फर्डिनंडची गोष्ट 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

फर्डिनंडची, म्हणजे आपल्या बैलोबाची, एक आवडती जागा होती. तो ज्या कुरणात चरायचा तिथं एक सुंदर वासाच्या फुलांचं झाड होतं. आपल्याकडं कसं बकुळीचं झाड असतं ना तसं! त्याच्याखाली बसायला त्याला आवडायचं. दिवसभर तो त्या झाडाखाली फुलांचा मनसोक्त वास घेत बसायचा. त्याच्या आईला, म्हणजे गाईला काळजी वाटायची. असं कसं हे आपलं पोर? हा असा एकटा राहिला तर उदासवाणा नाही होणार? 

ती विचारायची, ‘बाळा फर्डिनंड, तू इतर वासरांबरोबर खेळत का नाहीस? जा जरा त्यांच्यात.. मस्ती कर.’ फर्डिनंड नुसतंच डोकं हलवायचा आणि म्हणायचा, ‘इथंच शांतपणे फुलांचा वास घेत बसून राहायला आवडतं.’ फर्डिनंडची आई समजूतदार होती; म्हणायची, ‘बसू दे लेकरू! त्याला बरं वाटतंय ना!? मग झालं तर!’ 

हळूहळू वर्षं सरली. फर्डिनंड आता चांगला तगडा बैल झाला. त्याचे मित्र त्याच्याबरोबरच मोठे झाले होते. दिवसभर ते एकमेकांबरोबर दंगामस्ती करत. एकमेकांशी टकरा घेत. आपली टोकदार शिंगं दुसऱ्यांना टोचत. त्या सगळ्यांची एकच इच्छा होती, ‘आपल्याला कोणीतरी माद्रिदला घेऊन जावं.’ माद्रिद म्हणजे स्पेनची राजधानी! तिथं बैलांच्या झुंजी चालायच्या. तिथं जाऊन आपण आपलं कसब दाखवावं असं त्यांना वाटत असे. फर्डिनंडला मात्र झुंजीबिंजीची आवड नव्हती. त्याला त्याच्या आवडत्या झाडाखाली बसून फुलांचा वास घेत राहायला आवडायचं. 

.. आणि मग तो दिवस आलाच! त्या दिवशी गावात चित्रविचित्र टोप्या घातलेले पाचजण आले. ते सर्वांत मोठा, ताकदवान आणि तल्लख बैल निवडायला आले होते. माद्रिदमध्ये होणार असलेल्या बैलांच्या झुंजीसाठी त्यांना बैल निवडायचा होता. या माणसांच्या समोर सगळे बैल आपलं कसब दाखवायला पळू लागले, उड्या मारायला लागले, एकमेकाला धडका देऊ लागले. त्यांना वाटलं, की असं केलं की टोपीवाल्यांना आपली ताकद कळेल आणि ते आपली निवड करून माद्रिदला घेऊन जातील. 

फर्डिनंडला माहीत होतं, की आपली निवड कोणी करणार नाही. तशी त्याला पर्वाही नव्हती. तो त्या तमाशापासून लांब निघाला आणि आपल्या आवडत्या झाडाखाली येऊन बसला. पण तेवढ्यात एक गोंधळ झाला. फर्डिनंड बसायला आणि एक भुंगा त्याच जागेवर येऊन बसायला एकच गाठ पडली. फर्डिनंड त्या भुंग्यावरच बसायचा. तेवढ्यात भुंगा सावध झाला आणि त्यानं फर्डिनंडला कडकडून चावा घेतला. आता तुम्ही जर भुंगा असाल आणि एक बैल जर तुमच्यावर बसत असेल तर तुम्हीही हेच कराल ना! भुंग्यानं फर्डिनंडचा कडकडून चावा घेतला. 

‘अरे बापरे! काय हा जीवघेणा चावा!!’ फर्डिनंड जोरानं कळवळला. त्यानं उंच उडी मारली आणि तो धावत सुटला. धावताना तो जोरानं ओरडत होता, खुरांनी आणि शिंगांनी जमीन उकरत होता, ओरडत होता. 

अशा या फर्डिनंडला पाहून पाचही टोपीवाले खूष झाले. त्यांना मोठा ताकदवान, शूर बैल मिळाला होता. माद्रिदच्या लढतीसाठी हा बैल एकदम योग्य होता. त्यांनी फर्डिनंडला एका खूप मोठ्या घोडागाडीत बसवलं आणि त्याला माद्रिदला घेऊन गेले. 

एखादी जत्रा असावी तसा तो माद्रिदमधला दिवस होता. सगळीकडे झेंडे फडकत होते. बॅंड-बाजाचे आवाज घुमत होते. जत्रेला आलेल्या सर्व स्त्रियांच्या केसात सुगंधी फुलांचे गजरे माळलेले होते. 

त्यानंतर त्या लढाईच्या गोल मैदानात एक मोठी मिरवणूक निघाली. त्यात सर्वांत पुढे बॅंडवाल्या शिपायांची तुकडी आली. त्यांच्याकडे लांब लांब टोकदार भाले होते. त्यांना लांब लांब रिबिनी लावलेल्या होत्या. त्या भाल्यांनी ते बैलाला टोचणार होते. टोचणीच्या दुःखानं बैल वेडा होत असे. 

पुढं काय झालं? फर्डिनंडला पण अशाच दुःखाचा सामना करावा लागला का? त्यानं काय केलं? 

पाहूया पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या