रानभाज्यांची संगत आणि लज्जत!

वैशाली खाडिलकर
सोमवार, 19 जुलै 2021

फूड पॉइंट

पावसाळा म्हणजे रानभाज्यांचा ऋतू! निसर्गातील अमूल्य ठेवा असलेल्या आरोग्यदायी रानभाज्यांच्या या काही नावीन्यपूर्ण पाककृती...

स्वादिष्ट सकस सूप 

साहित्य : पाव कप मूग डाळ व मसूर डाळ (मिळून), ४ लसूण पाकळ्या, १ लहान तुकडा आले, १ टोमॅटो व १ कांदा बारीक चिरलेला, प्रत्येकी पाव टीस्पून भाजलेली जिरे पूड व मिरीपूड, २ टेबलस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून तेल, १ कप केना व कवळा या रानभाज्यांची कोवळी पाने, २ टेबलस्पून वाफवलेले मका दाणे.
कृती : दोन्ही डाळी स्वच्छ धुवाव्या व टोपात पाणी घालून पंधरा मिनिटे ठेवाव्यात. गॅसवर स्टील प्रेशरकुकरमध्ये तेल घालून लसूण पाकळ्या खमंग परताव्यात. नंतर कांदा, टोमॅटो व आले तुकडा घालून परतावे. रानभाज्यांची पाने स्वच्छ धुऊन घालावीत. दोन्ही डाळी, दोन कप पाणी, मिरीपूड, जिरे पूड व स्वादानुसार मीठ घालून ढवळावे. कुकरला तीन शिट्ट्या आणून शिजवावे. हँड ब्लेन्डरने घुसळून घ्यावे. त्यात लिंबू रस घालावा. तयार सूप सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे. वाफवलेले मका दाणे घालून सजवावे व सर्व्ह करावे.

गावरान मेवा रायता
साहित्य : आंबुशीची पाने व इतर २ कुठल्याही उपलब्ध रानभाज्यांची पाने, डाळिंबाचा पाला - हे सर्व प्रत्येकी पाव कप.
चटणीसाठी (प्रकार १) : एक कप पुदिना, कोथिंबीर पाने, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, २ चिंचेची बुटूक, गुळाचा लहान खडा, मीठ स्वादानुसार. 
चटणीसाठी (प्रकार २) : दोन लसूण पाकळ्या, पाव टीस्पून जिरे, एका लाल मिरचीचे तुकडे, १ टीस्पून लिंबू रस, स्वादानुसार मीठ. 
पंचामृतासाठी : अर्धा कप दही, प्रत्येकी १ टीस्पून दूध, तूप, साखर व मध. फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे. डाळिंब दाणे व ओले काजू सजावटीसाठी.
कृती : सर्व पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. दोन्ही चटण्या व पंचामृत तयार करावे. बाऊलमध्ये पाने व सर्व जिन्नस एकत्र करावेत. तडका पॅनमध्ये तुपावर खमंग फोडणी करून त्यावर ओतावी व सर्व एकजीव करावे. डाळिंब दाणे, ओले काजू घालून सजवावे व सर्व्ह करावे.

भरली करटोली

साहित्य : आठ-दहा करटोली, १ कप ओल्या नारळाचा चव, प्रत्येकी २ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे व तिळाचे कूट, १ टेबलस्पून गोडा मसाला, १ टीस्पून लाल तिखट, अर्धा कप चिंचेचा कोळ व गूळ पावडर, मीठ स्वादानुसार, कोथिंबीर, २ टेबलस्पून फोडणीसाठी तेल, राई-जिरे-हिंग-हळद जरुरीप्रमाणे.
कृती :  ओल्या नारळाचा चव व इतर साहित्य घेऊन सारण तयार करावे. करटोली स्वच्छ धुऊन आतील बिया काढून टाकाव्यात. नंतर प्रत्येकात वरील सारण भरावे. गॅसवर नॉनस्टिक कढईत तेल तापवून राई, जिऱ्याची खमंग फोडणी करावी. त्यात करटोली घालावीत. पाण्याचा हबका मारून मंद आच ठेवावी व वर थाळीत पाणी घालून झाकण ठेवावे. पाणी संपल्यावर करटोली शिजली असे समजावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार भाजी काढून कोथिंबिरीने सजवावी व लगेच गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

नळीची ताकातली भाजी
साहित्य : दोन कप नळी भाजीची पाने, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, २  टीस्पून बेसन, अर्धा कप आंबट ताक, ८-१० तयार मेथी मुठिया, चवीनुसार मीठ व साखर.
फोडणीसाठी : अर्धा टीस्पून तूप, राई, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता पाने.
कृती : नळीच्या भाजीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. गॅसवर नॉनस्टिक कढईत कपभर पाणी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व भाजीची पाने घालून मऊसर शिजवावे. शिजल्यानंतर चांगले घोटावे. एका वाडग्यात ताक व बेसन मिसळून त्यात ओतावे. मंद आचेवर ठेवून सारखे ढवळावे. अंदाजाने मीठ व साखर घालावी. तडका पॅनमध्ये तूप घालावे व खमंग फोडणी करून भाजीवर ओतावी. तयार मेथी मुठीया घालून ढवळावे. पाच मिनिटांनी भाजी तयार. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून गरम सर्व्ह करावे.

