लढाई आणि फुलं 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

गंमत गोष्टी 
कशापासून काय होते?...

 

(फर्डिनंडची गोष्ट पुढे चालू...) 
... त्यानंतर आली घोडेस्वारांची तुकडी. त्यांच्या हातात बैलाला मारायला लांब लांब भाले होते. शेवटी आला मेटाडोर. मेटाडोर म्हणजे बैलांशी झुंजणारा माणूस. त्याचा थाट काही वेगळाच होता. तो छान दिसत होता. आपल्या देखणेपणाचा त्याला अभिमान असावा असं त्याच्याकडं बघून वाटत होतं. त्यानं आधी झुकून महिलांना अभिवादन केलं. त्याच्या डोक्‍यावर लाल टोपी होती आणि हातात एक तलवार होती. या तलवारीनं तो बैलाला मारणार होता. शेवटी बैल आला. तो कोण होता हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. हो ना? फर्डिनंड!! 

सगळे लोक फर्डिनंडला बघून घाबरले. म्हणाले, ‘काय आडदांड बैल आहे हा.’ बॅंडवाल्यांचा त्याला पाहून थरकाप झाला. घोडेस्वारांची घाबरगुंडी उडाली. आणि मेटाडोर? तो तर फर्डिनंडला पाहून थरथर कापू लागला. फर्डिनंड धावत धावत मैदानाच्या मध्यभागी पोचला. त्याला पाहून लोक ओरडू लागले. जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. सगळ्यांना वाटलं, की हा भयंकर दिसणारा बैल मस्त लढाई करणार आणि शत्रूला त्याच्या टोकदार शिंगांनी मारणार! 

पण फर्डिनंडच्या मनात वेगळाच विचार होता. तो त्या लढाईच्या मैदानाच्या मध्यभागी पोचला आणि त्याला काय दिसलं! तिथं बसलेल्या स्त्रियांच्या केसातली सुंदर फुलं! फर्डिनंड चक्क त्या फुलांच्या दिशेनं जाऊ लागला. त्याला त्या फुलांचा वास घ्यायचा होता. फर्डिनंडनं मनात पक्कं ठरवलं होतं, या लोकांना काय हवं ते करू द्या. मी काही या लोकांबरोबर मारामारी करणार नाही. त्याचं हे जगावेगळं वागणं बघून बॅंडवाले गोंधळून गेले. घोडेस्वारांना काहीच समजेना झालं. बिचारा मेटाडोर भडकलाच. आता कसला तो आपली लाल टोपी घालून तलवारीच्या करामती दाखवणार? शक्‍यच नव्हतं. शेवटी लोकांना नाईलाजानं फर्डिनंडला घरी पाठवावं लागलं. 

मला कळलंय त्यानुसार तो फर्डिनंड बैल अजूनही आपल्या आवडत्या कुरणात आपल्या आवडत्या बकुळीच्या झाडाखाली बसला आहे.. आणि शांतपणं त्या फुलांचा वास घेतो आहे. तो खरंच खूप खूष आहे. 

*** 

मित्रहो, ओरोच आजोबांपासून सुरू झालेला प्रवास फर्डिनंडच्या गोष्टीपर्यंत आपण बघितला. जगातल्या सगळ्या ढवळ्या, पवळ्या, मोऱ्या, फर्डिनंडचे ओरोच हे आजोबा. अर्थात आपलं नाव ओरोच आहे हे काही त्यांना ठाऊक नसणार. त्यांच्यात काही एकमेकाला नावानं ओळखण्याची बात नसणार. एकमेकाला ‘नावं’ ठेवणं हीसुद्धा अगदी ‘Being Human’ गोष्ट आहे ना. प्राणी एकमेकाला कसं ओळखत असतील? आवाजावरून? गंधावरून? आणि झाडं? झाडांना दुसरं कुणी ओळखू येत असतील का? आपली जागा कधीही न सोडणाऱ्यांना कशाला हवी आहे दुसऱ्याची ओळख? असं काही मनात येतंय का तुमच्या? तर मग सावधान. या प्रांतात कदाचित तुम्हाला काही नवल भेटण्याची शक्‍यता आहे. 

इतर सजीवांत काय चालत असेल ते असो. पण माणसं मात्र नावं ठेवत आली. म्हणजे बघा, आधी नुसतं बैल म्हणायचं, म्हणजे मग तो माकडापासून वेगळा, पोपटापासून, गाईपासूनही वेगळा हे तर कळतंच; पण पुढं जाऊन त्याला मोऱ्या, फर्डिनंड असली नावं द्यायची. काय म्हणालात? सामान्य नाम आणि विशेष नाम? हो बरोबर. तेच तेच. असं आपण का करत असू? अशी आणखी कोणती उदाहरणं तुम्हाला आठवतात? कुत्रा... आणि तुमच्या घरी असलेला एखादा बाजी, चॉको, टोबी इत्यादी. घरी नसला तरी हरकत नाही. आपल्या मनात आपला एक ‘टायगर’ असू शकतो. महत्त्वाचं काय की आपण नाव देतो. 

आपण ओरोचच्या जवळ आलो, ओरोच आपल्या जवळ आला, तिथपासून फर्डिनंड घडला. असे कळप सोडून वागणारे फर्डिनंड काही सगळ्यांना आवडत नाहीत. बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या हे सगळे कसे पाहिजेत? मालकाचं म्हणणं ऐकणारे पाहिजेत. मालकाला हवं तसं वागणारे पाहिजेत. तसं झालं नाही तर मग त्यांची काय दशा? 

चार्ली चॅप्लिनचा एक सिनेमा आहे, ‘मॉडर्न टाइम्स’ नावाचा. सिनेमा सुरू होतो तेव्हा एक भारी दृश्‍य दिसतं. मेंढ्यांचा एक कळप निघाला आहे. दाटीवाटीनं चालणाऱ्या, एकसारख्या दिसणाऱ्या मेंढ्यांचा कळप आणि पुढचंच दृश्‍य अशाच दाटीवाटीनं चालणाऱ्या एकसारख्या दिसणाऱ्या माणसांचं आहे. इतकी गंमत वाटते हे दृश्‍य बघताना. आपण आपल्याकडंच वेगळ्या नजरेनं बघतो. हा सिनेमा जरूर मिळवून बघा. पुढची गोष्ट ऐकायला मात्र जरूर या.

फोटो फीचर

संबंधित बातम्या