ॲलिस आणि बोलकी फुलं 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 3 मे 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

‘लीलीबाई, किती सुंदर दिसता हो तुम्ही.. लिली, लिलू, तुला बोलता आलं असतं तर किती छान झालं असतं!’ ॲलिस म्हणाली. ओसाड प्रदेशात मधेच समोर आलेल्या एका बागेत उभी राहून ती फुलांच्या ताटव्याकडं पाहात होती. लिलीच्या एका सुंदर फुलानं तिचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

‘आम्ही बोलतोच मुळी. पण आमच्याशी कुणी बोललं तरच आम्ही बोलणार ना!’ लिली फिस्कारली. 

ॲलिसला प्रचंड आश्‍चर्य वाटलं. इतकं की तिला थोडावेळ काही बोलताच येईना. फूल बोलतंय? तिचा श्‍वासच अडकल्यासारखा झाला. लिली तिच्याकडं बघून मंद डुलत होती. ॲलिस चाचरत म्हणाली, ‘सगळीच फुलं बोलतात की काय?’ 

‘हो तर. अगदी तुझ्याएवढंच छान बोलू शकतात फुलं. चांगलं खणखणीत बोलू शकतात..’ लिली म्हणाली. 

‘त्याचं असं आहे, की आपणच बोलणं सुरू करण्याची रीत आमच्यात नाही. समोरचा बोलणं सुरू करेल अशी आम्ही वाट पाहतो,’ लिलीनं सांगितलं. 

गुलाब म्हणाला, ‘.. तर अगदी वाटच बघत होतो की तू केव्हा बोलशील. तुझ्या चेहऱ्याकडं बघून असं वाटत होतं की तुझ्यात काहीतरी खास आहे. तू हुशार नसशील.. पण तुझ्यात काहीतरी खास आहे! तुझा रंगपण अगदी बरोबर आहे.. म्हणजे जमलीच की बात.’ 

‘ए, रंगाचं मला काही एवढं वाटत नाही,’ लिली म्हणाली.. ‘तिच्या पाकळ्या तेवढ्या अजून छान वळलेल्या असत्या तर बरं झालं असतं.’ 

आपल्याविषयी ही फुलं असं काही बोलताहेत हे ॲलिसला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळं तिनंच विषय बदलत विचारलं, ‘या बागेला कुणी पाणी घालताना दिसत नाही. कुणी काळजी घेणारं नाही. तुम्हाला इथं भीती नाही वाटत?’ 

‘तिथं ते एक मोठ्ठं झाड दिसतंय का?’ गुलाब म्हणाला, ‘त्याचा दुसरा काय उपयोग आहे!’ 

‘संकट आलं तर झाड काय करणार?’ ॲलिसनं न कळून विचारलं. 

‘काही संकट आलं तर त्याच्या फांद्या एकमेकांवर घासतात आणि आवाज करतात. मग आम्हाला कळतं..’ डेझीचं फूल तिच्याकडं बघून मिश्‍कीलपणं म्हणालं. ॲलिसला आश्‍चर्य वाटलं. ‘तुम्ही सगळे इतकं छान कसं काय बोलू शकता?’ तिनं विचारलं. ‘आजवर इतक्‍या बागांमधे गेले आहे, पण मी कधी फुलांना बोलताना नाही ऐकलं.’ 

‘इथल्या मातीला स्पर्श कर.. म्हणजे तुला कळेल,’ लिली म्हणाली. 

‘ही जमीन तर चांगली कडक झालीये..’ ॲलिस म्हणाली. ‘पण त्याचा काय संबंध?’ 

‘त्याचं असं आहे, की बऱ्याच बागांमधे जमीन अगदी मऊ ओली ठेवतात. त्यानं फुलं सारखी झोपी जातात,’ लिली म्हणाली. 

हे कारण अगदी बरोबर होतं. ॲलिसला ते एकदम पटलंच. ‘असा विचार कधी केला नव्हता..’ ती स्वतःशीच म्हणाली. 

*** 

मित्रांनो, ‘ॲलिस इन वंडरलॅंड’ नावाच्या प्रसिद्ध पुस्तकातला हा उतारा. ॲलिस कदाचित तुमच्या ओळखीची असेल. तिच्यावर सिनेमे झालेत, मालिका झाली आहे. ‘ॲलिस इन वंडरलॅंड’ या पुस्तकाची अनेक भाषांतरं, रुपांतरंसुद्धा झाली आहेत. जरूर मिळवून वाचा. मूळ इंग्रजी पुस्तक तर जरूर वाचा. खूप मजा आहे. 

ॲलिसचा फुलांशी संवाद मला आपल्या ‘पाळीव’ गोष्टींची आठवण करून देतो. कसं माहितेय? फुलं जेव्हा म्हणतात, की सारखी निगराणी ठेवलेल्या बागेत ती झोपी जातात तेव्हा माझ्या मनात विचार येतो की बाग आणि जंगल यांच्यात काय वेगळं आहे बरं? बरोबर, बाग अगदी पाळीव आहे. आणि जंगल? जंगल अर्थातच पाळीव नाही, तिथं कोणी खत, पाणी घालायला जात नाही. तिथं वनस्पती आपल्या आपण वाढतात, पसरतात. त्यांना कधी कधी एकमेकांबरोबर स्पर्धा करावी लागते. कोण सूर्यप्रकाश मिळवायला उंच जाणार, कोण खाली जमिनीत खोलवर पाणी प्यायला मुळं पसरणार... जंगलात सगळं वेगळं होतं. तिथली झाडंसुद्धा त्यामुळं धट्टीकट्टी होतात. पाणी नाही मिळालं तरी गळून जात नाहीत. एखाद्या वेळी पावसानं ओढ दिली की लगेच वाळून जात नाहीत. पानं गळतात, एकमेकाच्या साथीनं राहतात, कीटकांशी आणि पक्ष्यांशी, वटवाघळं आणि मातीतल्या जीवजंतुंशी दोस्ती करतात आणि वर्षानुवर्षं छान राहतात. अशी छान झाडं आणि फुलं तुमच्याशी बोलली तर त्यात नवल ते काय! बागेतली फुलं मात्र स्वतः काही करावं न लागल्यामुळं झोपी जातात. 

गंमतशीर कल्पना आहे ना? तुम्हाला काय वाटतं? बागेत जाऊन बघा बरं...

संबंधित बातम्या