तरोट्याचे कटलेट
साहित्य : दोन कप तरोट्याची ताजी पाने, २ उकडलेल्या रताळ्यांचा लगदा, प्रत्येकी पाव कप बीट, कोबी, गाजर यांचा कीस, २ टीस्पून बेसन, १ कप ओट्स पावडर, पाव टीस्पून हळद, प्रत्येकी अर्धा टीस्पून ठेचलेला ओवा व धने-जिरे पूड, अर्ध्या लिंबाचा रस, १ टीस्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, रवा आणि खसखस जरुरीप्रमाणे, तळण्यासाठी तेल.
कृती :     पालेभाजीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत. चिरलेली पाने परातीत घ्यावीत. त्यात भाज्यांचा कीस, रताळ्याचा लगदा, इतर मसाले इत्यादी जिन्नस घालून जरुरीप्रमाणे पाणी घालावे व चांगले मळून गोळा तयार करावा. हार्टशेप कुकी कटरमध्ये हे मिश्रण घेऊन कटलेट तयार करावे. प्लेटमध्ये रवा व खसखस काढून ठेवावे. कटलेट त्यामध्ये घोळवावे. गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवावा. त्यात तेल घालून मंद आचेवर कटलेट शॅलो फ्राय करावे. प्लेटमध्ये पेपर नॅपकिनवर काढावे. कोथिंबीर- पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

हेल्दी बेक्ड ट्रँगल्स
साहित्य : दोन कप कुर्डूची पाने, प्रत्येकी १ कप मुगाच्या सालाची डाळ व हरभरा डाळ भाजून केलेले पीठ, प्रत्येकी १ टीस्पून लाल तिखट, आले-लसूण पेस्ट, धने-जिरे पूड, चाट मसाला, पाव टीस्पून हळद, चिमूटभर मीठ व हिंग, २ टेबलस्पून तेल व ताक जरुरीप्रमाणे.
कृती : कुर्डूची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरावीत व स्टील परातीत घ्यावीत. दोन्ही पिठे, मसाले व मीठ इत्यादी जिन्नस घालून, जरुरीप्रमाणे ताक घालून मळून घ्यावे. पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. तयार पिठाचा गोळा घेऊन मोठी पोळी लाटावी, कातण्याने कापून त्रिकोणी तुकडे करावेत. बेकिंग ट्रेला तेल लावून त्यावर हे ट्रँगल अंतराअंतरावर ठेवावे. प्रत्येकाला ब्रशने तेल लावावे. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० डिग्री से.वर पंधरा ते वीस मिनिटे बेक करावे. थंड होऊ द्यावे व काचेच्या बरणीत भरून ठेवावे, लागेल तसे वापरावे.
टीप :  याच मिश्रणाचे पराठेही करता येतात.

रानभाज्यांचा रुचकर भात
साहित्य : दोन कप सोनामसुरी तांदळाचा शिजवलेला भात, १ कप उपलब्ध रानभाज्या (टाकळ्याची कोवळी पाने, राजगिरा, तांदुळजा) प्रत्येकी २ टेबलस्पून वाफवलेले मका-मटार दाणे, १ टीस्पून साजूक तूप, पाव टीस्पून जिरे, १ तमालपत्र, १ टीस्पून धने-जिरे पूड, हळद व मीठ जरुरीप्रमाणे, २ टेबलस्पून लिंबू रस, तळलेले काजू.
मसाला वाटणासाठी : पाव कप ओल्या नारळाचा चव, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, २ लवंगा, २ वेलची, २ टेबलस्पून खसखस, १ आले तुकडा; या सगळ्याची पेस्ट करावी.
कृती : सर्व रानभाज्यांची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून त्याची पेस्ट करावी. गॅसवर नॉनस्टिक कढईत तूप घालून मसाला वाटणाची पेस्ट व भाज्यांची पेस्ट घालून परतावे. धने-जिरे पूड, हळद, मीठ घालून ढवळावे व मिनीटभर परतावे. शिजवलेला मका व मटार दाणे घालून एकजीव करून दोन मिनिटे झाकण ठेवावे. नंतर लिंबू रस पिळावा. रुचकर भात तयार. सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार भात काढून वर तळलेले काजू घालावे व भाजलेल्या पोह्याच्या पापडाबरोबर सर्व्ह करावे.

हरेभरे बुलेट्स
साहित्य : दोन कप केना, कवळा किंवा उपलब्ध रानभाजीची हिरवीगार पाने, ताजे मटार दाणे, ४-५ पुदिना पाने, २ टेबलस्पून कोथिंबीर व मिरच्यांची हिरवी चटणी, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, प्रत्येकी पाव टीस्पून मिरेपूड, धने-जिरे पूड व जायफळ पूड, १ टेबलस्पून लिंबू रस, अर्धा कप नाचणी आटा, मीठ स्वादानुसार, तेल. 
आलमंड बटर सॉससाठी : चार टेबलस्पून बटर, ३ टेबलस्पून साले काढलेल्या बदामांची पेस्ट - हे परतून घ्यावे व त्यात चिमूटभर मीठ-मिरपूड घालून सॉस करावा.
कृती : भाज्यांची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून बाऊलमध्ये घ्यावीत. त्यात वाफवून ठेचलेले मटार दाणे, हिरवी चटणी, मसाले व नाचणी आटा इत्यादी जिन्नस घालून मऊसर मिश्रण करावे. याचे समान भाग करून लंबगोलाकार आकार देऊन बुलेट्स तयार करावेत. गॅसवर पॅनमध्ये पाणी उकळावे, त्यात मीठ व थोडेसे तेल घालून बुलेट्स सोडावेत व पाच मिनिटे शिजवावे. असेच सर्व बुलेट्स करून घ्यावे व प्लेटमध्ये चाळणीत निथळत ठेवावेत. बाऊलमध्ये बुलेट घेऊन त्यावर आलमंड बटर घालून टॉस करावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून लगेच सर्व्ह करावेत.

संबंधित बातम्या