कुरकुरीत कुकीज

वैशाली खाडिलकर, मुंबई
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

फूड पॉइंट
लहान मुलांना चॉकलेट,कुकीज, केक असे पदार्थ खूपच आवडतात. हे पदार्थ झटपट तयार करता येतात आणि त्यांचा स्वादही छान असतो. ते पदार्थ घरच्या घरी तयार करण्याच्या सोप्या रेसिपीज...

पंचामृती कॉफी कुकीज  
साहित्य : पाव वाटी दूध, दोन स्पून तूप व दही, पाव वाटी मध, अर्धी वाटी शुगर पावडर, रोझ इसेन्स, दीड वाटी मैदा, कोको पावडर पाव वाटी, पाव वाटी दूध पावडर, पाव वाटी आरलट पावडर 
कृती : एका बोलमधे दूध पाव वाटी, दोन स्पून तूप व दही , मध पाव वाटी, अर्धी वाटी पावडर शुगर, रोझ इसेन्स घालून ब्लेंडरने छान फेटून घ्यावे. त्यात तीन वेळा चाळलेला मैदा दीड वाटी, कोको पावडर पाव वाटी, पाव वाटी दूध पावडर, पाव वाटी आरलट पावडर हे घालून एकजीव करावे. दुसऱ्या बोलमद्ये दोन टी स्पून कॉफी पावडर, दोन टी स्पून साखर व एक टीस्पून पाणी घालून कॉफी मिश्रण छान फेटून घ्यावे. पहिल्या मिश्रणात घालावे. ब्लेंडरने मिश्रण एकजीव, मऊसर करावे. शेवटी बेकिंग पावडर व बेकिंग सोडा प्रत्येक अर्धा टी स्पून घालावे. ढवळावे. बेकिंग शीटला ब्रशन वाटर लावावे. ओव्हन १८० अंश प्री-हीट करावी. वरील मिश्रणाचे छोटे गोळे करावेत. प्रत्येक गोळ्याला चपटा आकार द्यावा. हार्ट शेप कुकीज कटरने कापून कुकीज तयार कराव्यात. बेकिंग शीटमध्ये प्रत्येकामध्ये दोन इंच जागा सोडून कुकीज मांडाव्यात व १८० अंशवर १५ मिनिटे बेक कराव्यात. बोलमध्ये बटर एक वाटी, मिल्क पावडर २ टी स्पून, पावडर शुगर २ वाटी, स्ट्रॉबेरी इसेन्स १ टी स्पून, स्ट्रोबेरी जॅम अर्धा वाटी घालून मिश्रण बनवावे. तयार २ कुकीजमध्ये हे मिश्रण दाबून भरावे. फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी १०-१५ मिनिटे ठेवावे. पौष्टिक चविष्ट कुकीज तयार.

रेड वेल्वेट कपकेक्‍स 
साहित्य : दोन लहान बीट, दोन कप बारीक रवा, दोन टेबलस्पून कोको पावडर , बेकिंग पावडर एक टी स्पून, चिमटी मीठ, अर्धा कप गाईचे दूध, एक टेबलस्पून व्हिनेगर किंवा दही , पिठीसाखर एक कप, तूप अर्धा कप (किंवा बटर), एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स. बीट उकडून त्याची प्युरी करावी. 
कृती : स्टीलच्या वाडग्यात रवा, कोको पावडर व बेकिंग पावडर, चिमटी मीठ २ वेळा चाळून घ्यावे. काचेच्या बोलमध्ये दूध घ्यावे. त्यात व्हिनेगर घालून ५ मिनिटे ठेवावे, मग त्यात बटर व साखर घालावी व ब्लेंडरने घुसळावे, मग त्यात बीट प्युरी घालावी. पुन्हा घुसळावे. आता रवा मिश्रण घालावे. एकजीव करावे. इलेक्‍ट्रिक ब्लेंडरने सतत ४ मिनिटे फेटत राहावे. मऊसर मिश्रण व्होवून द्यावे. ओव्हन १७० अंश सें.वर प्रीहीट करावी. कप केक मोल्डसमध्ये मिश्रण घालावे. २० मिनिटे बेक करावे, थंड होऊ द्यावे. मोल्डमधून काढावे. अशा रीतीने हे कपकेटकस फ्रीजमध्ये ठेवावेत.

