माडीवरची मंडळी खाली आली.. 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

मला पडक्‍या भिंतीत राहणाऱ्या विंचवांबद्दल कुतूहल आणि प्रेम उत्पन्न झालं होतं. इतकं की त्यातल्या एकाला किंवा एकीला उचलून घरात आणावं आणि पाळावे असं माझ्या मनानं घेतलं होतं.. आणि एक दिवस तशी संधी मिळालीच! एक दिवस मला भिंतीच्या पोपड्याच्या आत एक जाडसर विंचवीणबाई भेटल्याच. लांबून पाहिलं तर असं वाटत होतं, की त्यांनी एक उबदार केसाळ कोट घातलाय. जवळून मात्र असं दिसलं, की तो कोट नसून त्या विंचवीणबाईंची पिलं आहेत. आपल्या आईच्या पाठीला ती चिकटून बसली होती. मला हे कुटुंब फारच आवडलं. मनात आलं, यांना घरी घेऊन जायला पाहिजे. म्हणजे मग मला ही पिलं वाढताना बघता येईल. इच्छेची अंमलबजावणी ताबडतोब करत मी एका रिकाम्या काडेपेटीत या कुटुंबाला अत्यंत काळजीपूर्वक ठेवलं. ही काडेपेटी घेऊन मी घरात शिरतच होतो, तेवढ्यात मला जेवणासाठी हाक आली. मी घाईघाईने काडेपेटी हॉलमध्ये टेबलावर ठेवली आणि जेवणाच्या टेबलापाशी जाऊन बसलो. जेवणाच्या वेळी नेहमीची कौटुंबिक संभाषणे चालू होती. आमचा कुत्रा रॉजर टेबलाखाली बसून निमूट ऐकत होता. थोड्या वेळात मी काडेपेटी आणि विंचवीणबाईंबद्दल पूर्णपणे विसरून गेलो. एवढ्यात आमचे थोरले बंधूराज लॅरी जेवण संपवून उठले आणि नेमके ‘त्या’ काडेपेटीपाशी गेले. त्यांना तीच काडेपेटी कशासाठी हवी होती कुणास ठाऊक? शांतपणे त्याने ती काडेपेटी उघडली आणि... 

मला आजही हे सांगायचेय, की यानंतर जे घडले त्यात विंचवीणबाईंचा काहीही दोष नव्हता. त्यांना काही आमच्या लॅरीला घाबरवून सोडायचे नव्हते. काडेपेटीत बंदिस्त झाल्याने त्या आधीच वैतागल्या होत्या. काडेपेटी उघडल्याबरोब्बर ती विंचूआई घाईघाईने बाहेर पडली. तिच्या पाठीवर तिची पिलावळ होतीच. ती लॅरीच्या हाताच्या पंजावर आली. तिथे आल्यावर काय करावे हे न कळून तिने आपली नांगी सज्ज केली. लॅरीला कसलीशी हालचाल जाणवली म्हणून त्याने हाताकडे पाहिलं आणि मग... 

एकच धुमाकूळ! लॅरीने एकच आरोळी ठोकली. त्याबरोबर आमच्या बहिणाबाईंच्या हातातली प्लेट खाली पडली. रॉजर टेबलाखालून बाहेर आला. लॅरीने हात झटकला आणि विंचवीणबाईंना दूर फेकले. विंचवीणबाई जेवणाच्या टेबलाच्या खाली गेल्या आणि माझा दुसरा भाऊ लेस्ली आणि बहीण मार्गो यांच्यामध्ये जाऊन पडल्या. त्यांची पिले इकडेतिकडे विखुरली. त्यांना काही हा तमाशा आवडत नव्हता. त्यांनी फणकाऱ्याने नांगी काढली आणि त्या लेस्लीच्या दिशेने जाऊ लागल्या. लेस्लीने आवेगाने पाय झटकला त्या बरोबर विंचवीणबाई मार्गोच्या दिशेने वळल्या. मार्गोने जी आरोळी ठोकलीये म्हणता! कोणत्याही रेल्वेच्या शिटीपेक्षा तिची आरोळी मोठी असेल! आईला झाल्या प्रकारातले काहीच कळत नव्हते. मुले अशी आरोळ्या का ठोकताहेत? काय झालेय हे बघण्यासाठी ती टेबलाच्या खाली वाकली. तेवढ्यात मार्गोच्या मनात आले, की आपण विंचवाच्या अंगावर पाणी टाकावे. तिने एक ग्लास पाणी जोराने त्या दिशेने भिरकावले. विंचवीणबाईंवर काही ते पाणी पडले नाही. आमच्या मातोश्रींच्या तोंडावर पडले. अचानक तोंडावर पडलेल्या थंडगार पाण्याच्या हबक्‍याने मातोश्री घाबऱ्याघुबऱ्या झाल्या. त्यांना शिंका येऊ लागल्या. विंचवीणबाईंची पिले इकडेतिकडे धावू लागली. रॉजर अजून जोराने भुंकू लागला. एकच हलकल्लोळ उडाला. 

‘हे त्या मूर्ख मुलाचे काम असणार!’ लेस्ली किंचाळला. 

‘त्याला आवरा,’ मार्गो कडाडली. 

‘आधी कुणीतरी त्या विंचवांकडे बघा,’ लॅरी काकुळतीने म्हणाला. 

‘अरे तुम्हाला झालेय तरी काय?’ आई शिंकत म्हणाली. तिला अजून काहीच कळत नव्हते. 

या सगळ्या हलकल्लोळात विंचू पिले जेवणाच्या टेबलवर इतस्ततः पडलेल्या प्लेट्‌सच्या खाली जाऊन लपली होती. बऱ्याच कष्टाने त्यांना आणि त्यांच्या आईला पकडून मी एका बशीत घेतले आणि चुपचाप त्या पडक्‍या भिंतीत सोडून आलो. ती दुपार मी आणि रॉजरने टेकडीवरच घालवली. सगळा गोंधळ शांत झाल्यावर आम्ही खाली आलो. मला कुणी काही बोलले नाही खरे; पण त्या दिवशी एक दुर्दैवी निर्णय झाला.. मी उनाड होत चालल्याचे आईचे मत बनले. मला नियमित शिक्षणाची गरज असल्याचे तिने जाहीर केले. माझ्या नाकात वेसण घालायची गरज होती असे तिचे म्हणणे पडले. 

(‘माय फॅमिली अँड अदर ॲनिमल्स’मधील विंचवाच्या गोष्टीचा पुढील भाग)

संबंधित बातम्या