सावधान! आपण जंगलात आहोत!

विवेक देशपांडे
सोमवार, 9 मार्च 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

उत्तुंग हिमालय, रुपेरी वाळूचे किनारे, समृद्ध अशी जंगले, हजारो वर्षांपूर्वीची लेणी, सह्याद्रीमधील दुर्गवैभव, प्राचीन मंदिरे, असंख्य धबधबे, असंख्य नद्या आणि सरोवरे... हे सारे वैभव आपल्या भारतात आहे. यातील एखादीच गोष्ट संपूर्ण पाहायची ठरवलीत, तरी एक जन्म अपुरा पडतो. म्हणजे सारा हिमालय पालथा घालायचा ठरवला, तरी ती आपल्या एका आयुष्यात अशक्‍य कोटीची गोष्ट ठरते. 

विपुल वनस्पती ही निसर्गाने भारताला दिलेली एक अनमोल देणगी आहे. अनेक प्रकारची वृक्षसंपदा, लता, वेली, नाना प्रकारचे पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक यांनी आपल्या जंगलांना नटवले आहे, समृद्ध केले आहे. हिमालयाच्या उत्तुंग पर्वतांसमोर आपण किती शूद्र आहोत याची जाणीव होते आणि जंगलातील, वनातील त्या निरव शांततेने आत्मिक समाधान मिळते. 

माझ्या एका मित्राने मला विचारले, 'अरे, सारखे तुम्ही हिमालयात आणि जंगलात का जाता रे? तेच तेच सारखे पाहताना तुम्हाला कंटाळा कसा येत नाही?' खरे तर हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. काय करता तुम्ही हिमालयात आणि जंगलात जाऊन? आयुष्यभर फक्त शिक्षण, नोकरी, संसार आणि निवृत्ती या ठराविक चाकोरीचे जीवन जगल्यावर हा प्रश्‍न पडतो, तेव्हा त्याचे आश्‍चर्य न वाटता, राग न येता फक्त कीव करावीशी वाटते. एखादी गोष्ट केल्याशिवाय आणि अनुभवल्याशिवाय ती का केली जाते हे समजणे फार कठीण आहे. 

मी जंगलात जातो, वारंवार जातो, कारण मला याचे व्यसन लागले आहे. एकदा जंगलात गेलात, की परत परत जावेसे वाटते. शहरात राहून मनात मुरलेला रूक्षपणा, सिमेंटच्या जंगलातील एकटेपणा जंगलात जाऊन घालविता येतो. इथल्या प्रत्येक भेटीत आपण अनुभवसमृद्ध असे 'जंगलाचे देणे' घेऊन येतो. जंगलात एक सकून मिळतो. जंगलातून बाहेर येताना मनाचा ताजेपणा, टवटवी पुढे कित्येक दिवस टिकून राहते. अगदी झाडावरच्या न तोडलेल्या फुलांप्रमाणे! निसर्गाच्या अनेक लोभसवाण्या अविष्कारांमध्ये 'अरण्य भ्रमंतीची' मोहिनी काही औरच आहे. 

आजकाल अनेक मंडळी जंगल पर्यटनास जातात. एका सहलीमध्ये जंगलात जिप्सीने मारलेली चक्कर म्हणजे जंगलभ्रमंती नव्हे. ते म्हणजे भोज्याला शिवणे असते. एखाद्या जंगलात जायचे असेल, ते पहायचे असेल, तर त्याला पूर्वतयारी आणि अभ्यास हा करावाच लागतो. मारुती चितमपल्लींनी ४० वर्षे जंगलांचा अभ्यास केला आणि तरीही ते म्हणतात, 'अजूनही मला जंगल समजलेच नाही,' तर एका जिप्सी सफारीने आपण काय जंगल पाहणार? आणि समजणार? भारतातील जवळजवळ सर्व अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने पावसाळ्यातील तीन महिने बंदच असतात. १ ऑक्‍टोबरपासून ते साधारणपणे ३० जून या कालावधीमध्ये आपल्याला जंगलभ्रमंती करता येते. जंगलाचा हिरवेपणा आणि गच्च जंगल अनुभवता येते, ते ऑक्‍टोबर ते जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत. फेब्रुवारी, मार्च हे महिने पानगळतीचे असतात. जंगल आपला हिरवा साज उतरावयाला लागतात आणि करड्या रंगाशी जवळीक साधतात. मार्चनंतर ऊन वाढायला लागते, ते जूनच्या पहिल्या पावसापर्यंत. जंगलभ्रमंतीचा योग्य कालावधी समजला जातो. यावेळी जंगलातील पाणवठ्यावर हमखास प्राणी पाहायला मिळतात. जंगल जेव्हा गच्च असते, पानगळती झालेली नसते, त्यावेळेस शेजारी प्राणी असले, तरी आपल्याला दिसत नाहीत. पर्णहीन झाडांच्यामधून अगदी दूरवरील प्राणी आपल्याला हमखास पाहायला मिळतात. 