चॉको फ्रुटी उत्तपा
साहित्य : २ वाटी डोसा बॅटर, आंबा, सफरचंद किंवा स्ट्रॉबेरी इत्यादी आवडीची फळे १ वाटी (बारीक कापलेली), अर्धी वाटी चॉकलेट सॉस , काजू ,बेदाणे, ४ चमचे बदामचे बारीक तुकडे ,४ चमचे बटर , १ चमचा लवंग दालचिनी पावडर. 
चॉकलेट सॉससाठी ः दोन कप सायीसकटचे गाईचे दूध, एक कप डार्क चॉकलेटचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स, डोसा बॅटरमध्ये लवंग दालचिनी पावडर घालून ढवळावी. 
कृती : गॅसवर नॉनस्टिक तवा तापवावे व पाण्याचा शिपका मारून तो पेपर नॅपकीनने पुसावा त्यावर अर्धी वाटी बॅटर ओतावे व गोलाकार पसरावा. कडेने बटर लावावे. मंद आचेवर उत्तपा तपकिरी रंगावर करावा. पांढऱ्या गोलाकार सर्व्हीग प्लेटमध्ये काढावा. त्यावर बटर लावावे व फळांचे बारीक तुकडे पसरावेत. त्यात काजू, बदाम, ड्रायफ्रुटचे तुकडे घालावेत. पाईपीन बॅगमध्ये चॉकलेट सॉस घालून झिगझॅग पद्धतीने ओतावा. चॉकलेट कटरने समान भाग करावेत व सर्व्ह करावेत. 
चॉकलेट सॉस पद्धत ः गॅसवर पॅनमध्ये दूध तापवावे. गॅस बंद करावा व त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे व व्हॅनिला इसेन्स घालावा. चविष्ट सॉस तयार. फ्रीजमध्ये ठेवावे व वापरावा. 
सोबतची चिली ः योगर्ट बॉलमध्ये द्यावी, बॉलमध्ये दही, २ सुक्‍या लाल मिरच्या बारीक कापलेल्या १ लसूण कळी, कोथिंबीर, चिमटी साखर घालावी. 
टीप ः येथे डोसा न करता उत्तपा केला आहे. कारण त्यावर जड स्टफींग घालायचे आहे, त्यामुळे तो वजनाने फाटणार नाही, फळे व ड्रायफ्रूट घालून याची पौष्टिकता वाढवली आहे व चॉकलेट सॉसने फारच चविष्ट होतो. सगळ्यांना खास करून मुलांना व वृद्धांना जास्त आवडेल. नाश्‍तासाठी छान पर्याय आहे. सोबत चिली योगर्ट द्यावे.

चॉकलेट पान कोन 
साहित्य : ८-१० कलकत्ता पाने, चुना, १ टीस्पून काथ (पेस्ट) , २ टेबलस्पून बडीशेप , २ टेबलस्पून गुलकंद , पाव टेबलस्पून वेलची पूड , अर्धा कप खवा, पाव कप गोड सुपारी, साखर अर्धा कप, पाव कप सुकलेल्या गुलाब पाकळ्या, १ कप डार्क चॉकलेट किसलेले, २ टेबलस्पून क्रीम (काथ व चुना ऐच्छिक) 
कृती : काचेच्या बोलमध्ये डार्क चॉकलेट घेऊन डबल बॉयलरने ते वितळून घ्यावे. त्याचे दोन भाग करावे. एका बोलमध्ये एक भाग व क्रीम घालावे व हॅण्डब्लेंडरने फेटून मिश्रण बनवावे. दुसऱ्या बॉलमध्ये काथ पेस्ट, गुलकंद इत्यादी साहित्य घेऊन सर्व एकजीव करावे व त्यात वितळलेले चॉकलेटचा दुसरा भाग घालून मिश्रण बनवावे. प्रत्येक पानाला थोडा चुना लावा व काथ पेस्ट लावावी. प्रत्येक पानाला कोनचा आकार द्यावा. टुथपीकने टाचावे. यातून सारण बाहेर येता कामा नये. कोनमध्ये दोन नंबरचे मिश्रण भरावे. नंतर हा कोन एकमध्येच्या मिश्रणात बुडवावा. हे प्लेटमध्ये काढावेत. डीप फ्रीजमध्ये ठेवावेत. छोट्या चौकोनी रंगीत ग्लासमध्ये ठेवावेत.

