लांडगा झाला कुत्रा 

मृणालिनी वनारसे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

गंमतगोष्टी
कशापासून काय होते?...

फार फार वर्षांपूर्वी, बरं का चिकू, जगात कुत्रा नावाचा प्राणीच नव्हता..’ चिकू आजोबांकडून गोष्ट ऐकत होती. 

‘कुत्रा नव्हता?’ चिकू एकदम गलबलली. कुत्रा नसलेल्या जगाची तिला कल्पना करता येईना. तिच्या स्वतःकडे कुत्रा नव्हता. पण तो तिला एकदिवस मिळेल असं तिचं स्वप्नं होतं. 

कुत्रा नसेल तर कुणाच्या गळ्यात पट्टा बांधणार? कुणाला चालायला नेणार? कुणाशी खेळणार? तिनं तिच्या भावी ‘कु च्या पि’चं नाव ठरवलं होतं, ‘चॉको.’ ते नाव तरी कुणाला देणार? छे. असं कशाला होईल की कुत्रा नसेल? आजोबा मला मुद्दाम काहीही सांगताहेत. त्यांना वाटतंय मी कुत्रा आणू नये. 

‘असं कधी नव्हतंच. तुम्ही मला बनवून सांगताय..’ चिकू आजोबांची गम्मत पकडल्याच्या आविर्भावात म्हणाली. 

‘अगं ऐक तर खरी. आताचा जो कुत्रा आहे ना तो एके काळी लांडगा होता.’ 

‘कुत्रा लांडगा होता? आजोबा, तुम्ही मला जादूची गोष्ट सांगताय का?’ 

‘नाही गं बाळा. अगदी खरी गोष्ट सांगतोय. जगात तेव्हा लांडगे होते. आतासुद्धा लांडगे आहेतच. पण तू कसं मला परवा वानर ते नर चित्र दाखवलंस ना तसं. आपले पूर्वज वानर म्हणजे एप होते. आता ज्या वानर आजोबांपासून आपण झालो ते तर काही कुठं जिवंत दाखवता येत नाहीत. पण आपण सगळी त्यांचीच नातवंडं आहोत. तसंच आहे हे..’ 

‘ओह आय सी’ चिकू म्हणाली. तसं असेल तर तिची काही हरकत नव्हती. शिवाय तिला ‘ओह आय सी’ असं म्हणायला फार आवडायचं आजकाल. 

‘तर लांडग्याचा कुत्रा झाला तरी कसा?’ आजोबा म्हणाले. 
‘हो ना. वानराचा नर झाला तरी कसा?’ सगळी कोडीच आहेत अशा स्वरात चिकू म्हणाली. 

‘ते आपण बघू पुढं, पण लांडग्याचा कुत्रा झाला ना चिकू त्या गोष्टीत माणसाला एकदम सॉलिड रोल आहे.’ 

चिकू आजोबांकडं बघत राहिली. काय गोष्टी काढतील आजोबा त्याचा नेम नव्हता. ‘नीट सांगा.’ तिनं फर्मान सोडलं. 

‘म्हणजे असं की जवळपास पस्तीस हजार वर्षांपूर्वी किंवा गेला बाजार पंधरा हजार वर्षांपूर्वी तरी नक्कीच, माणूस आणि लांडगा एकमेकांचे मित्र होऊ लागले..’ आजोबांनी गोष्टीची सुरवात केली. 

‘गेला बाजार म्हंजे? बाजार म्हणजे मॉल ना आजोबा? म्हणजे माणूस त्या वेळच्या मॉलमध्ये गेला होता तेव्हा तिथं त्याला..’ 

‘चिकू..’ आजोबा तिला थांबवत म्हणाले. ‘अगं कसला मॉल? मी जेव्हाची गोष्ट सांगतोय ना, तेव्हा मॉलमधला ‘मॉ’पण नव्हता.’ 

‘ऑ?’ 

‘हो ना. माणसं शिकारीला जायची बाजारात..’ 

‘आजोबा, बाजारात? शिकारीला जंगलात जातात ना..’ चिकू कपाळावर हात मारत म्हणाली. 

‘तेच बघत होतो गं तुझं लक्ष आहे ना म्हणून..’ आजोबा हसत म्हणाले. ‘तर तेव्हा, जेव्हा माणसं शिकारीला जंगलात जात होती, लांडगे पण जंगलात होते. तू जंगलातला लांडगा पाहिलास ना चिकू, तर तो तुला असा दिसेल.. एकदम खतरनाक. असे त्यांचे तीक्ष्ण सुळे आणि नखं. त्यांचे आवाजपण भीतीदायक. कुत्रा कसा भुंकतो ना, त्याहीपेक्षा डेंजरस..’ 

‘पण मला तर कुत्र्याच्या ओरडण्याची अजिबात भीती वाटत नाही.’ चिकूचं कुत्राप्रेम जराही मार खाण्यातलं नव्हतं. 

‘हो ना. तुझ्यासारखीच काही मुलं आणि मोठी माणसं तेव्हापण असली पाहिजेत. त्यांच्यामुळं झालं असं की माणूस आणि लांडगा यांच्यात चक्क मैत्री होऊ लागली.. आणि त्यानंतरच आजची तुला आवडतात ती ‘कु ची पि’ जन्माला आली.. काही कळलं?’ आजोबा चिकूकडे हसून बघत म्हणाले. 

‘वाटतंय मला थोडं थोडं कळतंय..’ चिकू डोळे मोठे करत म्हणाली. 

‘तर अशा या मैत्रीची आणि लांडग्याचा कुत्रा होण्याची गंमतगोष्ट आता मी तुला सांगणार आहे. तयार?’ 

चिकू सरसावून बसली. 

क्रमशः

संबंधित बातम्या