मोगलीच्या आधीची गोष्ट!

मृणालिनी वनारसे 
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

गंमतगोष्टी

कशापासून काय होते?...

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. फार फार म्हणजे तरी किती? असं समजा की तेव्हा मोगली आणि रामाची दोस्ती व्हायची होती. किंवा समजा दहा पंधरा हजार वर्षांपूर्वीची! तेव्हा नव्हता फोन, नव्हता टीव्ही, नव्हती साधी बैलगाडी. काय सांगता, तुम्हाला ठाऊक आहे? 

मग हे तरी सांगा की माणसं एकमेकांशी चॅट कशी करायची? कोणती भाषा बोलायची? काय काय बोलायची? बोलत असतील का माणसं पोट भरून खाण्याबद्दल? चिकन बर्गर की चीज पिझ्झा ? नव्हतं असलं ? हुशार आहात, मग काय होतं? सांगा पटापट.

माणसं बोलत असतील का फळ, मूळ, पानांबद्दल? झऱ्याच्या पाण्याबद्दल, नदीतल्या माशांबद्दल, आणि कधीतरी मिळून करण्याच्या शिकारीबद्दल? एखादा ससा, एखादं सांबर, एखाद्या वेळी एखादं डुक्कर! असली मजा करायला हवी, म्हणून माणसं देत असतील टाळी..एखादं हरिण पोट भरायला, एखादं अस्वल अंग झाकायला..असली चैन नेहमी नव्हती..शिकार काही ऑनलाइन नव्हती..शिकार म्हणजे पायपीट आली, दिवस दिवस एका जागी दबा धरायची शिक्षा आली. एवढं सगळं झाल्यावर एखाद्या वेळी एक भेकर, एखादं साळिंदर, एखादं डुक्कर..

मग शिकार गावल्यावर पुढचं सगळं करणं आलं. कधी तिथेच, कधी घरी नेऊन मग खाणं आलं..असंच एकदा शिकारीनंतर, माणसं जेवण झाल्यावर देत होती ढेकर, खाऊन सुद्धा खूप उरलं म्हणून होती कुरकुरत..त्यांना काय ठाऊक होतं, उरलेल्या जेवणाला रानात एक मोठं गिऱ्हाईक होतं. सुळेवालं, शेपटीवालं, भुकेलं जनावर होतं. राहिलेल्या जेवणावर मारायचा होता त्यांना ताव, चट्टामट्टा कसा करायचा त्यांच्या कडून शिका ना राव! 

असाच एक शिकारीच्या वेळी भुकेला लांडगा जवळ आला, माणूस चांगलाच घाबरला. खातो काय मला? पण त्याला साफ करताना, बघून माणसाला अंदाज आला.... भुकेला आहे बिचारा, सुखानं खाऊ द्यावं त्याला.

मग जमली त्यांची जोडी. लांडगा पण होता भारी, एक दिवस त्यानं चक्क माणसाला मदत केली. जखमी एका हरणाला, पाठलाग करून पळवलं, माणसाच्या पुढ्यात अलगद आणून उभं केलं. पुढचं काम सोपं होतं..एकमेकाशी जुळतंय आपलं दोघांच्याही लक्षात आलं. एकदा तर लांडगोबांच्या पायात काटा गेला, दोन बोटं जुळवून माणसानं तो अलगद काढला..असं म्हणतात तेव्हापासून लांडगा माणसाच्या अर्ध्या वचनात आला! 

पुढे काय झालंय म्हणता? माणूस पुढे लांडगा मागे, त्यांच्या असल्या युतीने सारे जंगल थरारे. 

अशी खूप वर्षं गेली, शिकारीसोबत शेती आली. गहू, तांदूळ, बार्ली, मका.. लांडगोबाला तोही चांगलाच रुचला..वर्षामागून वर्षं सरली, माणूस आणि लांडग्याची मैत्री चांगली पक्की झाली. फक्त आता तो नव्हता लांडगा, त्याच्या मूळ रूपाचा त्याला जसा विसरच पडला..

रानात होते लांडगे अजून, सगळेच नव्हते गेले बदलून..बदलले ते माणसाचे मित्र झाले, त्याचा पट्टा गळ्यात घालून त्याचा पेट डॉगी झाले!

असं म्हणतात डॉगी मधे आणि जंगलातल्या लांडग्यामधे अजून थोडे चॅट होते. कोण कुणाला आठवण देते, कोण कुणाला बोलावते..

त्यांचीच गोष्ट ऐकू पुढे, कुत्र्याने लांडग्याला एकदा काय सांगितले? गुगल नको, डोके खाजवा बरे...

संबंधित बातम्या