माणूस होण्याची गोष्ट 

मृणालिनी वनारसे 
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

गंमतगोष्टी
कशापासून काय होते?...

चिकूनं ते चित्र पुन्हा पुन्हा बघितलं, अगदी पुन्हा पुन्हा. 
ती त्या चित्रानं अगदी विचारमग्न होऊन गेली. चित्रात दाखवलेल्या सगळ्यांमधे काय सारखं आहे? काय वेगळं? तिला ठरवता येईना..  तो सगळ्यात शेवटी ताठ उभा असलेला माणूस.. त्याला बघून कसं ओळखीचं वाटत होतं.. त्याच्या जरा मागं उभा असलेला तो.. आणि त्याच्या मागं असलेला तो? सगळ्यात सुरवातीला दाखवलेला तर फारच भयंकर वाटला तिला. याच्यापासून आपण आलो... म्हणजे? बरं झालं बाई आपण आत्ता आलो... तिला वाटलं. कसं जमलं असतं आपल्याला जर आपण तेव्हा त्या काळात असतो? 

पण असं कसं होईल? या प्राण्यापासून हा माणूस तयार व्हायचा म्हणजे.. चिकू आठवायला लागली.. कशापासून काय होतं...? म्हणजे झालंच तर बाळापासून मोठा माणूस तयार होतो. हे सत्य तिला आता कळून आलंच होतं. शेजारचं छोटं बाळ घरी आलं तेव्हा केवढुसं होतं.. आता ते चालायला लागलंय आणि त्याची उंची तरी किती भरभर वाढतीये! आपणसुद्धा असेच छोटे होतो. तिला घराच्या भिंतीवर फ्रेम करून लावलेला आपला बाळफोटो फार फार आवडायचा.. आपण असे होतो? त्या फोटोकडं बघून तिला खुद्‌कन हसू यायचं.. त्या फोटोतल्या बाळाला जवळ घ्यावं वाटायचं. घरी आलेल्या पाहुण्यांनी त्या फोटोचं कौतुक केलं की तिला आवडायचं. 

अजून कशाचं काय होतं? तियाच्या घरी कुंडीत मिरचीचं झाड होतं. त्याला एकदा छान पांढरं फूल आलं. ते गळून गेलं आणि मग छोटी मिरची दिसायला लागली. ती मोठी झाली, मग लाल झाली.. चिकूनं ते सगळं जवळून पाहिलं होतं.. 

मटारात एक दिवस अळी सापडली होती, तर चिकू केवढी किंचाळली होती. ती त्या अळीला मारणारच होती, तर आई म्हणाली, ‘मारू नकोस. तिला झाडात सोड. त्यातून एखादं फुलपाखरू बाहेर येईल.’ ही तर चिकूला अक्षरशः जादू वाटली. दोन रंगीत चमचमणारे पंख तिच्या मनात उमलले. हे छान आहे. असं व्हायला काहीच हरकत नाही.. त्या मटारवाल्या अळीचं काय झालं कुणास ठाऊक, पण नंतर तिनं शाळेच्या ट्रीपबरोबर जाऊन अळी, कोष, फुलपाखरू सारं काही पाहिलं. तिला मजा वाटली. 

पण या भयानक प्राण्यापासून माणूस! हे जरा भयंकर आहे. तिला वाटलं. कदाचित फुलपाखराला अळीचा फोटो दाखवला तर असंच वाटेल का? त्याला हे आपण आहोत हे समजेल का? 

चिकू त्या दिवशी शाळेतून घरी गेली आणि केसाळ प्राण्यापासून माणूस होण्याची गोष्ट तात्पुरती विसरून गेली. जेवण, झोप झाल्यावर शेजारचं छोटं बाळ घरी खेळायला आलं. चिकूचं दप्तर ही त्याच्या अतिशय आवडीची गोष्ट होती. त्यानं गेल्या गेल्या तिच्या दप्तराचा ताबा घेतला. तो वेगानं त्यातल्या वस्तू बाहेर काढायला लागला, तशी चिकूनं त्याला बजावलं, ‘तू आता मोठा झालायस. असं वेड्यासारखं वागतात का? हे बघ मी तुला गोष्ट सांगते. नीट बैस आणि बघ..’ तिनं त्याला समोर बसवलं आणि ‘ते’ चित्र दाखवलं. ‘आपण असे झालोत. तुला कळलं का?’ 

केसाळ प्राण्याचं चित्र काही बाळाला आवडलं नाही. त्यानं चेहरा वाकडा केला. तशी चिकू म्हणाली, ‘अरे खरंच, आपण याच्यापासून झालोय..’ 

पण कसे? पण कसे? मला लहानपणीचं थोडं थोडं आठवतं. तसं माकडपणीचं का नाही आठवत? 

चिकूच्या डोक्‍यातून काही हा विषय जाईना... 

(क्रमशः)

संबंधित बातम्या