पायनापल पाय पार्सल  
साहित्य : एक कप अननसाचा कीस,  पाऊण कप पिठीसाखर, एक टेबलस्पून लिंबूरस,  ओला नारळ चव, चिमटी मीठ, दोन टेबलस्पून बटर , समोरा पट्ट्या, दोन व्हॅनिला इसेन्सचे थेंब, तेल तळण्यासाठी, मिक्‍स ड्रायफ्रूट भरड आवडीप्रमाणे. एका काचेच्या बोलमध्ये सर्व जिन्नस एकत्र करुन त्याचे मिश्रण करावे. 
कृती : गॅसवर नॉनस्टीकमध्ये हे मिश्रण मंद आचेवर सारखे ढवळत शिजवून घ्यावे, प्लेटमध्ये काढावे. त्यात मिक्‍स ड्रायफ्रूट भरड घालावी. प्लेटमध्ये एक समोसा पट्टी ठेवावी. त्यावर दुसरी पट्टी उभी ठेवावी. मधे सारण भरावे. समोरासमोरच्या बाजू दुमडावे. गॅसवर स्टील कढईत तेल तापवावे व मंद आचेवर ते लालसर रंगावर तळावीत. प्लेटमध्ये काढावीत. ही पार्सल आपण ओव्हनमध्ये बेकही करू शकतो. सर्व्हिंग बोलमध्ये पार्सल काढावीत. थंड होऊ द्यावीत. नंतर स्टील डब्यात भरावीत.

क्‍लासिक बैंगन डिप विथ मिल्क चॉकलेट 
साहित्य : मोठ्या आकाराचे वांगे, मीठ, १ टेबलस्पून लिंबूरस, एक चमचा जिरा पावडर, तेल, चार लसणाच्या पाकळ्या, तीळ, मिल्क चॉकलेट, १ डाळिंब, पुदिना 
कृती ः मोठ्या वांग्याला टोचून वेगळ्या जागी बारीक भोके पाडावी. गॅसच्या ज्वाळेवर मोठे वांगे, तेलाचा हात फिरवून मंद आचेवर सर्व बाजूंनी खरपूस भाजावे. थंड झाल्यावर साले काढून आतला गर घ्यावा. बिया काढाव्यात. चार लसूण कळ्याही भाजून त्याची पेस्ट करावी. तीळ भाजून ऑलिव्ह ऑलिव्हबरोबर पेस्ट करावी. स्वादानुसार मीठ, दोन चमचे लिंबूरस, एक चमचा जिरा पावडर. हे सर्व एका काचेच्या बॉलमध्ये घ्यावे. एकजीव करावे. शेवटी वितळलेले मिल्क चॉकलेट घालावे. आता ढवळू नये. चॉकलेटची मधे-मधे छान चव लागेल. डाळिंब दाणे व पुदिना पानांनी सजवावे.

