्यात हे मिश्रण ओतावे. इडली कुकरमध्ये मध्यम आचेवर पंधरा मिनिटे वाफवावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये हे मिनी केक काढावे व प्रत्येकावर डार्क चॉकलेटचा ठिपका देऊन चॉकलेट चिप्स घालून सजवावे व खायला द्यावे.

पनीर विथ बीटरूट सॉस

साहित्य : ताजे पनीर, मेरिनेशनसाठी प्रत्येकी १ टीस्पून आले लसूण पेस्ट, द्राक्षरस, अनारदाणे रस, प्रत्येकी १ टीस्पून धने जिरे पूड, लाल मिरची पूड, भाजलेले तीळ - अक्रोड - सूर्यफूल बिया यांची पूड, मीठ स्वादानुसार.
बीटरूट सॉससाठी ः एक लहान बीट, २ लसूण कळ्या, पाव कप दही, पाव टीस्पून मिरीपूड, १ टीस्पून आमचूर, मीठ स्वादानुसार.
कृती : पनीरचे शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करावेत. बीट वाफवून त्याची प्युरी करावी. एका काचेच्या बाऊलमध्ये मेरिनेशनचे सर्व जिन्नस घेऊन हॅँड ग्राइंडरने मिश्रण एकजीव करावे. पनीर तुकडे या मिश्रणात घालून वीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. प्रीहीटेड ओव्हनमध्ये १८० डिग्री से.वर दहा मिनिटे बेक करावे आणि प्लेटमध्ये काढावे. हे डायमंड तयार झाले.
बीटरूट सॉससाठी : बीट प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवावे. थंड झाल्यावर साले काढून बारीक तुकडे करावेत. मिक्सर जारमध्ये हे तुकडे, लसूण कळ्या इत्यादी जिन्नस घेऊन मऊसर मिश्रण वाटावे.
सजावट : सर्व्हिंग प्लेटमध्ये मधोमध दोन आडवे डायमंड ठेवून डाव्या-उजव्या बाजूला पाच-पाच तिरपे मांडावेत, प्रत्येकावर बीटरूट सॉसचा ठिपका द्यावा.

पंचरत्न पुलाव
साहित्य : एक कप आंबेमोहोर तांदूळ, प्रत्येकी पाव कप मोड आलेले मूग, मटकी, लाल चवळी, एका हापूस आंब्याचे तुकडे, प्रत्येकी १ टीस्पून तेल व तूप, २ तमालपत्र, २ लवंग, २ वेलची, अर्धा टीस्पून जिरे, २ टेबलस्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ टीस्पून पुलाव  मसाला, अर्धा टीस्पून हळद, १ टेबलस्पून दही, मीठ स्वादानुसार, ७-८  पुदिना पाने.
कृती : तांदूळ रोवळीत घेऊन नळाखाली वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवावे व निथळत ठेवावे. गॅसवर नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल व तूप एकत्र तापवावे. त्यात जिरे, तमालपत्र, लवंग-वेलची, पुलाव मसाला व पेस्ट घालून खमंग परतावे. नंतर तांदूळ व मोड आलेली कडधान्ये घालून एकजीव करावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून झाकण ठेवून उकळत ठेवावे. शिजत आले की त्यात दही व मीठ घालून ढवळावे आणि एक वाफ आणावी. शेवटी आंब्याचे तुकडे व पुदिना पाने घालावीत. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. सर्व्हिंग प्लेटमध्ये घालून गरमागरम पुलाव खावयास द्यावा. सोबत पापड व कोशिंबीर द्यावी.

हेल्दी हार्ट (कटलेट)

साहित्य : कटलेटसाठी - प्रत्येकी पाव कप ताजे मटार, ओले हरभरे, झुकिनी तुकडे, सोया चंक पावडर, २ टेबलस्पून काजू-बदाम तुकडे, २ टेबलस्पून दही, पाव टीस्पून मिरपूड, १ टेबलस्पून लाल मिरची-लसूण-आले पेस्ट, पाव कप उकडलेल्या रताळ्याचा लगदा, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून तंदुरी मसाला, मीठ स्वादानुसार, चिमूटभर साखर, भाजलेले तीळ जरुरीप्रमाणे आणि तेल तळण्यासाठी.
कृती : सॉससाठी - गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये पाणी उकळावे. त्यात टोमॅटो केचअप, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर हे सर्व प्रत्येकी २ टेबलस्पून व जरुरीप्रमाणे मीठ घालून ढवळावे. मिश्रण घट्ट होत आले की सॉस तयार.
कटलेटसाठी ः सोया चंक पावडर गरम पाण्यात पंधरा मिनिटे भिजवावी. मटार व हरभरे वाफवून भरडसर वाटावेत. नंतर ते बाऊलमध्ये घेऊन झुकिनी, काजू-बदाम तुकडे इत्यादी जिन्नस घालून मिश्रण करावे. त्याचे समान आकाराचे गोळे करावेत. हार्ट शेप कटरने कटलेट तयार करून त्यावर तीळ पेरावेत. गॅसवर नॉनस्टिक तव्यावर तेल घालून कटलेट शॅलोफ्राय करावेत व प्लेटमध्ये पेपर नॅपकिनवर काढावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये तिरपे मांडून व एका बाऊलमध्ये सॉस देऊन खाण्यास द्यावे.

संबंधित बातम्या