फुलपाखरू.. छान किती दिसते! 

मृणालिनी वनारसे
बुधवार, 21 मार्च 2018

गंमत गोष्टी 

कशापासून काय होते?...

पिवळी पानं झालेल्या झाडाखाली बसून विश्‍वनिर्माता विचार करू लागला. जे बदलून म्हातारं होणार नाही असं काही निर्माण करावं असं त्या विश्‍वनिर्मात्याला वाटू लागलं. मुलांसारखं जे सुंदर आणि आनंदी असेल असं काही निर्माण करायची त्याची इच्छा होती. कॉटनवूड झाडाखाली बसून विश्‍वनिर्माता असे हे सगळे विचार करत होता. विचार करत असताना त्यानं वर पाहिलं तर त्याला सुकलेली पिवळी पानं दिसली. त्या पानांमधून निळंशार आकाश दिसलं. खाली पाहिलं तर पिवळ्या पानांखाली पडलेल्या सावल्या दिसल्या आणि मुलं नाचतात तशा जमिनीवर नाचणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या रेषा आणि कवडसे दिसले. हे पाहिल्यावर विश्‍वनिर्माता हसला. त्याला जे पाहिजे होतं ते त्याला सापडलं होतं. 

विश्‍वनिर्माता उठला आणि त्यानं मूठभर पिवळी पानं गोळा करून त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत ठेवली. नंतर पानांखाली असलेल्या काही काळ्या सावल्या गोळा करून त्यानं त्यादेखील आपल्या पिशवीत ठेवल्या. नंतर खाली वाकून त्यानं जमिनीवरील सूर्यकिरणं पकडली आणि पिवळी पानं, सावल्यांसोबत स्वतःजवळच्या थैलीत ठेवून दिली. नंतर काही फिकट खाकी रंगाची पानं आणि अगदी छोटीशी पांढरी फुलंही स्वतःजवळच्या त्या थैलीत ठेवली. नंतर विश्‍वनिर्मात्यानं थैलीत डोकावून पाहिल्यावर त्याच्या असं लक्षात आलं, की आणखी आणखी थोड्या पिवळ्या पानांची त्याला आवश्‍यकता आहे. यावेळी विश्‍वनिर्माता वर उंच पोचला, त्यानं पिवळी पानं घेतली आणि निळ्या आकाशाचे काही तुकडेही घेतले. इतर जमा केलेल्या गोष्टींसोबत ते कशाचे तुकडेही त्यानं जवळच्या थैलीत टाकले. 

खेळणाऱ्या मुलांनी विश्‍वनिर्मात्याला त्या कॉटनवूड झाडाखाली पाहिलं आणि त्याच्याबरोबर खेळण्यासाठी ती मुलं आली. विश्‍वनिर्माता मात्र स्वतःजवळची थैली खाली टाकून त्या थैलीवर डोकं ठेवून झोपला. झाडाच्या गार सावलीत विश्‍वनिर्मात्याला आणि मुलांना गाढ झोप लागली. 

काही वेळानंतर विश्‍वनिर्माता झोपेतून जागा झाला. झोप लागलेल्या मुलांकडं त्यानं हसून बघितलं. जवळच असलेल्या थैलीत काय आहे याचा त्यानं विचार केला. मग त्यानं मुलांना हाक मारल्या. मुलं जेव्हा जागी झाली तेव्हा त्यानी मुलांना जवळ बोलावलं आणि थैली उघडून बघायला सांगितली. पिवळी, खाकी रंगाची पानं, छोटी छोटी पांढऱ्या रंगाची फुलं, सूर्यकिरणांचे ठिपके, सावल्यांचे तुकडे, निळ्या आकाशाचे छोटे तुकडे या गोष्टी फडफडत बाहेर पडल्या. त्या सर्व गोष्टी जिवंत झाल्या. क्षण दोन क्षण हवेत तरंगल्या. सूर्यप्रकाशात नाचल्या. सगळी मुलंही त्यांना बघून नाचली. सुंदर, कधीही न बदलणारं, कधीही म्हातारं न होणारं असं काही आपण करू शकलो यानं विश्‍वनिर्मात्याला आनंद झाला. 

हाच फुलपाखराचा जन्म होय. फुलपाखरांना बघून मुलं गाणं गाऊ लागली. 

इवलंसं पाखरू दिसतं किती छान 
हवेत पळतात क्षणभर थांबतात 
चिमटीत मात्र येईनात 

मुलं फुलपाखरांसाठी गात होती. फुलपाखरं मात्र गाऊ शकत नव्हती. ज्या झाडाखाली हा नाच आणि गाणं चालू होतं, तिथं त्या झाडावर काही पक्षी बसले होते. फुलपाखरं गाऊ शकत नव्हती हे कळल्यावर ते पक्षी हसले. 

विश्‍वनिर्मात्याच्या थैलीतून फुलपाखरं जेव्हा पहिल्यांदा बाहेर पडली तेव्हा त्यांना त्यांचा मत्सर वाटला होता. कारण फुलपाखरं अतिशय सुंदर होती. पक्ष्यांना जेव्हा हे समजलं, की फुलपाखरं गाऊ शकत नाहीत तेव्हा त्यांना हसू आलं. 

विश्‍वनिर्माताही मग हसू लागला. सगळी मुलंही हसू लागली. 

असं म्हणतात, की फुलपाखरांची निर्मिती करत असताना विश्‍वनिर्मात्याला झोप लागली. बिचाऱ्या फुलपाखरांना त्यामुळं गाण्याचा लाभ झालाच नाही. फुलपाखरं कधी म्हातारी दिसत नसतील, पण त्यांना गाता मात्र येत नाही..

(कथासंदर्भ ः अक्षरवाङ्‌मय)

संबंधित बातम्या