जेराल्ड डरेल आणि त्याची पडकी भिंत 

मृणालिनी वनारसे  
गुरुवार, 22 मार्च 2018

गंमत गोष्टी    मृणालिनी वनारसे    एंटरटेनमेंट   कशापासून काय होते?...

दोस्तांनो, 

कधीही म्हातारं न दिसणाऱ्या आणि कधीही गाऊ न शकणाऱ्या फुलपाखरांची गोष्ट तुम्ही ऐकलीत. फुलपाखरं म्हातारी दिसली नाहीत तरी म्हातारी होत असतील; नाही? असा सजीव जगात कोण आहे जो कधी म्हातारा होतच नाही? तुम्हाला कधी एखादं निष्प्राण फुलपाखरू किंवा त्याचा पंख सापडलाय? कशानं मेलं असेल ते फुलपाखरू? मनात विचार येतो ना? कुठल्या पक्ष्यानं त्याला खाल्लं असेल? की ते म्हातारं होऊन मेलं असेल? आणि खरंच, फुलपाखरं गाऊ लागली तर कशी गातील...? बाकी काय असेल ते असो (गाय पाळता येते, कुत्रा पाळता येतो तशी) फुलपाखरं पाळता येत नाहीत एवढं मात्र नक्की.. त्यांना आपण आपल्यापाशी बोलावू मात्र शकतो. 

एकदा एका छोट्या मुलानं कमाल केली. त्यानं असा एक जीव पाळायचा ठरवला, की त्यानं घरातले सगळे तीनताड उडाले. ही गोष्ट आहे जेराल्ड डरेलची! जेराल्ड डरेल हा एक प्रसिद्ध निसर्गतज्ज्ञ होता. प्राणिसंग्रहालयं कशी असावीत, कशी नसावीत याचा तो तज्ज्ञ होता. प्राण्यांशी जवळीक करायची तर त्यांना पिंजऱ्यात ठेवून ती कधीच करता येणार नाही असं तो मानत असे. या ऐवजी उघड्या आभाळाखाली त्यांच्याशी अधिक चांगली मैत्री करता येते असं तो सांगत असे. त्याच्या नावानं फ्रान्समध्ये ‘डरेल वाइल्डलाइफ पार्क’ नावाचं एक वन्यप्राणी उद्यान निर्माण केलेलं आहे. 

गमतीची गोष्ट अशी, की या वन्यप्राणीप्रेमी ब्रिटिश माणसाचा जन्म १९२५ मध्ये भारतात जमशेदपूर इथं झाला होता. पुढं लवकरच त्यांचं कुटुंब ब्रिटनला मायदेशी गेलं. आपल्या मोठेपणीच्या वन्यप्राणी प्रेमाची बीजं आपल्या लहानपणाच्या अनुभवात आहेत, असं ते मानत असत. या अनुभवांवर आधारित त्यांनी ‘फॅमिली अँड अदर ॲनिमल्स’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. ते इंग्रजी साहित्यातलं एक प्रचंड खपाचं पुस्तक आहे. १९५६ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक आजही आवडीनं वाचलं जातं. 

लहानपणी जेराल्ड आपल्या कुटुंबीयांसमवेत कोर्फू नावाच्या ग्रीक बेटावर काही वर्षं राहिला. इथं त्याची निसर्गाशी जवळून ओळख झाली. अशी ओळख जिच्यासाठी त्याला फार दूर अरण्यात जावं लागत नसे. घराबाहेरच्या मोकळ्या परिसरात आणि कधी घराच्या आतसुद्धा हा निसर्ग आणि वन्यजीव त्याचं लक्ष वेधून घेत. त्याच्याकडं दृष्टी होती आणि आजूबाजूला वैविध्यपूर्ण सृष्टी होती. यातून अनेक गमती जन्माला आल्या. त्यावर आधारितच हे पुस्तक आहे. जरूर मिळवून वाचा. 

निसर्ग अनुभवायला दर वेळी काही लांब जावं लागत नाही, काही वेळा तो घराबाहेरच्या एखाद्या पडक्‍या भिंतीतसुद्धा सापडू शकतो. पावसाळ्यात निर्माण झालेली ओल अनेक जिवांना आसरा पुरवते. अशीच एक पडकी भिंत छोट्या डरेलचं विरंगुळ्याचं साधन होतं. त्याविषयी तो लिहितो.. 

फारशा न राखलेल्या बागेतली ती पडझड झालेली भिंत हे माझं विरंगुळ्याचं मोठंच साधन होतं. विटांच्या त्या भिंतीचे पोपडे पडले होते आणि त्यावर शेवाळं उगवून आलं होतं. पावसाळ्यात हे चांगलं टम्म फुगायचं आणि हिवाळ्यात खाली बसायचं. ती भिंत म्हणजे लहान-मोठ्या भेगांच्या रेषांनी बनलेला एक जाळीदार नकाशाच होता. खरंतर ते एक भूचित्र होतं. तुम्ही नीट थांबून पाहिलंत, तर तुम्हाला दिसेल की त्यावर बारकं गवत, नेचे, कुत्र्याच्या छत्र्या, शेवाळे, माळ-फुलं यांच्या आपापल्या जागा होत्या. डोंगरावर उभं राहून गावाकडं पाहिल्यावर दरी, नदी, गाव पवनचक्‍क्‍या यांचे एकत्र भूचित्र दिसावं तसं ते होतं. हिरवळी, जंगलं, कुरणं, सारं काही तिथं होतं. जिथं काही उगवत नाही असं एक छोटे वाळवंटसुद्धा तिथं होतं. कितीच्या किती दुपारी मी या भिंतीचं निरीक्षण करण्यात घालवल्या. इथल्या अळ्या, विंचू, भुंगे, माशा, गांडुळं यांनी माझ्या मनात घर केलं... 

या भिंतीतल्याच एक रहिवाश्‍याला छोट्या डरेलनं पाळायचं ठरवलं. कोण असेल तो प्राणी? आणि त्यानं काय भंबेरी उडाली असेल? 
पाहूया पुढच्या लेखात.

संबंधित बातम्या