आयत्या पोळीवर 

मृणालिनी वनारसे 
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

गंमतगोष्टी
कशापासून काय होते?...

आजोबा वानर हसतं?’ चिकूनं मोठ्या अभ्यासूपणे विचारलं. 

‘होहोहो! हाहाहा!! आमच्या छोट्या चिकूला फणसाएवढे प्रश्न पडले आहेत..’ आजोबा सांताक्‍लॉजसारखे हसत म्हणाले. तशी गाल फुगवून चिकू म्हणाली, ‘यात हसण्यासारखं काय आहे?!’ 

‘अगं, मी विनोद केला.. आता तो न कळून तू हसली नाहीस तर तू नर की वानर?’ आजोबा चिकूच्या डोक्‍यावर हात ठेवून म्हणाले. ‘तसं मला वाटतंय, हे आमचं वांदरच आहे.’ 

‘आजोबा..’ चिकू फुरंगटत म्हणाली.. ‘मी नाहीये वांदर..’ 
‘मग हास बघू!’ 

‘आजोबा, मला जोक कळला, म्हणूनच मी हसत नाहीये ना!’ 
‘मोठं हुशार वांदर आहे, आपलं ते, पिलू आहे..’ 

‘आजोबा..’ 
‘अगं खरंच म्हणतोय मी. तूच मघाशी विचारत होतीस ना, कोण कोण हसतं म्हणून? तुझ्या प्रश्‍नाचं उत्तर तूच दिलंयस..’ 

आजोबांचं बोलणं चिकूला काही कळेना. तेव्हा आजोबाच पुढं म्हणाले, ‘चिकू, जोक कळून तू हसलीस किंवा जोकवर रागावून हसली नाहीस की तू म्हणजे ते काय म्हणता तुम्ही आजकाल, बिईंग ह्यूमन.. वांदराला जोक सांगून बघ बरं..’ 

‘आजोबा, काहीही हां तुम्ही, त्या वांदराला काय मी हत्ती आणि मुंगीचा जोक सांगणारे का?’ चिकू हसत म्हणाली. 

‘अगं, सांगून तर बघ, कदाचित ते तुला त्याच्याकडचे आणखी दोन जोक सांगेल, हत्ती आणि मुंगीचे.. आणि म्हणेल, माझे जोक्‍स एकदम ओरिजिनल आहेत हां, मी जंगलातून आणलेत..’ 

‘आजोबा.. काहीही...’ 
‘तेच तर.. असं काहीही होत नाही..’ 
‘म्हणजे वांदर हसत नाही?’ 

‘असं मात्र नाही.. ती हसतात, निदान तशी दिसतात, तेव्हा ती हसतात असं आपण समजूया..’ 

‘मग ते कसं काय?’ 
‘ते असं, तू त्या शेजारच्या बाळाबरोबर खेळतेस ना? बुवा.. कुकुक... मग काय होतं?’ 
‘बाळ हसतं, त्याला खूप आवडतं असं खेळायला, कितीही वेळा.. वेडाच आहे तो’ चिकू अगदी ताईच्या आविर्भावात म्हणाली.. 

‘हां, अगदी अशाच गमतीजमती काही प्राण्यांना पण आवडतात.. वांदरांना तर विशेष. एकमेकांच्या खोड्या काढायच्या, मस्ती करायची, मग ती गुदगुल्या झाल्यासारखी हसतात! निदान तशी दिसतात..’ 

‘हो हो, आज आईला पण तसंच दिसलं.’ 
‘हो ना, मग आई आता वैतागलीये की काय? चल आपण तिला मदत करू,’ आजोबा आणि चिकू स्वयंपाकघरात जात असताना चिकू पुन्हा म्हणाली, 

‘म्हणजे आजोबा वांदर शेजारच्या बाळासारखं अजून बुद्धीनं लहान आहे का?’ 
‘बुद्धीनं लहान, होहोहो, हाहाहा, जगात बुद्धीनी महान फक्त एकच बाळ आहे बरं का! कोण ते सांग बघू?’ 

‘तसं नाही हो आजोबा’ चिकू रागावत म्हणाली. 
‘माणसाएवढं बुद्धिमान कुणीच नाही असं म्हणायचंय मला’ 

‘तसं तर कधीच म्हणू नको चिकू, तसं तर अजिबात काही नाही’ आजोबा गंभीर होत म्हणाले.. 

आत आईच्या पोळ्या चालू होत्या. 
‘तुला काही मदत हवी का गं?’ आजोबांनी तिला विचारलं. ‘आज एका वानरानं तुझ्या पोळ्या नेल्या म्हणे..’ 

‘पोळ्या तर होत आल्या, वानराला म्हणावं पुढच्या वेळी पोळीबरोबर भाजी पण घेऊन जा. नुसती पोळी कशी खाणार नाही का? आणि आम्हीतरी नुसत्या भाजीचं काय करणार’ आई तव्यावर पोळी उलटताना म्हणाली. 

‘होहोहो, मोठी मजेशीर आहे बघ तुझी आई चिकू. अशी गंमत जमली म्हणजे बिईंग ह्यूमन जमलं काय?’ 
‘अजून एक गोष्ट कळलीये,’ चिकू डोळे मिचकावून म्हणाली. 

‘भाजीला लावून पोळी माणसाशिवाय दुसरं कुणीच खात नाही! वानर म्हणजे नुसती पोळी, नर म्हणजे भाजीला लावून पोळी!’ 
आई आणि आजोबा दोघंही तिच्याकडं हसून बघू लागले... 

मित्रांनो, तुम्हाला काय फरक दिसतो आपल्यात आणि इतर प्राण्यांत? खूप काय काय सुचतंय ना? मग लिहून आमच्याकडं पाठवा. तुमच्या उत्तराचा चिकूला खूप खूप फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या