एकदा आम्ही नागझिरा जंगलात भ्रमंती करत होतो. पिटेसरी गेटवरून आम्ही सहाजण एका बंदीस्त गाडीतून नागझिऱ्याकडे निघालो. माझ्या संस्थेचा कॅंप नागझिरा येथे आयोजित केला होता आणि काही भाजीपाला व किराणा सामान घ्यायला आम्ही साकोलीला गेलो होतो. मे महिन्याचे ते दिवस. विदर्भातील आग ओकणारा उन्हाला. गाडीच्या काचा खाली केल्या होत्या. मी ड्रायव्हर शेजारील सीटवर बसलो होतो. सतीश काळे या मित्राला तहान लागली, म्हणून गाडीचा वेग थोडा कमी केला. रस्त्याच्या उजवीकडे असलेल्या झाडावरील वानराने 'अलार्म कॉल' (Alaram call) दिला. ख्याक... ख्याक.... करून ते दोनदा ओरडले. मी चक्रधारींना गाडी पूर्णच थांबवायला सांगितली. एका छोट्या पुलाच्या अलीकडे आम्ही थांबलो. मी व सतीशने डावीकडचे दार उघडले आणि बाहेर बघू लागलो, तोच एक वाघीण पुलाच्या खाली असलेल्या सिमेंटच्या पाइपमधून बाहेर पडलेली आम्हाला दिसली. थोड्या अंतरावर असल्याने फोटो काही चांगला येत नव्हता. मी थोडा गाडीच्या बाहेर पडलो. एव्हाना सतीशही त्याचा व्हिडिओ कॅमेरा घेऊन बाहेर पडला. कॅमरा तिच्यावर रोखतो ना रोकतो, इतक्‍यात ती आमच्या दिशेने चाल करून आली, अगदी थोडे अंतर... पण तिचा बदललेला चेहरा आम्हाला सांगत होता, की बाबांनो सावध व्हा, तुम्ही माझ्या राज्यात आहात. आम्हाला इशारा देऊन ती थांबली. आमचेही 'चेहेरे बदललेच' होते. झटकन गाडीचे दार लावून आम्ही आतूनच तिला बघण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला. ड्रायव्हर महाशयांनी जंगलातील वाघ प्रथमच पाहिला होता. त्याची भीतीने गाळण उडालेली होती. तो म्हणाला, 'झू मधला वाघ बघितला, तरी मला भीती वाटते. इथे तर मोकळ्या मैदानात! साहेब चला लवकर कॅंपवर, नाहीतर ती आपल्या अंगावर येईल.' पण आमचा पाय काही निघत नव्हता. सरते शेवटी काही क्षणांनी ती सिमेंटच्या पाईपमध्ये शिरली. एव्हाना वानरांनीही आपले ओरडणे थांबवले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत थोडे फार पाणी, ओलावा आणि थंडावा पुलाखाली असतो. वाघ मंडळींची ती अतिशय आवडीची जागा असते. या घटनेनंतर ड्रायव्हरने आम्हाला न विचारता गाडी नागझिऱ्याच्या दिशेने सुसाट सोडली होती. अगदी वाघ मागे लागल्यासारखी! 

प्राणी आणि पक्षी यांच्याशी दोस्ती करायची असेल, त्यांचा जवळून परिचय करून घ्यायचा असेल, तर जंगलभ्रमंती अनिवार्य ठरते. ही जंगले, अभयारण्ये माणसाला अंतर्मुख करतात. सहनशीलता, सदाबहार प्रसन्नवृत्ती, चिंतन प्रवृत्ती आणि संवेदनशीलता या गुणांचा विकासही हीच जंगले करतात. जे वृक्षांवर, निसर्गावर, प्राण्यांवर आणि पक्षांवर प्रेम करतात ते जीवनावरही रसरसून प्रेम करतात. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही कदाचित बदलत असावा. 

अभयारण्य पाहणे, त्यात भटकंती करणे हे तसे सोपे काम नाही. मात्र, काही सूचनांचे पालन, नियमांची माहिती आणि स्वयंशिस्त या गोष्टींकडे लक्ष दिले, तर हीच भटकंती आनंददायी होऊ शकते. अनोळखी जंगलाची, अनवट वाटांची ओळख करून घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपण जंगलात जातो आहोत. प्राणी, पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासात जात आहोत. त्यांच्या साम्राज्यात प्रवेश करतो आहोत. इथले 'जंगली कायदे' पाळायलाच हवेत. कोणतेही जंगल, अभयारण्य तुम्हाला विन्मुख कधीच पाठवणार नाही. त्यांनी तुम्हाला काहीतरी देण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला असतो. प्रश्‍न इतकाच की आपण काय आणि कसे घ्यायचे याचा असतो. 

