ओरोच ते फर्डिनंड 

मृणालिनी वनारसे 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गंमत गोष्टी
​कशापासून काय होते?... 

दोस्तांनो, विंचू ‘पाळू’ बघणाऱ्या छोट्या जेराल्डची गोष्ट तुम्ही ऐकलीत. जेराल्डच्या या मुलखावेगळ्या पाळीव प्रेमानं त्याचं कुटुंबीय तीनताड उडालं. आपल्या, म्हणजे माणसाच्या जवळ आलेले रानातले प्राणी आपली अशीच भंबेरी उडवून देत असतील का? रानातले प्राणी जवळ आले आणि आपण त्यांना आपलंसं केलं. तुम्हाला आठवते लांडगा झाला कुत्रा त्याची गोष्ट? अर्थात हे काही एका रात्रीत घडलं नाही. दोन किंवा दहा रात्रीतही नाही! त्यासाठी माणसांच्या आणि लांडग्यांच्या अनेक पिढ्या जाव्या लागल्या. दोघांचं वागणं एवढ्या पिढ्या सारखंच राहिलं. दोघांना एकमेकांचा लळा लागला म्हणा किंवा फायदा समजला म्हणा. होता होता लांडग्याचा कुत्रा झाला. आता जगात कुत्रे फार आणि लांडगे थोडे. लांडग्याचा कुत्रा झाला. आपल्या चिकूला प्रश्‍न पडला होता, की वानराचा नर (माणूस) झाला म्हणजे काय झालं? लांडग्याचा कुत्रा झाला आणि वानराचा माणूस झाला या दोन्हीत फरक काय? हा प्रश्‍न तुम्हाला डोकं खाजवायला ठेवलाय बरं का.. 

तुम्ही उत्तर शोधताय तोवर आणखीन एक गोष्ट ऐकू. ही गोष्ट आहे फर्डिनंड नावाच्या एका बैलाची. कुत्रा आणि बैल यांच्यात सारखं काय? बरोबर, दोघंही पाळीव प्राणी आहेत. जसे त्या काळचे लांडगे माणसाच्या जवळ आले तसे काही हजार वर्षांपूर्वी आजच्या गाय-बैलांचे पूर्वज, त्यांचं नाव ओरोच, तेही माणसांच्या जवळ आले (किंवा माणूस त्यांच्या जवळ गेला, किंवा दोघं एकमेकांच्या जवळ आले). होता होता त्यांची आजची गाई-गुरं बनली. (पुन्हा एकदा आठवण करूया, की आजचा लांडगा आणि त्यावेळचा ‘तो’च्या जवळ आलेला लांडगा हे काही अगदी एकसारखे नव्हेत. तसेच ओरोच नावाची एक प्रजाती अगदी सतराव्या शतकापर्यंत पोलंडमध्ये टिकून होती. ती म्हणजेच आजच्या गायबैलांचे पूर्वज, असंही नव्हे. पण दोघं अगदी जवळचे नातेवाईक होते असं म्हणूया.) 

तर हे ओरोच माणसाच्या जवळ आले. दोघांचं चांगलं जमलं. कदाचित तोवर माणसानं चाबूक बनवला नसेल. पाठीवर असा चाबूक पडता तर कुठला ओरोच माणसाच्या जवळ थांबता! किंवा कुणास ठाऊक? आयती चारा-वैरण मिळत असेल तर चाबकाची काय तमा? आणि माणसानं तरी किती जीव लावला या प्राण्यांना! बघा तरी आपल्या भाषेत किती गाणी आहेत गाईवर आणि बैलावर. एक सुंदर अहिराणी गाणं आहे... 

माझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी 
माझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी 
घरच्या गाईचा पयला गोऱ्हा 
त्याचा मायसरका चेहरा 
शिंगायची बी तशीच तऱ्हा 
डोये भरीसन पाहाय जरा ...थाट सरदारी 
माझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी 
कामामधी तर हा अवं काई 
पायाच्या बाबे बाका लई 
अगीनगाडीले बधणार नाई 
तऱ्हाच याची समदी लई.. दुडकी हो मारी 
माझ्या मोऱ्याची काय सांगू भलरी 

गाण्यातले शब्द ओळखीचे वाटतात का? थोडा प्रयत्न केलात तर अर्थ लागू शकेल. या गाण्यातला मोऱ्या म्हणजे कोण? मोऱ्या म्हणजे अजून बाळ असलेला बैल म्हणजे वासरू किंवा गोऱ्हा. त्याचं कौतुक चाललं आहे. या मोऱ्याच्या मालकाचा किती जीव आहे आपल्या जनावरावर! अशा एकमेकाला जीव लावलेल्या मालक आणि मोऱ्या किंवा कपिला यांच्या कितीतरी गोष्टी, गाणी आपल्याला आपल्या साहित्यात आढळतील. आता मात्र परिस्थिती पालटते आहे. अशी जनावरं ठेवणं कुणाला फारसं परवडत नाही. आपल्या घरी दूध येतं ते कुठून येतं? जवळच्या गोठ्यातून? जवळच्या डेअरीतून? की माहितीच नसलेल्या कुठल्या तरी अज्ञात ठिकाणाहून? अनेकदा जिथं मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय चालतो, तिथं केवळ दुधासाठी आणि इतर उत्पादनांसाठी जिवंत ठेवलेल्या गाई-म्हशींची हालत फार गंभीर असते. त्यांना हलायला-डुलायलासुद्धा फारशी जागा ठेवलेली नसते. त्यांची हालत बघून त्यांचे ओरोच आजोबा काही खूष होणार नाहीत! 

पण आज मी जी फर्डिनंड नावाच्या बैलाची हकिगत सांगणार आहे ना त्याची तर पंचाईत वेगळीच होती. हा फर्डिनंड स्पेनमध्ये राहात होता. बैल म्हणजे वासरूच होतं ते. (म्हणजे त्यांच्याकडचा मोऱ्या बरं का!) त्याच्याबरोबर इतर वासरंही असायची. ती सगळी धावाधाव करायची, दंगामस्ती करायची, टक्कर टक्कर खेळायची. पण फर्डिनंडला मात्र असलं काही आवडायचं नाही. त्याला शांतपणं एका जागी बसून फुलांचा वास घ्यायला आवडायचं. 

असला कसला बैलोबा? वाचूया पुढच्या अंकात 

(ही गोष्ट लिहिलीये लीफ मुन्रो नावाच्या अमेरिकन लेखकानं. मराठी अनुवाद केलाय शोभाताई भागवतांनी.)

संबंधित बातम्या