सतत आनंदी कोण असेल? 

मृणालिनी वनारसे    
मंगळवार, 20 मार्च 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...
 

तर मित्रांनो, लांडगा माणसाच्या जवळ आला. त्याचा कुत्रा झाला! तुम्हाला माहितीये? आज भारतात लांडगे जवळपास तीन हजार आहेत आणि कुत्री किती आहेत? घरात पाळली जाणारी आणि भटकी धरून जवळपास तीन कोटी! आहे ना मजा? 

मधमाश्‍या आपण ‘पाळतो’ खऱ्या; पण त्यांचा अजून ‘कुत्रा’ नाही झाला. म्हणजे असं की खाणं, पिणं निवारा यासाठी त्या काही अजून कुत्र्यासारख्या माणसावर अवलंबून नाहीत. 

फुलपाखरू तर आपण पाळलं असं म्हणूही शकत नाही. त्याला बोलवायचं तर आपण फक्त त्याच्यासाठी त्याला आवडणारी फुलं, पानं असलेली झाडं ठेवू शकतो. अळी पानं खाईल आणि कोशातून बाहेर आलेलं फुलपाखरू मध चोखेल. प्रत्येक फुलपाखराच्या अळीचं एक एक स्पेशल झाड/झुडूप असतं. कढीपत्त्यासारखी, कोरांटीसारखी झुडपं अनेक अळ्यांना आवडतात. फुलपाखरू आणि त्यांची आवडती पानं आणि फुलं हा एक मजेचा विषय आहे. त्याचा जरूर अभ्यास करा. काही फुलपाखरं फक्त घनदाट अरण्यात दिसतात. काही अगदी आपल्या वर्गातसुद्धा येऊन जातात. काही उंच पर्वतात, तर काही समुद्रसपाटीला दिसतात. थंड प्रदेशातली वेगळी, उष्ण प्रदेशातली वेगळी. इवलंसं फुलपाखरू! पण वाचायला सुरवात केलीत तर ते चिमुकले पंख मोठ्या ग्रंथाची पुढची मागची पानं आहेत. आत वाचायला खूप काही आहे. म्हणजे दुरून बरं का! एक फार सुंदर जपानी हायकू आहे - 
नको ना रे पकडूस चिमटीत फुलपाखराचे पंख 
आधीच दुखतोय पंखावरला रंग.. 
किती अद्‌भुत नाजूक गोष्ट आहे ना फुलपाखरू म्हणजे! 

आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो? ओलावा, गारवा राहील अशा जागा बागेत तयार करू शकतो. थोडा चिखल, थोडी सडत आलेली फळं असा सगळा पाहुणचार असला म्हणजे फुलपाखरं आपल्या निमंत्रणाला मान देऊ शकतात. आपल्या अगदी जवळून जेव्हा फुलपाखरू पहिल्यांदा उडून गेलं तो क्षण किती जणांना आठवतोय? आपल्या मुठीत ते भिरभिरतं सुंदर पाखरू पकडायचा प्रयत्न किती जणांनी केलाय? आणि मग पुढं लक्षात येतं, की फुलपाखराची खरी मजा तर ते आपल्याच मस्तीत जेव्हा भिरभिरत असतं, फुलावर बसतं ते बघण्यात आहे. मुठीत पकडून ते कसं होणार? अनेक ठिकाणी आता खास फुलपाखरांसाठी बागा विकसित होताहेत. त्या कशा तयार करतात? एकदा जाऊन विचारायला हवं, हो ना? जवळपास अशी एखादी बाग आहे का नक्की बघा. 

आणि आता गोष्ट. तुम्हाला माहितीये? फुलपाखरावर फारशा गोष्टी नाहीयेत. जगात अनेक ठिकाणी अनेक लोककथांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे प्राणी भेटतात. अगदी अस्वलापासून कावळ्यापर्यंत सर्व प्राणी गोष्टीत येतात. पण फुलपाखरू नावाचं रंगीत रहस्य फार थोड्या लोककथांमध्ये सापडतं. अशीच एक कथा ‘अमेरिकन इंडियन्स’मधली... 

अमेरिकतील मूळ स्थानिक जमातींना ‘अमेरिकन इंडियन्स’ असं संबोधलं जातं. अमेरिकेच्या अरिझोना राज्याच्या ‘दक्षिण अरिझोना’त वस्ती करून राहिलेल्या पॅपगो अमेरिकन इंडियन्सची ही कथा आहे. फुलपाखरांची निर्मिती कशी झाली असावी या विषयीची ही गोष्ट आहे. 

एकदा उन्हाळा खूप कडक पडला होता. लोकांना पुरेसं पाणी मिळतं आहे की नाही हे पाहण्यासाठी एके दिवशी विश्‍वनिर्माता एका गावात गेला होता. तिथं खूप मुलं खेळत होती. विश्‍वनिर्माता तिथं थांबला आणि मुलांच्या चिवचिवाटाचा आनंददायी आवाज ऐकत उभा राहिला. तिथंच डोक्‍यावर लाकडाची मोळी घेऊन जाणारी एक म्हातारी त्याला दिसली. एक फार म्हातारा कायोटी (लांडग्यासारखा दिसणारा उत्तर अमेरिकेतील जंगलातील एक प्राणी) सुद्धा तिथं होता. म्हातारीला आणि वृद्ध कायोटीला बघून विश्‍वनिर्मात्याचं मन भरून आलं. तो एका मोठ्या कॉटनवूड वृक्षाच्या सावलीत बसला. तो वृक्षही पुराणा होता. त्याची पानं पिकून पिवळी झाली होती. थोडीफार सावली तो वृक्ष देऊ शकत होता. त्या सावलीत बसून विश्‍वनिर्मात्यानं विचार केला, जे म्हातारं होणार नाही, मोठं होऊन सुरकुतणार नाही, वाकणार नाही, मुलांसारखं जे कायम आनंदी असेल ते काय असेल? कसं निर्माण करता येईल? 

पुढं विश्‍वनिर्मात्यानं काय केलं? त्याला कधीही म्हातारं होणार नाही असं काय गवसलं? 

(गोष्ट संदर्भ : अक्षर वाङ्‌मय)

संबंधित बातम्या