लांडगा आणि कुत्रा 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 8 मार्च 2018

गंमत गोष्टी

कशापासून काय होते?...

लांडगा आणि कुत्र्याची गोष्ट. लांडगा झाला कुत्रा त्याची गोष्ट. आजही लांडगे आहेत, कुत्रा तर आहेच आहे. या आताच्या कुत्र्यांचे तेव्हाचे लांडगेआजोबा. आताच्या लांडग्यांसारखेच असतील. पण तेच असतील असं नाही. आताच्या लांडग्यांचे कुत्रे होतील, असंही नाही. तेव्हाचे लांडगेआजोबा आणि तेव्हाचे माणूसआजोबा यांनी एकमेकांशी मैत्री केली. त्या मैत्री जुळवलेल्या लांडगोबाची नातवंडं हळूहळू वेगळी होत गेली. माणसाची पिलंपण हळूहळू शिजवून अन्न खायला, शेकोटीच्या उबेत राहायला सरावली. रात्रीच्या वेळी या नव्या मित्रानं माणसाचं रक्षण करावं, कोणी अन्य शिकारी प्राणी, माणसं आसपास आली तर मोठ्यानं भुंकून माणसाला जागं करावं आणि माणसानं त्याला आणलेल्या शिकारीतला हिस्सा द्यावा, कधीमधी एखादा गव्हाचा रोट द्यावा, त्याच्या पिलांची काळजी घ्यावी असं चाललं होतं. पिलं मग माणसाच्या आजूबाजूलाच वाढत. माणसाशी त्यांची चटकन दोस्ती होई. माणसाचा सगळ्यात पहिला प्राणी-मित्र बनला होता लांडगा, म्हणजे लांडग्यापासून बनलेला कुत्रा. जमिनीखालच्या उत्खननात तेव्हा म्हणजे जवळपास पंधरा हजार वर्षांपूर्वी युरोपात मिळालेले माणूस आणि कुत्र्याचे एकमेकांशेजारी सापडलेले सांगाडे आहेत. कशी असेल ना त्यांची दोस्ती..!

तर असा हा माणसाचा मित्र बनलेला लांडगा कुळातील प्राणी आणि जंगलात वस्ती करून राहणारा त्यांचा भाईबंद. यांच्यातली अशी गोष्ट सांगितली जाते बरं का... म्हणजे आता जी मी सांगणार आहे ती ‘गोष्ट’ आहे.. म्हणजे खरंच होता का असा एक लांडगा आणि खरंच होता का असा एक कुत्रा असं नाही विचारायचं.. मी आता लांडगा आणि कुत्र्याची कल्पनेतली गोष्ट सांगणार आहे. लांडगा आणि कुत्र्याचे आजोबा एक होते आणि हळूहळू कुत्रा नावाचा प्राणी अवतरला हे सत्य. पण त्यांच्यातल्या संवादाची ही गंमतगोष्ट? ती मात्र आपल्या मनातली. 

तर एकदा एक कुत्रा आपल्या मालकासोबत मजेत राहात होता. मालक त्याची खूप चांगली काळजी घेत असे. मालकानं त्याच्यासाठी राहायला छान घर तयार केलं होतं, उबदार बिछाना केला होता. रोज चघळायला हाडं आणि शिवाय दूध, रोटी अशी काय काय मज्जा होती. एकच झालं होतं, कुत्र्याला अधूनमधून मालकाच्या हातच्या अंघोळीचा त्रास सहन करावा लागे. शिवाय मालकानं कुत्र्याच्या गळ्याभोवती एक पट्टासुद्धा बांधला होता. मालकाच्या म्हणण्याप्रमाणं ‘काय सुंदर दिसतो कुत्रा तो पट्टा घालून!’ कुत्र्याला काही ते फार आवडत नव्हतं. त्याला मानेला जरा त्याचा काचच होता. पण माणसानं एकदा त्याला चक्क आरसा दाखवला. वा! काय रुबाबदार दिसत होता कुत्रा. कुत्र्याला स्वतःविषयी एकदम भारी वाटू लागलं. तो आरशातला गोजिरवाणा प्राणी मी आहे? गळ्यातला पट्टा कितीही काचला तरी तो घालण्यानं आपण छान दिसतो आणि शिवाय मालकाला आपल्याला घेऊन चालायला जायला सोपं पडतं यावर आता त्याचा विश्‍वास बसला. इतका विश्‍वास, की कधीमधी माणूस विसरला तर कुत्रा त्याला पट्टा आणून देई. ‘अरे मला तो पट्टा घाल ना. नाहीतर मी छान कसा दिसणार? आणि तुझ्या हातात माझं टोक कसं राहणार?’ अशावेळी माणूस खूष होई आणि कुत्र्याच्या गळ्याखाली खाजवे. कुत्रा मग जास्तच लाडात येई. 

असे दिवस चाललेले असताना एक दिवस वेगळीच मजा झाली. कुत्रा जिथं राहात होता तिथं तारेच्या कुंपणाबाहेर एक वेगळाच पाहुणा उपस्थित झाला. कुत्र्यानं त्याला पाहिलं, त्यानं कुत्र्याला पाहिलं. जुनी ओळख पटली. ‘अरे हा तर आपला रानातला भाईबंद लांडगा.’ कुत्रा मनाशी म्हणाला. ‘अरे हा तर आपल्यातलाच दिसतो आहे आणि तरीही इतका वेगळा कसा?’ लांडग्याच्या मनात विचार आला. दोघंही कुंपणापाशी येऊन एकमेकाला न्याहाळू लागले, एकमेकांशी बोलू लागले. 

काय बोलले? पाहूया पुढच्या अंकात...

संबंधित बातम्या