 जेव्हा जंगल बघण्याचा पहिला अनुभव घ्यायचा असतो, त्यावेळेस एकटे कधीच जाऊ नये. कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती बरोबर असावा किंवा एखादी संस्था, जी जंगल भ्रमंतीचे कार्यक्रम आयोजित करते. ही मंडळी अनुभवी असतात आणि त्यांच्या ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होतो. कदाचित पहिल्या वेळेस तुम्हाला अपेक्षित असे काहीच दिसणार नाही. तुमच्या पहिल्याच भेटीत जंगलातील सर्व प्राणी-पक्षी तुम्हाला भेटायला येतील ही अपेक्षाही बाळगू नये. वाघ किंवा बिबट्या दिसलाच पाहिजे हा अट्टहास तर अजिबातच नको. चितमपल्ली म्हणतात, 'जंगलात वाघ काही ‘दावणीला' बांधून ठेवलेला नसतो, की प्रत्येकाने जाऊन त्याचे दर्शन घ्यावे. हमखास वाघ/बिबट्या दिसण्याची एकच जागा म्हणजे 'झू'. तिथे ते बंदिस्त असतात, आपण तिथे मुक्त असतो. पण ते पाहणे असते, अनुभवणे नसते! तुम्हाला अभयारण्यातील मुक्त संचार करणारे प्राणी पाहायचे आहेत की 'भयअभयारण्यातील' ते बंदीस्त, असाह्य प्राणी पाहायचेत हे ठरवावे लागते.' जंगलात जाताना आपला पोषाख अत्यंत महत्त्वाचा असतो. जंगलाशी एकरूप (कामाेफ्लाज) होणारेच कपडे वापरले पाहिजेत. भडक रंगाचे म्हणजे लाल, पिवळे हे कपडे कटाक्षाने टाळले पाहिजेत. काळपट, हिरव्या किंवा करड्या रंगांचे कपडे अत्यंत सोईचे ठरतात. साखरपुड्याला किंवा लग्नाला निघाल्यासारखे नटून थटून जंगलात कधीच जायचे नसते. प्राणी अशा कपड्यांना बुजतात आणि पळ काढतात. जंगलातील भ्रमंतीसाठी जिप्सीही हिरव्या रंगाच्याच असतात, त्याचे हेच कारण आहे. 

एकदा मे महिन्यात आम्ही कान्ह्याच्या जंगलात भटकंती करत होतो. किसली गेटवरून आम्ही आत गेलो. गाइडला कसला तरी आवाज आला. त्याने आम्हाला शांत राहायला सांगितले. ड्रायव्हरने गाडी बंद केली. डावीकडच्या बाजूने रानकुत्र्यांचा एक कळप पळत येत होता. सर्वांची तोंडे लाल होती. गाइडचे लक्ष जंगलाकडेच होते. तो म्हणाला 'सर वॅंहा देखो, वाइल्ड डॉगने चितलको मारा है।' आम्ही बघितले तर काही कुत्री त्या हरणाचे लचके तोडत होते. हे सर्व सुरू असतानाच आमच्या ग्रुपपैकी दीपक सराफ नावाचा आमचा मित्र ताडकन उभा राहिला. त्याचे कपडे स्टेशनवरच्या हमालासारखे होते. तो ट्रिपला आला तेव्हा त्याने याच पद्धतीचे शर्ट आणि टी-शर्ट आणले होते. मात्र, कान्ह्याला आल्यावर आमच्या हे लक्षात आल्याने आम्ही काहीच करू शकत नव्हतो. जी काही रानकुत्री आमच्या दिशेने येत होती ती हा 'लाल बावटा' बघून थांबली, दचकली आणि विरुद्ध दिशेला जोरात पळत गेली. माझी उत्तम छायाचित्रांची संधी केवळ लाल दीपकमुळे हुकली! उरलेल्या सर्व सफारींमध्ये आम्ही दीपकला एकदाही उठू न देण्याची खबरदारी घेतली होती. जंगलात जाताना कोणताही मेकअप करू नये. तिथे आपल्याला कोणीच पाहत नसते. तुम्ही कधी वाघ, सिंहांना (खरे तर वाघिणींनी किंवा सिहिंणींना) मेकअप केलेले पाहिले आहे? ही प्रथा फक्त मनुष्य प्राण्यातच आहे. शहरात, आपल्या गावात ती एकवेळ ठिक आहे. परंतु, जंगलात हे प्रकार नकोच! जंगलाचा आणि त्यातील प्राणी, पक्ष्यांचा ओरिजिनल नैसर्गिक मेकअप पहा, अनुभवा. त्यासाठीच तर आपण आलेलो असतो. सेंट, अत्तर आणि डिओड्रंट तर अंगाला अजिबातच चोपडू नये. याचा उग्र वास काही वेळा बरोबरच्या माणसांनासुद्धा सहन होत नाही, तर प्राण्यांची काय कथा? त्यांना हा गंध काही कि.मी. अंतरावरून येतो. या वासामुळे ते सावध होतात आणि दूर निघून जातात. कदाचित हल्ला करण्याचीही शक्‍यता असते.

संबंधित बातम्या