पेंचमधील थरार...
मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!
विवेक देशपांडे
दरवर्षी एक हिवाळा आणि एक उन्हाळा एखाद्या जंगलात काढायचा, हा माझा गेले कित्येक वर्षाचा शिरस्ता आहे. एके दिवशी अशीच जंगलात जाण्याची तयारी सुरू असताना एका मित्राने विचारले, की अरे, इतकी जंगले तुम्ही पाहता, यातले कोणते जंगल तुम्हाला जास्त आवडते? यावर एका क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो, ‘माणसांचे जंगल सोडून प्राणी पक्ष्यांचे कोणतेही जंगल मला तितकेच आवडते. मातकट कच्चे रस्ते, आजूबाजूला घनदाट वृक्ष, कमालीची शांतता, फक्त पक्षी आणि प्राणी यांचेच आवाज आणि अखंड प्राणवायूचा पुरवठा.. एका सच्च्या निसर्गप्रेमीला ही शिदोरी पुरते.
कान्ह्याची छोटी प्रतिकृती म्हणून पेंच अभयारण्याकडे बघितले जाते. एका फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी परत एकदा (कितव्यांदा ते आठवत नाही) काही मित्रांसमवेत पेंचला निघालो. नागपूरला आधी पोचलो, तिथे आमचा नेहमीचा वाहनचालक राकेश हजर होता. थंडी होती पण ऊनही जाणवत होते. नागपूर-जबलपूर रस्त्यावरील खवासा या ठिकाणी दीड तासातच पोचलो. तिथून डावीकडे वळून पेंचच्या तुरिया या गेटकडे पोचायला फक्त दहा मिनिटे लागली. किपलिंग्ज कोर्ट हे मध्यप्रदेश टुरिझमचे अत्यंत सुंदर असे रिसॉर्ट आहे. जंगलाच्या अगदी जवळ असल्याने जंगलात राहण्याचा अनुभव इथे घेता येतो. महेश हिंगे हा आमचा पेंचमधील जिप्सी चालक, गाइड आणि मित्रही... बाबूजी कैसी रही सफर, म्हणत हजर झाला. पुणे स्पेशल बाकरवडी दिसल्याने स्वारी खूश झाली. भोजनोत्तर सर्व तयारीनिशी तिथून पाचच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ‘तुरिया गेट’ या जंगलाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आम्ही पोचलो. एंट्रीपास, गाइड इत्यादी सोपस्कार पार पडले आणि ठीक अडीच वाजता आम्ही जंगलात प्रवेश केला.
हवेतील सुखद गारवा आणि हवाहवासा वाटणारा तो जंगलाचा दर्प नाकावाटे थेट फुप्फुसात पोचला. हा दर्प आत पोचला, की सारे चित्रच बदलून जाते. थोड्याच अंतरावर सांबरांचा कळप आमच्या स्वागताला सामोरा आला. एक भलामोठा नर, पाच मोठ्या माद्या आणि छोटी दोन पिल्ले होती. गाडीच्या आवाजाने त्यांनी कान टवकारले. आमच्याकडे पहिले. गाडीत काही नवखे होते, प्रथमच जंगलात आलेले. त्यांनी कॅमेरे रोखले. एक दोनदा क्लिक झाले. गाडी सुरू झाल्याचा आवाज आला आणि सर्व जोरात पळाले. अरे अरे थांबा ना माझा फोटो काढायचा राहिलाय, एक मित्र विनवणी करत म्हणाला.. पण म्हणे म्हणेपर्यंत ही सांबर मंडळी खूप दूर गेली होती. मी त्या मित्राला म्हणालो, अरे सुहास आत्ता तर सुरुवात आहे. अजून आपल्याला खूप काही बघायचे आहे. एक लक्षात ठेव की कोणताही प्राणी फोटोसाठी थांबणार नाही. जंगलात तो क्षण पकडावा लागतो अन्यथा वाट पाहावी लागते.
महेश आमचा वाहनचालक, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा पेंचला आम्ही आलोय, तो कायम आमच्या ग्रुपबरोबर असायचा. अनुभवाने कोठे काय दिसते, कोणत्या वेळेत दिसते, कोणत्या वेळेस शक्यता जास्त असते दिसायची, हे त्याला माहीत असायचे. महेश उत्तम मराठी बोलायचा, पण आमच्याशी मात्र त्याचे संभाषण हिंदीतून चालायचे. तो आमच्या गाइडला म्हणाला, ‘चलो चिंधीमहा रोडसे सिधा पिवरथडी जायेंगे. इनको वहा बहोत सारे जानवर देखनेको मिलेंगे।’ तसे आम्ही निघालो. एका ठिकाणी मोर आणि ४-५ लांडोरी दिसल्या. सुहास खूश झाला. त्याला यावेळेस फोटो मिळाले होते.
