गड्या आपुले रान बरे! 

मृणालिनी वनारसे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

गंमतगोष्टी
कशापासून काय होते?...

‘नमस्कार!’ लांडग्याकडे पाहून कुत्रा शेपूट हलवत म्हणाला. माणसाबरोबर राहून त्याला शिष्टाचार नीट कळला होता. 

जंगलातून आलेला लांडगा त्याच्याकडे काही क्षण बघतच राहिला. कुत्रा चांगला गबरू दिसत होता. त्याच्या अंगात उत्साह होता. मालकाने अंघोळबिंघोळ घालून, खाऊपिऊ घालून त्याला अगदी नीट ठेवला होता. त्याच्या अंगचे तेज बघून लांडगा एकदम भारावला. त्याच्यासमोर आपण कुणीच नाही असे त्याला वाटू लागले. त्याचे पोट खपाटीला गेले होते. हाडे वर आली होती. त्याला दोन दिवसात काही खायला मिळाले नव्हते. रानात शिकारीसाठी दिवसभर पळून तो दमला होता. अंगावर अनेक ठिकाणी चिखलाचे ओघळ, काट्याकुट्यांतून पळताना झालेले ओरखडे होते. आपले हे ध्यान बघून लांडग्याला स्वतःचीच दया आली. असा कसा झालो मी? त्याने स्वतःला विचारले.. आणि हा जो माझ्यासमोर शेपूट तुटेल एवढी हलवतोय हा कसा काय एवढा सुंदर दिसतोय? 

‘काय म्हणताय? बरं आहे ना?’ कुत्र्याने पुन्हा विचारले. माणसे एकमेकांशी असे बोलताना त्याने ऐकले होते. शिष्टाचार. लांडगा अजूनही कुत्र्याकडे जीभ बाहेर टाकून बघत होता. त्याला ही अदब, मिठास सारे नवीन होते. या प्रश्‍नाला काय उत्तर द्यायचे हे ही त्याला माहीत नव्हते. तो नुसता दोन पावले पुढे सरकला. आता त्या दोघांच्या मधे केवळ तारेचे कुंपण होते. 

‘रानात कसे काय आहे सारे? ठीक आहे ना?’ कुत्र्याने पुन्हा विचारले. त्याची बडदास्त बघून लांडग्याचा बांध फुटला. ‘काय सांगू मित्रा, तू नशीबवान आहेस,’ तो म्हणाला. ‘आमचे आईवडील जर माणसाच्या जवळ असे राहिले असते किंवा त्यांनी आम्हाला त्यांच्यापाशी ठेवले असते, तर आम्हीही मजेत राहिलो असतो, तुझ्यासारखे. पण त्यांच्यापाशी दूरदृष्टी नव्हती. ते स्वतःही रानात वणवण फिरले आणि आम्हालाही तशीच सवय लावली. बघ ना, मी कसा झालोय. मला दोन दिवसांत काही धड खायला मिळालेले नाही. अन्न न मिळाल्याने मी अगदी क्षीण झालोय..’ लांडगा हताशपणे म्हणाला. कुत्र्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याकडे पाहिले. तो खरोखरच गरीब दिसत होता. त्याला आपण काहीतरी खायला द्यायला पाहिजे.. कुत्र्याच्या मनात आले. पण मालकाने सगळे घासूनपुसून नीट ठेवले होते. खाण्याची वेळ संपली होती. पुढचे खाणे यायला अजून उशीर होता. पिंजऱ्यात काही नव्हते. कुत्र्याला वाईट वाटले. आपण एवढी चैन करतो, त्यातले या गरीब बिचाऱ्या लांडग्याला काही देता येऊ नये ना! 

‘मित्रा तू निराश होऊ नकोस,’ कुत्रा म्हणाला. ‘तुला जेवण नक्की मिळेल. माझा मालक फार चांगला आहे. तो माझी नीट काळजी घेतो. तशी तुझीही घेईल. तो आत्ता जरा बाहेर गेलाय. तो येईपर्यंत थांब. तुला बघून तो काही म्हणणार नाही. तूही मग माझ्यासारखाच चैनीत राहशील. आपण दोघे मज्जा करू..’ 

कुत्र्याचे बोलणे ऐकून लांडग्याला हुरूप आला. खरेच असे होईल? मलाही याचा मालक ठेवून घेईल? मीही मग याच्यासारखाच मजेत राहीन. मला रोज खायला भरपूर अन्न असेल. मी ही अगदी स्वच्छ दिसेन. लांडगा खुशीत आणखी थोडा जवळ सरकला. आता कुत्रा त्याच्या अगदी पुढ्यात होता. तो आनंदानी ‘हो चालेल’ असे म्हणणार; तेवढ्यात एक गोष्ट झाली. कुत्र्याच्या मानेवरचे केस गेलेले होते. ते लांडग्याला दिसले. ‘हे काय आहे?’ त्याने विचारले. 

कुत्र्याला समजले तो काय विचारतोय. ‘ते का? ते काही नाही. मी पट्टा लावतो ना बाहेर जाताना, त्याचा वळ आहे तो. तिथले केस गेलेत. बाकी काही नाही.’ 

कुत्र्याचे हे बोलणे ऐकले मात्र, लांडगा एकदम हबकला. असे आहे तर. क्षणात त्याच्या लक्षात आले, आपण कुठे आहोत, हा कुत्रा कुठे आहे. तो एक पाऊल मागे सरकला. म्हणाला, ‘मित्रा, असू दे. तुझे अन्न तुला लखलाभ. मला माझ्या मानेवरचे केस जास्त प्रिय आहेत.’ एवढे बोलून तो माघारी फिरला. खुरडत खुरडत निघून गेला. 

कुत्र्याला काही कळेचना. आत्ता हा बरा होता. चांगला माझ्याबरोबर राहिला असता. असा का निघून गेला? वेडाच आहे. लांडगा का निघून गेला ते कुत्र्याला काही कळले नाही. 

पण मित्रांनो, तुमच्या ते नक्की लक्षात आले असेल. कुत्रे आणि आताचे लांडगे यांचे पूर्वज एकसारखे होते म्हणतात. लांडग्यांचे भाईबंद माणसाच्या जवळ आले आणि कुत्रे झाले. आता ते पूर्वी कसे होते हे त्यांनाही आठवत नाही. की आठवत असेल? 

तुम्हाला काय वाटते?

संबंधित बातम्या