क्रिस्पी फ्राय चॉकलेट बार 
साहित्य : चार फ्रोझन चॉकलेट बार, मध्यम आकाराचे दीड कप मैदा, एक कप कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा एक चमचा, अर्धा कप कॉर्नफ्लेक्‍स चुरा, कनोला ऑइल, पिठीसाखर, चेरी, दूध जरुरीप्रमाणे (पाण्याऐवजी वापरायचे आहे) 
हनी सिरप ः मध दोन चमचे, चिमटी लवंग, दालचिनी पावडर, जीरेपूड 
कृती : एका काचेच्या बॉलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, दूध व बेकिंग सोडा यांचे मिश्रण बनवावे. प्लेटमध्ये कॉर्नफ्लोअरचा चुरा ठेवावा. प्रत्येक चॉकलेट बार प्रथम मैदा मिश्रणात घोळावा. मग कॉर्नफ्लेक्‍स चुरा सर्व बाजूनी लागला पाहिजे. हीच कृती परत करावी, म्हणजे चॉकलेट पटकन वितळणार नाही. गॅसवर सॉस पॅनमध्ये कनोला ऑइल तापवावे. मंद आचेवर हे बार तळावेत. प्लेटमध्ये पेपरनॅपकीनवर काढावेत. सर्व्हिंग प्लेटमध्ये हे बार एकावर एक आकर्षक रीतीने मांडावेत. त्यावर गाळनीतून पिठीसाखर पेरावी. मग किंचित तिखटपणा येण्यासाठी घरी बनवलेला हनी सिरप थोडा थोडा ओतावा. सर्वांत वरती दोन चेरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावे.

ड्रॅगनफ्रूट टार्ट 
पूर्वतयारी : डबलबॉयलरने व्हाइट चॉकलेट वितळून घ्यावा. साधारण एक कप असावे. ड्रॅगनफ्रुटची साले काढून बारीक तुकडे करावेत. 
साहित्य : जिंजर आमंडबटर सॉससाठी - फूड प्रोसेसरमध्ये दोन टेबलस्पून आले कीस, आमंडबटर अर्धा कप, दोन टेबलस्पून लिंबूरस ,  दोन टी स्पून मध, अर्धा टी स्पून पापरिका, चवीप्रमाणे मीठ घालावे व अर्धा कप थंड पाणी घालत सारखे फिरवत मऊसर पेस्ट सॉस बनवावा. 
कृती : बोलमध्ये ड्रॅगनफ्रुटचे तुकडे व हबा सॉस यांचे मिश्रण बनवावे. मार्केटमध्ये बिस्कीट टार्ट मिळतात, ते आणावेत. प्रत्येकात प्रथम व्हाइट चॉकलेट घालून तळ झाकून घ्यावा व १५ मिनिटे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. नंतर त्यावर ड्रॅगन फ्रूट तुकडे, सॉसचे मिश्रण घालावे. क्रीम चीज पाईपिंग बॅगमध्ये भरून ते यावर घालावे. सर्वांत वरती एक चेरी फळ ठेवावे. असे सर्व टार्ट बनवावेत व लगेच सर्व्ह करावे.

हेल्दी जार  
साहित्य : एक मोठे सफरचंद , दोन टेबलस्पून ओटस्‌, अर्धा कप दूध, ओला नारळ, ड्रायफ्रुटचे तुकडे, दोन टेबलस्पून सब्जा बी किंवा तुळशीचे बी 
पूर्वतयारी ः दोन टेबलस्पून सब्जा बी किंवा तुळशीचे बी अर्धा कप दुधात तासभर भिजवावे. लाल सफरचंद स्वच्छ धुवावे व त्याच्या फोडी कराव्यात. दोन टेबलस्पून ओटस्‌, अर्धा कप दुधात भिजवावे. १५ मिनिटे ओल्या नारळाचे लांबडे काप करावेत. ड्रायफ्रुटसचे तुकडे करावेत. 
कृती : एका काचेच्या ग्लासमध्ये प्रथम सफरचंदाचे तुकडे घालावे त्यावर दोन टेबलस्पून ओटस्‌चा थर द्यावा ते दाबून बसवावेत. त्यावर सब्जा बी दुधासकट घालावे. त्यावर नॅचरल टेंडर कोकोनट आईस्क्रीमचा एक स्कूप घालावा. (वेगळ्या स्वादाचेही चालेल) त्यावर ओल्या नारळाचे काप व ड्रायफ्रुटस्‌ दोन टेबलस्पून घालावे. शेवटी पुनः आईस्क्रीमचा एक स्कूप घालावा. आपले अप्रतिम चविष्ट डेझर्ट तयार.

फोटो फीचर

संबंधित बातम्या