पेंचची वृक्षसंपदा संपन्न आहे. मात्र त्यातही उठून दिसतो तो साल वृक्ष. जवळजवळ वर्षभर तो हिरवा असतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होताना काही काळ पानगळ होते. परंतु, लवकरच तो आपला हिरवा पर्णसांभार लेवून जंगलाचे वैभव टिकवून ठेवतो. पेंचमध्ये असे महाकाय सालवृक्ष जागोजागी आहेत. ऐन उन्हाळ्यातही याची पाने हिरवी असल्याने जंगलभ्रमंती सुखद होते. दिसताना थोडाफार सागासारखाच हा दिसतो.
वळणावळणाच्या रस्त्याने आम्ही पिवरथडीला पोचलो. पेंच नदीच्या बॅकवॉटरचा हा भाग आहे. आम्हाला नवीन नसले तरी दर वेळी समोरचे दृश्य पाहून भान हरपून जाते. गाडी जसजशी पाण्याजवळ जाऊ लागली तसा सुहास खूपच खूश झाला. कारणही तसेच होते. एका बाजूला चितळ्यांचे कळप शांतपणे चरत होते. थोड्या अंतरावर सांबरांचे कळप होते. तेवढ्यात रानडुकरांची एक भलीमोठी टोळी रस्त्यावरून पळत दिसेनाशी झाली. मोर आणि लांडोरीही रस्त्याच्या अगदी कडेलाच दिसत होते. जंगलातील प्राणी आणि तेही इतक्या मोठ्या संख्येने पाहण्याची काही जणांची ती पहिलीच वेळ होती. संध्याकाळ जवळ येत होती. पक्ष्यांचीही लगबग पाहायला मिळाली.
एका झाडावर इंडियन रोलर म्हणजे नीलपंख, कॉमन किंगफिशर म्हणजे खंड्या वेगवेगळ्या फांद्यांवर बसले होते. अचानक पोपटांचा थवा गलका करत उडाला आणि दिसेनासा झाला. पाण्यावर असंख्य पाणकावळे पंख उघडून सुकवत बसले होते. सोनपाठी सुतारपक्ष्यांचेही टकटक दुरून ऐकू येत होते. मंडळी काही हलायला तयार नव्हती. सहा वाजायच्या आत तुरिया गेटवर पोचणे क्रमप्राप्त होते. अंधारही थोडा जाणवू लागला होता आणि थंडीही वाजू लागली होती. गरम कपड्यात आमच्या सर्वांची शरीरे लपेटली गेली आणि पिवरथडीचा निरोप घेऊन आम्ही थोडेसे वेगाने तुरिया गेटकडे निघालो.
आजूबाजूच्या रस्त्यावरही प्राण्यांच्या अंधूक आकृत्या दिसत होत्या. पण आता त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष जात नव्हते. रिसॉर्टवर पोचताच कँटीन गाठले. महेशने चहा कॉफीची ऑर्डर दिली. इतक्यात वेटर गरम गरम सामोसे घेऊन आला. त्या वातावरणात थकलो भागलो असताना सामोशावर ताव मारणे सुरू झाले. तोपर्यंत इतरही पर्यटक येऊ लागले होते. एक ग्रुप तर भलताच खूश होता. ‘अरे भाई हमने तो शेर देखा.. बहोत देर तक.. हमारे गाडीके सामने चला आ रहा था।’ त्यांना वाघ दिसला आणि आपल्याला का नाही, हा नवख्यांचा प्रश्न होताच. काळजी करू नका उद्या आपल्यालाही दिसेल, असे मी ही त्यांना आश्वासन दिले. उद्या वाघ दिसला तर सुहासचा आनंदी चेहरा कसा असेल आणि नाही दिसला तर कसा... ही दोन्ही चित्रे माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली.
दुसऱ्याच दिवशी सकाळी सहा वाजताच आम्ही तुरिया गेटवरून आत प्रवेश केला. अजून पुरते उजाडले नव्हते. थंडीही बऱ्यापैकी पडली होती. एक तासभर आम्ही जंगलातील रस्त्यावरून हिंडत होतो, पण काही ठराविक प्राणी सोडले तर जंगल तसे शांतच वाटत होते. आम्ही ‘बाघीन नाला’ रोडच्या दिशेने जायला सुरुवात केली आणि अचानक दूरवर वानरांचा भयसूचक आवाज यायला सुरुवात झाली. महेश म्हणाला, ‘सरजी शायद आपकी तमन्ना आज पुरी होनेवाली है।’ आमची गाडी तिथे पोचली आणि रस्त्याच्या बाजूलाच ‘स्पॉटेड डियर’ पडलेले दिसले आणि बाजूला चक्क एक बिबट्या ते खाण्याचा प्रयत्न करत होता. आमच्या ड्रायव्हरने थोड्या अंतरावर नेऊन गाडी बंद केली. लेपर्डने आमच्याकडे पाहिले आणि तो हरणाला ओढून आत घेऊन जाऊ लागला आणि अचानक वानरांची परत एकदा खॅक खॅक खोर्र खोर्र असा आवाज सुरू केला.... आणि एक विलक्षण घटना तिथे घडली. बाजूच्या गवतामधून अचानक एक वाघ तिथे आला. आल्याआल्याच त्याने प्रचंड आवाज दिला. तो लेपर्डच्या दिशेने धावला. लेपर्डने किल सोडले आणि समोरच्या झाडावर चढला. त्याच्या पाठोपाठ वाघही झाडावर चढला. पण त्याला फार वर जात आले नाही. वाघ खाली उतरला आणि किलच्या दिशेने येऊ लागला. पाठोपाठ लेपर्ड झाडावरून खाली उतरला आणि त्याने धूम ठोकली. वाघाने शांतपणे आपले भोजन सुरू केले. काही मिनिटांमध्ये केवळ डिस्कव्हरी किंवा ॲनिमल प्लॅनेटवर दिसणाऱ्या या अतर्क्य घटनेचे आम्ही साक्षीदार झालो. मीही अशी घटना प्रथमच पहात होतो. सुहास आणि अजून एक मित्र तर अचंबित झाले होते. आमचा गाइड म्हणाला, सर ये किल किसने किया इसका तो अंदाजा नही है, लेकिन भोजन नशीब में तो टायगर के ही था..
कालच्या फेरीत वाघ दिसला नाही म्हणून थोडे नाराज झालेले आमचे मित्र आज इतके खूश होते, की त्याक्षणी गाइड आणि ड्रायव्हरला त्यांनी छान बक्षिशी दिली. आयुष्यात कोणताच प्राणी मोकळ्यावर न पाहिलेल्या मंडळींना ही घटना म्हणजे पर्वणीच होती. आमच्यानंतर ७ ते ८ गाड्या तिथे आल्या. त्यांना मात्र फक्त वाघ शिकार खाताना दिसला. गाइडने जेव्हा आधी घडलेल्या प्रसंगाचे रसभरीत वर्णन केले तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. आम्ही अगदी मोक्याच्या जागी होतो. इतरांनाही वाघ पाहता यावा म्हणून आम्ही तिथून निघून जाण्याचा विचार केला.
मी ‘दिसेल हं तुला वाघ उद्या’ हा सुहासला दिलेला शब्द वाघ आणि बिबट्या यांनी तंतोतंत पळाला होता! हे मात्र खरे, की जंगलात वाघ किंवा बिबट्या बघितला की त्या जंगल सफारीचे सार्थक झाले असे मानणारी मंडळी संख्येने अधिक असतात. एकदा हा क्लायमॅक्स पहिला, की इतर जंगलपटात त्यांना फारसा रस उरत नाही.
आमच्याकडे अजूनही थोडा वेळ असल्याने पेंच नदी पार करून महादेव घाट मार्गे टॉवरकडे गेलो. नदीच्या अलीकडचा भाग हा सिवनी जिल्ह्यात येतो. मात्र जो टॉवर आहे तो मात्र नदीच्या पलीकडच्या भागात म्हणजे छिंदवाडा जिल्ह्यात येतो. टॉवरवरून जंगलाचे विहंगम दृश्य दिसते. गाइडने वेळ संपत आल्याचे सांगितल्याने आम्ही परत फिरलो. सातमोडी मार्गाने तुरिया गेटकडे निघालो. वाटेत एके ठिकाणी नीलगाईंचे नर चरताना दिसले. गाडी त्यांच्यापाशी नेऊन कॅमेरा बाहेर काढेपर्यंत त्यांनी पलायन केले होते.
आम्ही निघालो इतक्यात गाइडने परत गाडी थांबवली. सर, चितळ का कॉल है.. लेकिन दूर है... मीही तो कॉल ऐकला पण भ्रमंतीची वेळ संपत आली होती. २-३ मिनिटे कॉल सुरू होता. नंतर तो थांबला. आम्ही आता थकलोही होतो. गाडी तुरिया गेटपाशी केव्हा आली हे समजलेही नाही. या वेळेचे पेंच बऱ्यापैकी समाधान देऊन गेले होते.